तिचा संघर्ष भाग-36

Every Woman Wants Love, respect And Support.
भाग-36

  

उद्या जोशना च्या होणाऱ्या सासरी आपल्याला लग्नाच्या बैठकीसाठी जायचे आहे हे आदल्या रात्री संतोष ने त्याच्या मित्रांना व गावात राहणाऱ्या त्याच्या मामाला सांगितले होते. तसेच दहा वाजता सगळ्यांनी संतोष च्या घरी जमायचं असं त्यांचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे सकाळी सर्वजण संतोष च्या घरी आले होते. संतोष ने ही त्याचं सर्व आवरले होते. तोही अंगणात मामाची आणि मित्रांची वाट पाहत थांबला होता. सर्वजण शिदोरी घेऊन जोशनाच्या सासरी निघाले होते. जाता-जाता संतोषने जयाला आणि आत्याला ही बस स्टॅंडवर सोडले. सर्व मंडळी राकेश च्या घरी पोहोचली.
पण घरात कसलीही तयारी दिसत नाही म्हटल्यावर न राहून संतोष चे मामा राकेश ला म्हणाले, "राकेश आम्ही येणार हे तू घरच्यांना सांगितले नव्हते का ? त्यांची काहीच तयारी दिसत नाही म्हणून म्हणलं."
" म्हणजे ? काय म्हणायचे तुम्हाला, तुम्ही येणार म्हटल्यावर बँड, बाजा तयार ठेवायचा होता का तुमच्या स्वागताला ?" राकेश उद्धटपणे मामाला म्हणाला.
"नाही म्हणजे तुमच्या भावकीतले, पाहुणे मंडळी कुणीच दिसत नाही असं म्हणायचं होतं मामाला." संतोष म्हणाला. 
" भावकीचं अन् आमचं लय वाकडं हाय म्हणून कुणी येणार नाही. तुम्ही बसा आत जाऊन, आलोच मी." म्हणून राकेश निघून गेला.
"आरं संतोष, तुझ्या आईचं आणि त्या जोशना चं सोड ; पण तुला बी माणसांची पारख नाही राहिली व्हय रं ? ही काय माणसं नीट नाहीत, ही माहित असून बी तुला जोशना साठी हेच स्थळ कसं काय बरं वाटतंय मला तर काय कळना गेलंय बघ." मामा चिडून म्हणाला.

"अरं तुला आईचा स्वभाव माहितीये ना, एकाच गोष्टीला धरून बसायचा. जोशनानंच तिला राकेश लय आवडतोय म्हणून सांगितलंय, त्याच गोष्टीला धरून बसली आहे बघ ती. आणि तुला काय वाटतं मी या स्थळाला विरोध केला नसेल ; पण तेव्हा ती मलाच मध्ये पडू नको म्हणाली." संतोष स्पष्टीकरण देत म्हणाला.

हे सर्व संभाषण दारात उभे राहूनच चालू होते. कोणाचेही जराही लक्ष आलेल्या पाहुण्यांकडे नव्हते. राकेश बाहेर जाऊन परतही आला तरी पाहुणे दारातच उभे होते. मग राकेश च अगदी पाहुण्यांवर उपकार केल्यासारखे त्यांना म्हणाला, "अजून इथेच थांबलात का ? चला आत मध्ये."

गुपचूप सगळे जण आत मध्ये गेले. कोणी साधे पाणीही विचारले नाही आलेल्या पाहुण्यांना. राकेश चे वडील म्हणाले, "आमच्या मुलाला बक्कळ स्थळं येत आहेत, पण तुमच्या बहिणीत त्याला काय दिसले कोण जाणे?"

"ती जरा बाजूला ठेवा, अन् मुद्द्याचं बोला." राकेश वडिलांना म्हणाला. तेव्हा मात्र संतोष च्या मामाने आणि संतोष ने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. \" कुठे माझा भाचा संतोष, जो आई वडिलांचा मान राखण्यासाठी आणि बायकोच्या ईच्छा पुर्ण  करण्यासाठी एवढा मोठा त्याग करतोय आणि कुठे हा उद्धट मुलगा वडिलांचा पाहुण्यांसमोर ही थोडा सुद्धा मान राखत नाहीये.\" मामाने मनात विचार करून डोक्याला हात लावला. "व्हय, व्हय." म्हणत राकेश चे वडील आपल्या मागण्या एखाद्या संघटनेचे अध्यक्ष शासनापुढे जशा मांडतात त्याप्रमाणे एक-एक करून मांडू लागले. "पंधरा तोळे सोने, मुलीचे व मुलाचे कपडे तुमच्याकडेच असतील आणि भांडीकुंडी देण्याऐवजी पैसे दिले तर बरे होईल आणि हो लग्नही तुमच्याकडेच असेल." राकेश च्या वडिलांनी एका दमात सगळ्या मागण्यांचा प्रस्ताव पाहुण्यांसमोर ठेवला. संतोष आणि मामा उठून बाहेर गेले.

" काय करतोय रे असा ही पोरगा ? की याला इतका हुंडा दिला पाहिजे." मामा रागाने म्हणाले.
"मला वाटतं मामा, आईची इच्छा आहे जोशना च लग्न ह्याच घरात जमलं पाहिजे तर असू द्या. टाकू जमवून." संतोष शांतपणे म्हणाला.
"चला मग आत." म्हणून संतोष आणि मामा आत मध्ये गेले. हुंडा मान्य करून पाहुणे उठणार तोच राकेश म्हणाला," तुम्हाला पाणी आणू का ?"
"नाही, नको." म्हणून संतोष, त्याचे मित्र आणि मामा घरी आले. संतोष ने आईला सगळ्यांसाठी चहा करायला सांगितला. मामा स्वयंपाक घरात जाऊन संतोष च्या आईला म्हणाले, "फक्त बैठक पक्की झालीय. अजून वेळ गेलेली नाही, विचार कर बर का ताई. माणसं अजिबात चांगली नाहीत. अगं हुंडा मागण्याची काय पद्धत असते की नाही." मामा काळजीपोटी म्हणाले. पण आईला जोशना च्या भविष्याची काळजी असल्यामुळे आई वड्यावरचं तेल वांग्यावर काढत उलट मामालाच म्हणाली, "तुला काहीच पारख नाही रे माणसांची. ती दीपा तुझ्याच पसंतीने सून म्हणून आणली होती ना ह्या घरात, काय झालेय दिसते ना तुला."

\"गाढवाला गुळाची चव काय \" हा मनात विचार करून मामा स्वयंपाक घरातून बाहेर गेले.

चहा घेऊन आई संतोष जवळ आली. आणि संतोष ला म्हणाली, "कसं कसं ठरलं रं लग्न ? एवढी बैठक झाली साधा कुंकाचा टिळा लावला नाही तुमच्या कपाळाला."

"अहो काकी, तासभर दारात उभारल्यावर आत या म्हणणारी माणसं इतका मान देतील का ?" संतोष चा मित्र म्हणाला. संतोषने हुंडा ऐकवला तेव्हांच आईला घाम फुटला होता पण आता माघार घेणं जोशनासाठी तिला शक्य नव्हतं, म्हणून आई गप्प बसली होती. मामा आणि मित्र निघून गेले. आईने संतोष ला जेवायला वाढले. जेवण करून संतोष शेतावर गेला. सायंकाळच्या वेळी पुन्हा राकेशने जोशना ला फोन केला. त्याचा फोन चालू झाला तशी जोशना "नाही, का बरं ? कधीच नाही." अशा शब्दात अगदी वैतागून बोलत होती. जोशना चे डोळे भरून आले होते. जोशना ने फोन ठेवला तशी आई जोशना जवळ जाऊन म्हणाली, " काय म्हणत काय होता राकेश ? तुला काय झालं रडायला?" "आई, मला तर आता काहीच कळंना गेलंय बघ." जोशना आईच्या गळ्यात पडून रडू लागली. "अगं तू सांगितलंस तर कळंल ना मला. काय झालं सांग बरं." "आपली सगळी जमीन राकेश च्या नावावर करा म्हणतोय राकेश." जोशना म्हणाली. "आता गं बाई ! हुंडा बी द्या आणि वरून जमीन बी नावावर करा. आम्ही काय करायचं ? कसं जगायचं ? अन् संतोष ला आता काय सांगायचं ?" आईच्या डोळ्यातून आसवांचा पूर वाहू लागला.

------------


संध्याकाळी दीपा शतपावली करायला जाताना दुर्वा तिला धावण्याचा सराव करताना दिसली. दुर्वा ची पोलीस भरतीची लेखी परीक्षा दूर्वा ने चांगल्या गुणांनी पास केली होती. आता ती फिजिकल साठी प्रयत्न करत होती. "बापरे वार्‍याच्या वेगाने धावतेस तू." दीपा दुर्वा ला म्हणाली. "आणखी एक दाखवू का ?" म्हणून दुर्वा सरसर सरसर कंपाऊंड वॉल वरून आश्रमातील झाडांचा आधार घेत स्लॅब वर जाऊन पोहोचली. दीपा आश्चर्याने पहात उभी होती. "अगं खाली ये लवकर." दीपा घाबरून खालून आवाज देत होती. तेवढ्यात ज्या वेगाने दूर्वा वर गेली होती त्याच वेगानं खाली आली. "बघितलंस मी किती ट्रेन झाले ते !" दूर्वा म्हणाली. "आता फिजिकल मध्येही तुझं सिलेक्शन होणार यात शंका नाही बघ." दीपा कौतुकाने दुर्वा ला म्हणाली. मस्त गप्पा मारत दोघींनी शतपावली केल्यावर दीपा हॉलमध्ये येऊन बसली होती. तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला. तो दीपाने उचलला. दीपा ने "हॅलो" म्हणताच, समोरून आवाज आला.
" हॅलो दीपा, आई कुठेय ? तिचा फोनच लागत नाही." 

" तुम्ही शार्दुल सर का ? तुम्हांला कसं कळलं मी बोलतेय ते. आणि मॅडम आणि माझी आई आश्रमात बसल्या आहेत. बहुतेक मॅडमचा फोन रूम मध्ये चार्जिंग ला लावला असेल, म्हणून स्विच ऑफ असेल. मी बोलवून आणू का मॅडम ना?" एवढी सगळी वाक्य एका दमात बोलल्यावर दीपा शांत बसली.
पण दीपालाच कळत नव्हते की, ती आज इतकी आनंदी का होती ते ?
"अगं दीपा, किती बोलतेस तू ! नक्कीच उत्कृष्ट वकील होणार बघ तू. माझं ऐकून तर घे. मी लवकरच भारतात येणार आहे हे आईला सांगायचं होतं. पण असू दे. मी करेन नंतर तिला फोन. ओके बाय." म्हणून शार्दुल ने फोन ठेवला.

\"शार्दुल सर भारतात यावे, ही मॅडम ची इच्छा पूर्ण व्हावी; अशी माझी इच्छा असल्यामुळे आज शार्दुल सरांनसोबत बोलताना मीच खूप आनंदी होत असेल कदाचित.\" हा दीपाने मनात विचार केला. 

शार्दुल च्या येण्याने मॅडम च्या आयुष्यात आनंदाचे पर्व येईल, पण दीपाचं काय ? पाहूयात पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील.

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका.

कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

# साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.




🎭 Series Post

View all