तिचा संघर्ष भाग-56

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग-56



"सर तुमचं लक्षच नाहीये मुळी जेवणाकडे ? का खात नाही आहात तुम्ही?" एक विद्यार्थिनी हरीला म्हणाली.


"ती पण खात नाहीये." हरी हळूच पुटपुटला.


"कोण ती ?" म्हणून सर्व विद्यार्थिनींनी हरीच्या नजरेचा शोध घेत पाहिले, तर हरी राणीला पाहत होता आणि राणीही जेवण न करता फक्त प्लेटकडे पाहत होती. 


आता विद्यार्थिनींनी सर का अपसेट आहेत हे ओळखले आणि त्या लगेच राणीकडे गेल्या. 


आणि राणीला म्हणाल्या, "मॅम, प्लीज तुम्ही आमच्यासोबतच तिकडेच चला. राणीची प्लेट एकजणीने घेतली, तर एकजण राणीला घेऊन आली."


राणी यायला तयार झाली आणि आपल्यासमोरच्या खुर्चीवर येऊन बसली हे पाहून हरीला खूप आनंद झाला. दोघे एकमेकांकडे पाहात होते. त्या विद्यार्थिनींनी पटापट सरांभोवतीच्या आपल्या खुर्च्या उचलल्या आणि सर्वजण राणी आणि डॉ. हरीश यांना सोबत ठेवून लांब जाऊन जेवण करू लागले. 


"आता झालं ना मनासारखं मग खा ना ." हरी म्हणाला.


"काय झालंय माझ्या मनासारखं ?" असं म्हणून राणी मनात विचार करत होती, 'हरीची त्याच्या विद्यार्थिनीसोबतची जवळीक मला आवडली नाही हे बहुतेक हरीच्या लक्षात आलं असावं.'


"अगं म्हणजे आपण दोघे जेवण करूया, असं तुला वाटलं होतं ना मगाशी. तीच इच्छा म्हणतोय मी." हरी म्हणाला.


"हं." म्हणत राणीने पहिला घास घेतला. तिला अगदीच भारी वाटत होतं. राणी मनात विचार करत होती. 'मी एवढ्याशा घरात राहणारी अगदी सामान्य मुलगी.  वाटलं ही नव्हतं, एवढ्या मोठ्या मनाच्या डॉक्टरशी माझी भेट होईल. आणि ह्या सगळ्या गोड आठवणी ज्या फक्त स्वप्नात अनुभवणे शक्य होते त्या आज मला प्रत्यक्षात अनुभवता येतील.'


"राणी काय झालं? चांगल नाही का गं जेवण?" हरी म्हणाला. 


राणी विचारचक्रातून बाहेर आली. आणि म्हणाली, "तू हसशील अरे, म्हणून मी नाही सांगू शकणार तुला."


"अगं, नाही हसणार. सांग ना प्लीज." हरी म्हणाला.


"म्हणजे बघ ना,  त्यादिवशी दीपा मावशीही आपल्याला हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि आज आपणही हॉटेलमध्ये जेवण करतोय, पण मला ना हे पंचतारांकित हॉटेल फक्त पाहायला आवडतं. पण जेवण म्हणशील ना, तर माझ्या आईच्या हातची चुलीवरची भाकरी आणि मिरचीचा ठेसा याची चव यापेक्षा कैक पटीने जास्त आवडते अरे मला." राणी डोळे पुसत म्हणाली.


"अगं रडतेस काय अशी ?" मी तर तुला खूपच स्ट्रॉन्ग मुलगी समजतोय. हे घे पाणी पी." म्हणून हरीने ग्लास राणीच्या पुढे केला. 


राणीने "थॅन्क्स." म्हणून हरीच्या हातातला ग्लास घेतला दोघांनी मिळून जेवण केलं. राणी वॉशरूमला गेली. हरीला दीपाचा फोन आला होता. गप्पा मारता-मारता हरी दीपाला म्हणाला, "आज राणीला आईच्या हातच्या भाकरी आणि ठेस्याची आठवण झाली आणि तिच्या डोळ्यातून गंगा-जमुना ओघळू लागल्या."


दीपा हरीला म्हणाली, "उद्या माझा आदर्श महिला म्हणून सत्कार होणार आहे आणि मला आदर्श बनविणाऱ्या व्यक्तीत माझ्या आक्काचा म्हणजेच राणीच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. पण कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे आक्काला इथे आणणे शक्य होणार नाही ही खंत वाटते."


"दीपा मॅडम, तुम्ही काळजी करू नका. "आहे ना हरी मग डोन्ट वरी!" राणी आलीय घरी जायला निघतोय." म्हणून हरीने फोन ठेवला.


"ओके." म्हणून दीपानेही फोन ठेवला.


राणी मनात विचार करत होती. 'मी आलेय म्हणून हरीशने फोन ठेवला म्हणजे त्याला कुणीतरी गर्लफ्रेंड आहे की काय?' आणि आपसूकच तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ज्या हरीला स्पष्टपणे दिसल्या. लगेच हरीने मोबाईलची कॉल हिस्ट्री राणीच्या समोर धरली आणि तो म्हणाला, "दीपा मावशीचा फोन आलेला तुझ्या. उद्या या म्हणत होत्या. रविवार आणि त्याला लागूनच दोन सलग सुट्ट्या आल्या आहेत."


राणी प्रसन्न मुद्रा करून म्हणाली, हो मलाही आलेला फोन तेव्हा म्हणाली होती मॅडमशी बोलते म्हणून. मग या सगळे."


"हो मलाही जरा काम आहे. तुला सोडून लगेच निघावं लागेल." हरी म्हणाली.


'कुठे?' हा प्रश्न मनातच ठेवून राणी सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली.


घरी गेल्यावर हरीने मॅडमची परवानगी घेतली आणि तो निघून गेला. राणी पार्टीतल्या गमतीजमती घरच्यांना सांगत होती. सगळेजण अगदी मन लावून ऐकत होते. रात्री जेवताना मॅडमनी सगळ्यांना, " उद्या आपल्याला दीपाकडे जायचं आहे. तेव्हां लवकर तयार रहा." हे  आवर्जुन सांगितले. "हो" म्हणून सगळेजण झोपायला गेले.


सकाळ झाली. सगळेजण हरीची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात हरीच्या गाडीचा हॉर्न वाजला तसे सगळेजण लगबगीने बाहेर आले. राणीने गाडीचा दरवाजा उघडताच तिला आई आणि तिचा छोटा भाऊ गाडीत बसलेले दिसले. राणीला खूपच आनंद झाला.


"आई तू !" म्हणून राणीने आईला मिठी मारली. 


"फक्त आईच नाही, ठेसा आणि भाकरीही आहे सोबत." हरी म्हणाला. 


"काय रे हरीश." म्हणून राणी जराशी लाजली.


"हरीश का म्हणाली राणी ?" म्हणत मॅडम, आबा आणि दीपाच्या आई गाडीत बसल्या.


"अगं आई, माझं नाव हरीश आहे." गाडी स्टार्ट करत हरीश म्हणाला.


"मग हरी का सांगतो सगळ्यांना?" मॅडम म्हणाल्या. "आई-बाबांनी हौसेने माझं नाव हरीश ठेवलं होतं. पण आजी-आजोबांना मात्र हरीशपेक्षा हरी म्हणून बोलावणं खूप आवडायचं आणि त्यांना आवडायचं म्हणून मलाही आवडतं माझं नाव हरी आहे असं सांगायला." हरीश म्हणाला.


"मी हरीश म्हणेन. तुझ्या आईला आवडायचं ना, मी तुझी आईच आहे." मॅडम म्हणाल्या. 


"हो, हो, चालेल." हरीश म्हणाला.


दीपाच्या आईला खूप दिवसाने लेकीला पाहून खूप आनंद झाला. 


" म्हणजे काल तू ,माझ्या आईला आणायला गेलेला आमच्या गावी?" राणी म्हणाली.


"हो. काल दीपा मॅडमकडून तुझ्या गावाचा पत्ता घेतला. आईला सांगितलं आणि गेलो. आणि आज बघ घेऊन पण आलो तुझ्या आईला." हरीश म्हणाला.


"थॅंक्स अगेन." राणी म्हणाली.


"वेलकम." हरीश म्हणाला.


हरीश सोबत प्रवासात कितीही अबोल असणारा व्यक्ती अगदी मस्त गप्पा मारायचा. ती जुनी गाणी आणि हरीश. प्रवास भारी व्हायचा.


गाडी दीपाच्या घराजवळ आली. "किती छान आहे गं मावशीचं घर !" राणीचा भाऊ रोहन म्हणाला.


"होय खरंच किती छान आहे!" राणीची आई म्हणाली.


"हो, पण त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो बरं का. जो दीपा मावशीने केला. हे शासकीय निवासस्थान, घरी काम करण्यासाठी नोकर आणि हे वॉचमन काका सगळं मिळालं तिला." मॅडम म्हणाल्या.


"निवासस्थान म्हणजे ?" रोहन म्हणाला.


"म्हणजे शासनाकडून थोडया कालावधीसाठी घर मिळतं आणि आपली बदली झाली की, आपल्यासाठी दुसरं घर तयार असतं आणि हे घर, जे या ठिकाणी दुसरे कोणी जज म्हणून येतील त्यांना द्यायचं असतं." मॅडम रोहनच्या पाठीवर हात ठेऊन म्हणाल्या.


"पण ही बाग असेल किंवा घरातील सजावट हे सर्व दीपा मावशीने स्वतः केले आहे." हरीश म्हणाला.


"छान आहे बागही! पण डेकोरेशन पाहायला आत जावं लागेल. चला ना पटकन. " रोहन म्हणाला.


"अरे हो, हो, चला, चला." सगळेजण एका सुरात म्हणाले.


'एवढा वेळ झाला तरी कोणी आत कसे आले नाही अजून?' हा मनात विचार करून दीपा हातातलं काम सोडून बाहेर आली.


सगळ्यांना पाहून दीपाला खूप आनंद झाला. सगळ्यांच्या पटापट पाया पडून, दीपा सगळ्यांना घेऊन आत गेली. 


मावशीचे सुंदर घर पाहून "वॉव!" राणी आणि रोहन एका सुरात म्हणाले.


दिपाने आणि कामवाल्या मावशींनी स्वयंपाकाची सगळी तयारी केली होती. 


"हे बघ दीपा, मी ही चुलीवरची भाकरी आणि ठेचा घेऊन आलेय. आणि हा मिठाईचा बॉक्स. यांनी सांगितलं,(हरीशला उद्देशून ) राणीला माझ्या हातची भाकरी आणि ठेचा खूप खावासा वाटतोय म्हणून." आक्का म्हणाली. 


"फक्त राणीलाच नाही हं आक्का, मला सुद्धा तुझ्या हातची ठेचाभाकरी खूप आवडते." दीपा म्हणाली.


"दोघीही खा गं. भरपूर आणलयं." आक्का म्हणाली. 


संतोष आणि शार्दुल बाहेर गेले होते.  "आजी आली, राणी दीदी आली." म्हणून शार्दुल उड्या मारतच घरात आला.


"आई मला खूप भारी वाटतेय, इतके पाहूणे आपल्या घरी आले आहेत म्हणून." शार्दुल म्हणाला.


"शार्दुल उद्याचा कार्यक्रम झाला की, परवा आपण पाहुण्यांना घेऊन बाहेर फिरायला जातोय. तुझ्या आवडत्या बीचवर. गणपती बाप्पाचे दर्शनही घेऊ आणि खूप मजा करू." दीपा म्हणाली.


सगळ्यांनाच आनंद झाला होता. पण चिमुकल्या शार्दुलने "यस!" म्हणून तो व्यक्त करून दाखवला.


मावशींनी डायनिंग टेबलवर सगळ्यांसाठी ताट तयार केली. सगळेजण जेवायला बसले दीपाने आणि राणीनेही ठेचा आणि भाकरी घेतली. हरीशने राणीकडे पाहिले . राणीच्या चेहऱ्यावरील समाधान जीवनात आई असणं किती महत्त्वाचं असतं हे दाखवून देत होतं. राणीने हरीशला "तुला हवी आहे का ठेचा आणि भाकरी ?" असे विचारल्यावर, केवळ राणी नाराज व्हायला नको म्हणून "बघू थोडीशी." हरीश म्हणाला.


मॅडमना दोघांची जोडी मनापासून आवडत होती. दोघांनाही एकमेकांबद्दलची असलेली काळजी, प्रेम आज दिसलेही होते. मॅडम जो विचार करत होत्या तो सर्वांना पटेल काय?


पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील 


कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका. 


कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. #साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.







🎭 Series Post

View all