तिचा संघर्ष भाग-30

Every Woman Wants Love,respect And Support.

भाग-30



सायंकाळी मॅडम नी दीपाला आश्रम पाहायला नेले. प्रत्येकीची दीपाला ओळख करून दिली. आश्रमात असलेली प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या घरगुती हिंसेला, समाजाकडून झालेल्या पिळवणूकीला बळी पडली होती. आणि कितीतरी वयोवृद्ध असलेल्या महिला या आश्रमामध्ये राहत होत्या. या सर्वांच दुःख ऐकल्यावर 'खरोखरच समाजात अजूनही स्त्रियांना मान मिळतोय का? स्त्री पुरुष समानता दिसते का?आज ना उद्या सुखाचे दिवस येतील म्हणून प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आनंद देते. आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी पैशाचे योग्य नियोजन करून ती आपला संसार सुरळीत चालवत असते. पण मुलं मोठी होतात, नोकरी करतात आणि आईला असं अनाथ आश्रमामध्ये राहावं लागतं हे किती चुकीचं आहे ना!' हाच प्रश्न दीपाच्या मनात सतत घोळत होता.


"हिचं नाव दूर्वा. हिला पोलिसात भरती व्हायचं आहे म्हणून ही खूप प्रयत्न करतेय. दीपा अगं तू वकील होशील ना तेंव्हा हिला न्याय मिळवून दे बाई. पोलीस कोठडीत आल्यावर ही त्याला बरोबर सुतासारखा सरळ करते की नाही ते बघ." मॅडम म्हणाल्या.


"काय झालं होतं हिच्याबाबतीत ?" दीपा म्हणाली.


"गावातल्या सावकाराच्या मुलाने हिच्यावर जबरदस्ती  करून यांची सगळी जमीनही हडप केली आणि त्यामुळेच हिच्या आईवडिलांनी आत्महत्या केली. हिने ही काहीतरी भलतं-सलतं पाऊल उचलायचं ठरवलं होतं, पण तिच्या मावशीने तिला वाचवलं आणि इथे आणून सोडलं." मॅडम म्हणाल्या.


"नक्कीच मॅडम.खूप काही करायचय मला महिलांसाठी." दीपा म्हणाली.


मैदानावर दीपाला एक मंदिर दिसलं. मॅडमनी दीपाला त्या मंदिरात नेलं. 


"हे मंदिर शार्दुल च्या बाबांनी हे आश्रम सुरू केल्यावर बनवलं होतं. नारीशक्ती ला स्मरून सर्व नारीना त्यांना सक्षम बनवायचं होतं." मॅडम म्हणाल्या.


"मॅडम, अगदी अशीच मुर्ती संतोष च्या घरी आहे." दीपा म्हणाली.


"माझा मुर्ती पुजेवर विश्वास नाही दीपा. मी माणसात देव शोधते. आतापर्यंत देवाने मला जे दिलं नाही किंवा कोणत्याच गरजूला आतापर्यंत दिलं नाही, ते मी माणूस असूनही गरजूंना देणार हे मी ठरवलयं. हे मंदिर इथे आहे ते केवळ यांची आठवण म्हणून." मॅडम म्हणाल्या.


"सतत दुःख पाठलाग करत असेल ना मॅडम, तर उडतो माणसाचा देवावरचा ही विश्वास." दीपा म्हणाली.


तेवढ्यात मॅडम ना संतोषचा फोन आला. मॅडम दीपापासून लांब जाऊन संतोषशी बोलल्या. उद्या तो मॅडमला भेटायला येणार आहे असं म्हणाला. मॅडमनी कुठे भेटायचे ते सांगितले आणि फोन ठेवला. दीपा आणि मॅडम घरी आल्या. संतोष उदया काय म्हणेल ? कशामुळे त्याला मला भेटायचं असेल? असा विचार मॅडम च्या डोक्यात सतत येत होता.


सकाळ झाली तशी संतोष ला दिलेल्या वेळेत मॅडमची आवराआवर झाली. मॅडम कोणालाच काहीही न सांगता ड्रायव्हर ला घेऊन संतोषला भेटायला गेल्या होत्या.


संतोष ही ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचला.


"संतोष तुझ्यासारखा समजूतदार नवरा मिळायला भाग्य लागतं रे. किती करतोय तू दीपासाठी आणि ते ही तिच्या नकळत. खरच खूप छान वाटतेय." मॅडम म्हणाल्या.


"मॅडम घरचे सगळेच दीपाशी चुकीचं वागत होते आणि मला मात्र कोणालाच दुखावता येणं शक्य नव्हतं. तरीही आज ना उद्या घेतील समजून ही माझ्या मनात आशा होती. पण जेव्हा मावशीनं मुलाचा विषय काढला तेव्हा, हे आता दीपाला मुद्दाम त्रास देणार हे मला माहीत होतं आणि घरातील इतर कोणी त्रास दिला असता तर दीपानी तो त्रास माझ्यासाठी सहनच गेला असता याचीही मला खात्री होती. मग मीच दीपापासून दूर व्हायचं ठरवलं कारण हे प्रेमाने सांगितल्यावर दीपा मला सोडून जायला कधीच तयार झाली नसती. म्हणून मीच मुद्दाम दीपाला माझा राग यावा अस वागत होतो आणि त्या दिवशी जोशनाने तर कहरच केला. दीपाबद्दल आणि गौरव बद्दल फोटो दाखवत हे सिद्ध केलं की,यांना दीपाला शिकूही द्यायच नाही आणि शिकवणी ही घेऊ द्यायची नाही. शिकवणीतून मिळालेल्या कष्टाच्या पैशातून लग्नाआधी पासून वडीलांच्या संसाराला हातभार लावणारी माझी बायको अशी कधीच वागू शकत नाही याची मला पूर्ण खात्री होती. त्यादिवशी आबा दीपाला दिवस गेलेत हे सांगायला आले अन् असे वाटले आता माझ्या दीपाचा संघर्ष संपला. आई ला जे पाहिजे तेच झालयं म्हणत मी आबांना दीपाला घेऊन येईल असं म्हणालो. पण आबांनी मला आई आमच्या बाळा बद्दल कसला विचार करतेय हे सांगितल्यावर मात्र मी खूप निराश झालो. मी किती भाग्यवान आहे की मला दीपासारखी बायको मिळाली असे मला वाटले. जिने एका शब्दानेही मला आईबद्दल वाईट नाही सांगितले.


मी भेटलो हे दीपाला न सांगण्याची शपथ मी आबांना आणि तुम्हाला त्या दिवशी घातली कारण दीपा कितीही त्रास झाला तरी माझ्यासोबत राहायला तयार होईल अन् मी तिला दुःखा शिवाय काहीच नाही देऊ शकणार. आणि तुम्हीही परिस्थिती ऐकून घेतल्यावर दीपाला तुमच्याकडे मोठ्या मनाने ठेवून घेते म्हणालात आणि खरंच देवाने माझं ऐकलं. थोड्याच दिवसात जोशनासाठी योग्य मुलगा बघून तिचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मुक्त होईन आणि माझ्या बायको मुलासोबत शहरात राहीन." संतोष म्हणाला.


"मग आता निर्णय बदललास का तू ? का भेटायला बोलावलंस मला." मॅडम म्हणाल्या.


"नाही मॅडम, तसं नाही. आई ने रोजच दुसरं लग्न कर म्हणून हट्ट धरलाय. काय करावं मला काहीच कळत नाहीये म्हणून तुम्हाला विचारावं असं ठरवलं." संतोष म्हणाला.


"अरे दुसरे लग्न करणं एवढं सोपं असतं का ? पहिली बायको जिवंत असेल तर तिला आधी घटस्फोट द्यावा लागतो की नाही आणि तोही लगेच मिळत नसतो. पण हे जर तुझ्या आईला सांगितलं तर ती उद्याच दीपाला घटस्फोटाची नोटीस पाठवेल आणि अशा परिस्थितीत तिला त्रास व्हायला नकोय त्यामुळे कायमचे त्यांचे तोंड बंद करायचे असेल तर तू सरळ सांगून टाक की, दीपा बोलली होती तेच खरं होतं. मुलं न होण्यासाठी फक्त स्त्रीच जबाबदार नसते. पुरुषांमध्ये ही दोष असूच शकतो ना. म्हणून तेच पाहण्यासाठी तू डॉक्टरांकडे गेलास आणि डॉक्टरांनी तू कधीही बाप होऊ शकत नाही असं सांगितलंय असं सांग. हा पण तू त्यांना काही सांगितलं नाहीस ना दीपाच्या प्रेग्नेंसी बद्दल?" मॅडम म्हणाल्या.


"नाही मॅडम, आबांनी तसं सांगितल्यावर मला घरी ही आनंदाची बातमी सांगाविशी नाही वाटली. आणि तुम्ही म्हणताय तेच कारण योग्य आहे घरच्यांना शांत बसवायचं असेल तर असं मलाही वाटते." संतोष म्हणाला.


"अरे पण गौरवला एकदा विचार बरं त्यांने ही बातमी गावात कोणाला सांगितली आहे का ते ? आबा तर कोणालाच बोलले नाहीत असे ते मला म्हणाले आहेत." मॅडम म्हणाल्या.


"हो मी लगेच फोन लावतो." संतोष म्हणाला.


 संतोष नी गौरव ला विचारल्यावर, त्याने ही कोणालाच ही बातमी सांगितली नाही असं संतोषला सांगितलं आणि यापुढेही कोणाला सांगू नकोस असं संतोष ने गौरवला सांगितलं.


"येऊ का मग मॅडम मी ?" संतोष म्हणाला. संतोष ने गावातील मिठाईच्या दुकानातून आणलेली जिलेबी, फळं यांची बॅग ड्रायव्हरच्या हातात दिली.


"हो, हो, ये. दीपाची आणि बाळाची बिलकुल काळजी करु नकोस आम्ही सगळे आहोत इथे." मॅडम म्हणाल्या.


संतोष निघून गेला. तशा मॅडम ही गाडीत बसत होत्या. तितक्यात त्यांना रोडवर च्या एका दुकानात सुंदर अशा गोंडस बाळाचे पोस्टर दिसले. मॅडमला ते पोस्टर घेण्याचा मोहच आवरला नाही. मॅडम नी ते पोस्टर खरेदी केलं आणि मॅडम घरी आल्या. मॅडम नी दीपा ला बोलावून घेतलं. आणि ड्रायव्हरला जिलेबीची, फळांची पिशवी दीपाला द्यायला सांगितली.


"होती ना मॅडम फळ." दीपा म्हणाली.


"असू दे ग. खा बरं ती जिलेबी." मॅडम म्हणाल्या.


"आज परत जिलेबी." दीपा म्हणाली.


"हो. तुला आवडते म्हणून मुद्दामच आणली." मॅडम म्हणाल्या.


आबांना मात्र जावईबापूनीच जिलेबी पाठवली असेल, अशी पक्की खात्री होती.


मॅडमनी दीपाला पोस्टर दाखवलं आणि सगळ्यांनी ते दीपाच्या खोलीमध्ये पोस्टर चिटकवलं. आणि मॅडमनी दीपाला आवर्जून बजावलं उद्यापासून कॉलेजला जायचे बरं. दीपाने होकारार्थी मान हलवली.


कसा असेल दीपा चा उद्याचा कॉलेजचा पहिला दिवस ? पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील


कथा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. कथा आवर्जून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे मनापासून आभार. 


#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे. कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.


*तुमचा अभिप्राय हाईड करून कळवू नका. म्हणजे मला तुम्हाला रिप्लाय देता येईल. विद्यार्थ्यांमुळे शोभा असते शाळेला. तसा तुमच्या अभिप्रायाने शोभा येते माझ्या कथेला.*







🎭 Series Post

View all