तिचा संघर्ष भाग-44

Every Woman Wants Love, Respect And Support.
भाग-44


" मॅडम आणि दीपा ,आता तुम्ही दोघीही आढेवेढे घेऊ नका बरं . उद्याचा सत्काराचा कार्यक्रम ठरला म्हणजे ठरला. आता लगेच जातो आणि गावात दवंडीच द्यायला सांगतो त्या महादेवाला." सरपंच उठत-उठतच म्हणाले.

मॅडमनी डोळ्यांनीच दीपाला असूदे म्हणून खुणावले. मग दीपाही सत्कार करून घेण्यासाठी तयार झाली. सरपंच निघून गेले. सगळेजण गप्पा मारत अंगणात बसले होते. दीपाला आज तिने लग्नानंतर, मी माझ्या आबांना सासरी मान मिळवून देईन आणि माझा होणारा नवरा माझ्या आबांना मुलाप्रमाणेच प्रेम करेल हे जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरले असेच वाटत होते. संतोष किती प्रेमाने आबांसोबत बोलत होता आणि आई-आबाही संतोषला जावयापेक्षा मुलगाच जास्त समजत होते हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होते. सासूबाई ही देवाला दीवा लावून आले म्हणून उठल्या तसा शार्दुल आपल्या आजीच्या पाठोपाठ देवघरात गेला. आजीने देवासमोरील दीवा जसा प्रज्ज्वलित केला तसा तिच्या कानावर -

"शुभंकरोती कल्याणम

आरोग्यम् धनसंपदाम

शत्रू बुद्धी विनाशाय

दीपज्योती नमोस्तुते

दिव्या-दिव्या दिपत्कार

कानी कुंडल मोतीहार

तिळाचे तेल कापसाची वात

दिवा जळो मध्यंरात

दिवा तेवे देवापाशी

उजेड पडे विष्णू पाशी

माझा नमस्कार सर्व तेहतीस कोटी देवापाशी

घरातली पीडा बाहेर जावो

बाहेरची लक्ष्मी घरात येवो

आमच्या घरच्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो.." हा गोड आवाजातील श्लोक पडला. 

"आजी प्रसाद." म्हणून शार्दुलने हात पुढे केला. दीपाने स्वयंपाक घरातून साखर आणून शार्दुलच्या हातावर ठेवली. शार्दुलने चटकन आईचा आशिर्वाद घेतला आणि घरातील इतरही मोठ्या माणसांचा रोजच्या सवयीप्रमाणे आशिर्वाद घेतला. शार्दुलवर झालेले उत्तम संस्कार त्याच्या प्रत्येक कृतीतून उलगडत होते. दीपाच्या सासूबाईंच्या डोळ्यातून आनंद आणि दुःख असे संमिश्र अश्रू वाहू लागले. "काय झाले ?" दीपा सासूबाईंना म्हणाली.

"दीपा तु जवळ होती तेव्हा तुझी किंमत कळाली नाही आणि आता तु लांब आहेस तर तुझी किंमत कळतेय गं. उद्या तुम्ही गेल्यावर शार्दुलच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आठवणीने मला हे घर खायला उठेल गं. पण मी ज्या चुका केल्या त्या सुधारण्याची देवानं एकतरी संधी दिली याचा आनंद आहे बघ. माझ्या जोशनाच्या चुकीची शिक्षा माझी नात रिंकी विनाकारण भोगत होती. देवानं माझं गाऱ्हाणं ऐकलं अन् तुझ्या रूपात देवी आली माझ्या मदतीला जिच्या छायेत चांगले संस्कार आणि प्रेम भरभरून मिळणार माझ्या नातीला अशी माझी खात्री झालीय." दीपाच्या सासूबाई म्हणाल्या.

"हो सासुबाई, तुम्ही काही काळजी करू नका. रिंकी आता माझी मुलगीच असेल. आणि एक आता आजिबात तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. जे होतं ते चांगल्यासाठीच. हे लक्षात ठेवा. माणसाच्या आयुष्यात संघर्ष नसेल तर त्याची प्रगतीही खुंटते असेच मला वाटते, त्यामुळे तुमच्या रूपात देवाने माझ्यासमोर संघर्ष निर्माण केला आणि त्याच संघर्षाला जिद्दीने तोंड देण्यासाठी मी पुढील शिक्षणाचा अट्टाहास केला. कदाचित सगळ काही व्यवस्थित असतं तर मी पुढील शिक्षण घेतलं असतं पण या पदावर कधीच पोचू शकले नसते. त्यामुळे तुम्ही आणि जोशना ताई जेही वागलात त्याबद्दल चा राग पूर्णतः माझ्या मनातून कायमचा निघून गेला आहे. आता आपलं नातं जुनं असला तरी नव्याने बहरत आहे, त्यामुळे जे झालं त्याचा जास्त विचार करू नका. आणि तुम्हाला किंवा घरातील कोणाला त्रास झालेला मला आवडणार नाही." दीपा किती समजूतदारपणे बोलत होती.

दीपाच्या सासूबाईंनी दीपाला पहिल्यांदा मिठी मारली.

"होय ग पोरी, चांगल्या माणसाचं चांगले दिवस यायला वेळ लागतो,  पण चांगले दिवस नक्की येतात. हे मला तुझ्याकडे बघून पटले बघ." दीपाच्या सासुबाई दीपाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

मॅडम, आबा, संतोष आणि दीपा च्या आईचेही डोळे पाणावले होते. ' माझ्या दीपानं तिच्या गुणानं सासरच्या माणसांची मनं जिंकली. दीपा तुझ्यासारखी पोरगी देवानं मला दिलीय तवा मी लय पुण्य केलं असंल बघ आदल्या जन्मी.' दीपाची आई मनात विचार करत होती.

"आजी तु पण चल ना मग, आमच्या सोबत शहरात." शार्दुल म्हणाला.

"नाही रे बाळा, ती आजी बघितली ना तु , ती काहीच हालचाल करू शकत नाही. तेव्हा तिचं सगळं मलाच करावं लागतं बघ. मग मी शहरात आल्यावर तुझ्या आजोबांना आणि त्या आजीला कोण खाऊ घालणार ?" दीपाच्या सासुबाई म्हणाल्या.

"अगं, तिला पण आपण शहरातल्या दवाखान्यात दाखवूया ना. मग ती पण बाबांसारखी स्वतःच्या पायावर उभी राहील. आई म्हणाली होती ना काल, की शहरातल्या दवाखान्यात गेल्यावर बाबा स्वतःच्या पायावर उभे राहतील." शार्दुल निरागसपणे म्हणाला.

आता मात्र सगळ्यांना हसू अनावर झालं. शार्दुल ने घाबरलेल्या नजरेने दीपाकडे पाहिले. 

मग दीपाने शार्दुलला समजावून सांगितले की, "आजी एवढं वय झालं की, कुठल्याच माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नसतं कितीही मोठ्या दवाखान्यात गेलं तरीही. कारण त्यांच्या हाडांची झीज झालेली असते."

शार्दुल म्हणाला, " हो आई, मी इंटरनेटवर पाहिलं होतं. आपलं शरीर हे मशीन सारख असतं, जसे मशीन बिघडले की ते दुरुस्त करावे लागते पण सतत सतत मशीन दुरुस्त होत नाही."

"अगदी बरोबर, शार्दुल." मॅडम शार्दुलला जवळ घेत म्हणाल्या.

शार्दुल मॅडमला गोष्ट सांग म्हणून आग्रह करू लागला हे पाहून दीपाच्या सासूबाई म्हणाल्या," मी सांगितली तर चालेल का गोष्ट ?"

"हो." म्हणून शार्दुल आपल्या आजी जवळ जाऊन बसला.

" मॅडम , शार्दुलची एका दिवसात आजीशी चांगली गट्टी जमलीय." संतोष म्हणाला.

"हो रे बाबा, आजी- आजोबांना मुलांपेक्षाही नातवंड फार प्रिय असतं. म्हणूनच तर म्हणतात ना, दुधापेक्षा प्रिय दुधावरची साय." मॅडम हसून म्हणाल्या.

तेवढ्यात दीपाला हरी चा फोन आला आणि दीपा फोनवर हरीला बोलत होती.

"हॅलो हरी, बोल ना.अरे तुझा आवाज येत नाही." दीपा म्हणाली.

दीपाला हरी मुसमुसत असल्याचा आवाज आला. "अरे हरी, रडतोस की काय ?" दीपा म्हणाली.

"दीपाताई , तुम्ही परत कधी येणार आहात ? मॅडम कशा आहेत?" हरी रडवेल्या आवाजाने म्हणाला. 

" थांबा हा एक मिनिट. मॅडम कडे फोन देते." दीपा म्हणाली.

मॅडमनी दीपाकडून फोन घेतला. " मॅडम कशा आहात ?" असा हरीचा आवाज ऐकून चक्क मॅडमच्याही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे पाहून दीपाला जरा आश्चर्यच वाटले. 'मॅडम आणि हरी यांची ओळख फक्त दोन दिवसांची आणि हरीच्या रडवेल्या आवाजाने मॅडमच्या डोळ्यात पाणी कस काय आलं ?' दीपा मनात विचार करत होती.

मॅडम हरीशी अगदी प्रेमाने बोलत होत्या. जशा त्या फार पूर्वीपासून हरीला ओळखत होत्या. हे पाहून संतोष दीपाला म्हणाला, "  हरी मॅडम चा मुलगा आहे का ? मागे एकदा त्या बोलल्या होत्या, त्यांना एक मुलगा आहे. परदेशात असतो. तोच का हा हरी ?"

"नाही अरे, मॅडमचा मुलगा शार्दुल होता. तो परदेशातून कायमचा भारतात राहायला येणार होता. पण दुर्दैव असं की, तो सात वर्षांपूर्वी विमान अपघातात मृत्युमुखी पडला. त्याचीच आठवण म्हणून शार्दुलच नाव मॅडमनीच शार्दुल ठेवलं होतं." दीपाच्या डोळ्यात पाणी तरळल होतं.

" बापरे ! मॅडम, किती महान आहेत. स्वतःचे दुःख विसरून त्यांनी तुला, माझ्या शार्दुल ला किती प्रेम दिलं." संतोष नाराज होऊन म्हणाला.

"हो रे, पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप वाढतं आणि तेच पाप नष्ट करण्यासाठी देव अवतार घेतो, हे ऐकलं होतं मी. पण मॅडम च्या सहवासात राहिल्यावर स्वतः अनुभवलयं मॅडमच्या रुपात खरोखरच देवाने अवतार घेतलाय रे पृथ्वीवर. प्रत्येक मुलीचं दुःख मॅडम दूर करतात आणि ज्यांनी अन्याय केलाय त्यांना कायद्याने शिक्षा ही देतात." दीपा म्हणाली.

"हो, पण देवाने त्यांच्या मुलाच्या बाबतीत असं नव्हतं करायचं ? " संतोष म्हणाला. 

"बघ ना त्याचच फार दुःख होतं रे. आणि हा हरी माझा ड्रायव्हर आहे. अगदीच नवीन पण मॅडम बद्दल कळाल्यानंतर तो खूपच रडला अरे . आणि पहिल्याच भेटीत त्यांन मॅडम ना आपलंसं केलं. खूप मनमिळावू स्वभावाचा आहे हरी." दीपा म्हणाली. 

तेवढ्यात मॅडम दीपा आणि संतोषजवळ आल्या होत्या. म्हणून दोघेही शांत बसले.

"दीपा हा हरी खूपच हळवा आहे गं. सहजच फोन केला म्हणाला आणि चक्क पंधरा मिनिट माझ्याशी बोलत होता. आणि मलाही तो अनोळखी वाटलाच नाही." मॅडम दीपाला म्हणाल्या.

"हो मॅडम, हरीशी बोलताना तो पहिल्यांदा आपल्याशी बोलतोय असं वाटतच नाही." दीपा म्हणाली.

सगळ्यांसाठी दीपाच्या सासूबाईनी अंथरूण घातले होते. संतोषचे वडील दारू पिऊन आले होते. पण आता मात्र ते कोणाशी एक शब्दही बोलत नव्हते कारण संतोष आणि जोशना या दोघांचेही दुःख रोजच पाहताना मरण यातना ते भोगत होते. ते आले आणि आपल्या खोलीत जाऊन झोपी गेले. दीपाला मात्र सासर्‍यांची दारू सुटेल की नाही ही खंत मनात होती.

दीपाच्या सासऱ्यांची दारू सोडवण्यासाठी कोण घेईल पुढाकार ? 

पाहूया पुढील भागात क्रमशः 

सौ. प्राजक्ता पाटील 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका.

 कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे खूप खूप आभार.

कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.  #साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.





🎭 Series Post

View all