Login

तिचा संघर्ष भाग-32

Every Woman Wants Love,respect And Support.

भाग-32



" बोल बाई, आता तुला काय सांगायचंय ते सांग.आताच त्या पोरानं जे सांगितलंय त्यानं माझ्या पायाखालची जमीन सरकलीय आणि आता तुला काय सांगायचंय ती सांगून मोकळी हो बाई पटकन." आई म्हणाली.

"काय सांगितलं दादानं ?" जोशना म्हणाली.

"तुला काय सांगायचे ते सांग आधी. लागली दादा च ईचारायला. उठ की सुट ती मोबाईल हातात घ्यायचा अन् सगळं गाव धुंडाळून यायचं. जरा बग घरातल्या कामाचं. आईचा जीव मेटाकुटीला आलाय, काम करून करून ते नाही तुझ्या ध्यानात यायचं."आई ओरडूनच म्हणाली. 

\" बाई, दादांनं आईला असलं काय सांगितलय काय माहीत ? की आता आईचा मूडच बदललाय. नको आता हिला काही सांगायला.\" जोशनाने मनात विचार केला.पण रात्रभर जोशना च्या काही डोळ्याला डोळा लागला नाही. कारण नियमित येणारी तिची पाळी चुकली होती. आता काय करावं ? हेच तिला कळत नव्हतं.

दीपा गेल्यापासून संतोष दररोज रानात झोपायला जात होता. रात्री त्याने मोबाईल काढला पाहतो तो काय ! मॅडम नी दीपाचा आणि त्यांचा फोटो स्टेटसला ठेवला होता आणि संतोष ला दीपाचा एकटीचा फोटो इडीट करून पाठवला होता. फोटो मधल्या दीपाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत दीपाच्या आठवणीने संतोषचे डोळे पाणावले होते. पण नंतर डोळे पुसत त्याने फोटोतल्या दीपाला लवकरच मी बाळासोबत आणि तुझ्यासोबत असेल. म्हणून प्रॉमिस केले. \"खरंच, खूप दिवसांनी दीपाला इतके प्रसन्न पाहून मी घेतलेला निर्णय योग्य आहे अशी माझी खात्री झालीय.\" हा मनात विचार करून संतोषने स्मितहास्य केलं. \"छान !\" म्हणून मॅडम ना रिप्लाय ही पाठवला. \"धन्यवाद.\" म्हणून मॅडमनीही रिप्लाय पाठवला. मॅडम च्या मनात विचार आला, \" चला ज्याच्यासाठी स्टेटस ठेवला होता, त्याचा उशिरा का असेना रिप्लाय आला. लवकरात लवकर संतोष आणि दीपा तुम्ही एकमेकांच्या जवळ या हीच इच्छा असेल माझी.\" म्हणून मॅडम ही खूप खुश झाल्या.

सकाळ झाली तशी जोशना कोरड्या उलट्या करत होती. हे बघून आईला दरदरून घाम फुटला.

"अगं ये जोशना, काय झाले बाई तुला ? अगं दिवस गेल्यासारख्या उलट्या काय करायलीस." आई रडत रडत म्हणाली.

"तिच तर तुला सांगायचं होतं. पण दादांनं काय बाय सांगितलं म्हणून तू माझं ऐकून घ्यायच्या इचारात होतीस का काल ? म्हणून मी तुला काहीच नाही सांगितलं." जोशना म्हणाली.

"म्हणजी काय सांगायचं काय व्हतं तुला ? सांग लवकर. हितं जीव झुरणीला लागलाय माझा." आई म्हणाली.

"आई, खरंच मला दिवस गेलेत वाटतयं गं." जोशना रडत रडत म्हणाली.

"अगं लाज वाटते का तुला असं बोलायला?" आई म्हणाली. आईला ब्रम्हाण्ड आठवले. "लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची ? पोरीनं घराण्याच्या तोंडाला काळं फासलं. किती अन् काय काय नाही केलं गं जोशना मी तुझ्यासाठी? आणि तू असलं दिस दावलं का मला. "आई धाय मोकलून रडू लागली.

"हे सगळं बी तुझ्यामुळंच झालंय." जोशना म्हणाली.

"अगं, काय तुझ्या जिभेला हाड हाय का नाही ? का उगा आपली उचलली जीभ लावली टाळ्याला. मी म्हणलं तुला असं वाग म्हणून." आई म्हणाली.

"म्हणल नाहीस, पण दीपा साठी खड्डा खोदायला सांगितलास अन् त्यात मीच पडले बघ." जोशना रडत रडत म्हणाली.

"अगं काय बोलतिस? नीट सांग की मला, काय झालं ते?" आई म्हणाली.

"तूच माझं वाटोळं केलंस बघ. त्या दीपाला कॉलेजला जायला येऊ नये; म्हणून मला मावशी कडून इथं बोलवून घेतलं आणि तिची घरची शिकवणी बंद झाली तशी, बाहेरची बंद व्हावी म्हणून काय तर कर. असं तूच म्हणली होतीस का नाय. आलं का नाही तुझ्या ध्यानात ? " जोशना म्हणाली.

"मग त्याचा आन् ह्याचा काय संबंध गं ?" आई म्हणाली.

"सांगते की, त्यादिवशी दीपा च्या मागं मागं जाताना मला रस्त्यात ती राकेश भेटला. अन त्याला फोटु किती चांगलं काढता येतात ही तर तुला माहीतच हाय की. मग मीच त्याला लांब- लांब उभारलेल्या दीपाला आणि गौरवला फोटुत जवळ- जवळ आण म्हणून सांगितलं. त्यानं काय तर करून ती केलं बी. पण मला काय माहित होतं ? त्यो पुढं ती सगळं दादाला सांगंल म्हणून मला सारखं धमकावील ते. मी त्याला दादा कडून खर्चायला म्हणून घेतलेले पैसे बी दिले, पण त्यानं मला रानात बोलवलं अनं हे सगळं घडलं." जोशना रडू लागली.

"अगं मग आई काय मेलती का काय तुझी ? एका शब्दाने बी तु मला सांगितलं नाहीसं ते." आई रागा रागानं म्हणाली.

"अगं तू तवा घरात नव्हतीस. आजीचा पाय मोडल्यामुळे तू दवाखान्यात होतीस. मग आता दादाला कळलं, तर दादा काय करंल? म्हणून मी लय घाबरले होते बघ." जोशना म्हणाली.

"बर आता उरक लवकर. शहरात जाऊन काहीतरी करावं लागंल. हितं जर कुणाला कळलं तर गावात तोंड दाखवायला बी जागा उरायची नाही बाई." आई म्हणाली.

दोघींनी मिळून कसाबसा स्वयंपाक उरकला. संतोषला आजी कडे लक्ष दे. म्हणून फोन करून सांगून दोघीही शहराकडे जायला निघाल्या. आईच्या मनात देवाचा धावा सुरू होता. पण माणसांना दुःख देणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीना देव तरी कसा माफ करेल बरं ? असं म्हणतात ते अगदी खरं आहे.  जोशनाला आणि तिच्या आईला गाडीत बसून अवघे पंधरा मिनिट झाले होते. तेवढ्यात राकेशने जोशना ला फोन केला अन् तो म्हणाला, " ये जोशना, तुझ्या पोटातल्या बाळाला जर काय झालं तर गावात मी तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल च सगळं सांगत सुटीन. तवा गेलीस तशी परत ये नाहीतर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे ते." म्हणून त्याने फोन ठेवला. जोशना रुमाल डोळ्याला लावून रडू लागली.

"काय झालं गं जोशना रडायला?" आई म्हणाली.

"अग त्या राकेश चा फोन होता. तो आता मला म्हणत होता की, गेली तशी परत ये. बाळाला जर काय झालं तर गाठ माझ्याशी आहे." जोशना रडत रडत म्हणाली.

"बिनडोक हाय का काय गं तू. त्याला कशाला सांगायचं होतं?" आई म्हणाली.

"आता मी खरं प्रेम करतेय गं त्याच्यावर. आम्ही दोघं लग्न बी करणार आहोत. तू फक्त दादाला तयार कर." जोशना म्हणाली.

"अगं तुम्ही दोघं करचाल गं लग्न, पण त्याच्या घरच्यांचं काय ? लग्नाआधीच दिवस केलेली मुलगी सून म्हणून आवडंल का कुणाला ? जरा इचार कर." आई दबक्या आवाजात म्हणाली.

"तू आता शांत बस बरं. राकेश न इचार करून सगळं ठरवलंय." जोशना म्हणाली. शहरातल्या बस स्थानकावर बस येऊन थांबली. तेव्हा जोशना आणि तिच्या आईनं रिक्षा बोलावली. रिक्षात बसून त्या दोघी प्रख्यात प्रसुती तज्ञ असलेल्या एका मॅडम कडे निघाल्या. रिक्षावाल्यांने रिक्षा पेट्रोल पंपाकडे वळवली. 

"आव इकडं कुठं?" आपला अडाणीपणा सिद्ध करत जोशना ची आई म्हणाली.

"कुठे म्हणजे? पेट्रोल पंपावर आणली आहे रिक्षा. पेट्रोल भरावे लागेल की नाही रिक्षात?का हवेवर चालते रिक्षा?" रिक्षाचालक म्हणाला.

"बरं.बरं.भर गप." जोशनाची आई म्हणाली.अचानक एक सुंदर गाडी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आली. "काय बाई, किती श्रीमंत माणूस असेल हा! किती सुंदर गाडीय बाई ही !" जोशना म्हणाली.ती सुंदर गाडी जोशना आणि तिच्या आईच्या रिक्षा पासून थोडी दूर होती.

"त्या गाडीत बसलेली ती पोरगी बघितलीस का? किती  अभ्यास करायलीय नाहीतर तुला, मोबाईल शिवाय काय सुचतं का? अशाच पोरी काय ती आई बापाचं नाव करू जाणं बाई. आमच्या नशिबात कुठलं असलं सुख. " आई रागानं म्हणाली. तेवढ्यात ती गाडी अगदी शेजारीच येऊन उभारली. ज्या सुखा ला लाथाडलं गेलं ते सुख त्या गाडीत असेल असं जोशना आणि तिच्या आईला दोघींना स्वप्नातही वाटलं नव्हतं. गाडीतली ती सुंदर मुलगी दुसरी, तिसरी कोणी नसुन चक्क ती दीपा होती.

"आई, बघितलेस का?ती पोरगी सेम टू सेम त्या दीपा सारखी दिसतेय." जोशना म्हणाली. आईनं निरखून पाहिल्यावर आई म्हणाली," जोशना दीपा सारखी नाही दीपा च हाय ती." गाडीची काच बंद असल्यामुळे आणि दीपाचे मन वाचनात एकाग्र असल्यामुळे दीपाने ढुंकूनही बाहेर पाहिले नाही. जशी गाडी भरधाव वेगाने आली तशीच भरधाव वेगाने निघून ही गेली. आई आणि जोशना मात्र दीपा ज्या गाडीत बसून गेली त्या गाडीकडे एकटक बघत होत्या. दवाखान्या जवळ रिक्षा येऊन थांबली. जोशना आणि तिची आई खाली मान घालून नंबर लावू लागल्या. गावातलं कोणी दिसू नये म्हणून प्रार्थना करत होत्या. जोशना चा नंबर आला तसं मॅडम नी तिला आत बोलावलं. जोशना चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. खरोखरच ती राकेश च्या मुलाची आई होणार होती. बाळाच्या वडिलांचे नाव विचारल्यावर घाबरत घाबरत जोशनाने राकेशचे नाव सांगितले. आई मात्र पूर्णपणे गोंधळली होती. आज दीपाला एवढ्या भारी गाडीत बसलेले बघून कुठेतरी तिच्या मनात खंत वाटत होती. पण दूषित मनात दूषितच विचार येणार... त्याप्रमाणे जोशना आणि तिची आई दीपा बद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क करू लागल्या. जोशना आई होणार आहे यापेक्षा दीपा त्या मोठ्या गाडीत कशी? या प्रश्नाने त्या दोघींना बेचैन करून सोडले होते. 

जोशना आईला म्हणाली, "आई, दादाला माहित असेल का गं हे सगळं ?" "मला नाही वाटंत त्याला काही माहित असेल म्हणून. माहीत असतं तर त्याने मला सांगितलं असतं. तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. ती गेल्यापासून त्यांनं एकदा तरी त्या दीपाचं नाव काढलंय का? तरी बी इचारनार हाय मी त्याला घरी गेल्यावर." आई म्हणाली.  

बघूया आता घरी गेल्यावर संतोष ला जोशना बद्दल खरं काय ते कळेल की दीपा बद्दलच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल ?


पाहूयात पुढच्या भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील. 


कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासह शेअर करा आणि हो आणि मला फॉलो पण करा.


# साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.


कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. 


कथा वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे मनापासून आभार.













🎭 Series Post

View all