तिचा संघर्ष भाग-14

Every Woman Want Love ,respect And Support.

दीपाला आता आधार होता, तो फक्त संतोषच्या पाठिंब्याचा.


तिचा तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता आणि हाच विश्वास  तिला सांगत होता की, संतोष तिला समजून घेईल आणि ती जे आज वागली होती,बोलली होती त्याचा संतोष नक्कीच आदर करेल. दीपा संतोष च्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. 


आई,आजी आणि जोशना यांनाही दादा आपल्याला दुखावणार नाही याची खात्री होती त्यामुळे तो वहिनीला घरात काही शिकवणी घेऊ देणार नाही या आवेशाने त्या तिघीही संतोष ची वाट पाहत बसल्या होत्या.


संतोष आला. सगळ्याजणी अगदी मोहोळा ला माशा जशा चिटकतात तशाच संतोषला घेराव घालून उभ्या राहिल्या.


"आज तुझी बायको माझ्या मुलीशी फार चुकीची वागली आहे, जे तिने केले त्यासाठी तिने जोशना ची माफी मागावी." आई म्हणाली.


"नेमकं काय झाले ? सांगेल का कोणी मला ?" संतोष म्हणाला.


"अरे आता कुठे चार पैसे कमवायला लागलीय, स्वतःला फारच शहाणी समजायला लागलीय. मला तर आज तिने फारच तोऱ्यात आणि उद्धटपणे उत्तरं दिली आहेत." आई म्हणाली.


सर्वांना संतोष आता दीपाला चांगलाच चोप देणार असे वाटले. पण संतोषने शांतपणे दीपाला बोलावून घेतले. 


"काय झाले होते दीपा, मला सांगशील का ?" संतोष म्हणाला.


"तिला काय विचारतोय ? आम्ही सांगितले ना तुला. का विश्वास नाही आमच्यावर ?" आई चिडून म्हणाली.


"मग दीपाचं ऐकून न घेता तिला माफी मागायला लावावी अशी इच्छा आहे का तुझी ?" संतोष म्हणाला.


"मग तुझ्या बहिणीशी आणि घरातल्यांशी ती कशीही वागली तरी चालणार आहे म्हणजे तुला ? आई म्हणाली.


"आई तु दीपा च्या बाबतीत खूप चुकीची वागत आहेस. तु तिच्याबद्दल तुझ्या मनात जो गैरसमज निर्माण करून घेतला आहे त्यामुळे तुला दीपा किती चांगली आहे हे दिसत नाहीये." संतोष चे वाक्य अर्धातूनच मोडून काढत 


आई म्हणाली," म्हणजे जन्मदाती आई तुझ्यासाठी चुकीचे आहे या दीपासाठी."


"काय म्हणते आई मगाच पासून ही दीपा.. ही दीपा.. ही दीपा म्हणजे कोण ? माझी जीवन साथीच ना. माझ्यावर विश्वास ठेवून या घरात आली ती या घरची लक्ष्मी. तुम्ही जशा माझ्या आहात तशी ती ही माझीच आहे. त्यामुळे मला तिचे ही ऐकून घ्यावेच लागेल. तिचे म्हणने ऐकून न घेता मी तिला जोशनाची माफी मागायला नाही लावू शकत. माफ कर मला. " संतोष म्हणाला.


"तु बायकोला चांगलेच डोक्यावर चढवून ठेवतोय बघ." आजी म्हणाली.


"आजी तु तर मला बायकोला डोक्यावर चढवून ठेवणं काय असतं? याबद्दल काही बोलूच नकोस. आपल्या वाड्यात नवऱ्याला घेऊन महिन्याच्या आत वेगळा संसार थाटणारी तूच होतीस. मग घरातली मोठी सून म्हणून तुला झालेला त्रास किंवा अन्य कोणतेही कारण असू दे. पण तु अडाणी असूनही तुला सहन झालं नाही म्हणून तु अन्याय सहन केला नाहीस. मग दीपा सहा महिने झाले तरी एका शब्दानेही मला तुमच्या बद्दल काही सांगत नाही तेव्हा वेगळा संसार थाटावा असा तिचा कोणताही विचार नाही. मग तिच्यावर मी अन्याय का करावा ?" संतोष किती मोजक्या शब्दात खूपच मार्मिक बोलून गेला होता. आजीची बोलती बंद झाली होती.


"छान ! म्हणजे बायको समोर आमचाच पाणउतारा करतोयस ?" आई म्हणाली.


"आई, तुझं बोलून झालं असेल तर, आता दीपाला बोलू दे." संतोष म्हणाला.


"बोल दीपा तू." संतोष दीपाला उद्देशून म्हणाला.


"संतोष, अरे सून म्हणून त्यांनी मला चुकत असेल तिथे बोलणं हा त्यांचा हक्क आहे ; पण जिथे बरोबर असेल तिथे कौतुक करणे हे त्यांचं कर्तव्य नाही का ?"


"म्हणजे नेमकं काय झालं ?" संतोष म्हणाला.


"सुरुवातीपासूनच यांनी मला त्रास द्यायचं ठरवलं होतं. कॉलेजला जायचं नाही म्हणून तुझी शपथ घातली होती हे तुला सांगायचं नाही ही यांची अट होती." दीपाचे बोलणं अर्धवट आडवत सासूबाई म्हणाल्या,


"पण दीपा खरयं का नाही मी म्हणलेलं ? तुझं नवऱ्यावर प्रेमच नाही. शपथ घालूनही सांगितलं की आता तु त्याला सगळं." सासुबाई संतोषसमोर दीपाच त्याच्यावर प्रेम नाही हे सांगू पाहात होत्या.


पण संतोष म्हणाला, "आई, हे दीपाने मला आज नाही सांगितले, खूप दिवसापूर्वी सांगितले आहे. पण हा मी तिला कॉलेजला ऍडमिशन न घेण्याचं खरं कारण सांगण्यासाठी तुझ्यासारखीच माझी शपथ घातली होती. त्यामुळे तिला खरं काय ते सांगावे लागले होते. कॉलेजला गेल्यावर तुमच्या सगळ्यांचा रोष पत्करावा लागेल म्हणून घरीच तिने शिकवणी घेण्याचा निर्णय घेतला होता. मग त्यात चार पैसे कमावले तर तिने स्वतःला शहाणा समजलं असं का वाटलं तुला?"


"रोज जोशना ताई , मुलं शिकवणीला यायच्या आधी फरशी पुसायला येत होत्या आणि मुलांना ओरडून "दहा मिनिट थांबा रे बाहेर फरशी वाळली की आत या." असं सांगत होत्या. आजी ही टीव्हीचा आवाज मोठा करून शिकवणीच्या वेळी रोज टीव्ही पाहात होत्या. जोशना ताई ही मी ज्या खोलीत शिकवणी घेत तिथे येऊन फोनवर बोलत होत्या. रोज रोज शिकवणीच्या वेळी नवीन संघर्ष माझ्यासमोर उभा राहत होता आणि आज तर जोशना ताईंनी मुद्दाम रेडिओवर गाणे लावले आणि इतका मोठा आवाज केला की, मी काय बोलते हे मुलांना ऐकू जात नव्हतं. मी दोनदा त्यांना विनंती केली पण तरीही त्या माझ्याकडे दुर्लक्ष करत होत्या म्हणून मी रेडिओ बंद केला यात माझं काय चुकलं तुच मला सांग ?" दीपा म्हणाली.


"असं का वागताय तुम्ही सगळेजण?" संतोष म्हणाला.


"दीपा शिकवणी घेऊन आमच्यावर उपकार करतेय का ? का आम्ही ती शिकवणी घेते म्हणून घरात वावरायच पण नाही का ? माझी लेक काही पण करू शकते तिला वाट्टेल ते . तिच्या मनाला वाट्टेल ते. कोणी माझ्या लेकीला बंधन घातलेली मला नाही चालायची." आई म्हणाली.


"आणि एक संतोष, मला तुला सांगायचे आहे." दीपा म्हणाली.


"हा बोल. संतोष म्हणाला.


"आईंचा पाय मुरगाळला नव्हता, त्यांनी पाय मुरगळल्या चं  नाटक केलं होतं ." दिपा म्हणाली.


"काय? कशासाठी आई हे सगळं?" संतोष म्हणाला.


"कशासाठी म्हणजे? एकुलत्या एक मुलाची आई आहे मी आणि त्याच्याच लग्नात मला जर मानपान मिळाला नाही तर मी बोलणारच ना.अन् मी माझ्या मुलाला घर दाखवायच्या आधीच कशी पाठवू तिला सोडायला माहेरी ?" आई म्हणाली.


"आई, मला चांगल आठवतय की तुला आजी नेहमी म्हणायची, फुटकी वाटीही नाही आणली बापाच्या घरून पण इथे राज्याची राणी झाली. मी उभा केलाय हा सगळा संसार. आणि आपण आत्ता जी जमीन पिकवतो ती ही आजीने च दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून विकत घेतली होती बरोबर ना!" संतोष म्हणाला.


"होय खरं आहे. पण आमच्या काळात नव्हतं असलं.आता विहीनबाईना चांदीचा सुई दोरा, चांदीचा दगड असे अरे किती काय काय दिले जाते आणि समाजात मान मिळतो तो वेगळाच. खूप करणी आली आमक्याच्या पोराला म्हणून. पण माझं नाहीच एवढं नशीब. आधीच दारूडा नवरा पदरी पडला म्हणून कुठल्याच कार्यक्रमात कधी कसलाच मान मिळाला नाही. अन् पुढं पोटच्या पोराच्या लग्नातही नाही." आई म्हणाली.


"अगं आई, तुच मला सांग, आपण शेतात धान्य पेरतो. ते जास्त दिवस टिकेल की विकत आणलेलं." संतोष म्हणाला.


"हे काय मधीच?" आई म्हणाली.


"सांग तर खरं." संतोष म्हणाला.


"पेरलेलंच खूप दिवस पुरवणी येतयं बघ." आई म्हणाली.


"कारण ते आपल्या कष्टाचं असतय. मग यापुढे तु दीपाला मानपान किंवा हे दिले,ते दिले नाही. असं म्हणायचं नाही हे लक्षात ठेव." संतोष म्हणाला.


"आणि दीपा यांना तु शिकवणी घ्यायला नकोय ना, तर तु नको घेऊस उद्यापासून घरात शिकवणी." संतोष म्हणाला.


काय असेल दीपाच प्रतिउत्तर ? 


पाहूया पुढील भागात क्रमशः 


सौ.प्राजक्ता पाटील 


लेख आवडल्यास लाईक करा,कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.


आवर्जून लेख वाचल्याबद्दल आभार 






🎭 Series Post

View all