Login

तिचा संघर्ष भाग -13

Every Woman Wants Love,respect And Support.

भाग -13



आईने पाय मुरगळल्या चे नाटक संतोष समोर अतिशय चांगल्या पद्धतीने केले. संतोषलाही ते खरेच वाटले. पण संतोषला दीपालाही मुळीच दुखवायचे नव्हते. काय करावे? हा विचार संतोषच्या मनात चालू होता. म्हणून तो आईला म्हणाला-


" बर तू कर आराम. बघू उद्या काय करायचय ते." संतोष म्हणाला.


संतोष बाहेर आला. दीपा दारातच उभी होती. त्याला दीपाला माहेरी जाऊ नकोस असं कसं सांगावं हेच कळत नव्हतं.


दीपा आणि संतोष स्वयंपाक घरात अंथरूण घालून झोपले होते. संतोषला मात्र झोपच येत नाहीये, हे दीपा ला समजले होते. आईने सांगितलेले संतोषला पटले होते, पण दीपा ही इतक्या दिवसांनी तिच्या आई आबांना भेटायला जाणार होती. तिला नाराज करणं संतोषला योग्य वाटत नव्हतं.म्हणून तो शांत होता. 


मग दीपाने संतोषला, "आज मी जवळ असूनही तुला झोप येत नाहीये का ?" असं विचारलं.


"प्रश्नही तुच विचारलास आणि उत्तर ही तुलाच माहिती आहे.  तूच काल म्हणालीस ना, आपल्या मनातलं सुख, दुःख व्यक्त झालं की माणसाला शांत झोप येते म्हणून." संतोष म्हणाला.


"अरे मग बोल की, काय आहे तुझ्या मनात ते !" दीपा म्हणाली.


"दीपा आज आई काय म्हणाली, ते तू ऐकलंस का गं ?" संतोष म्हणाला.


"हो मी ऐकलं ही आणि ठरवलं ही." दीपा म्हणाली.


"काय ठरवलंस तू ?" संतोष म्हणाला.


"अरे मी माहेरी जायचं दिवाळीपर्यंत पुढे ढकलले आहे. आई आणि बाबांची भेट नवरात्रीत झालीच ना आणि आता मला बरं वाटतंय. करीन मी सगळं काम. तु नकोस काळजी करूस." दीपा म्हणाली.


संतोष ने दीपाच्या गालावरची ती नाजूक बट आपल्या हळुवार हाताने मागे ढकलत तिला जवळ घेतले.


"खरंच" संतोष म्हणाला.


"हो, हो खरच." दीपा म्हणाली.


सासुबाईनी दीपा माहेरी जाणार नाही हे ऐकले होते.


सासूबाईंच्या मनाप्रमाणे सगळे झाले होते. आता त्यांना दीपा च्या माहेरी घर दाखवण्याचा कार्यक्रम घडवूनच आणायचा होता. त्या भलत्याच खुश होत्या. आजी सासूबाईंना आणि जोशना ला त्यांनी केलेले नाटक माहित होते. सकाळ झाली होती. दीपा उठून कामाला लागली होती. संतोष ही उठला होता. तो उठून आईच्या खोलीत गेला. 


"आई, तुझा पाय खूप दुखतोय का ? का डॉक्टर कडे जाऊन पायाचा एक्स-रे काढायचा ते सांग?" संतोष म्हणाला.


"नाही रे, रात्री आयोडेक्स लावलं. त्या नंतर जोशनानं गोळ्या दिल्या होत्या,  त्यामुळे पाय दुखायचा थांबला बघ." आई म्हणाली.


"बरं, बरं तू आराम कर. दीपा दिवाळीतच जाते म्हणतेय माहेरी, त्यामुळे तु आराम केला तरी चालेल. पण हा जोशना, (जोशना ला उद्देशून ) तुला तुझ्या वहिणीला मदत करावी लागेल. आलं का लक्षात ?" संतोष म्हणाला.


मनात नसतानाही जोशना ने होकारार्थी मान हलवली.


जोशना ची थोडीफार मदत घेत दीपाने सर्व स्वयंपाक उरकला होता. सर्व काम आटोपून दीपा बसली होती. तोच दीपाच्या कानावर नमीचा आवाज आला. नमी म्हणजे नम्रता. दीपाची बालमैत्रीण तीचा मुलगा पहिली मध्ये शिकत होता. सातवी झाली की नमी च लग्न करून तिच्या घरचे मोकळे झाले होते. पण नम्रता ने मात्र आपल्या मुला साठी सेमी इंग्रजी हे त्याच्या शिक्षणाचे माध्यम निवडले होते. आणि गणितातील काही समस्या नम्रताला निखीलला सांगता येत नव्हत्या. मग नम्रताने दीपा चे घर गाठले. कारण आईकडे असतानाही दीपा नम्रता च्या निखील ला अडचण आल्यावर छान समजून सांगायची. म्हणून निखिलने हट्ट धरला होता आई आपण त्या दीपा मावशीकडे जाऊ या ना म्हणून. असं नम्रताने दीपाला सांगितल आणि नम्रता दीपाला माझ्या मुलाची शिकवणी घे असे देखील म्हणाली. 


दीपाने ही लगेच \"हो\" म्हणून टाकले. कारण दीपाला ही शिकवणी घ्यायला कोणतीही अडचण नव्हती. 


दीपाने संतोषला आल्या आल्या ही आनंदाची बातमी सांगितली. संतोषही खूश झाला आणि निखिलच्या शिकवणीने दीपाच्या स्वावलंबनाचा \"श्रीगणेशा\" झाला. \"इवलसं रोप लावियेल दारी वेल तयाचा गेला गगनावरी.\" शिकवणीला येणाऱ्या मुलांची संख्या चांगलीच वाढली होती.


घरातली कामं आणि ट्युशन असा दीपाचा नित्यक्रम सुरू होता. महिनाभर घेतलेल्या कष्टाचं फळ दीपाला मिळालं होतं. पण तिला कुठे माहित होतं की हे घरच्या कोणालाच पटणार नाही ते. दीपा घरी बसून पैसे कमावते हे ही आता घरच्या बायकांना का खटकत होते ? याचे उत्तर दीपाला काही सापडेना.


शिकवणीच्या वेळेला मुद्दाम टीव्हीचा आवाज वाढवणाऱ्या आजीसासूबाई किती विचित्र वागत होत्या दीपासोबत. आपण कलियुगात वावरतोय याचेही त्यांना भान नव्हते. आपण जसे वागतो तसेच फळ देव आपल्याला देतो. हे मात्र घरातल्यांच्या लक्षात येत नाही याची दीपाला खंत वाटत होती.


ट्युशन ची मुले यायच्या पुढे फरशी पुसणारी जोशना शिकवणीच्या मुलांना बाहेर थांबा रे थोडावेळ म्हणून रोजच ओरडायची. राहुद्या जोशना ताई पुसून घेईन मी नंतर अस दीपानी सांगूनही तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. कधी कधी तर शिकवणीच्या हॉलमध्ये येऊनच फोनवर गप्पा मारत होती.


आज जोशना ने कहरच केला होता. दीपाने शिकवणीच्या तासाला शिकवायला सुरुवात केली की जोशनाने रेडिओचा आवाज एकदम मोठा केला. दोनदा दीपाने," जोशना ताई, प्लीज आवाज कमी करा." असं अगदी गयावया करून सांगितलं होतं. तरीही जोशना ऐकण्याच्या तयारीत नव्हती. म्हणून दीपाने तिसऱ्या वेळी जाऊन स्वतः रेडीओ बंद केला त्याचा जोशना ला इतका राग आला की, ती घडलेल्या गोष्टी पेक्षा वेगळेच दृश्य आई समोर तयार करू लागली. 


 दीपा च काही ऐकून न घेता 


"शिकवण्या बंद कर तुझ्या. माझ्या मुलींनं काय करावं, काय नाही करावं ? हे तू सांगणार आहेस का आता ? तिच्या वडिलांचं घर आहे हे." सासुबाईनी दीपाला नाय नाय ते ऐकवलं.


दीपाच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. दीपा च्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तिला वाटले होते 


\"एक वेळ त्यांनी मला शिकवणी संपल्यावर हे सगळे ऐकवले असते तरी काही फरक पडला असता का ? पण ती ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होती, त्यांच्यासमोर तिला हे खूपच अपमानास्पद वाटलं. मुलं माझ्याकडे शिकण्यासाठी येतात की रोज रोज नवी नवी कारण शोधून भांडण काढणाऱ्या ह्या लोकांची भांडण ऐकण्यासाठी हेच मला कळत नाहीये .\" असा दीपाच्या मनात विचार आला.


दीपाच्या सासूबाई म्हणाल्या, "आई-बापाला घर दाखवा म्हणाव. लग्नात तर आम्हाला मानपान मिळाला नाही. सगळ्या गावानं नावं ठेवलं आम्हाला. आता दिवाळीत तर घर दाखवा म्हणाव. नाहीतर माहेरी ठेवून घ्या म्हणावं लाडाच्या लेकीला."


"आता हे काय नवीनच घर दाखवायचं काढलंय तुम्ही ?"  जरा स्पष्टच बोलते आता मी. माझ्या आबांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळेच तुमच्या भावाने म्हणजेच संतोषच्या मामाने फक्त मुलगी आणि नारळ द्या असे सुचवले होते. आणि म्हणूनच मी ही लग्नाला तयार झाले होते. पण फुकट म्हणून कोणाच्याही गळयात हार घालण्या इतकी ही मी लाचार कधीच नव्हते आणि यापुढेही नसेल लक्षात असू द्या. किती दिवस पुरवणार होतात हो माझ्या आबांनी दिलेला हुंडा? का आयुष्यभर पुरणार आहे माझ्या आबांनी घर दाखवताना केलेला आहेर उपचार ? अहो करणी, मानपान यापेक्षा सुनेमधील गुणं ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायचं बघा आयुष्यभरासाठी पुंजी मिळेल प्रत्येक घराला.  मी माझ्या ज्ञानाच्या जोरावर आर्थिक दृष्ट्या हातभार लावू पाहतेय तर तुम्ही किती विघ्ने आणून माझ्या प्रयत्नांना अपयशी ठरवतात.आणि बोलणारी लोक काय एका बाजूने बोलतात का सगळ्या बाजूने बोलत असतात" दिपा आज पहिल्यांदा तावातावाने बोलत होती.


"आणि हे काय ? तुम्ही तर स्वतःच्या पायावर चालत आलात म्हणजे मी माहेरी जाऊ नये म्हणून मुद्दाम तुम्ही पाय मुरगळल्या च नाटक केलं होतं तर. आता माझ्या सगळं लक्षात येतय. किती विश्वास, प्रेम आणि आपुलकी घेऊन आले होते मी या घरात घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, पण काय मिळालं मला या घरात अविश्वास, अपमान आणि प्रत्येक गोष्टीत विरोध एवढचं."


आता संतोष आल्यावर कळेलच तुला, मला पण बघायचेच आहे तो तुला कशी शिकवणी घेऊ देतो ते ?



काय असेल संतोष चा निर्णय ? पुढील भागात क्रमशः


सौ.प्राजक्ता पाटील


लेख आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.


लेख आवर्जून वाचला त्याबद्दल खूप खूप आभार 


#साहित्य चोरी हा गुन्हा आहे.


 #कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखीकेकडे राखीव.





🎭 Series Post

View all