Login

तिचं अस्तित्व भाग -31

नाचणारीच्या मुलीची कथा

मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्री आणि राजन एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते; शिवाय अमोलरावांनी सुद्धा इशारा दिला होता. पण राजनला पुढचं पाऊल उचलायला खूप जड जात होत...... आता पाहूया पुढे.......,



"जन्माला आली अन मायेला गिळलं, अजून नशीब खराब म्हणून ही अशी अधू होऊन पडली..... ना शेजेला ना सुखाला... निरुपयोगी कार्टि..! आधी बापास खाल्ले आता स्वतःस जखडून घेतले..! मुलीला गिळत होती तर बरेच होते..! पण तेही नाही! उलट तिला जन्मास घालून अजून एक ओझे वाढवून घेतले!"

असे हे सगळे कटू बोलणे, टोमणे, सारे आघात तिने फक्त राजनरावांचे प्रेम आहे या एका खात्रीपोटी पचविले होते..!

तस पाहता खूप केले होते तिने तिच्या लहान भावंडांचे, तिच्या आईचे. पण तिच्या वेळी मात्र कोणीही नव्हते. तिच्या आणि बाळाच्या साठी..! तिची किंमत सुद्धा कुणी ठेवली नव्हती. हेच सार आठवून तिला खूप त्रास व्हायचा.


'ते म्हणतात की सर्व मार्ग बंद झाले तरी एक मार्ग असतोच कुठंतरी. तसच तिच्या मनाने साद घातली राजनच्या मनाला. म्हणजे मनाचा मनाशी संवाद सुरू झाला..... तो संवाद त्या दोघामध्ये होता.. म्हणूनच तिने हे दुःख मनातून त्यांना सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ते तिच्या माहेरी तिला भेटायला जाऊन पोहोचले..!'

तिची झालेली अवस्था समजून घेत परत ते तिला वाड्यात घेऊन आले होते... तेव्हा पासून आजपर्यंत काही सुखे वंचित असली तरी सोबत असण्याचे सुख नक्कीच होते तिला. राजनने नेहमीच तिच्या मनाचा आधी विचार केला. ते तिच्या बाबतीत किती भावनिक आहेत ह्याची चांगलीच कल्पना होती निलमला... त्याचाच तिने फायदा घेतला आणि स्वतःच नुकसान करून घेतलं. तिची आठवण सई होती म्हणून ते सईला जास्तच जपत, तिचा एकही शब्द ते खाली पडून देत नव्हते.


इकडे सई झोपल्यामुळे राजनने तिला पलंगावर झोपवले पण अचानक त्यांचे डोकं आणि डोळे अचानक त्यांना जाड झाल्यासारखे वाटले म्हणून थोडा वेळ पडतो असा विचार करून ते सईच्या शेजारी पहुडले. पण त्यांना एकदम गाढ झोप लागली थोड्याच वेळात.

जी रात्र खरंतर अनुश्रीसोबत घालवायची होती, तिचं रात्र त्यांची सईसोबत गेली...... मध्यरात्री केव्हातरी जाग आली तेव्हा आपण अनुश्रीला वाट पाहायला सांगितलं ही गोष्ट त्यांना आठवली........ सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाल्यामुळे त्यांना फारच अपराधी वाटले त्या वेळेस. सई शांत झोपली होती, आता अनुश्रीदेखील झोपली असेल असा विचार करून सईच्या डोक्यावरून हात फिरवून सकाळी उठून काय ते पाहू असे म्हणत ते पुन्हा झोपून गेले.



इकडे अनुश्री बिचारी रात्रभर राजन रावांनी सांगितल्या प्रमाणे जागी राहिली होती..! ते काय बोलणार आहेत..... आपल्यात काय घडेल..याची तिला उत्सुकता लागून राहिली होती तिला. त्यात त्यांचा तो स्पर्श आठवून तिच्या पोटात फुलपाखरू उडत होते......तिला तो स्पर्श अजून जाणवून घ्यायचा होता....अखेर वाट पाहून कंटाळून पहाटे उशिरा तिचा डोळा लागला.

                    पण इकडे त्या म्हणताऱ्या आजीबाईला मात्र जे हवे होते ते मिळाले होते..!.. खरं तर दुपारी आजीने शेवंता आणि कमलाबाईचं बोलणे ऐकलं होत..... म्हणूनच त्या आजी बाईने ही खेळी खेळली.......
ती तशीच सईच्या रूममध्ये गेली....,आणि तिला म्हणाली...,

                  

                    "सई ताईसाहेब..., म्या काय म्हणते...आज तुमी साहेबास्नी तुमच्या खुलीत बोलवा...तुमचे बा हायेत ना ते ..उद्या ते तालुक्याला जातील परत काय लवकर येणार न्हाय ..अन ती नवीन आलेली बाई तुम्हाला फार मारझोड करेल.. उपाशी ठेवेल .."

"पण आजी ती खूप चांगली हाय ..मला केवढं जपते .."

लहानगी सई निरागसपणे बोलून गेली

"तुमास्नी काय सांगू आता , शेवटी माय ती माय असती आपली ..हि थोडीच तुमास्नी जीव लावील ..."

  असं म्हणून तिने सईला नकळत निलमच्या काही आठवणी सांगितल्या ज्या ऐकून त्या बिचाऱ्या लहानगीला रडू कोसळलं आणि तिने राजनला घाबरून स्वतःच्या जवळ थांबायला सांगितलं. वरून रात्री ते जाऊ नयेत म्हणून त्यांच्या दुधात औषधं टाकलं ज्याने त्यांना झोप आली. अशाने त्या आजीचा हेतू साध्य झाला. पण तिने अस का केल ह्या मागचं कारण तिलाच ठाऊक....

*------*-------*-------**---**


दुसऱ्या दिवशी निघायचे असल्यामुळे अनुश्रीचा निरोप घ्यायला राजन तिच्या खोलीत गेले, पण ती तिथे नव्हती. म्हणून त्यांनी शेवंता जवळ तिची चौकशी केली, तेव्हा त्यांना समजलं तिचा महिना आल्यामुळे ती तिथून दुसऱ्या खोलीत गेली आहे. त्यामुळे त्यांना काही तिला भेटता आलं नाही.(त्यावेळेस पाळी आली कि त्या स्त्रीला दुसऱ्या खोलीत पाठवले जायचे,तिथेच तिला जेवण दिल जायचं. पाच दिवस पूर्ण झाले कि मगच केस धुवून तिला घरात घेतलं जायचं.)

त्यामुळे नाईलाजाने ते परत फिरले. तिकडे बस्तान बांधून पुन्हा अनुश्रीला तिकडे घेऊन जायचंच ह्याच आनंदात ते पुन्हा व्यापाराच्या हेतूने शहरात परतले! अनुश्रीला न भेटता!

इकडे अनुश्रीचे ते पाच दिवस झाल्यामुळे ती पुन्हा एकदा आपल्या खोलीत परत आली. तेव्हा तिला समजले राजन शहरात निघून गेले आहेत, पण राजन तिची भेट न घेताच गेल्याने तिचे मन खट्ट झाले. ती एकदम उदास राहू लागली.

हे राणूक्काच्या नजरेतून काही सुटले नाही. त्यांनी ते बरोबर ओळखले, म्हणूनच तिला स्वयंपाकघरातल्या जबाबदाऱ्या देऊन थोडे गुंतवायला सुरुवात केली. त्याच वेळी हिशोबाच्या कामात तिने लक्ष द्यावे म्हणून अमोलरावांना देखील सुचविले.

त्यामुळे त्या महिनाभरात घरातील काम, हिशोब आणि घरच्यांची काळजी घेण्यास तिने सुरुवात केली. ह्यामध्ये तिने कमलाबाईच्या हाता-पायास स्वतः तयार केलेल्या ओव्याच्या तेलाचे ताज्या गोमूत्राचा वाफारा देऊन मालीश करून देण्यास सुरुवात केली. वरून ती सईचा अभ्यास सुद्धा घेत होती. त्यामुळे तिची आणि सईची चांगलीच गट्टी जमली होती. शेवंता सुद्धा तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत होत्या.

छान असा दिनक्रम सुरू झाला होता, पण एके दिवशी रुतुबाई अचानक गायीचे शेण काढताना गोठ्यात घसरल्या आणि तोल गेल्यामुळे त्यांचा पाय गायीच्या शेपटीवर पडला. इकडे ती गाय सुद्धा घाबरून दचकून उठली, पण त्या गडबडीत त्या गायीचा पाय पुन्हा रुतूच्या पायावर पडला. त्यामुळे तिला दुप्पटची दुखापत झाली. त्यामुळे त्या सुद्धा अंथरुणावर पडल्या. इकडे अनुश्रीने तिच्यासाठी सुद्धा काढे, मलम, लेप, तेल तयार केले. तिचे ते तेल रुतूसाठी चांगलेच लागू पडले होते. तिच्या हाताची व पायाची आखडलेली नस आता थोडीफार पूर्ववत होऊन बोटे हलायला लागली होती.

तिचे मृदू लाघवी आणि मोजकेच बोलणे रुतूच्या मनाला सुखावत असले तरी तिची सुंदरता, आपल्या बाबतीत सगळ्या ठिकाणी पुढाकार आणि तिच्या सोबत असलेले नाते पाहता मनातला कडवटपणा कमी होत नव्हता. ती सुद्धा जोपर्यंत राजनपाटील अनुश्रीच्या जवळ जात नाहीत, तोपर्यंत त्या सगळ्यांना टेन्शन असणारच होत. तिच्या डोक्यावर सुद्धा टांगती तलवार होतीच. अमोल रावांचा पाय घसरला तर तिचा संसार उध्वस्त होण्याची शक्यता होतीच.


कमला बाई देखील तिच्या हळुवार स्पर्शाने सुखावत, काही वेळासाठी वेदनामुक्त होत होत्या. पण खूप जास्त सुख सुद्धा चांगले नसतेच की. त्यामुळेच की काय हे सारे खूप सुखाचे असणे नियतीला मान्य नसावे. कारण तिला ज्यासाठी या घरात आणले होते, ती गोष्ट अजून साध्य झाली नव्हती. त्यामुळे त्या दोघी जरा जास्तच चिंतेत होत्या. ह्याने अनुच्या आयुष्यावर देखील परिणाम होणार होता.


अनुश्री राजन एकत्र येतील का??
अनुश्री वारस देऊ शकेल का?
रुतू आणि अनु नीट वागतील का?