तिचा संघर्ष भाग-19

Every Woman Wants Love,respect And Support.
भाग -19


दीपा क्षणाचाही विलंब न करता आपल्याच विचारात लगबगीने घरी पोहोचली होती. आज दीपा घराच्या उंबरठ्यावर क्षणभर थांबली पण तिच्या सोबत आज \"घाबरू नकोस दीपा. मी आहे ना.\" म्हणणारा संतोष मात्र  उभा नव्हता. दीपा घरात गेली. सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. दीपाला पाहताच सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. 

तरीही दीपाने मावशींना आदराने विचारले, "कधी आलात मावशी?"

"बराच वेळ झाला की मी येऊन." अगदी कपाळावर आठ्या उमटवत मावशीनी उत्तरं दिलं.

"बरं मी फ्रेश होऊन आलेच." म्हणून दीपा फ्रेश व्हायला गेली.

दीपा स्वयंपाक घरात गेली. संतोष बाहेरून घरात आला होता. 

"आई मला जेवायला वाढ." संतोष म्हणाला.

दीपाने जेवायला ताट तयार केलं आणि संतोष ला जेवायला बोलवलं पण दीपाकडे लक्ष न देता, संतोष भूक नाही म्हणून बाहेर निघून गेला.

सगळ्यांच्या चेहर्‍यावर आनंदी आनंद दिसत होता. 

\"आता याला काय झालं असेल बरं?\" दीपाच्या मनात हा प्रश्न सतत घोळत राहिला. आल्यावर ही संतोषने दीपाकडे साधं पाहिलं ही नाही. न राहून दिपा ने संतोष ला विचारलं, "संतोष तुला काय झालंय? असा का वागतो तू माझ्याशी?"

"अरे वा ! चुक स्वतः करायची आणि वर दुसऱ्यालाच जाब विचारायचं हे म्हणजे असं झालंय चोराच्या उलट्या बोंबा." संतोष रागाने म्हणाला.

"अरे कोण चोर ? काय केले मी ? फक्त यायला उशीर झाला एवढेच ना. पण तिथे काय झालं ते ऐकून घेणार आहेस का तू माझं ?" दीपा उदास होऊन म्हणाली.

"आता दीपा,काय झालंय माहितीय?तू माझा नवरा झालीस आणि मी तुझी बायको. तू म्हणायचं आणि मी ऐकायच हेच हवं आहे ना तुला. आणि आता घरात पाहुणे आलेत तेव्हा त्यांच्यासमोर कसलाही वाद नको. कृपा करून मला कसलेही स्पष्टीकरण देऊ नकोस. तुला जे योग्य वाटतं ते तू करतेस. आता माझ्याकडून ही कसलीही अपेक्षा ठेवू नकोस." संतोष म्हणाला.

" वाद घालत नाही रे मी. अरे पण माझं ऐकून तरी घे." दीपा म्हणाली.

तेवढ्यात मावशीनं दीपाला आवाज दिला. दीपा आत गेली. सगळ्या बायका मिळून शेंगा फोडत होत्या. दीपा ही त्यांच्यासोबत शेंगा फोडायला बसली. मावशींन हळूच विषय काढला.

मावशी म्हणाली, "दीपा तुमच्या लग्नाला किती महिने झाले गं?"

"सात महिने." दीपा म्हणाली.

"मग काय हाय का नाही गोड बातमी?" मावशी म्हणाली.

"नाही अजून काही ?" दीपा लाजून म्हणाली. 

"तुमच्याबरोबर लग्न झालेली माझ्या नंदेची मुलगी तीन महिन्यांची गरोदर आहे आता. आत्ताच मुलं नको म्हणून तसलं काही तर करत नाही ना तुम्ही?" मावशीच्या या प्रश्नावर दीपा थोडीशी नाराज झाली.

"बघ बाई रत्नाताई, तुझी सून शिकण्याच्या नादात आताच मुल नको म्हणून गोळ्या खायची. अन् परत तुझ्या एकुलत्या एक पोराला वारस बी नाय द्यायची. मावशी रत्ना (म्हणजे दीपा च्या सासूबाईंना) उद्देशून म्हणाली. नेमकी ही गोष्ट संतोषच्या कानावर पडली होती. 

दीपाला माहित होतं, सासूबाईंना आत्ताच मूल नको आहे ते. कारण तिने तिच्या कानाने ऐकलं होतं की, मूल झाल्यावर खूप खर्च वाढतो. असं सासुबाई स्वतः बोलल्या होत्या. त्यामुळे त्या जास्त काही दीपाच्या गरोदर पणाविषयी स्वारस्य दाखवणार नाहीत अशी दीपाला पक्की खात्री होती. पण घडलं नेमकं उलट.

"व्हय गं दीपा, गोळ्या तर घेत नाहीस ना ? नाहीतर पुढं शिकायचंय म्हणून तसलं काही करू नकोस बाई." सासुबाई इतक्या काळजीनं म्हणाल्या की,दिपाला आश्चर्याचा धक्काच बसला.

"नाही सासुबाई, तसं काही नाही करत मी." दीपा म्हणाली.

संतोषच्या मनात मात्र संशयाचं बी रुजलं गेलं.

दीपाला दुसऱ्या दिवशी मावशीने कितीतरी अट्टहासाने पारायण करायला लावले. मुल होण्यासाठी अमुक हे उपवास करत जा म्हणून बजावले. 

दीपाला मनातून फार चीड आली होती. उपवास करून कुठे मूल होत असतं का? पण आधीच संतोष नाराज होता. आता पाहुण्यांना नाराज करून दीपाला रोष पत्करायचा नव्हता. म्हणून दोन दिवसांचाच तर प्रश्न आहे, म्हणून दीपाने सर्व काही सहन केले. मावशी अजय, विजय ला घेऊन जायला निघाल्या होत्या. संतोष मावशीला सोडवायला स्टँड वर गेला होता. दीपाला आज तिच्या हक्काच्या खोलीत प्रवेश मिळणार होता. किती तरी दिवसांनी दिपा आणि संतोष यांना एकांतात वेळ घालवता येणार होता. दीपा आज खूप खुश होती. संतोष चा झालेला गैरसमज ती आज कुठल्याही परिस्थितीत दूर करणार होती. सायंकाळ झाली. रात्र झाली तरी अजून संतोषचा घरी यायचा पत्ता नव्हता. दीपा वाट बघत बसली होती. जरा कुणाच्या गाडीचा आवाज आला की दीपा खिडकीजवळ येऊन संतोष आला की काय ते पहात होती. आता तिला संतोषचा थोडा राग आला होता. \"इतका वेळ असतो का घरी यायला ? बायको घरी वाट बघत असेल हे लक्षात आलं नसेल का संतोषच्या? तो आला की विचारतेच त्याला. नाहीतर नको. आधीच दोन दिवस झालं माझ्यावर नाराज आहे. परत नाराज व्हायचा.\" असे किती तरी विचार दीपाच्या मनात चालू होते.

तेवढ्यात दारात गाडी थांबल्यासारखी वाटली, म्हणून दिपाने हळूच खिडकीतून डोकावून पाहिले. संतोष मुख्य दरवाजाची कडी लावून आत आला होता. दीपाला संतोषला कधी एकदा मिठी मारते आणि सगळे गैरसमज दूर करते अस झालं होतं. पण संतोषच्या चेहऱ्यावर जराही दीपाला भेटण्याची ओढ दिसत नव्हती.

"संतोष तुला जेवायचं असेल तर वाढू का ?" दीपा म्हणाली.

"माझं पोट भरलंय. मी जेवण करून आलोय बाहेरून." संतोष दीपाकडे पाठ करून म्हणाला.

दीपा ने मागून त्याला प्रेमाने मिठी मारली.

"तुला कशाचा राग आलाय? सांगशील का मला ? ऐकूनही घेत नाहीस तू माझं." दीपा प्रेमाने बोलत होती.

"म्हणजे सगळं माझं चुकतय असं म्हणायचे का तुला ? आणि चुकूनही मूल न होण्याच्या गोळ्या वगैरे घेऊ नकोस. तु नेहमी तुझ्या मनाला वाटेल तसं करतेस म्हणून तुला सांगितलं." संतोष रागाने म्हणाला.

"अरे एवढा मोठा निर्णय मी एकटी कसा घेईल? मला मुल नकोय असं वाटतं का तुला? कसा बोलतोयस तू ?" दीपाने आवंढा गिळून संतोष ला विचारले.

"सात महिने झाले आपल्या लग्नाला. अजूनही तुला दिवस गेले नाहीत म्हणून विचारले. आणि तु नाही ऐकलं सकाळी मावशी सांगत होती तिच्या नंदेच्या मुलीचं आपल्यासोबतच लग्न झालं म्हणून. आणि तिला मात्र दिवस गेले आहेत. " संतोष म्हणाला.

"अरे मग आपण डॉक्टरांकडे जाऊ. मग तर तुझ्या मनातली शंका दूर होईल ना .आणि सोबत लग्न झालं म्हणून काय सोबतच दिवस जायला पाहिजे असं आहे का ? लग्न झाल्यापासून कितीसा आपल्याला एकांत मिळाला रे ? फक्त शरीराने एक होणं म्हणजे लग्न नव्हे. संसार सुखाचा होण्यासाठी मनं जुळणं खूप महत्त्वाचं असतं." दीपा ने सडेतोड उत्तर दिलं.

"म्हणजे अजून आपलं मन जुळलं नाही, असं म्हणायचं का तुला?" संतोष म्हणाला.

"जाऊ दे मला तुझ्याशी काही बोलायचं नाही." म्हणून दीपा झोपी गेली.

आज दीपाने ही निश्चय केला होता की, जोपर्यंत संतोष स्वतःहून तिला बोलणार नाही तोपर्यंत तिही संतोष सोबत अबोला धरणार होती. 

सकाळी सासूबाईंनी दीपाला जेवताना चक्क अडवलं होतं. का तर म्हणे आज उपवास केला तर मुल होण्यासाठी फायद्याचा ठरेल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे संतोष ने ऐकलं होतं पण तो काहीही बोलला नाही. याचं दीपाला फारच वाईट वाटलं.

\"मूल जर माझं आणि संतोषचं असेल तर मी एकटीनं उपवास केल्यावरच कसे होईल? पण फक्त मला त्रास व्हावा हीच यांची इच्छा आहे.\" दीपा मनात विचार केला. घरातून नाराज होऊन दीपा शिकवणी घ्यायला गेली. जोशना ही दीपाच्या मागोमाग शिकवणीच्या ठिकाणी पोहोचली.

दीपा च्या मागे जाण्याचा जोशनाचा काय बरं हेतू असेल ? पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ.प्राजक्ता पाटील.

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. कथा आवर्जून वाचल्या बद्दल खूप खूप आभार.

# साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.

# कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेकीकडे राखीव.






🎭 Series Post

View all