तिचा संघर्ष भाग-35

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग-35



शार्दुल चा फोन आल्यावर ज्या खुर्चीवर बसून मॅडम शार्दुल शी बोलल्या होत्या, अद्याप तेथेच बसून भूतकाळातील आठवणीत रममान झाल्या होत्या. शार्दुल सोबत गप्पा मारल्या मुळे मॅडमचा चेहरा अगदी आनंदी दिसत होता. आज कितीतरी दिवसांनी, त्यांना तो शार्दुल सापडला होता जो आई आणि आजीकडे प्रेमाने हट्ट करायचा. मग आजी, आई त्याचा हट्ट पुरवण्यात नेहमी पुढाकार घ्यायच्या. त्या दोघींना शार्दुल शिवाय दुसरा कोणाचाही आधारही नव्हता. असे असले तरी लाडात वाढलेला असूनही फाजील लाड करून घेणे मात्र शार्दुल लाही कधीच आवडत नव्हते. आज पर्यंत आईने, आजीने सांगितलेला कोणताही शब्द शार्दुलने कधीच टाळला नव्हता. पण वयाच्या त्या टप्प्यावर त्याला घरच्या पेक्षाही मित्राची सोबत थोड्या दिवसांसाठी का असेना खूप प्रिय वाटली होती. पण ते क्षणिक आकर्षण कायमच्या ओढीपुढे थोडीच तग धरणार होते... हा पूर्ण विश्वास आईला आणि आजीला असल्यामुळे शार्दुल नक्की परत येणार या मतावर त्या ठाम होत्या.

शार्दुल च्या भूतकाळातील आठवणीत रममाण झालेल्या मॅडम मनाशीच स्मित हास्य करत होत्या. त्यांना तिथे दीपा आलीय याचीही जाणीव झाली नाही. मग दीपाने "मॅडम." म्हणून आवाज दिला.

"अं." म्हणत मॅडमनी दीपाकडे पाहिले. आणि दीपाला बसण्यासाठी आग्रह केला. दीपाही मग मॅडमच्या खुर्ची समोर असलेल्या बेडवर बसली. दीपा मॅडम ना म्हणाली, "एक सांगू मॅडम." " हा बोल न दीपा, अगं माझ्यासोबत बोलण्यासाठी च तर आवर्जून तुला इथं बस म्हणाले."

स्मित हास्य करत दीपा म्हणाली, " मॅडम, शार्दुल सरांना बोलल्यावर तुम्ही खरच खूप खुश असता." "हो गं, आई झाल्यावर प्रत्येक बाईचं आयुष्य बदलून जातं बघ. म्हणजे तिचं अस्तित्व फक्त दिवस गेलेत हे कळल्यापासून तिच्या मुला भोवती गुरफटलं जातं. म्हणजे बघ ना, मुलाच्या जन्मासोबत आईचाही दुसरा जन्मच होत असतो. त्याचे ते पहिले बोबडे बोल जरी अर्थहीन असले तरी प्रत्येक आईचे कान ते शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. आणि अगं त्याने स्वावलंबीपणे टाकलेले पहिले पाऊल खरंच आई कधीच विसरू शकत नाही.  उगाच का म्हणतात - \"देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !\" नोकरी करणारी स्त्री असो किंवा घरी बसणारी प्रत्येकीला आपल्या वाटेला आलेला संघर्ष आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये अशीच इच्छा असते गं. खूप खूप प्रेम करते गं मी शार्दुल वर." मॅडम चे डोळे आसवांनी भरले होती.

"हे काय दीपा,  तू का रडतेस ?" दीपा कडे पाहून मॅडम म्हणाल्या. 

"नाही म्हणजे, लग्न झाल्यावर माझीही हीच एक इच्छा होती की, मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलांना अवश्य द्यावं आणि त्यासाठीच मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण नियतीला ते मान्यच नव्हतं आणि सगळं उलट-सुलट घडत गेलं." दीपा भावुक होऊन म्हणाली.

"अगं वेडी, काही उलटसुलट घडलेलं नाही. तू आता फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. आणि बघ होतं की नाही सगळं व्यवस्थित ते." मॅडम दीपाचा हात आपल्या हातात घेऊन तिला धीर देत म्हणाल्या.

"आणि हो अगं, मी विसरले बघ तुला सांगायला. शार्दुल ने तुला अभिनंदन सांगितलेय बरं का." मॅडम आनंदाच्या भरात म्हणाल्या.

"पण मॅडम, त्यांना कसं कळालं ? मला चांगले मार्क्स मिळाले ते." दीपा आश्चर्याने म्हणाली.

"अगं, मी मगाशी तुझा आणि माझा \"सेल्फी विथ ट्रॉफी\" तो फोटो स्टेटस ठेवला. आणि त्याने तो पाहिला. खरंच दीपा, तू निमित्त ठरतीयेस हा आमच्या दोघांच्या वारंवार संभाषणाचं." मॅडम बोलण्याच्या ओघात बोलुन गेल्या खऱ्या पण दीपाला मात्र प्रश्नच पडला ? ती मॅडमना म्हणाली, " मी कशी निमित्त ठरतेय ?" मॅडम पुढे बोलणार तोवर दीपाच्या आई मॅडमला आणि दीपाला नुकतंच जन्मलेलं गाईचं गोंडस वासरू बघायला चला, म्हणून बोलवायला आल्या आणि विषयाला अर्धविराम मिळाला म्हणून मॅडम खुश झाल्या. गडबडीने त्या सगळ्या जणी गोठ्याकडे गेल्या. पाहतात तर काय ! पांढर्‍याशुभ्र गाईचे ते पांढरेशुभ्र वासरू. किती देखणं दिसत होतं. काळेभोर डोळे, इवलेसे कान आणि उठून उभं राहण्यासाठी चाललेली धडपड पाहून स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येक सजीव असाच धडपडत असतो याचा प्रत्यय मात्र त्या कृतीतून उलगडत होता. 

"आता या चिमुकल्या नंतर आमच्या दीपाच्या चिमुकल्याचा नंबर आहे हो दुडुदुडु धावायला. अंगण कमी पडेल त्यालाही आणि आपल्याला ही त्याच्या मागे धावायला. हो किनाय हो दीपाच्या आई ? " मॅडमच्या सासुबाई म्हणाल्या.

दीपाच्या आईने " व्हय की." म्हणल्यावर सगळ्यांच्या हास्याचा कल्लोळ झाला. दीपा ने स्मितहास्य करत,"चला मी क्लासला जायला निघते." म्हणून तिथून काढता पाय घेतला.

-----------

संतोष च्या घरी दोन दिवस म्हणत म्हणत आत्याचा पाच दिवसांचा मुक्काम घडला होता. कारण राकेश च्या बहिणीला आणायला मुराळी आला नाही, म्हणून तिच्या सासरच्यांनी तिला पाठवायला नकार दिला होता आणि हे राकेश च्या घरच्यांना उशिरा समजले होते. तेव्हा मग राकेशने स्वतः जाऊन बहिणीला आणल्यावर राकेश ची आई जोशना ला बघायला यायला तयार झाली होती. आज पाहुणे येणार म्हटल्यावर संतोष च्या घरच्या सगळ्याजणी स्वयंपाक व इतरही सर्व काम आवरून पाहुण्यांची वाट बघत होत्या. संतोष च्या आई आणि शालिनी ताई या एकमेकींना विहीणबाई समजू लागल्या होत्या. आता काहीही झालं तरी आपण दोघी वरमाई होणार असं त्यांचं ठरलं होतं. जयालाही संतोष आवडत होताच पण संतोष ला मात्र ग्राह्य धरण्यात आलेच नव्हते. संतोष च्या आईच्या सांगण्यावरून अगदी जोशना सारखचं जयाने ही छान आवरलं होतं. दर दहा मिनिटांनी आई संतोष ला, "जया किती सुंदर दिसते हो की नाही रे संतोष ?" हाच प्रश्न विचारत होती.

शेवटी चिडून संतोष म्हणाला, " जोशना ला पाहुणे बघायला येणार आहेत का जयाला. दहा वेळा एकच गोष्ट विचारताना तुला कंटाळा येत नाही का ग ?"

आता मात्र आईने तोंडाला कुलूप लावून घेतले कारण पाहुणे यायच्यापुढे संतोषचा मूड जायला नको म्हणून. पाहुणे आले तसे संतोष पाहुण्यांना पाय धुवायला पाणी घेऊन गेला. हात-पाय धुऊन पाहुणे आत आले. चहा घेऊन जोशना ज्या खोलीत पाहुणे बसले होते त्या खोलीत गेली. सर्वांना चहा दिल्यावर जोशना ला प्रश्न विचारले गेले. त्यानंतर प्रश्नांची उत्तरं देऊन जोशना स्वयंपाक घरात आली. जिथे जोशना ची नणंद आणि सासूबाई बसल्या होत्या. सासुबाई आणि नणंद यांना जोशना अजिबात आवडली नाही हे त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव वरून स्पष्ट दिसत होतं.

"नाव काय आहे?" ननंद तोऱ्यात म्हणाली.

"जोशना." जोशना हळू आवाजात म्हणाली.

हा एक आणि शेवटचा प्रश्न विचारून दोघींनी दीपा बद्दल विचारण्यास सुरुवात केली.

" दीपाला म्हणे तुम्ही घराच्या बाहेर हाकलून दिलं." जोशना ची होणारी सासू म्हणाली.

"अहो त्या दीपाच्या घरची माणसं असलीच आहेत बघा एकाचे दोन करून सांगणारी, आम्ही कशाला हाकलून देतोय ती स्वतः घर सोडून गेली." आत्या मध्येच म्हणाली.

"ह्या कोण ? ह्यांना बरं माहिती तुमच्या घरातलं सगळं." जोशना ची होणारी सासू पुन्हा रागात म्हणाली.


" मग तुमाला तरी काय माहिती आहे यांच्या घरातलं ?" शालिनी आत्या जोमात म्हणाली खरी पण जोशना च्या गरोदरपणामुळे पाहुण्यांचा अपमान झाला तर कोण करंल जोशनाशी लग्न ? या विचाराने जोशना च्या आईला कोमात जायची वेळ आली होती. परिस्थिती सांभाळत जोशना ची आई म्हणाली," शालीनीताई, तुम्ही जरा गप बसा की." शालिनीताई चा राग अनावर झाला होता पण पाहुण्या पुढं तमाशा नको म्हणून शालिनीताई गप्प बसली. एवढ्यात पुन्हा जोशना ची नणंद म्हणाली," म्हणजे दीपा किती चांगली मुलगी आहे ते मला माहित आहे आणि तुम्हीच तिच्याशी चुकीचं वागले असणार याची खात्री ही आहे."

कोणीच काही बोलत नाही म्हटल्यावर शालिनी नेही तोंडातून ब्र काढला नाही. \"पण वहिनी का गप बसतीय\" हा  विचार तिच्या मनात घर करुन राहिला होता. जेवण वगैरे आटोपल्यावर पाहुण्यांचा पाहुणचार झाला आणि पाहुणे निघून गेले. अगदी थोड्याच वेळात शालीनीताई नी तोंड उघडले त्या म्हणाल्या, "अगं वहिनी, माणसं काय बरोबर वाटली नाहीत बघ. किती त्या दीपाचा पुळका होता त्यांना. तुम्ही या स्थळाचा विचार सोडाच. जोशना ला काय बी सुख लागायचं नाही बघ त्या घरात." आईनं मात्र मौन धारण केलं होतं.

संध्याकाळी राकेश ने, "उद्या बैठक आहे, तवा तयारीत राहावा." म्हणून जोशना ला सांगितले. जोशनाने ते आईला सांगितले आणि मग आई हळूच संतोष ला म्हणाली.

"म्हणजे वहिनी, तुमचं आधीचं ठरलं होतं होय जोशना ला तिथंच द्यायचं म्हणून. मी उगाच दोड झाले बाई." शालिनी आत्या म्हणाली.

" बरं, बरं असू दे. करू उद्या बैठक." संतोष म्हणाला.

बैठकीत काय- काय असतील राकेश च्या मागण्या ? पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील. 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.  

कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे खूप खूप आभार.

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे. 

कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.






🎭 Series Post

View all