तिचा संघर्ष भाग- 12

Every Woman Wants Love, Respect And Support.

"अहो, काय झालं हो ? काय बोलले का दीपाच्या सासरचे ? नुसते बिस्कीटचे पुडे घेऊनच वडील आले वगैरे असलं काय ? जावईबापूनी काय अपमान केला का तुमचा ? पण तुम्ही काय काळजी करू नका. आपण कसे आहोत हे आपल्याला माहितीच आहे की." दीपा ची आई घाबरत घाबरतच दीपा च्या वडिलांना म्हणाली.


"अगं तसं कायबी झालं नाही बघ शांता आज. दीपाच्या सासरी गेल्यावर मुलीचा बाप म्हणून मला कोणीही हिणवले नाही किंवा पाणउतारा केला नाही." दीपा चे वडील अगदी तोंड भरून लेकीच्या सासरचं कौतुक करत होते, तेव्हा जणू काही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.


"देवच पावला म्हणायचं बाई. लय मोठं भाग्य हाय माझ्या पोरीचं. माझी पोर बी लई गुणाची हाय हा पण आपली चूक नसेल तर सहन बी करायची नाय अशीच आहे माझी दीपा." दीपाच्या आईला आपल्या लेकी बद्दल किती बोलू अन् किती नाही, असं झालं होतं.


"अगं थांब, थांब किती कौतुक करशील आपल्याच पोरीचं. आपलं जावईबापू बी लई गुणाचं आहेत बघ. मी दीपाला न्यायला आलोय म्हटल्यावर कसलीही अपेक्षा न ठेवता मी येतो की स्वतः सोडायला दीपाला असं किती मोठ्या मनाने म्हटलं बघ." आबा म्हणाले.


मुलाचं कौतुक करताना वडिलांना जसा अभिमान वाटावा  तसाच आबांना आपल्या जावयाचं कौतुक करताना अभिमानानं ऊर भरून आला होता.


"आलेच मी ." दीपाच्या आई म्हणाली.


"आता तू कुठे चाललीस ?" आबा म्हणाले.


" देवाजवळ साखर ठेवून येते." दीपा ची आई म्हणाली.


आज सदाशिवराव आणि शांताबाई यांना खऱ्या अर्थानं समाधानाची झोप लागली होती.


पण इकडे दीपाची मात्र झोपचं उडाली. 


' संतोष थोड्या वेळा करता बाहेर काय गेला, किती बोलल्या ह्या सगळ्या जणी मला? काय तर म्हणे बिस्कीटचा पुडा घेऊन आले तुझे वडील.पण त्यांना काय माहित ? माझे आबा आले हेच माझ्यासाठी लाख मोलाचं होतं. खरंच आबा, लहानपणापासून मला वाटायच आम्ही तुमच्या मुली असूनही तुम्हाला ओझंच वाटतोय , पण आज तुम्हाला मी आजारी हे कळल्यावर चैन पडली नाही लगेच आलात तुम्ही मला भेटायला म्हणजे खरंच आबा तुम्हाला आमची खूप काळजी आहे.' दीपा मनात विचार करत होती.


पाणी घ्यायच्या निमित्ताने संतोष स्वयंपाक घरात आला होता. त्याने पाहिलं अजूनही दीपा जागी होती.


" अगं दीपा, किती वाजलेत ? झोपली नाहीस का अजून? का पुन्हा आजारी पडायचय ?"


" तू तर कुठे झोपलाय अजून? " दीपा म्हणाली.


" तुझ्या काळजीमुळे झोपच उडाली बघ माझी." संतोष म्हणाला.


"अरे झोपच येत नाहीये. आज माझे आबा आले आणि लहानपणापासून आबांबद्दल मी जो विचार करायचे तो त्यांनी खोटा ठरवला याचा मला खूप आनंद झालाय." दीपा म्हणाली.


"अस्सं आहे होय ! मला वाटलं माझीच आठवण येत होती की काय?" संतोष थोडासा रोमॅण्टिक भावनेने दीपाला म्हणाला.


" हो रे तेही आहेच. म्हणजे बघ आपल्या जोडीदाराबरोबर आपण आपला आनंद, दुःख किती हक्काने व्यक्त करतो तसं इतरांपुढे करू शकत नाही आणि जेव्हा आपण आपला आनंद, दुःख व्यक्त करतो, तेव्हा ते हलकं होतं की नाही आणि आजचा आनंद तुझ्यासोबत व्यक्त केला मग तोही हलका झाला बग आता. येईल मला आता शांत झोप. दीपा आनंदाने म्हणाली.


बर झोपा मग आता. दीपाला 'शुभ रात्री' म्हणून संतोष स्वयंपाक घरातून बाहेर गेला.


' संतोष तुझ्या सोबत मी फक्त आनंद व्यक्त केला. तू गेल्यानंतर घरच्यांनी जो माझा अपमान केला, ते दुःख आता व्यक्त करण्याची वेळच नव्हती म्हणून मला माफ कर.' दीपा स्वगत पुटपुटली. आणि झोपी गेली.


पहाटेच्या मंगल समयी, मंगल अशा घंटा नादाने घरातल्या सगळ्यांच्या साखरझोपेला पूर्णविराम मिळाला. कोण इतक्या सकाळी उठून देवीचे भजन गातेय ? म्हणून जो तो आपल्या बाजूला झोपलेले सगळे आहेत ना. हेच पाहत होता.


सगळेच खोल्यांमधून बाहेर आले आणि देव घरापाशी येऊन थांबले. नुकतेच धुऊन बांधलेले ते लांबसडक काळेभोर केस, देखणी दीपा आणि तिचा तो मंजुळ स्वर ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध करत होता. हे भजन संपूच नये असेच प्रत्येकाला वाटले, पण केवळ ती दीपा होती म्हणून कौतुक मात्र कोणाच्याच तोंडून झाले नाही. पण सगळेजण गेल्यानंतर आजी सासूबाईंनी संतोषला नवरात्रीच्या पहिल्या रात्री ची सुरुवात दीपाच्या ह्या भजनाने करावी असे सुचवले. हे ऐकून दीपाला खूप समाधान वाटले. प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे आजीसासूबाईनी दीपाचे कौतुकच केले होते त्यातच दीपा चे मन आनंदाने न्हाऊन निघाले होते. 


"अगं, दीपा तुला आजारी आहेस म्हणून आराम कर सांगितले, तर हे काय ? काय गरज होती तुला एवढ्या लवकर उठायची ?" संतोष म्हणाला.


"अरे त्या जगदंबेच्या कृपेने, मी अगदी ठणठणीत आहे काही होणार नाही मला." दीपा म्हणाली.


सर्वांनी मिळून स्वयंपाक उरकला. दररोज दीपाला आजारी आहे म्हणून का असेना थोडाफार सर्वांचा कामाला हातभार मिळत होता. त्यामुळे दीपा आनंदी होती.


आणि शेवटी त्या आई जगदंबे ची नवरात्र अगदी थाटामाटात साजरी करण्यासाठी सर्व भक्तगण तयारीला लागले होते. आज जगदंबा मातेची रंगीत फुलांनी सजवलेल्या भव्यदिव्य मंडपात "आई राजा उदो उदो.."  च्या गजरात चौकात स्थापना झाली. आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली ती म्हणजे दीपाने सुरेल आवाजात गायलेल्या भजनाने. सर्व ग्रामस्थांनी दीपा चं भरभरून कौतुक केलेले पाहून जन्मदात्या आबांना आणि जन्मभराचा साथीदार असलेल्या नवऱ्याला म्हणजे संतोष ला आज आकाश ठेंगणे झाले होते. आईने तर दीपाला प्रेमाने मिठी मारली. 


" लई मोठी हो बघ दीपा " आई म्हणाली.


" शिकून तवाच मोठी करायची होती. लग्नाची जरा घाईच केली वाटतं तुम्ही." सासुबाई थोड्या रागातच म्हणाल्या.


दीपा चे पाणावलेले डोळे पुसत आई म्हणाली, " त्या बोलल्या त्यात बी काय खोटं नाही, ते बी खरंच आहे बघ दीपा. यांच्या एक्सीडेंटमुळं तुझं लग्न अचानकच झालं आणि तू गेल्यावर तुझं मोल आम्हाला कळालं." आई जरा स्पष्ट बोलली.


आज दीपाला आईचे हे शब्द खूप मोठे प्रोत्साहन देऊन गेले. 


"आई तू आणि आबा सुद्धा खूपच चांगले आहात गं." सासरी आल्यावर मलाही तुमची खूप किंमत कळालीय.


नवरात्रीचे नऊ दिवस वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून गावातील सर्वच बालचमू तसेच युवकांना आपले कलागुण सादर करण्यासाठी वाव मिळाला होता. आणि या कार्यक्रमाचे सर्व नियोजन दीपाने अगदी चोख बजावले होते त्यामुळे शिकलेली आपली सून खरचं किती हुशार आहे हे सगळ्यांच्या डोळ्यात दिसत होते पण दीपाला हे बोलून दाखवले तर ती डोक्यावर बसेल ही भीती मनात बाळगून कोणी काही बोलले नाही.


नवरात्र संपली तशी आत्या तिच्या सासरी जायला निघाली. मायलेकींच्या गळाभेटी झाल्या. संतोष आत्याला बस स्थानकापर्यंत सोडवायला गेला. जायच्या आधी मात्र आत्याने दीपाच्या सासुबाई चे कान भरले होते. "वहिनी, त्या दीपा च्या आईला ह्या दिवाळीला तर घर दाखवा म्हणाव. नाहीतर लग्नात जशी तुमची किंमत केली नाही तशी यापुढे होणार नाही बघ लक्षात ठेव." वहिनीने म्हणजे दीपाच्या सासूबाईंनी हाच मुद्दा लक्षात ठेवला. आणि पाय घसरून पडल्याचं खोटं नाटक सुरू केलं. मग जोशनाने त्यांना खोलीत नेऊन झोपवले. संतोष घरी आला होता. दीपाने सासुबाई पाय घसरून पडल्याचे सांगितले संतोष आईच्या खोलीत गेला.


"आई, कशी ग पडलीस तू ?" संतोष म्हणाला.


"पाय घसरून पडले रे बाबा. आता कसं व्हायचं ह्या घरच्या कामाचं. तुझी बायको तर आजारी म्हणून चालली माहेरला आजी तर कोणत्याच कामाला हात नाही लावत अन् मावशीने इतके दिवस जोशनाला किती फुलात सांभाळलं अन् तिच्या लेकराला चार दिवस सांभाळलं नाही असं माऊशीला वाटायचं. जोशनाला काय एकटीला काही सुधरायचे रे बाबा.अवघड होऊन बसलं सगळं. " आई अगदी ढोंगीपणे खरे वाटेल असे बोलली.


" तू म्हणती ते पण खरयं, काय करावं तेच कळेना बघ.तू आता आराम कर बघू उद्या काय करायचं ते." संतोष म्हणाला.


"मी एक सांगू का तुला संतोष ? आता दसरा झालाय, दिवाळी पण जवळ आलीय. मग असं केलं तर दीपाला आपण दिवाळीला तिच्या माहेरी पाठवलं तर. तिला बी राहता येईल थोडे दिवस तिकडं मनमोकळे पणाने. अन् माझा पाय बी बरा होईल तोपर्यंत आणि अजय,विजयला बी पाठवू मावशीकडं. बघ बाबा तुझं तू ठरव." आई म्हणाली.


काय असेल संतोष चा निर्णय ? पाहू या पुढील भागात क्रमशः


सौ.प्राजक्ता पाटील.


लेख आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.


आवर्जून लेख वाचला त्याबद्दल खूप खूप आभार.


# लेख चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे.


@लेख प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखीकेकडे राखीव.





🎭 Series Post

View all