तिचे अस्तित्व... भाग ४.(जलद ब्लॉग लेखन स्पर्धा)

एका स्त्रीवर घर अवलंबून असते हे दर्शवणारी कथा


भाग ४

पूनमचं म्हणणं ऐकुन सगळेचं जण क्षणभर स्तब्ध झाले. खरंच आपण सगळे किती गृहीत धरत होतो हिला. खरतरं घरातलं बाहेरचं सगळं काही कसलीही तक्रार नं करता पूनम निमूटपणे करत होती. पण कोणालाही ती बोलेपर्येंत ह्या गोष्टीची जाणीव झाली नाही. घरातल्या मोठ्या माणसांकडे पाहून मुलेही आईला वाटेल ते आणि वाट्टेल तसं बोलायला शिकत होती. त्यामुळे पूनमला काहीही करून ह्या गोष्टीचा तुकडा तोडायचाचं होता. त्या सगळ्यात तिला मदत झाली तिच्या बालमैत्रिणीची. तिने आणि पूनमने मिळून काही प्लॅन केला आणि त्या प्लॅन नुसार आज पूनम वागत बोलत होती. स्वतःच्याचं घरात आपल्याचं माणसांसोबत तिला अस्तित्वासाठी लढाई जिंकायची होती. पूनमच्या बोलण्यानं आता मात्र अमितलाही त्याची चूक क्षणात उमगली होती. पूनम सगळं नं बोलता करत होती त्यामुळे तिच्या असण्याचा कोणाला फारसा फरक कळत नव्हता पण तिचं कमावणं बंद झालं तसं सारे जण आपापल्या परीने तिला त्यावरूनही टोकू लागले होते.
"सॉरी पूनम माझं खूप चुकलं मी तुला प्रत्येकवेळी गृहित धरत गेलो. तू एक माणूस आहेस हेंच मी जणू विसरलो होतो. तू दिवसभर कष्ट करत होतीस आणि मी अवास्तव अपेक्षा तुझ्यावर लादत होतो. आज मला माझी चूक उमगली आहे. इथून पुढे तू तुझ्या मर्जीने नोकरी कर किंवा नकोही करुस माझी तुझ्या कोणत्याही निर्णयाला आडकाठी नसेल." अमितला त्याची चूक उमगली होती. त्याने पूनमच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवत सांगितलं.
"आई गं सॉरी आमचं पण चुकलं. आम्ही तुला असं बोलायला नको होतं." म्हणत दोन्ही पोरं तिला येऊन बिलगली. घरात सुरू असलेला हा सगळा प्रकार पाहून खरंतर तिच्या सासूबाईंना टेंशन आलं होतं. ही आता वेगळं घर करते की काय अशी शंका त्यांना वाटू लागली. कोपऱ्यात अंग चोरून कसंनुसं तोंड करून उभ्या असलेल्या आपल्या सासुबाईंना पाहून मनकवडी पूनम म्हणाली,
"आई अहो अजिबात टेन्शन घेऊ नका. मी नाही कधीही तोडणार तुमच्या लेकाला आणि नातवंडांना तुमच्यापासून. त्यांना आणि मलाही तुम्ही मनापासून हव्या आहात. मी घरातून बाहेर असते त्यावेळी प्रचंड आधार वाटतो मला तुमचा." तिच्या बोलण्याने त्यांना धीर आला. त्यांनी बाहेर येऊन पूनमला जवळ बोलावलं.
"पूनम बाळा, मलासुद्धा मोठ्या मनाने माफ कर. मी जणू पट्टी बांधल्याप्रमाणे घरात वावरत होते. तुझी ओढाताण कधीच मला जाणवली नाही. घरातल्या सुखसोयी तुझ्या कष्टाच्या कामाईने आल्या हे पण मी विसरले. माझं खूप चुकलं तुला नाही नाही ते बोलले, टोमणे मारले." सासूबाईंच्या डोळ्यात पाणी तरळलं.
"आई अहो तुम्ही बसा बरं माझ्याजवळ आणि अहो माफी कसली मागताय. मी लहान आहे खूप तुमच्याहुन. मानानं आणि वयाने सुद्धा." पूनम म्हणाली. तिचा निखळ स्वभाव पाहून सासूबाईंना अपराधी वाटत होतं.
"बरं ऐका मला नोकरी करायला काहींच हरकत नाही. मला आवडेल खरंतर घरातल्या खर्चाला हातभार लावायला. पण आता मला तुमची सगळ्यांचीही साथ हवी आहे. आणि खरं सांगू का मी अजून राजीनामा दिलेलाचं नाही. माझ्या नोकरीचं महत्व तुम्हालाही पटावं म्हणून केला हा सगळा खटाटोप. आता तुम्ही सगळे म्हणत असाल तर पुन्हा होते मी जॉईन. फक्त आता सुट्टी काढलीचं आहे तर छानशी फॅमिली पिकनिक काढू मग जाऊ लागेन आधीसारखी ऑफीसला..." हसत पूनम म्हणाली.
तिच्या ह्या बोलण्यावर घरातलं वातावरण हलकंफुलकं झालं आणि सगळे वादविवाद विसरून ते पंचकोनी कुटूंब पुन्हा पूर्वी प्रमाणे हसरं झालं.

©️®️सायली पराड कुलकर्णी
वरील कथा काल्पनिक आहे. कथा आवडल्यास जरूर कळवा. लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे.

🎭 Series Post

View all