तिचा संघर्ष भाग-22

Every Woman Wants Love,respect And Support.
भाग-22


आज तो मंगल दिवस उगवला होता. ज्या आबांचं बोट धरून पहिलीच्या वर्गात दीपाने भीतभीतच पाय टाकला होता. त्याच आबांच्या पाठिंब्याच्या जोरावर, हुकलकावणी देणाऱ्या तिच्या करियर रूपी स्वप्नांच्या फाटकात आज मोठ्या आत्मविश्वासाने दीपाचा पाय पडणार होता.

"अगं, तू कवा उठलीस ? पहाटेच आबांनी प्रेमाने आईला विचारलेला तो प्रश्न दीपाने ऐकला.

"तुमची लाडकी लेक अंगणात सडा- रांगोळी करत होती तवाच उठले." आईही तेवढ्याच प्रेमाने आबांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देत म्हणाली.

\"खरंच आई आणि आबांना पाहिल्यावर असं वाटतं की, देवाने अगदी वेळ काढून नवरा-बायको म्हणून यांना सात जन्मांच्या नात्यात गुंफले असावे. नाहीतरी संतोष या ना त्या कारणावरून सतत रुसणं ठरलेलं असतं त्याचं. पण असो. सकाळ सकाळी नकारात्मक विचाराने सुरुवात व्हायला नको.\" हा विचार करून दीपा घरात गेली.

"म्हणजे दिपा उठली होय ?" आबांनी पुन्हा प्रश्न विचारला. "तुमची पोर ती. लहानपणापासून ऐकत आलीय. लवकर उठणाऱ्या व्यक्तीची लक्ष्मी नेहमी जागृत असते. त्यामुळे अंथरुणात पडून राहायची सवय माझ्या दीपाला कवाच नाही बघा." आई आबांना म्हणाली.

"व्हय व्हय ती बी खरंच आहे बघ.पण माझ्या दीपाची तर लक्ष्मी बरोबर सरस्वती सुद्धा जागृत आहे." आबा कौतुकाने म्हणाले.

"होय बाई खरयं तुमचं. बरं बरं उरका बरं आता. जायचं हाय ना कॉलेजात दीपाच्या?" आई म्हणाली.

"आलोच, अंघोळ करून येतो मी. अन् दीपा तुझं बी उरक पोरी लवकर." आबा म्हणाले.

"झालेय आबा माझं. हो, डॉक्यूमेंटची फाईल तेवढी काढून ठेवते." दीपा म्हणाली.

"काय काय लागते ते नीट भर बाई दीपा बॅगमध्ये. ऐन वेळेला फजिती नको. अन् हेलपाटा बी नको व्हायला. तवर मी कणीक मळायला घेते." म्हणून आई स्वयंपाकघरात गेली.

दिपाने एॅडमिशन साठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स, आयडी प्रूफ, पासपोर्ट साईजचे फोटो, काळा, निळा पेन आणि इतरही सर्व साहित्य बॅगमध्ये भरले आणि दीपा आईला मदत करायला स्वयंपाकघरात गेली.

"समदं नीट भरलं ना गं पोरी." आई काळजीनं दीपाला म्हणाली.

"हो गं आई. तू नकोस काळजी करूस.भरले मी सगळे व्यवस्थित." दीपा म्हणाली.

"बरं दीपा, भाजीला काय करू पोरी?" आई म्हणाली.

"आई तुझ्या या प्रश्नांनं मला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची आठवण करून दिली बघ. आमचं दहावीचं परीक्षा केंद्र शेजारच्या गावात होतं, तेव्हा पण तू रोज मला हाच प्रश्न विचारायचीस." दीपा हसून म्हणाली.

"तसं नव्ह गं पोरी. आपल्या घरी पंचपक्वान्न बनत नसली तरी, ही तुझी आई दररोज घेऊन येते की गं रानातला रानमेवा. अन् घरी असल्यावर ती भाजी नको म्हणलीस तर दुसरी करता येते. पण बाहेरगावी गेल्यावर उपाशी बसायचं का भाजी आवडली नाही म्हणून." आई म्हणाली.

"अगं तुझ्या हाताने बनलेल्या प्रत्येक पदार्थाला पंचपक्वान्नांची चव येते बघ. काही केलं तरी एक नंबर बनतं." दीपा म्हणाली.

"तशी माझ्या गुणी लेकीची कधी तक्रार नसते खाण्याची, पण विचारल्यावर आईच्या मनाला समाधान वाटतं ग लेकी च्या आवडीचं आपण काहीतरी बनवलं म्हणून." आई म्हणाली.

"आई मग तू अळूच्या पानांच्या खमंग वड्या बनव. मी बनवते चपाती." दीपा म्हणाली.

"तुझा विश्वास बसायचा नाही, पण अगं प्रवासात तेलकट, तूपकट नेऊ नये म्हणतात गं दीपा." आई म्हणाली.

"कोणत्या पुस्तकात वाचलसं तु हे, सांग बर मला जरा." दीपा म्हणाली.

"अगं हे पुस्तकात असतं होय गं पोरी. तुझी आजी मला म्हणायची, ती मी तुला म्हणते." आई म्हणाली.

"मग हे सगळ खोटं आहे बघ आई. अंधश्रद्धा असते ही.ज्या गोष्टीचं शास्त्रशुद्ध कारण कोणी देऊ शकत नसेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं चुकीचं असतं." दीपा म्हणाली.

"आत्ता पासुनच खरोखर वकीलीनबाई झाल्यासारखी वाटायला लागलीय आपली दीपा." लेकीचं कौतुक करत आबा म्हणाले.

"व्हय व्हय तुमचीच पोरगी हाय म्हणल्यावर, आपलं मत  असं मांडायचं की ते समोरच्याला पटलंच पाहिजे हे तुमचेच गुण घेतलेत बघा पोरीनं. तुम्ही गावातली भांडण मिटवणार आणि आता पोरगी वकीलीनबाई होऊन सगळ्या दुनियेची भांडणं मिटवणार." आई म्हणाली.

"पण त्यासाठी आधी कॉलेजमध्ये तर जावं लागेल की नाही एॅडमिशन घ्यायला." दीपा हसून म्हणाली.

सगळेजण आज कितीतरी दिवसांनी पूर्वीसारखे मनमोकळेपणाने एकत्र हसले होते.

दीपाच्या चपात्या बनवून झाल्या होत्या. आईच्याही वड्या बनल्या होत्या. तेवढ्यात आबांना कोणाचा तरी फोन आला. फोनवर बोलतच आबा, दीपा तु आवर मी आलोच म्हणून बाहेर गेले.

दीपाने माळ्यावर ठेवलेली पेटी खुर्चीवर चढून काढली.

"आई काय भरलंस एवढं या पेटीत ?" कसली जड वाटतेय ही पेटी. दीपा म्हणाली.

"अगं थोडी तुझीच पुस्तकं आहेत. उंदरांनी कुरतडू नये म्हणून तुझ्या कपड्यांच्या पेटीत ठेवली बघ. थांब मी धरू लागते पेटीला." म्हणत आई दीपाच्या मदतीला आली.

दोघींनी मिळून पेटी खाली घेतली. मोजून चार ड्रेस असले तरी पण ते खूप स्पेशल होते दीपा साठी.

"आई कोणता घालू गं ड्रेस?" दीपा म्हणाली.

"हे बघ हा घाल. लय भारी दिसतो बघ तुला." आई म्हणाली.

दिपा ने ड्रेस घातला. किती सुंदर दिसत होती दीपा. "चिखलात कमळ उगवतंय म्हणतेत ते खरं आहे बघ दीपा. आमच्या सारख्या गरीब कुटुंबात इतकं सुंदर आणि हुशार लेकरू जन्माला आलंय हे आमचं भाग्य आहे. थांब तुझी दृष्ट काढते. कोणाची नजर नको लागायला माझ्या लेकराला." म्हणून आई मीठ घेऊन आली.

"आई, मला नाही आवडत दृष्ट काढलेली तुला माहितीय ना." दीपा म्हणाली.

"कधीच नाय काढू दिलीस म्हणूनच माझ्या लेकराला कोणाचीतरी दृष्ट लागलीय.तू गप उभी रहा इथं."आई म्हणाली.

आई ने दीपा ची दृष्ट काढली.तेवढ्यात आबाही घरात आले.

"हे घे पोरी. घाल हे गळ्यात." आबा म्हणाले.

आबांनी अगदी छोटीशी दोन मंगळसूत्र काळ्या मण्यांच्यामध्ये ओवून आणली होती. 

"नाही हं आबा, मी नाही घालणार. देऊन या परत.आबा,  तुम्हीच म्हणतात ना \"अंथरूण पाहून पाय पसरावे\" मग कशाला उगीच खर्च करताय ? लोकांकडून उसने घेतलेले पैसे परत करावे लागतातच ना आज ना उद्या. " दीपा म्हणाली.

"अगं पोरी, कोणाकडूनही उसने पैसे नाहीत घेतलं मी. तुझ्या आईनं रात्री मला तीच्या जवळ ठेवलेलं पैसं देऊन बजावलं होतं की तुझ्यासाठी नवीन मंगळसूत्र घ्यायला. आमच्या पैशाची आहेत ही मंगळसूत्र." आबा दीपाची समजूत काढत म्हणाले.

दिपाने आई कडे बघितलं. आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

"दीपा, तू नाही म्हणू नकोस बरं. एवढं पण ऐकणार नाहीस का तुझ्या आईचं." आई म्हणाली.

"अगं आई, पण त्यांनी संतोष चं दुसरं लग्न करायचे ठरवले आहे. आणि मी का घालू त्याच्या नावाचे मंगळसूत्र माझ्या गळ्यात?" दीपा रागाने म्हणाली.

"तुझ्या आईच्या समाधानासाठी घाल दीपा." आबा म्हणाले.

दीपाने मंगळसूत्र गळ्यात अडकवले, पण संतोष च्या आठवणीने तिचे मन हळवे झाले. आबांनी \"चला\" म्हणून दीपाला सांगितले.

दिपा आणि आबा बॅग भरून स्टॅंडवर आले. पंधरा-वीस मिनिटानंतर एसटी आली. एसटीत बसून काही वेळाने आबा आणि दीपा शहरात पोहोचले.

"आबा थांबा मी रिक्षा बोलावते." दीपा म्हणाली.

"अगं दीपा,कॉलेज जवळ असेल, तर जाऊ की चालत. रोज आम्ही शेतात चालतच जातो की." आबा म्हणाले.

"आबा,आपल्याला लवकर पोहोचायचं आहे ना कॉलेजमध्ये म्हणून रिक्षा करूया." दीपा म्हणाली.

"बरं, बरं. बोलाव रिक्षाला" आबा म्हणाले.

रिक्षात बसून बाबा आणि दीपा कॉलेजमध्ये पोहोचले. 

"अरे बापरे किती गर्दी ? दीपा काय करायचं गं आता?" कुठं जायचं ?"आबा घाबरून म्हणाले.

"अहो आबा, हे बघा या इन्क्वायरी रूममध्ये हे सर बसलेत ना तिथे जाऊन, आपण इथे कशासाठी आलो आहोत ते सांगायचं असतं. मग ते आपल्याला पुढे काय करायचं ते सांगतात." दीपा म्हणाली.

दीपा किती व्यवस्थित ऍडमिशन ची चौकशी करत होती. हे आबा पाहात होते. 

\"वाटेल का कुणाला तरी दीपा माझ्यासारख्या अडाणी बापाची लेक आहे म्हणून. मला दीपा चा अभिमान वाटतो.\" आबा मनात विचार करत होते.

दीपाने इंग्रजी फॉर्म घेतला आणि इंग्रजीमधला तो फॉर्म तिने पटापट भरला. लागणारी सर्व डॉक्युमेंट्स त्याच्यासोबत देऊन तो फॉर्म तिने क्लार्ककडे जमा केला. पुस्तकांची चौकशी केली.

"सर मला नाईट कॉलेजला एॅडमिशन घ्यायचं आहे." दीपा म्हणाली.

"अगं पोरी आपल्या गावावरून तुला येणं जमणार आहे का? जरी अर्ध्या तासाचा रस्ता असला तरी रात्रीच्याला यायचं अवघड वाटतेय बघ." आबा म्हणाले. 

"आबा मी तुम्हाला सांगते सगळं." म्हणून दीपा आबांना घेऊन एका झाडाखाली आली.

"आबा शिकवणी अर्ध्यावर सोडून देणं योग्य दिसत नाही. आणि किती विश्वासाने गौरव ने माझं नाव घेतले आहे शिकवणीमध्ये. आपल्या शेजारची ती किरण, प्रीती अजून दोघी-तिघी नाईट कॉलेज करतात इथं.येईन मी त्यांच्यासोबत. तुम्ही नका काळजी करू." दीपा म्हणाली.

हे ऐकून आबांचा जीव भांड्यात पडला. दीपाने सोबत आणलेला डबा उघडला. जेवण करून आबा आणि दीपा गावी यायला निघाले.


येणारा प्रत्येक दिवस आजच्या सारखाच पहाटेपासून आनंद देणारा असेल ना दीपा साठी. पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. कथा आवर्जून वाचली त्याबद्दल सर्व वाचक वर्गाचे मनापासून आभार. तुमच्या अभिप्रायामुळे लिखाणातील उत्साह द्विगुणित होतो.

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.

# कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.


 





🎭 Series Post

View all