तिचा संघर्ष भाग-20

Every Woman Wants Love,respect And Support.

तिचा संघर्ष भाग-20


काल आपण पाहिले की, जोशना दीपा च्या मागोमाग शिकवणी वर्गापर्यंत पोहोचली होती. दीपाला मात्र या गोष्टीची माहिती नव्हती. जोशना दीपासमोर कोणता नवा संघर्ष निर्माण करणार ते आज आपण पाहणार आहोत.


दीपा आज उपवास असल्यामुळे काही न खाता पिताच शिकवणी वर्ग जिथे चालू होते त्या ठिकाणी पोहोचली. दीपा आपल्याच विचारात मग्न होती. गौरवने दीपा कडे पाहिले. पण दीपाचे मात्र गौरव कडे बिल्कुल लक्ष नव्हते. 


'आज दीपा खूपच टेन्शन मध्ये दिसतेय. काय झालं असेल? का रागावली असेल माझ्यावर ? त्या दिवशी दीपा घाईत होती आणि उगीचच तास घे म्हणालो तिला. चुकलच वाटतं माझं जरा. आता दीपाला स्वारी तर म्हणावं लागेल, त्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही.' असे अनेक प्रश्न गौरव च्या मनात घिरट्या घालू लागले.


गौरव दीपाच्या पाठोपाठ वर्गात गेला. दीपा एका विद्यार्थिनीची समजून काढत होती.थोड्या वेळाने गौरवने त्या विद्यार्थिनीला बोलावून घेऊन विचारले, "दीपा मॅडम काय म्हणत होत्या तुला."


"काही नाही, रोज रोज माझ्यासाठी चॉकलेट नकोस आणत जाऊस म्हणाल्या. आणि आज त्यांचा उपवास असतो म्हणून त्यांनी थोडेही चॉकलेट नाय घेतले माझ्याकडून." ती विद्यार्थिनी नाराज होऊन म्हणाली.


"बरं.बरं. जा तू बस वर्गात." गौरव म्हणाला.


दीपाला आज खूपच थकवा जाणवत होता.उभ राहणं ही तिला असह्य झालं होतं. कधी एकदा छोटी सुट्टी होते आणि ती खुर्चीवर बसते असं तिला झालं होतं. छोटी सुट्टी झाली. मुले वर्गाबाहेर गेली होती. दीपा डोळे मिटून शांत बसली होती. पण मनात मात्र असंख्य विचारांची अफाट वादळे निर्माण होत होती.


" हा घे ज्यूस. " म्हणून गौरव दीपासमोर उभा होता.


दीपाने डोळे उघडले. तिचे डोळे आसवांनी डबडबले होते, 'कारण असाच एका रात्री दीपा उपाशी झोपली असताना संतोष दीपासाठी जेवणाचं ताट घेऊन आला होता. पण आज तो तिच्यावर किती नाराज झाला होता. आणि ती काहीच करू शकत नव्हती.' हा मनात विचार करून तिने डोळे पुसले.


"अगं कसला विचार करतेस? नाराज आहेस का माझ्यावर? सॉरी दीपा." गौरव म्हणाला.


"नाही कसलाही विचार नाही करत मी आणि तुझ्यावर का नाराज असेल मी?" दीपा म्हणाली.


"नाहीस ना. मग घे, हा ज्यूस पिऊन घे." गौरव म्हणाला.


"अरे नाही,नको. तू घे. आज माझा उपवास आहे." दीपा म्हणाली.


"अगं ताज्या फळांचा ज्यूस आहे. फ्लेवर नाही वापरला की जो, उपवासासाठी नाही चालणार." गौरव म्हणाला.


दीपाने ज्यूस घेतला. पण गौरव आणि दीपा ज्यूस घेतानाचा फोटो मात्र जोशनाच्या मोबाईल मध्ये कैद झाला. 


"दीपा तुला उपवास करायची काय गरज आहे गं ? हं.. आता चांगला नवरा मिळावा म्हणून काय तो उपवास करतात पोरी, पण तो चांगला नवरा आता मिळालाय तुला मग नको करू उपवास वगैरे. आणि हो, अजून तू इतकी मोठी दिसत नाहीस की एक दिवस पोटाला आराम म्हणून केला असेल उपवास म्हणायला." गौरव म्हणाला.


दीपाने स्मितहास्य केलं. पण दीपाचा मूड अजूनही खराब आहे म्हटल्यावर गौरव ने दीपाला एक किस्सा सांगायचा ठरवला.


गौरव म्हणाला, " दीपा आपल्याला तिसरीत देटे सर होते आठवतात का तुला?"


"हो आठवतात. गणित शिकवायचे न आपल्याला." दीपा म्हणाली.


"हो ग तेच ते. त्यांनी उद्या येताना तीनचा पाढा तोंडपाठ करून या असे सांगितले होते आणि दुसऱ्या दिवशी वर्गात फक्त तू एकटीनेच पाढा तोंडपाठ केला होता." गौरव म्हणाला.


"हं." मान हालवत दीपा म्हणाली.


"अगं खरी मजा तर पुढे आहे." गौरव म्हणाला.


"काय ?" दीपा म्हणाली.


"अगं सरांनी जोरात सर्वांच्या गालात मारायला सांगितले आणि तू इतक्या जोरात माझ्या गालात मारलेलं की, माझा हा असा (म्हणून गौरव गाल फुगवतो.) हनुमानासारखा गाल टम्म फुगलेला. " गौरव म्हणाला.


आता दीपाला हसू अनावर झालं. लहानपणीचा गाल फुगलेला गौरव दीपाला आठवला. हा ही फोटो जोशनाच्या मोबाइल मध्ये सेव्ह झाला.


"सॉरी गौरव. पण सरच म्हणायचे ना रे, गालात मारलेला आवाज नाही आला तर मला दीपा तुझ्या गालात मारावे लागेल." दीपा म्हणाली.


"अगं आल्या पासून तू नाराज दिसत होतीस म्हणून सहज तुला हसवण्यासाठी हा किस्सा सांगितला."सो लेटस् कंन्टिन्युव युवर टीचिंग विथ स्माईल." म्हणत गौरव निघून गेला.


सर्व तास संपवून दीपा घरी आली. 'घर कसले नुसत्या भिंतीच आहेत या. जिथे माणसांच्या भावनाची मुळी कदर केली जात नाही.' दीपा घरात पाऊल ठेवतच मनात पुटपुटली.


"खबरदार दीपा, घरात पाऊल ठेवशील तर. घरी येऊ नकोस. कुठे जायचे तिथे जा." संतोष म्हणाला.


"अरे काय झालं तुला ? का असा बोलतोयस ?" दीपा म्हणाली.


"किती साजूक पणाचा मुखवटा पांघरून वावरते ही दीपा." सासुबाई म्हणाल्या.


 "तेच तर मला सांगा. काय चुकलयं माझं?" दीपाला रडू कोसळले.


"आज माझ्या मुलाने सर्व कारस्थाने पाहिली आहेत तुझी. घरात उपवास म्हणायचा आणि बाहेर मित्रासोबत ज्यूस घ्यायचा. हसायला, खिदळायला तर जायचंय तूला त्या शिकवणीला." सासुबाई म्हणाल्या.


"म्हणजे तू आज माझा पाठलाग केलास तर ? एका शब्दाने शिकवणी बंद कर म्हणाला असता तरी, मला काहीच वाटलं नसतं रे. पण आज तू हे जे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत." दीपा रागाने म्हणाली.


"तु माझ्या अडाणी असण्याचा फायदा घेतेस. अशी आज माझी खात्री पटलीय. आणि नक्कीच शिक्षणात मुलांमुळे अडचण नको म्हणूनही तु काहीतरी उपाय करत असशील असं मला वाटतेय." संतोष म्हणाला.


"इतके दिवस तू अडाणी आहेस असं मला कधी वाटलंच नाही, पण आज मात्र तू खराच आडाणी आहेस याची मला जाणीव झालीय. अरे मी तुला म्हणाले होते डॉक्टरांकडे जाऊ म्हणून. दोष फक्त माझ्यात असेल हे कशावरून ठरवतोय तू ? उपवास करून मुलं होतात म्हणणाऱ्या आईची तु साथ देतोयस म्हणजे अडाणीच आहेस तू." दीपा ठामपणे बोलत होती.


"म्हणजे माझ्या मुलामध्ये दोष आहे असे म्हणायचे का तुला?" सासुबाई म्हणाल्या.


"मला चक्कर आली तेव्हा, तुम्ही का घाबरला होतात ? आणि काय म्हणाला होतात ? हे मी सर्व ऐकलं होतं. त्यामुळे मला तुम्ही बोलायला लावूच नका. तुमच्या मुलाच्या दृष्टीने तुम्ही बरोबर आहात तर तेच खरं. मग तुमच्याबद्दल खरं काय ते सांगून तुमच्या नात्यामध्ये मला दुरावा आणणे योग्य वाटत नाही. पण मी इथून गेल्यावर तुम्ही माझ्याशी किती वाईट वागलात हे विसरू नका." दीपा म्हणाली.


"काही वाईट वगैरे वागलो नाही आम्ही तुझ्याशी. माझ्या मुलाने तू आजारी असताना किती केले तुझ्यासाठी." सासुबाई म्हणाल्या.


"अजूनही तुम्ही चूक मान्य करत नाही हेच माझे दुर्दैव." दीपा म्हणाली.


दीपा बॅग भरायला खोलीत गेली. दीपा बॅग भरून बाहेर आली. आणि आई जगदंबेच्या पाया पडण्यासाठी खोलीत गेली. दीपाच्या डोळ्यातून आसवांचा पूर वाहत होता.


"आई, माणसं सरड्यासारखा रंग बदलतात हे फक्त ऐकलं होतं. पण माझ्या आयुष्यात अशी माणसे आली की, माणसावरचा विश्वासच उडाला आहे. आता तुलाच माझ्या या निर्णयात माझी साथ द्यावी लागेल." दीपा रडत रडत म्हणाली.


दीपा आजी सासूबाईंच्या पाया पडणार तोच त्या म्हणाल्या, "पाया बिया काही पडू नकोस. उलट ते गळ्यात घातलेलं मंगळसूत्र काढून दे. तुझ्या बापाने फुटका मणी ही तुझ्या गळ्यात घातला नव्हता. आम्ही संतोष चं दुसरं लग्न करणार आहोत."


संतोष ही हे सर्व ऐकत होता. पण तो आजीला काहीही बोलला नाही. कदाचित हेच असेल त्याच्याही मनात.


दिपाच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिने विचार केला,' हे लोक कितीही चांगलं वागलं तरी, सतत चुका काढण्याचं थांबवणार नाहीत. आणि आज त्यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. उद्या ते काहीही बोलू शकतात. त्यापेक्षा संतोषला काय करायचे ते करु दे. आता मी माघार घेणार नाही.'


दीपा बॅग भरून कुठे जाईल ? पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील 


कथा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. आवर्जून वेळ काढून कथा वाचली त्याबद्दल खूप खूप आभार.


#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे. 


#कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखीकेकडे राखीव.








🎭 Series Post

View all