तिचा संघर्ष भाग-25

Every Woman Wants Love, Respect And Support.
भाग-25


काल आपण पाहिले दीपाला चक्कर आली होती. मॅडमच्या गाडीतून गौरव दीपाला शहरातल्या दवाखान्यात घेऊन गेला होता. केवळ मॅडम मुळेच दीपाला लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळाली होती. आता मॅडमच्या सांगण्यावरुनच गौरव दीपाच्या आई-बाबांना आणायला निघाला होता. 

रस्त्यात मात्र त्याला फारच वाईट वाटत होतं.

\"का दुखावले मी दीपाला ? त्यात तिचा काहीच दोष नव्हता. मीच तिला ज्यूस दिला नसता तर हे रामायण घडले नसते. देवा मला माफ कर आणि दीपाला लवकर बरं कर.\" हा मनात विचार करून गौरव देवाकडे प्रार्थना करत होता.

आपल्याच विचारात मग्न असलेल्या गौरवला हात जोडताना पाहून ड्रायव्हर म्हणाले, "नका साहेब टेन्शन घेऊ. होतील त्या लवकर बऱ्या."

"तुमच्या तोंडात साखर पडो आणि दीपाला लवकर शुद्ध येवो." गौरव म्हणाला.

"काय झालंय हो त्यांना ? तुमचं भांडण झालंत का ? नाही म्हणजे तुम्ही एकटेच होतात त्यांच्या जवळ म्हणून म्हणालो." ड्रायव्हर म्हणाले. 

"हो जरा रागाच्या भरात जास्तच बोललो मी तिला." गौरव म्हणाला.

"नवरा बायकोच्या भांडणात होतच असतं असं. पण राग शांत झाला की चूक समजते. आणि तुमचं तर नवीन लग्न झालेलं दिसतयं. मग तर हे सगळं होणारच. हा, पण पुन्हा त्यांना दुखवू नका, हळवा दिसतोय तुमच्या बायकोचा स्वभाव. "ड्रायव्हर म्हणाले.

"नाही हो तुमचा गैरसमज झालाय ती माझी बायको नाही मैत्रीण आहे." गौरव म्हणाला.

"स्वारी बरका. मला तसं वाटलं." ड्रायव्हर म्हणाले.

"मित्राचीच बायको आहे माझ्या. आम्ही तिघेही गावातल्या शाळेत एकत्रच होतो." गौरव म्हणाला.

"व्हय का म्हणजे गावातच सासर आहे का त्यांचं?" ड्रायव्हर म्हणाले.

"हो." गौरव म्हणाला.

\"काय सांगू काका तुम्हाला, सासरची माणसं केवळ अंतराने जवळ आहेत मनाने केव्हाच दीपा पासून दुरावली आहेत आता दीपा मलाही माफ नाही करणार.\" गौरव मनात विचार करत होता.

"मग त्यांच्या सासरच्यांना कळवायला हवं. नाहीतर उगाच काळजी करत बसायची त्यांच्या घरची माणसं." ड्रायव्हर म्हणाले.

गावात प्रवेश केल्यावर गौरवला दीपाच्या सासुबाई घराकडे जाताना दिसल्या. गौरवने त्यांना संतोष बद्दल विचारले. तेव्हा त्यांनी तो शेतात असल्याचे सांगितले. 

गौरव म्हणाला, "आज दीपाला चक्कर आली होती म्हणून तिला शहरातल्या दवाखान्यात ऍडमिट केलं आहे. तेवढं संतोषला सांगा."

"कोण दीपा ? आम्ही कोणत्याही दीपाला ओळखत नाही. रोगीष्ट कुठली. सतत नाटकं करायची आणि चक्कर येऊन पडायचं एवढंच येत तिला. आणि गौरव तुला माहीत नाही का ? आम्ही लवकरच तिला सोडचिट्टी पाठवणार आहोत ते आणि माझ्या संतोषच दुसरं लग्न थाटात करणार आहोत. तवा आता तिचा आणि आमचा काहीही संबंध नाही. आणि अगं बाई मी विसरलेच की, अरे तू आहेस की मदतीला तिच्या. तू आहेस म्हटल्यावर तिला आमच्या आडाणी संतोष ची काय गरज आहे तूच सांग." संतोष ची आई किती चुकीचे बोलत होती.

"हे बघा काकू, असलं भलतच काही बोलू नका. मुलाची असो किंवा मुलीची, तुम्ही कोणाची तरी आईच आहात ना! हे असं बोलणं योग्य वाटतं का तुम्हाला?" गौरव म्हणाला.

"दुसऱ्याच्या बायकोला ज्यूस पाजताना तिच्याबरोबर हसताना,धिंगाणा घालताना तुला योग्य वाटलं का रे? शहाणपणाच्या गोष्टी मला लागलाय सांगायला. तुझ्या नादाला लागायला मला वेळ नाही. " असं म्हणून संतोषची आई तडक निघून गेली.

"अहो काकू माझं ऐकून तरी घ्या... गौरव चे डोळे डबडबले होते.

\"रोज दीपा असल्या माणसाच्या सहवासात राहत होती. बापरे !\" म्हणून गौरवने डोळे पुसले.

"खरंच हो ड्रायव्हर काका माझी आणि दीपाची यात काही चूक नव्हती. पण बघा ना लोक कसे बोलतात." गौरव खिन्न होऊन म्हणाला.

"वाईट वाटलं बघा साहेब. समाजात अशी लोक असतील तर कसं जगायचं बाईनं ? म्हणूनच कदाचित मुलगी झाल्यावर खर्चापेक्षा जास्त, लग्न करून गेल्यावर माझ्या काळजाच्या तुकड्याला कुठल्याही प्रकारचा त्रास तर होणार नाही ना. घरातले लोक तिला समजून घेतील ना. या विचारने प्रत्येक बापाचं मन नाराज होत असेल बघा." ड्रायव्हर म्हणाले.

\"अनोळखी असूनही ड्रायव्हर काकांना परिस्थिती समजल्यावर दिपाबद्दल वाईट वाटलं, पण संतोष ला कसं काय वाटत नसेल? या विचाराने गौरवला संतोष चा प्रचंड राग आला.\"

गाडी दीपाच्या घराजवळ येऊन थांबली होती. घर नेहमीप्रमाणेच बंद होते. शेजारी चौकशी केल्यावर गौरवला दीपाच्या आबांकडे मोबाईल आहे हे समजले. त्याने आबांना फोन केला, पण आबांचा फोन काही लागत नव्हता. त्याने चौकशी करून आबा ज्या शेतावर गेले होते त्या शेताचा पत्ता मिळविला. गावातील एका मुलाला घेऊन गौरव शेतावर पोहोचला. आबा घाबरतील म्हणून त्याने आबांना घरी येईपर्यंत काही सांगितले नाही. फक्त दीपा आजारी आहे घरी चला म्हणून सांगितले होते. आबा आणि आई दोघेही झपाझप पाऊले टाकत घराकडे आले. गाडी बघितल्यावर आबांना प्रश्न पडला.

"हे काय रे गौरव ? गाडी कशाला घेऊन आलास ?" काय झाले दीपाला? आबा घाबरुन म्हणाले.

"आबा मला माफ करा. तुम्ही घाबराल म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. पण आता तुम्ही गाडीत बसा. आपण शहरात जाऊ. दीपाला शहरातल्या दवाखान्यात ऍडमिट केले आहे." गौरव म्हणाला.

आईच्या अंगावर काटा उभा राहिला.

"काय झालं रं गौरव माझ्या पोरीला? अन्नाचा कण बी नव्हता रे सकाळी पोरीच्या पोटात. पण तुझा फोन आला म्हणून लगबगीनं तुला भेटायला आली होती." आई रडू लागली.

आता तर गौरवला फारच अपमानास्पद वाटत होतं. 

\"किती चुकलोय मी. माफी सुद्धा मागण्याच्या लायकीचा नाही मी.\" गौरव ही हळवा झाला होता.

"म्हणजे तू उपाशी पाठवलं होतं दीपाला ? आणि अगं आजारी आहे पोरगी म्हणल्यावर तुला काय गरज होती रानात यायची?" आबा हताश होऊन म्हणाले.

"अवो मला तर काय माहित होतं असं होईल म्हणून." आई म्हणाली.

"आई ,आबा तुम्ही काही काळजी करू नका. दीपाला काही होणार नाही. होईल सगळे व्यवस्थित." गौरव आई-बाबांना धीर देत होता.

पूर्ण प्रवासात आई आणि आबा दीपा च्या आठवणी आठवण होते. त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब सतत वाहत होते.

दवाखान्या जवळ गाडी थांबली. सगळे जण खाली उतरले. भराभर पावले टाकत सर्वजण आत गेले. मॅडम दवाखान्यातल्या बाकावर बसलेल्या होत्या. दीपाच्या आई मॅडम जवळ जाऊन दीपा बद्दल विचारू लागल्या. मॅडम सगळ्यांना दीपाच्या रूम मध्ये घेऊन गेल्या. दीपा शुद्धीवर आली होती. आई-आबांना बघून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.

"काही त्रास होतोय का ग पोरी." आईने दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला.

मानेनेच नाही म्हणत दीपाने सगळ्यांना छोटीशी स्माईल दिली.

गौरव मात्र स्वतःला अपराधी समजत होता, त्यामुळे तो बाहेर जाऊ लागला. 

दीपा म्हणाली, "गौरव चक्कर आल्यामुळे तुला सॉरी म्हणायचं राहूनच गेलं माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय.मला माफ कर."

"सॉरी तर मला म्हणायला हव दीपा. खूपच बोललो मी तुला."

"नाही रे तू बोलला म्हणून नाही चक्कर आली मला." दीपा शांत बसली.

"हो गौरव, तु मामा बनणार आहेस. अरे गुड न्यूज आहे." मॅडम आनंदाने म्हणाल्या.

आई-आबांना मात्र म्हणावा तेवढा खोटा आनंद चेहऱ्यावर दाखवता आला नाही.

"काँग्रॅच्युलेशन दीपा." गौरव म्हणाला.

"थँक्यू." दीपा म्हणाली.

"अरे असला कसला रे मामा तू. हे बघ हे घे पैसे. आणि मिठाई घेऊन ये बरं आणि सगळ्यांच तोंड गोड कर." मॅडम उत्साहाने म्हणाल्या.

दिपा च्या आई-वडिलांना दीपा जवळ थांबा म्हणून मॅडम बाहेर गेल्या.

"आई इतके दिवस माझा संघर्ष सुरू होता. आता माझ्यासोबत या चिमुकल्या जीवाचाही संघर्ष सुरू होईल का ग ?" दीपा म्हणाली.

"अगं असं का बोलतेस पोरी?" आई म्हणाली.

"अग बघ ना, प्रत्येक मुलीचा नवरा तिला मिठाई भरवून त्यांच्या प्रेमाची निशाणी त्यांच्यासाठी किती स्पेशल आहे हे सांगत असतो. आणि मग ही बातमी आजोळी कळते. आणि त्या बातमीने सगळ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तुझ्या आणि आबांच्या चेहऱ्यावर मला तो न जाणवण्या एवढी लहान नाही गं राहिले मी आता…." दीपा रडू लागली.

"तसं नाही ग पोरी. पण तुला आधीच अशक्तपणा आलेला, त्यात त्या लोकांनी इतका त्रास दिला आणि वर तू आई होणार म्हटल्यावर तुझ्यावर अजून जबाबदारीचं ओझं पडणार म्हणून वाईट वाटलं गं." आई म्हणाली.

"दीपा तू काळजी करू नकोस. होईल सगळं नीट." म्हणून आबांनी दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला. गौरव पेढे घेऊन आला होता. त्याने सर्वांना पेढे दिले.

आबा बाहेर येऊन बसले होते. पण मनात मात्र विचार चक्र सुरु होते.

\"दीपाला मी बाप म्हणून माया देईन पण तिच्या लेकराला बापाचं प्रेम नको का मिळायला? पण तिच्या घरची ती लोकं बी तसली आहेत त्यामुळे मला विचार करुन निर्णय घ्यावा लागेल.\" हा विचार करत असतानाच मॅडम आबांजवळ येऊन बसल्या.  

त्यांनी आबांना "कशाची काळजी करतात?" असं विचारलं तेव्हा आबांनी घडलेली सगळी हकीकत मॅडम ना सांगितली. 

"बर मी बोलते संतोष शी." मॅडम म्हणाल्या.

"नाही मॅडम नको. मी उद्या प्रत्यक्ष जाऊन भेट घेतो जावई बापूंची. काय म्हणतात ते पाहतो." आबा म्हणाले.

दीपाला आता घरी परत जाणं खूप अवघड वाटत होतं. मॅडमनी दीपाला "पुढे काय करायचं?" ते विचारलं. 

"मॅडम आबा म्हणतात, ते पण बरोबर आहे. बाळाला त्याच्या आई सोबत वडिलांच ही प्रेम मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. उद्या आबा संतोषला भेटल्यावर तो काय म्हणतो त्यावर मी माझा निर्णय सांगेन." दीपा म्हणाली.


काय असेल संतोष चा निर्णय ? पाहू या पुढील भागात क्रमशः 


सौ. प्राजक्ता पाटील.

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.कथा आवर्जून वाचली त्याबद्दल आभार.

#साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

#कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.










🎭 Series Post

View all