तिचा संघर्ष भाग-45

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग-45



आज दीपाच्या आयुष्यातील संघर्षरूपी अंधकार नाहीसा झाला होता आणि विजयाचा सोहळा साजरा करायला ती सूर्यकिरणे ही सज्ज झाली होती. आणि दीपा उठून पाहते तर काय ! सासुबाई आणि दीपाच्या आई स्वयंपाक करत होत्या. 

"खरंच खूप उशीर झालाय मला उठायला. रात्री झोपच नाही आली आणि पहाटे डोळा लागला..." दीपा हळू आवाजात म्हणाली.

"अगं दीपा, आता तु माझी फक्त सुनच नाहीस, तर लेकही झालीस. आणि आता मी बदललेय गं पोरी. आता तुला त्रास होऊ नये असंच वाटतंय गं मला. तेव्हा उशीरा उठलीस म्हणून मी नाही बोलणार तुला आता." दीपाच्या सासूबाई प्रेमाने म्हणाल्या.

गोड हसून दीपा अंघोळीला गेली. दीपा छान तयार होत होती. तिचं ते सोज्वळ रूप संतोषला मोहनी घालत होतं. संतोषने दीपाला जवळ बोलवलं. दीपा चटकन संतोषजवळ गेली. संतोषने दीपाच्या गालावरील बट हलक्या हाताने दूर करत तिच्या गालावरती किस केलं. लाजून दीपा मागे सरकली. तेवढ्यात संतोषच्या वडिलांचा आवाज आला. दीपाने मग दुरूनच फ्लाईंग किस पाठवली. संतोषने ती फ्लाईंग किसही अगदी प्रेमाने कॅच करून दोन्ही हातात पॅक केली. दोघेही इतक्या वर्षांनंतर भेटत होते त्यामुळे एक अनामिक ओढ दोघांनाही होती. 'शहरात गेल्यावर मी संतोषला खूप सारं प्रेम देईन.' दीपा केस बांधतच मनात विचार करत होती. तेवढ्यात आबांना संतोषच्या वडीलांनी "राम, राम." घातलेला आवाज दीपाच्या कानावर आला. दीपाचे सासरे आणि आबा अंगणात गप्पा मारत बसले होते. दीपाच्या सासुबाईनी दीपाला आवाज दिला तशी दीपा लगेच बाहेर आली. दीपा सासऱ्यांच्या पाया पडली. 

'मॅडम आजींनी सांगितलेले बॅड हॅबिटवाले आजोबा हेच आहेत वाटतं. माझ्या बाबांचे बाबा.' शार्दुल खोलीतून बाहेर डोकावत मनात विचार करत होता.

दीपाच्या सासूबाईंनी शार्दुलाही आवाज दिला.शार्दुल आणि रिंकी दोघेही अंगणात येऊन उभे राहिले.   

दीपाच्या सासूबाई आपल्या नवऱ्याला मनातलं सांगू लागल्या त्या म्हणाल्या ," आवं , त्यादिवशी जोशनाला न्याय मिळवून द्यावा म्हणून शहरात गेल्यावर मला समजलं की , आपली दीपा जज झालीय म्हणून. आणि आवं तिचं आपल्या संतोषवर खरंच लय प्रेम हाय बघा. त्याला भेटायला म्हणून ती हितं आली आणि दोन दिवसांत तिने माझ्या पदरात कितीतरी सुखं घातली. तिने जोशनावर चांगलं उपचार करता यावं म्हणून जोशनाला शहरातल्या दवाखान्यात पाठवलं आणि राकेशला त्याच्या घरच्यांना बी समजून सांगतलं बघा, अन् त्यांनी आपल्या लेकीला सून म्हणून स्वीकारलं . लय दिवसांतून अशी समाधानाची झोप मला काल मिळाली बघा. लय उपकार झालेत पोरी तुझे आमच्यावर."

"अहो सासूबाई सून आहे मी या घरची. सुनेचं कर्तव्यच असतं घरावरचं अनिष्ट दूर करण्याचं. आपल्या माणसाचे उपकार असतात का ? ते कर्तव्य असतं,  वाईट वेळेत साथ देण्याचं." दीपा म्हणाली.

"पण मी मात्र सासू म्हणून कोणतचं कर्तव्य केलं नाही. उलट तुझ्यावर वाईट वेळ आमच्यामुळेच आली. याचा लय पश्चाताप होतोय बघ." दीपाच्या सासूबाई म्हणाल्या.

"तुम्हाला पश्चाताप झालाय न, मग झालं तर आता काहीच जुनं आठवायचं नाही." दीपा म्हणाली.

" व्हय,  व्हय लय मोठं मन हाय तुझं." म्हणून सासूबाई दीपाच्या गालावरून हात फिरवत होत्या. त्यांना बोलण्याच्या ओघात आपण शार्दुलला बोलावले याचे भानच राहिले नाही. शार्दुलकडे पाहून दीपाच्या सासूबाई म्हणाल्या,  "आवं, हयोका ही आपल्या संतोषचा आणि दीपाचा पोरगा, आपला नातू शार्दुल."

शार्दुल चटकन आजोबांच्या पाया पडला. आजोबांनीही शार्दुलला जवळ घेतलं आणि आपल्या नेहरू शर्टातून दहा रूपये काढून शार्दुल च्या हातात देत, दीपा चे सासरे म्हणाले, " हे घे पैसे आणि जवळच्या दुकानातून तुला काय खायचं असेल तर घेऊन ये." 

शार्दुल पैसे परत करत म्हणाला ," मला नकोत पैसे."

"मग काय पाहिजे ?" दीपा चे सासरे म्हणाले.

"मी जे मागेल ते द्याल तुम्ही ?" शार्दुल हट्टाने म्हणाला.

"हे बघ माझ्याकडं हे पन्नास रुपये आहेत, एवढ्यात जे येईल ते मी तुला नक्की देतो." दीपा चे सासरे म्हणाले.

"मला जे हवंय त्यासाठी पैसे नाहीत लागणार." शार्दुल पुढे म्हणाला.

"पैसे नाहीत लागत म्हणल्यावर मी तुला ती गोष्ट दिलीच म्हणून समज." आनंदाच्या भरात दीपा चे सासरे म्हणाले.

"प्रॉमिस." शार्दुल हात पुढे करत म्हणाला.

शार्दुल काय बोलला हे न समजल्यामुळे दीपाचे सासरे दीपाच्या तोंडाकडे बघत होते.

"वचन मागतोय नातू तुम्हाला." दीपा म्हणाली.

"दिलं वचन. बोल की काय पाहिजे तुला ?" दीपा चे सासरे म्हणाले.

"मला ना तुम्ही तुमची बॅड हॅबिट सोडावी असं वाटतंय. मला हेच हवय. आणि आता मला प्रॉमिस केल्यामुळे तुम्ही इथून पुढे कधीच ड्रिंक नाहीत ना करणार ?" शार्दुल म्हणाला. शार्दुल च्या अ‍ॅक्शनवरून दीपा चे सासरे काय समजायचे ते समजून गेले.

"बोला ना आजोबा नाहीत ना करणार यापुढे ड्रिंक माझी शपथ असेल तुम्हाला." शार्दुल म्हणाला.

शार्दुलच्या तोंडावरती हात ठेवून दीपा चे सासरे आपल्या अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी शार्दुल ला म्हणाले , "आधीच मिठाच्या खड्यासारखा दोन्ही मुलांना देवाने शिक्षा दिलीय ,आता माझ्या नातवाला मी काही होऊ देणार नाही मी कधीच दारूला हातही लावणार नाही." 

हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. संतोष ही सायकल ची चाकं फिरवत फिरवत बाहेर आला. त्याची लहानपणापासून हीच इच्छा होती आपले वडील निर्व्यसनी असावे. त्या दारुमुळे रोज रोज घरात होणारी भांडणं आणि ताणतणाव यामुळे संतोषला इतर मुलांप्रमाणे बालपण अनुभवता आले नव्हते. पण आज इतक्या वर्षांनी वडिलांच्या तोंडून "मी दारू सोडणार." हे शब्द ऐकून संतोषला जग जिंकल्याचा आनंद झाला.

आज संतोषला वडिलांना "बाबा" म्हणावं असं मनापासून वाटत होतं. 

मॅडम म्हणाल्या ," जे मोठ्यांना जमलं नाही ते इवल्याशा शार्दुलने करून दाखवलं. म्हणून तर म्हणतात ना इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला."

"व्हय मॅडम,  परिस्थितीतून मिळालेली अनुभव रुपी शिकवण कायमची लक्षात राहते. मधल्या काळात माझं घर खूपच वाईट परिस्थितीतून गेलय, पण आता मला माझ्या नातवाला आणि घरच्या सगळ्यांना आनंदात बघायचे आहे बघा. शेवटचे दिस गोड व्हावे हीच इच्छा आहे आता." दीपाचे सासरे म्हणाले.

'खरंच देवा, वाईट परिस्थितीचा सामना केल्यावर आनंदाचा एक क्षणही मनाच्या इवल्याशा कुपीत जपून ठेवावा वाटतो. उद्या शहरात गेल्यावर इथल्या आठवणी मात्र मनात घर करून राहतील.' दीपा मनात विचार करत होती.

दारात ढोल-ताशांचा गजर ऐकू येत होता. सर्वजण बाहेर आले पाहतात तर काय ! सरपंच ढोल ताशाच्या गजरात मॅडमला आणि दीपाला सत्कार समारंभासाठी घ्यायला आले होते.

"चला, चला उरका लवकर." सरपंच म्हणाले.

दीपाने सर्वांनाच येण्याचा आग्रह केला. संतोषलाही राकेश व्हिल चेअरवर घेऊन येतो म्हणाला. सगळेजण यायला तयार झाले. दीपा आणि घरातील सर्व बायका गाडीत बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या. मॅडम दीपा आणि शार्दुल स्टेजवर विराजमान झाले. दीपाची आई , सासुबाई ,आबा, दीपाचे सासरे , संतोष आणि राकेश खालीच बसले होते. प्रचंड गर्दी जमली होती. गावकरी दीपाला नव्या रूपात जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाला शाळेतल्या सरांनी सुरूवात केली.

सर म्हणाले, "ज्ञानदानाच्या पवित्र कार्यासोबत समाजसेवेचाही वसा उचललेल्या काशीद मॅडम आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत तर बक्षीस वितरणादिवशी अभ्यासासोबत निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त बक्षीस पटकावणारी, आदर्श विद्यार्थिनी कुटुंबासोबत आपल्या गावाचं, शाळेचं नाव जिने उज्ज्वल केलंय ती न्यायाधीश ही पदवी मिळवलेली आपली सत्कारमूर्ती दीपा हिचं मी गावाच्या वतीने स्वागत करतो.

ते म्हणतात ना - 

"पंख्यामध्ये नसतो वारा सृष्टीमध्ये फिरणारा 

देवळामध्ये नसतो देव विश्व व्यापून उरणारा

यशस्वी तोच होत असतो , प्रयत्न आणि जिद्दीने रात्रीचा दिवस करणारा."

आता तुमचा जास्त वेळ न घेता जिचे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात त्या दीपाला तिच्या या यशाची गाथा सांगण्याची आणि समस्त स्त्रियांना, मुलींना मार्गदर्शनपर चार शब्द बोलण्याची विनंती करतो. " 

दीपा आत्मविश्वासाने चार शब्द बोलण्यासाठी उभी राहिली. 

गावातील सर्वजण दीपा चे भाषण ऐकण्‍यासाठी आतुर होते. तुम्हांलाही दीपा काय- काय बोलते ते ऐकायचे आहे ना ? तर उद्याचा भाग नक्की वाचा..

सौ. प्राजक्ता पाटील. 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका. 

कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखीकेकडे राखीव. 

कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे खूप खूप आभार. 

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.









🎭 Series Post

View all