तिचा संघर्ष भाग-58

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग-58



"ये ना दीपा, बस. वय झाल्यावर माणूस अगदी लहानमुलासारखा वागतो हे याआधी नुसतं ऐकलं होतं पण आता प्रत्यक्ष अनुभवतेय. मघाशी जरा जास्तच बोलले का गं मी ?" मॅडम दीपाला म्हणाल्या.



"नाही हं मॅडम,प्लीज तुम्ही असं नका न बोलू . पण जी गोष्ट मी आई, आबा आणि तुमच्यापासून लपवून ठेवली ती मात्र आज मला तुम्हाला सांगावी लागेल." दीपा म्हणाली.



आई आणि मॅडम घाबरून एकमेकींकडे पाहत होत्या. 


दीपा पुढे म्हणाली , मला माहितीय, आईला आणि तुम्हाला वाईट वाटले, मी गप्प का बसले ? याचे. आई, आम्ही त्यादिवशी आलो मॅडमना भेटायला म्हणून. पण रात्री मला आक्काचा फोन आला की, राणी एका गावातल्या मुलासोबत पळून गेली आहे. आक्का आणि भावजीही खूप रडत होते. पण तुम्हाला हे सगळं सांगून कशाला टेन्शन द्यायचं ? म्हणून मी आणि संतोष शार्दुलला तुमच्याजवळ ठेवून आक्काकडे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्ही राणीला भेटायला गेलो तर राणीला त्या मुलाच्या घरच्यांनी दिलेली वागणूक आणि आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव उशिरा का असेना पण झाली होती. ती आमच्या बरोबरच परत यायला निघाली म्हणूनच तिला गावाजवळच्या क्लासला न पाठवता आम्ही इकडे घेऊन आलो." दीपा हताश होऊन म्हणाली.



"तु हे मॅडमला आता सांगितलंस, ते बरं केलंस दीपा. कारण उद्या मॅडम हरीला लग्नाबद्दल बोलून बसल्या असत्या आणि हरीला खरं काय ते कळालं असतं तर तूच काय, आम्ही सगळेच खोटं बोललो असं वाटलं असतं. आता यापुढे राणीच्या लग्नाचा विषय नको काढायला." दीपाची आई म्हणाली.



"पण मला काय वाटतं माहितीय दीपा?" मॅडम म्हणाल्या.


"सांगा ना मॅडम." दीपा म्हणाली.



"अगं हरीश आणि राणी एकमेकांच्या प्रेमात आहेत असं वाटतंय मला." मॅडम म्हणाल्या.


"पण खरी वस्तुस्थिती कळल्यावर हरीश राणीवर प्रेम करेल का? याचाही आपल्याला विचार करायला हवा." दीपा म्हणाली.


आई आणि मॅडम दोघींनाही दीपाचं म्हणणं पटलं होतं, म्हणून त्यांनी होकारार्थी मान हलवली.



एक रात्रीचा मुक्काम झाला .सगळेचजण झोपले होते. राणीच्या रूममधील दिवा चालू होता. म्हणून दीपाने सहजच रूममध्ये डोकावून पाहिले तर राणी मन लावून वाचत बसली होती. दीपा राणीला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून परत फिरली. 


पण राणीला कोणीतरी आहे याची चाहूल लागली म्हणूनच राणी म्हणाली, "कोण आहे ?"


राणीला विनाकारण भिती वाटू नये म्हणून दीपा राणीच्या खोलीत गेली. राणीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली,  "मीच आहे गं. तुझ्या खोलीतील लाईट चालू होती म्हणून आले. खूप छान वाटलं राणी, तुला असं मन लावून अभ्यास करताना पाहून."


"हो मावशी, तू माझा आदर्श आहेस. आल्यापासून मी पाहतेय, तू नोकरी आणि नाती किती छान सांभाळतेस ते. मी ही तुझ्याएवढं जमलं नाही तरी, तुझ्यासारखं थोडंतरी बनण्याचा नक्की प्रयत्न करीन." राणी म्हणाली.


"नक्की बनशील. सगळ्यांचे आशिर्वाद आहेत तुझ्या पाठीशी आणि कर तू अभ्यास. जाते मी आता." म्हणून दीपा निघून गेली. रात्री खूप वेळ अभ्यास करून राणी झोपी गेली.


दुसऱ्या दिवशी तो मंगलमय दिवस उजाडला. महिला दिनाचं औचित्य साधून ठेवलेला सत्कार समारंभ काही कारणाने रद्द करण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्याचा न्यायदानाचा भार आपल्या खांद्यावर लीलया पेलणाऱ्या दीपाचा सत्कार आजच्या दिवशी होणार होता. सगळेजण छान तयार होऊन गाडीत बसले आणि गाडी कार्यक्रम स्थळी पोहोचली. कितीतरी प्रसन्न वातावरण होते. संपूर्ण स्टेज फुलांनी गजबजला होता. सनईचा मंद सूर गुंजत होता. मान्यवरांचे आगमन झाल्यावर स्वागतगीत गाऊन शब्दसुमने मान्यवरांना बहाल करण्यात आली. कितीतरी जय्यत तयारी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल केलेल्या स्त्रियांचा आदर केलेला पाहून प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटावा असाच हा कार्यक्रम होता. दीपा स्टेजवर विराजमान झाली.


घरातील सगळेचजण खूप खुश होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. राणीकडे पाहून राणीची आई म्हणाली, "बघितलंस राणी, शिकल्यावर किती मान मिळतो ते. माझ्या दीपाच्या कष्टाचे चीज झाले तसे तु ही कष्ट कर आणि खूप मोठी डॉक्टर बन." 


"हो आई, मी खूप मेहनत घेऊन, डॉक्टर बनून मगच गावात पाऊल ठेवणार आहे." राणी म्हणाली.


मायलेकींचा संवाद हरीशने ऐकला आणि त्याने मनात विचार केला. \"राणी, तुझ्या या प्रवासात मी तुझ्या सोबत असेन. कधीच तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही.\"


दीपाने सर्वांना एक स्त्री मनात आणलं तर, असाध्य ते साध्य करू शकते हे सांगितलं. भाषणाच्या शेवटी तिने आवर्जून आक्काचा उल्लेख केला. दीपा म्हणाली, "मी लहान असताना आक्काच्या आणि आईबाबांच्या पैशावर आमचं घर चालायचं. पण म्हणून कधी आक्काने ते बोलून दाखवलं नाही किंवा इतर छोट्या बहिणींनाही शेतात काम करायला सोबत घ्या अशी ती म्हणाली नाही. उलट आई-आबांना ती समजवायची, त्यांना जाऊ द्या शाळेत. मी आहे ना.(दीपाचे डोळे डबडबले होते.) माझ्या या कौतुक सोहळ्यात तिचाही वाटा आहे. म्हणून मी सगळ्यांसमोर तिचा सत्कार करू इच्छिते,  पण तुम्हा सर्वांची परवानगी असेल तर." दीपाने कार्यक्रमाच्या आयोजकांची आणि मान्यवरांची परवानगी मागितली.


"हो मॅडम, परवानगी आहे. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक प्रेरणास्थान असते. यशस्वी व्यक्ती मोठी होते, पण प्रेरणास्थान बनलेली ती व्यक्ती तिथेच असते. आज खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान बनलेल्या त्या ताईचा सन्मान होतोय ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आहे. आम्ही आक्काना स्टेजवर येण्याची विनंती करतो." कार्यक्रमाचे आयोजक म्हणाले. 


कधीच एवढी माणसं न पाहिलेली आक्का गोंधळून गेली. स्टेजवर जायला ती नकोच म्हणत होती. मग राणीने, "मी येईन सोबत." म्हटल्यावर राणीसोबत आक्का स्टेजवर गेली.


आडाणी असलेल्या मला,  माझ्या बहिणीने इतका मान दिला म्हणून आक्काच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.


सत्कार झाल्यावर आक्का आणि राणी खाली येऊन बसल्या. 


कार्यक्रम संपल्यावर सर्वजण जायला निघाले होते. दीपा मॅडमजवळ गेली आणि म्हणाली, "थॅंक्यू मॅडम, आज तुम्ही स्वतः ऐवजी आक्काचा सत्कार कर म्हणालात. म्हणूनच आक्काच्या चेहऱ्यावरील हा निर्मळ आनंद मला पाहता आला."


"हो गं, असे खूप सत्कार झालेत माझे. पण आक्काचा सत्कार अजूनतरी नसेल झाला कधी. तिने तुझ्यासाठी कष्टही घेतलेच होते. तिचे आभार मानायची तुला संधी मिळाली आणि त्याचं सोनंही झालं. बरं दीपा, आता आम्हाला निघायला हवं." मॅडम म्हणाल्या.


"चला आधी घरी तर जाऊ. मग लगेच निघा तुम्ही. राणी आणि हरीश दोघांनाही एक- एक दिवस महत्त्वाचा आहे." दीपा म्हणाली.


"हो." म्हणत मॅडम गाडीत बसल्या. सगळेचजण गाडीत बसून घरी आले. मावशींनी स्वयंपाक बनवला होता. सर्वांचे जेवण झाल्यावर पुन्हा गाडीत बसून आपल्या कर्मभूमीकडे सर्वांचा प्रवास सुरू झाला.


शार्दुल सर्वांना निरोप देताना उदास झाला होता. परतीचा 


प्रवास उदास होऊ नये म्हणून हरीशने त्याच्या मेडिकल कॉलेजमधील गमतीजमती सांगायला सुरुवात केली. आणि खरंच प्रत्येकजण अगदी त्याच्या कॉलेज लाईफला एन्जॉय करून आला. किती रंजक पध्दतीने हरीशने राणीला मेडिकल क्षेत्रातील कन्सेप्टची ओळख करून दिली. 


"हो हाच पॉईंट काल आम्हाला सरांनी सांगितला होता. खूप अवघड वाटला होता ऐकून, पण तुमच्या मित्रांची ही ट्रिक भारीच आहे. आता मी कधीच ही कन्सेप्ट विसरू शकत नाही." राणी आनंदाने म्हणाली.


राणीची आई राणीकडे आणि हरीशकडे कौतुकाने पाहत होती. \"जगदंबे आई, हरीशना त्यांच्या तोलामोलाचे स्थळ मिळू दे. पण माझ्या राणीला या अभ्यासात तरी त्यांची साथ मिळू दे.\" राणीची आई मनातच देवीची प्रार्थना करत होती.


सर्वजण घरी पोहोचले. राणीची आईही शेतातल्या कामामुळे लगेच त्यांच्या गावी जायला निघाली. हरीश राणीला सोबत घेऊन तिच्या आईला एसटी स्टँडपर्यंत सोडून आला होता.


राणी आईच्या पाया पडली. आईच्या आणि राणीच्या डोळ्यात अश्रू होते. आई जाऊन खूप वेळ झाला, तरीही राणी उदास आहे हे पाहून हरीशने राणीला नोट्स आणायला सांगितल्या. राणी नोट्स घेऊन हॉलमध्ये आली. प्रत्येक पॉईंट हरीश अगदी सोप्या पद्धतीने सांगत होता. राणीही मन लावून ऐकत होती.


मॅडम आणि दीपाच्या आईला खूप आनंद होत होता. आबाही हरीशचं कौतुक करत होते. 


"देव पावला अन् राणीला इतका चांगला सर मिळाला." 


आबा हसून म्हणाले. राणीने अर्धी रात्र जागून हरीशच्या सांगण्याप्रमाणे नोट्स काढल्या. सकाळी पुन्हा हरीशसोबत क्लासला जायला भेटणार व आपल्या ज्ञानात भर पडणार म्हणून राणी पटपट आवरुन तयार झाली. हरीशही राणीशी बोलता येईल तसेच तिच्या आईची इच्छा पूर्ण केल्यानंतर माझ्यामुळे आईच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल म्हणून खूप खूश होता. 


दररोजचाच हा प्रवास रोजच नवीन भासायचा. राणी आणि हरीश एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते. पण अजून एकमेकांबद्दलच प्रेम व्यक्त झालं नव्हतं पण शेवटी तो दिवस आलाच. 


अबोल प्रीत कशी बहरली? 


पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील.




🎭 Series Post

View all