भाग-33
"आई, जेवण तर करून जाऊ की गं. मला लई भूक लागली बघ." दवाखान्याच्या बाहेर असलेल्या बागेजवळ आल्यावर जोशना तिच्या आईला म्हणाली.
"जेव बाई तुझी तू, माझी तर तहान-भूकच निघून गेलीय." आई म्हणाली. "बरं जेवते बाई माझ्या मी." म्हणून जोशना जेवायला बसते. आईच्या मनात सतत दीपाचे च विचार घोळत होते. "ती दीपा, शहरात आल्याआल्याच इतकी श्रीमंत कशी झाली असंल बरं ? आधीपासूनच कुणीतरी असंल तिचा मित्र ज्यानं तिला ठेवून घेतलं असंल इथं. नाहीतर काय आहे तिच्या आबाजवळ ? आता मी काय बी करून संतोषच दुसरं लग्न लावते कनाय बघ. भरपूर हुंडा बी घेते." आई म्हणाली.' संतोषला मूल होत नाही हे फक्त मलाच माहीत आहे शालिनी ताईला कुठं माहीत आहे ? शालिनी ताईची जयाच आता माझी सुन करणार.' आई मनात विचार करत होती.
"काय तर काय बोलते ग आई, दीपानं काय दादाला घटस्पोट दिलाय व्हय ? आता काय पहिल्यासारखं नाही राहिलं बघ, कितीही बायका केल्या तरी चालतात. आता पहिली बायको जिवंत असेल तर तिच्या परवानगीनेच म्हणजे तिला घटस्फोट देऊनच दुसरं लग्न करता येतय नाहीतर तुरुंगात जावं लागतंय खडी फोडायला." कायदेपंडित असल्यासारखं जोशना टीव्हीवरच्या मालिकांमधून, चित्रपटांमधून तिला जेवढं माहित होतं तेवढं आईला सांगत होती. आईच्या मनातल्या विचारांची शृंखलाच बंद झाली. आई खडबडून जागी झाली. "अगोSssबाई असं असतंय व्हय ? बरं. उरक पटकन निघू लवकर." हे आईचं वाक्य ऐकल्यावर डबा गुंडाळून जोशना उभी राहिली. आई दीपाचा अन् जोशना राकेश चा विचार करत प्रवासात अतिशय चिंताग्रस्त दिसत होत्या. दिवस मावळायच्या वेळेला दोघी मायलेकी घरी पोचल्या. संतोष मात्र नुकताच शेतातून येऊन बसला होता. जोशना ला चहा करायला सांगून आई संतोष जवळ जाऊन बसली. आणि सकाळपासून पोटात साठवलेलं सगळं कधी एकदा संतोष समोर ठेवते असं आईला झालं होतं. तेव्हा आई संतोष ला म्हणाली, " व्हय रं संतोष, दीपा कुठं असतीय? तिच्या घरची पण शहरात गेलेत वाटतं ?"
"काय करायचय आपल्याला ? आपला आणि तिचा संबंध संपलाय आता. तेव्हा मला तु तिच्याबद्दल काहीच विचारू नकोस." संतोष रागाने म्हणाला. "अरे जोशना म्हणत होती, असा संबंध संपत नसतोय त्यासाठी तुला तिला काय तर द्यावं लागतं. काय ग जोशना ? (आई जोशना ला उद्देशून म्हणाली.) "घटस्फोट. कनाय रं दादा" जोशना घाबरत घाबरत म्हणाली." हं, त्यो देवून काय करायचंय ?आणि आज बरी तुला दीपाची अचानक आठवण झाली." आता संतोष चा पारा चांगलाच चढला होता. तेव्हा आईनं विषय तिथल्या तिथेच थांबवला. "अरे दादा आज कनाय दीपा वहिणीसारखी एक बाई लय मोठ्या गाडीतून जात होती आम्ही बघितलं. म्हणून आईला आज आठवलं."
"गावात आलती का आपल्या?" संतोष म्हणाला. "नाही रे, आम्हीच गेलतो शहरात. जोशना बोलत असताना तिचे लक्ष आईच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे गेले ते पाहून ती गप्प बसली. "जा, चहाच बघ." आई रागातच म्हणाली. जोशना तिथून गेली. 'आधी आपणच बोलवायचं अन् परत घालवायचा बी आपणच.' जोशना हळूच पुटपुटली.
"अन् तुमी कशा ला गेलतात शहरात?" साशंक नजरेने संतोष आईला म्हणाला. "काय नाय रे पाडव्याची खरेदी करायला गेलतो." आई विषय टाळत म्हणाली.
"बर ती जाऊ दी. ती फोटुग्राफर राकेश आपल्या जोशना साठी चांगला हाय नव्ह. नाही म्हणजी ती लोक जोशना बद्दल विचारत होती." आई म्हणाली.
"ती मोप विचारतील गं ! पण आपण द्यावं का तसल्या घरात. काय करतय पोरगं तर गावभर पोरींचे फोटो काढत फिरतयं. थांब की जरा. बघतोय की मी तिच्यासाठी स्थळ." संतोष चिडून म्हणाला.
"नाही दादा, मला त्याच्याबरोबरच लग्न करायचय." जोशना चहा देत देतच म्हणाली.
"बघितलस का ? तवा सारखी मोबाईल घेऊन बसायची म्हणून बोललो, तर तुला किती वाईट वाटलं होतं. आता बघ स्वतःच पोरगं पसंत केलंय लग्नासाठी." संतोष तावातावानं म्हणाला. संतोषने आणि आईने चहा संपवला. जोशनाला दिवस गेल्यामुळे आता संतोष ची बाजू घेणं आईला शक्य नव्हतं. लोकांचं वाकून बघणारी आई आज आपल्या लेकीचं झाकून ठेवण्यासाठी संतोषलाच म्हणाली, "असु दे. केला ना तिनं मुलगा पसंत, करू दे. मग तिचं लग्न त्याच्या बरोबरच व्हणार, तू काय मधी पडू नकोस."
"तुमचं ठरलंय तर मग. मी नाही मधी पडणार." म्हणून संतोष रागाने उठून बाहेर निघून गेला. संतोष ला आज जोशना चं तसल्या मुलाबरोबर लग्न जमतंय याचं दुःख आणि जोशना चे लग्न झाल्यावर आपल्याला दीपा जवळ आणि आपल्या बाळाजवळ राहता येईल याचा आनंद अशी दुहेरी अवस्था झाली होती. संतोष न जेवताच रानात निघून गेला होता म्हणून आईला काळजी वाटत होती. रात्रीची झोप सुद्धा उडाली होती.
पण इकडे दीपा मात्र अतिशय आनंदात होती. दररोज कॉलेजमधले लेक्चर, घरच्या नोट्स आणि त्या एवल्याशा जीवाची चाहूल त्यामुळे दीपाचा उत्साह ओसंडून वाहत होता. किती करत होत्या मॅडम दीपासाठी. कॉलेजला जायला एका पेक्षा एक सुंदर ड्रेस मॅडमनीच तर खरेदी केले होते. मॅडमनी जवळच असलेल्या गर्भसंस्कार शिबिरात दीपा चं नाव नोंदवलं होतं. दीपा नको म्हणत असतानाही गर्भसंस्कार शिबिरासाठी वेगळे ड्रेस अगदी आग्रहाने खरेदी करणे म्हणजेच स्वतःच्या लेकीसारखी काळजी घेत होत्या मॅडम. दिवसेंदिवस गर्भसंस्कार केंद्रातील व्यायाम, स्तोत्र आणि योग्य आहार यामुळे दीपाच्या मनावरील सर्व ताणतणाव नाहीसा होत होता. आधीच निरागस असलेली तिची छबी आता तर गरोदरपणाच्या नितळ कांतीने उजळून निघाली होती. " किती सुंदर दिसतेय माझी लेक!" म्हणून आईनं दीपाच्या डोक्यावरून गाला पर्यंत हात फिरवला. आज दीपाला तीन महिने पूर्ण झाले होते. आणि त्यासाठी आई आणि मॅडम दीपा सोबत दवाखान्यात चालल्या होत्या. सोनोग्राफी करताना दीपा खूपच घाबरली होती पण मॅडम नी तिला "बाळाला भित्रं बनवायचे का?" म्हणताच दीपा मध्ये अचानकच शौर्य संचारल. सोनोग्राफीचे रिपोर्टही छान होते. पण दीपाचा हिमोग्लोबीन म्हणावा तेवढा वाढतच नव्हता एवढी गायनिक असलेल्या मॅडमची तक्रार होती. "बघितलंस का दीपा, दिवस गेल्यावर आपल्या सोबत आपल्या बाळाचे ही पोट भरावे लागते म्हणून दुप्पट खावं लागतं." मॅडम दीपाला उद्देशून म्हणाल्या.
"हो मॅडम." म्हणत दीपाने स्मितहास्य केले.
"आम्ही अजून काळजी घेऊ." मॅडम गायनिक मॅडम ना म्हणाल्या. " दीपा तुला बाहेरचं काय खावं वाटतं का ग? नाही म्हणजे ती बाळाची इच्छा असते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तरच बाळ मोठं झाल्यावर हट्टी होणार नाही." मॅडम म्हणाल्या. हो म्हणावे की नाही या द्विधा मनस्थितीत असलेली दीपा बाळाचे नाव काढताच "हो मॅडम, पाणीपुरी खावीशी वाटतेय मला खूप." असं चटकन म्हणाली. दीपा गाडीतून उतरेपर्यंत मॅडम आणि दीपा ची आई हॉटेलच्या पायरीजवळ आल्या होत्या न राहून दीपाच्या आईने विचारलं, "असं असतं का हो मॅडम, आम्हाला तर बाई असलं काहीच माहीत नव्हतं. गरोदर असल्यावर हे करायचं ते नाय करायचं."
मॅडम म्हणाल्या, "अहो मी म्हणाले असते सांग दीपा, तुला काय खावेसे वाटते ते. मग ही माझी लेक सांगणार होती का मला? नाही न ! बाळाचं नाव काढल्यावर दीपा काय खायचं हे नक्की सांगेल याची मला खात्री होती म्हणून मी ही मुद्दामच अस म्हणाले. ते म्हणतात ना, "सीधी उंगली से घी जब नही निकलता तो ऊँगली टेढ़ी करनी पड़ती है।" मॅडम हिंदीत व्यक्त झाल्या खर्या, पण ते दीपाच्या आईला समजले का नाही ? अशा साशंक नजरेने त्या दीपाच्या आईकडे पाहत होत्या. तेवढ्यात दीपाच्या आई म्हणाल्या, "समजलय मॅडम मला तुम्हाला काय म्हणायचं ते. आमच्या शेजारच्या यास्मिन भाभी नेहमी असं म्हणत्यात बघा. बोलता येत नसलं तरी मला कळतंय तुमी बोलल्याल." दीपाच्या आई हसून म्हणाल्या. दीपा आली म्हणून दोघेही शांत बसल्या.पाणी पुरीची मॅडमनी ऑर्डर दिली. मनसोक्त पाणीपुरीचा दीपाने आस्वाद घेतला. आणि दीपा हळूच मॅडमना म्हणाली, "मॅडम." "हा बोल दीपा." मॅडम म्हणाल्या.
"आईस्क्रीम पण खावंसं वाटतंय!" दीपा जीभ चावत म्हणाली. "मग आता खावेच लागणार." मॅडम म्हणाल्या. पण मॅडमनी आणि दीपा च्या आईनी एकमेकींना स्माईल देत त्या प्रसंगाचा आनंद घेतला. छोटीशी पार्टी एन्जॉय करून सगळेच घरी परतले. आबा म्हशीचे दूध काढत होते. दीपा तिथेच उभी राहिली. दीपा तिच्या भूतकाळात रममाण झाली. दीपा लहान होती तेव्हा त्यांच्याकडेही अशीच एक म्हैस होती आणि आबांनी दूध काढले की आई दीपाला सर्वात पहिले दूध द्यायची. आबांनी पोटात बाळ असेपर्यंतच मुलाची अपेक्षा केली होती पण पुन्हा मात्र मुलींना कधीच तुम्ही मुलगी आहात हे त्यांच्या कृतीतून जाणवू दिलं नव्हतं. म्हणूनच आज दीपा मनात विचार करत होती.'म्हणजे लोक म्हणायचे की, माझ्या आबांना मुलाची वाट बघता बघता एवढ्या मुली झाल्या, पण आमच्या आई-आबांनी आमचं मन कधीच दुखवलं नाही त्यामुळे आत्ता मला आई-बाबांचं खरं महत्त्व कळालंय. खूप जीव आहे त्यांचा आपल्या मुलींवर. ' दीपाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. आबा दूध काढून दीपा जवळ आले. पोरी इथं काय करतेस गं? चल आत मध्ये." म्हणून दीपाला घेऊन आबा आत आले.
क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील
कथा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. आणि मला "फॉलो" पण करा.
कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
# साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.
कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे आभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा