तिचा संघर्ष भाग-27

Every Woman Wants Love,respect And Support.

भाग-27



मॅडमनी ड्रायव्हर ला दीपाच्या खोलीत डबा ठेवायला सांगितला होता. मॅडम नी आत जाऊन दीपाला जेवण करायला सांगितले.


दीपा मात्र रूपाबद्दल मॅडमना विचारत होती. 


"दीपा तू, असल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. खाऊन घे बर पटपट." मॅडम म्हणाल्या.


दीपाच्या आई, मॅडम आणि दीपाने दुपारचे जेवण केले. सगळ्यांना चिंता लागली होती ती म्हणजे आबा परत आल्यावर काय सांगतील याचीच.

मग मॅडम दीपाला म्हणाल्या, " तू काही काळजी करू नकोस दीपा. मी आहे ना. मी संतोष शी बोलणार आहे. तु सासरी गेली तरीही तुला कसलाही त्रास होणार नाही यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असेल."


"खरच मॅडम, किती बरं होईल ! आणि संतोष तुमची गोष्ट टाळणार नाही याची मला खात्री आहे." दीपा म्हणाली.


"हो. मग आता तू निश्चिंत राहा." मॅडम म्हणाल्या.


एवढ्यात आबा दीपाच्या खोलीत आले. सगळेजण आबा काय सांगतात ते जणू कानात प्राण आणून ऐकत होते. पण दीपाला तर काहीच बोलले नाहीत. मॅडमनाच आबांनी बाहेर बोलावले. मॅडम आणि आबा बाहेर निघून गेले. आई आणि दीपा आबांची वाट बघत होत्या. पंधरा-वीस मिनिट झाले तरी कोणाचाच यायचा पत्ता नाही म्हटल्यावर, दीपाने आईला बाहेर बघून ये म्हणून सांगितले. पण इकडे तिकडे पाहिल्यावर आईच्या लक्षात आलं की, मॅडमची गाडी ही दवाखान्याच्या बाहेर दिसत नव्हती. दीपा आणि आई चिंतातुर झाल्या.


दीपा आईला म्हणाली, "आई काय झालं असेल गं?"


"मला तर काय माहित गं पोरी. पण तू काय काळजी करू नको दीपा. मॅडम हायत नव्हं आपल्या सोबत.मग तू कसलाच विचार करू नकोस. तू तुझा जीव संभाळ." आई दीपाला धीर देत म्हणाली.


तासाभरानंतर मॅडम आणि आबा परत आले. ड्रायव्हरच्या हातात जिलेबी ची पिशवी होती.


"काय झालं मॅडम ? काय म्हणाला संतोष आबा ?" दीपाने विचारलं.


"दीपा आधी तू जिलेबी खाऊन घे बरं ! तुला आवडते ना." मॅडम म्हणाल्या.


"कोणी आणली जिलेबी ?" दीपा म्हणाली.


"कोणी म्हणजे ? मीच आणली आहे." आबा म्हणाले.


"मगाशी मॅडमला बोलवताना तर तुम्ही रिकाम्या हाताने आला होतात ना ?" दीपा म्हणाली.


आबा काहीतरी लपवत होते हे दीपाच्या लक्षात येत होतं. कारण आज आबा विचार करून उत्तरे देत होते.


"अगं दीपा किती प्रश्न विचारशील ? खाऊन घे बर जिलेबी." मॅडम म्हणाल्या.


"नाही आबा, संतोष काय म्हणाला ? हे ऐकल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही." दीपा म्हणाली.


"दीपा, तुला हे मूल हवे आहे ना ?" मॅडम म्हणाल्या.


"हो मॅडम, असं का विचारताय तुम्ही ?" दीपा म्हणाली.


"मग त्या बाळाची काळजी असेल तर तू कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेणार नाहीस, असं मला प्रॉमिस कर." मॅडम म्हणाल्या.


" एवढा वेळ नका लावू मॅडम,प्लीज सांगा ना काय झाले ते." दीपा म्हणाली. 


"दीपा संतोषची आई त्याचं दुसरं लग्न करायचं म्हणतेय आणि त्यांनी मुलगीही पसंत केलीय. तेव्हा तू त्यांचा विचार न केलेला बरा. आणि हे सत्य कळल्यावर तुला हे मूल हवंय का नको ? हे तुला स्वतःला ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे." मॅडम म्हणाल्या.


"संतोष कसाही वागू देत. त्यात माझ्या बाळाचा काय दोष. मला बाळ हवय मॅडम." दीपा म्हणाली.


"पण मॅडम बाळाला वडिलांचं छत्र पाहिजे की वो." दीपा ची आई म्हणाली.


"मग त्यासाठी दीपाला फक्त आपलाच स्वाभिमान नव्हे, तर आबांचा ही स्वाभिमान गमवावा लागेल. आणि जिथं आपल्या भावनांची किंमत असते तिथेच झुकाव माणसाणं. बोल दीपा तुला काय वाटतं ?" मॅडम म्हणाल्या.


"संतोष ही दुसरे लग्न करायला तयार असेल तर आता सगळं संपलय. तेव्हा मी माघार घेणार नाही. माझ्या आबांच्याही आणि स्वतःच्याही स्वाभिमानाला ठेच पोहोचू देणार नाही." दीपा म्हणाली.


"झालं तर मग आणि दीपा कायम लक्षात ठेव मुलं घडविण्यात आईचाच वाटा मोठा असतो. छत्रपती शिवाजीराजांना जन्म दिल्यावर प्रत्येक प्रसंगी शहाजीराजे होते का त्यांच्यासोबत? नाहीच ना. पण जिजाऊंनी शिवाजीराजांच्या संस्कारांमध्ये, त्यांच्या पालन-पोषणा मध्ये कसलीही उणीव ठेवली का ?नाही ना. झाशीची राणी लक्ष्मीबाई कित्तेक प्रसंगी मुल पाठीवर घेऊन लढल्या, असं तर आपल्याला काही करायचं नाही ना.आणि तू एकटी कुठे आहेस दीपा ? आजपासून मीही आहे तुझ्यासोबत. तू दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर डायरेक्ट माझ्या घरी राहायला यायचंय आई आबांसोबत. तरच पुढे तुला शिक्षण घेता येईल आणि काही इमर्जन्सी आली तर शहरात दवाखान्याची सोय असल्यामुळे बाळ ही सुरक्षित जन्माला येईल." मॅडम म्हणाल्या.


"नाही म्हणजी तुम्ही म्हणताय ते खरं मॅडम. पण आम्ही गावाकडची माणसं. रोज आम्हाला कामाची सवय असतीय. इथे नुसतं बसून राहणं शक्य नाही व्हायचं. दीपा ची आई काय दीपाच्या डिलेवरी पर्यंत राहिल हितं. पण मी मात्र गावातच कोणाच्या तरी शेतात सालगडी म्हणून राहीन." आबा मॅडमला म्हणाले.


"म्हणजे शहरात शेत नसतं असं वाटतं का तुम्हाला ? अहो आमच्या आश्रमाच्या समोर शेतीच आहे सगळी. तिथं तुम्ही आणि दीपाच्या आई कामही करू शकता आणि रोज तुम्हाला तुमची लेक ही दिसेल डोळ्यासमोर आणि दीपालाही तुमचा आधार होईल. जे गावी कष्ट करणार होतात तेच इथे करा. पण माझं कुठलंही बंधन नसेल हा. तुम्ही विचार करून निर्णय घ्या." मॅडम म्हणाल्या.


मॅडम स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी घरी गेल्या. आबांना आणि आईला मॅडम म्हणत होत्या ते पटलं होतं, पण दीपाला मात्र गावी राहिलो तर संतोषचे मन परिवर्तन होईल असे वाटत होते. 


पण आबांनी दीपाला समजून सांगितलं," हे बघ दीपा, गावी गेल्यावर काहीच हाती लागणार नाही पोरी. संतोष च लग्न झालेलं पाहून तुझ्या मनाची किती घालमेल होईल आणि त्याचा लय वाईट परिणाम तुझ्या बाळावर आणि तुझ्या शिक्षणावर बी पडणार तवा तू नीट विचार करून निर्णय घे. आणि आम्ही काही मॅडमला कसला बी त्रास होऊ देणार नाही बघ. पडल ती काम करू आम्ही दोघं. तुझा विश्वास हाय ना तुझ्या आई आबा वर?" आबा म्हणाले.


"दीपा, मला बी आबा म्हणतेत ते सगळं पटतंय बघ. पण तुला जे बरोबर वाटल ते आम्हाला तू सांग." आई म्हणाली.


"मला थोडा विचार करू दे. सांगेन मी नंतर." दीपा आईला म्हणाली.


\"गौरी\" म्हणजे दीपा पेक्षा मोठी असलेली दीपा ची बहिण. गौरी पेक्षा मोठी काल जी दीपाला भेटायला आली होती ती रूपा. आणि रूपापेक्षा मोठी असलेली दुर्गा. अशा ह्या चार बहिणींपैकी रूपा जरा जास्तच तापट स्वभावाची होती. हाताची पाची बोटं जशी सारखी नसतात तशीच एकाच आईची सगळी मुलं सारखी नसतात. 


आईला आबांनी," आज रूपा आलती का ?" म्हणून विचारलं.


"व्हय आलती." आई म्हणाली.


\"आता त्यांनी काय विचारलं तरी हयानला,  रूपा कशी वागली हे सांगायला नको बाई. आधीच का कमी टेन्शन आहे यांच्यामागे.\" आई मनात विचार करत होती.


"त्या दिवशी मी तिला काही सांगितलंच नव्हतं गं दीपाचं, भेट झाली तवा. मी दीपाचं काही बोललो असतो तर ती दीपाला काही बी बोलली असती बघ.अन ऊग रस्त्यात तमाशा केला असता तिनं.अन् तिच्या मनात काही कोणतीच गोष्ट राहत नाही. पटकन बोलून मोकळी होतीय. लहानपणापासून ओळखतो मी तिला. पण आज काय बोलली नसल दीपा आजारी हाय म्हणल्यावर." आबा म्हणाले.


"नाही काय बोलली." आई म्हणाली.


"देवच पावला म्हणायचं मग." आबा हसून म्हणाले.


रूपाने दुर्गा ला फोन केला. दुर्गा अतिशय समजूतदार होती. रूपा मात्र दीपा बद्दल काहीही वाईट बोलत होती. बोलता-बोलता रूपा म्हणाली,"काय गरज होती ग दीपाला शिकवणी घ्यायची ?"


दुर्गाला मात्र फार राग आला. ती म्हणाली," दीपा लहानपणापासूनच किती स्वावलंबी आहे माहितीय आहे ना तुला. कधीच कोणाला आपल्यामुळे त्रास होऊ देत नाही दीपा. सतत दीपाच्या सासरचे तिला बापाने काही दिलं नाही म्हणून बोलत होते आणि दिवाळीला पण घर दाखवा म्हणून त्यांनी ठेका धरला होता. तेवढाच आबांनला हातभार लागेल म्हणून तिनं शिकवणी घ्यायची ठरवली होती.अन् आता तिला कुठे आपल्यासारखी बहीण होती, जी स्वतः शिकवण्या घ्यायची अन् दिवाळीला आपल्या लेकरांना कपडे घ्यायची. स्वतः मात्र कधी सणाला कपडे न घेणारी दीपा तू विसरली असशील गं, पण मी नाही विसरले." दुर्गाचा कंठ दाटून आला होता.


"मी खुपच चुकले ग ताई. नाही नाही ते आईला बोलून आले. उद्याच जाऊन दीपा ची आणि आईची माफी मागते." रूपा म्हणाली.


"तुला किती वेळा सांगितले रूपा, तू बोलताना विचार करत जा.बोलून माफी मागितल्यावर बोललेले व्रण पुसले जात नसतात गं." दुर्गा म्हणाली.


"ताई मला माफ कर गं. यापुढे मी कधीच कोणाचं मन नाही दुखावणार." रूपा हुंदके देत म्हणाली. 



दीपा शहरात राहायला तयार होईल का ? पाहूया पुढील भागात क्रमशः



सौ. प्राजक्ता पाटील. 


कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. 


कथा आवर्जून वाचल्या बद्दल सर्व वाचक वर्गाचे मनापासून आभार. 


#कथा प्रकाशनाचा अधिकार लेखिकेकडे राखीव.


 #साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.







🎭 Series Post

View all