Login

तिच अस्तित्व भाग -27

नाचणारीच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्री राजन येण्याच्या आतच झोपी गेली. सकाळी उठल्यावर त्यांना जवळ पाहून ती लाजली. त्यानंतर ती खाली गेली असता तिला सई भेटली.... तिला दूध बिस्कीट देऊन तिने शांत केलं पण आजी काहीही बोलल्यामुळे तिला खूप त्रास झाला. आता पाहूया पुढे....,

          तिचे शब्द फार बोचरे होते. आली त्या पावली तशीच अनुश्री निघून गेली खोलीत....! आणि धाडकन पलंगावर तिने अंग टाकून दिले.... थोड्या वेळाने दोन चिमुकले हात तिचे डोळे पुसत असल्याचे तिला जाणवले.

"अनुमा, तू रडते का .....?"

समोर पाहिलं तर छोटी सई डोळे पुसत तिला विचारत होती... अनुश्रीने मानेनेच नकार दर्शविला.... पण सई इथे कशी काय हे मात्र तिला समजल नाही..... तिने पटकन सईला जवळ घेऊन विचारलं....,

"सई, बाळ... तू इथे कशी आलीस, आजी शोधत असणार ना तुला...? "

"ते... ते.... हा... तू... मला बिस्कीट दिल ना.... म्हणून तुला थांकु म्हणायला आली होती.... बाबा म्हणतात नेहमी आपण थांकु म्हणावं.... "

आपल्या बोबड्या शब्दात काहीतरी खूप मोठं सई बोलून गेली.

ती तिच्याशी बोलतच होती की, शेवंता खालून बोलवायला वर आली....,

"ताईसाहेब तुमास्नी खाली बोलावलं हाय..... "

सईला जायला सांगून ती सुद्धा खाली गेली..

इकडे राजन सुद्धा हसऱ्या चेहऱ्याने खाली निघून गेला.... फार दुःख झाले ते सगळं ऐकून त्याला... आपल्या वाड्यात आपल्या पत्नीला तिच्या घराण्यावरून तिचा काहीही दोष नसताना कोणी आणि का म्हणून बोलावे...????? आपण काही बोलावे... तर ती पडली म्हातारी बाई..... कसे बोलणार.... त्यात सई च सगळं तिच करत होती. त्याला माहित होत आता ह्या क्षणाला अनुश्रीला खूपच त्रास होत असेल म्हणून त्याने मुद्दामच सई ला अनुश्री जवळ पाठवलं..... त्याने त्या वेळाकरिता का होईना ती आपलं दुःख विसरेल...... आणि तसंच झालं.... सईमुळे अनुच्या चेहऱ्यावर हास्य आलं ....


.                **वर्तमानात **


                सईच्या आठवणीने पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं.... अचानक त्यांना त्या मुलीची आठवण झाली तश्या त्या, आताच डिलिव्हरी झालेल्या मुलीला बघायला गेल्या. बाहेरूनच त्यांनी डोकावलं तर ती मुलगी त्या छोट्या बाळाला दूध पाजत होती.... तिच्या बाजूलाच अजून दोघे तरुण तिथे उभे होते.... एक छोट्या मुलीला खूप प्रेमाने पाहत होता, कदाचित तोच तिचा बाप असावा.... आणि दुसरा त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत होता.... कदाचित तो तिचा भाऊ असावा. ... पण त्याचा चेहरा काही तिला दिसला नाही..... का कुणास ठाऊक पण त्या मुलाला पाहून त्या त्याला ओळखतात असं वाटलं..... तेवढ्यात एक बाई पुढे आली तिने बाळाला पाळण्यात झोपवलं आणि त्या मुलीला सुद्धा झोपायला सांगितलं...... अनुश्रीला त्या मुलीकडे पाहून सतत सईची आठवण येत होती. ती मुलगी झोपली म्हणून त्या आल्या पावली परत गेल्या.... नर्स ला emergency आली तर सांग असं म्हणून त्या घरी निघून गेल्या.... थकव्यामुळे त्यांना विकनेस जाणवत होता. म्हणून त्या बेड वर पडल्या, पण डोक्यात विचार मात्र चालूच होते......



.      **भूतकाळ **


प्रसन्न वदनाने राजन विचार करत ते तिथून बाहेर पडून त्यांच्या दालनात गेले, तर तिघे रघु काहीतरी करत होता ते पाहून त्यांनी विचारलं.....

"रघु तुम्ही इथे... काय करताय आमच्या खोलीत?"

त्यांच्या आवाजाने रघु म्हणाला,

"जी मालक...., ते आपले सामान वरच्या खोलीत नेतोय.... अनुश्री बाईसाहेबांच्या खोलीत........ तसा आदेश हाय..... मोठ्या पाटलांचा ...!"

"नाही.... नको राहूद्या मी सांगेन तेव्हा घेऊन जा.... आता या तुम्ही... दादा साहेबांना काय सांगायचं ते पाहू आम्ही....."

राजन असे म्हणाले, त्यावर होकार देत रघु निघून गेला.

इकडे राजनने स्वतःच सगळं आवरलं, तेवढ्यात रघु परत आईसाहेबांनी बोलावलंय म्हणून निरोप घेऊन आला. तेव्हा आवरून तो तिकडे गेला.

इकडे अनुश्री सुद्धा शेवंता सोबत खाली आली होती, पण तिचा चेहरा मात्र त्या घटनेमुळे उदास आणि रडवेला झाला होता आणि ते सर्वांच्या लक्षात आले होते....पण कारण राजन सोडून कुणालाही ठाऊक नव्हते.


तर ह्या विधीचा एकच उद्देश होता, की त्या दोघांमध्ये काही झालं असेल तर त्या दोघांच्या हालचालीवरून समजेल. खरतर किती विचित्र होते ना हे सारे. म्हणजे कौतुक सोहोळा करायचा असेल तर धर्म पत्नी आणि दुसरी पत्नी म्हणून आणलेली दोघींसाठी सारखेच असावे... पण नाही इथे तिला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती.

हा प्रकार राजनला खटकला होता, पण तो काही म्हणाला नाही.... उघड उघड अनुश्रीचे सगळे निरीक्षण करत होते... ती चालते कशी?, चालताना अडखळते का....?, दोघे लाजतात का....?, तिच्या चेहऱ्यावर तेज आहे का....? तिच्या अंगावर ओरखडे आहेत का? हद्द म्हणजे एक बाई तर मानेवर काही दिसत का ते वाकून वाकून पाहत होती, ते पाहून त्या दोघांना कसतरी झालं.


पण ह्यासाठीच तर सगळ्या बायका जमल्या होत्या, त्या बायांना तिथे तस काहीच जाणवलं नाही.... म्हणून त्या कुजबुजत होत्या..... ते नेमकी कमलाबाईंच्या लक्षात आलं आणि त्यांनी अनुश्रीला पातळ बदलून स्वयंपाक घरात यायला सांगितले गेले... ती जात होती तेव्हा तेथील दोन तीन बायका.. काहीतरी तिच्याच बद्दल कुजबुजत असल्याचे तिच्या लक्षात आले. पण तिकडे लक्ष न देता ती तिकडून निघून गेली.

इकडे कमलाबाई एकदम धुसपूस करत होत्या आवरून खाली आल्यावर अनुश्रीने कमलाबाई आणि राणूक्काला नमस्कार केला.

"आत्याबाई .... मी आज काय नाश्त्याला करू .....?"

असा निरागस प्रश्न त्यांच्याकडे पाहून विचारला....

"बाई... तू काय बी करू नगोस..... फकस्त ज्या कामासाठी तुला आणले आहे तेवढेच कर! आणि ते ही लवकरात लवकर ...."

एक रागाचा कटाक्ष टाकून एकदम चिडून बोलल्या कमळाबाई.....

त्यांच्या ओरडण्यामुळे ती दचकली.... तिचे डोळे भरून आले...... तिला काहीच समजत नव्हते की तिची चूक काय घडली?


तेवढ्यात तिथे रुतू सुद्धा गेली तिला सुद्धा बायांची बडबड कानावर अली होती आणि ह्याचा फायदा  अमोलराव ह्यांनी घेऊ नये यासाठी काळजीत होती . कमलाबाईंना ओरडताना पाहून तिला अनुश्रीचीच चुकी झाली असं वाटलं . ती काहीच बोलत नाही हे पाहून रुतूबाई पुढे आल्या आणि अनुश्रीच्या हाताला पकडून तिच्यावर दातओठ खाऊन बोलल्या ..,

"ऐकाया आलं ना , आत्याबाई काय बोलल्या त्या , लवकरात लवकर ह्या घराला वारस दे अन ह्यातून तुजी अन माजी बी सुटका कर ."

शेवटचं वाक्य बोलताना तिचा आवाज सुद्धा कातर झाला होता .पण अनुश्रीच्या डोळयांत मात्र आसवे जमा होऊन गालावरून ओघळली.


तिची ती परिस्थिती समजून राणूक्का पटकन पुढे झाल्या आणि म्हणाल्या......

"अहो वहिनी, अन रुतुबाई लहान आहे पोर..... सगळे बोलतात म्हणून तुम्ही दोघी सुद्धा बोलणार का....? तिला त्या गोष्टी कळत सुद्धा नाहीत.... मग ओरडायचं का... बघा कशी हिरमूसली....."

तिच्या कडे बोट दाखवत त्या म्हणाल्या... त्यावर जरा ओशाळून कमलाबाई उत्तरल्या.....

"आवं वन्स... आता काय झालं न्हाय.... तर रडायची येळ येईल हिच्यावर..... न आपल्याला मानसिक तरास व्हईल तो अलग..... म्या समदयांच्या भल्यासाठीच बोलत हाय .... तुमास्नी ठाऊक हाय ना......"


"वाहिनी, तुमची काळजी समजते हो आम्हाला पण हे नैसर्गिक आहे. त्याला खुलायला, वाढायला वेळ द्या.. की.....! तुम्हीच सांगा..... आपण लहान रोपटे लावतो ते देखील मातीत रुजायला काही वेळ घेतेच ना....... ही तर हाडामांसाची माणूस आहे. त्यात नवखी आहे...... तेव्हा मनाने, शरीराने रुजायला... वाढायला वेळ द्यायलाच हवा ना आपल्याला......!"

राणूक्का कमलाबाईंना समजावत म्हणाल्या......

"वन्स समदं समजतंय मला, पण त्या बराबर ह्या दोन्ही लेकराची काळजी पण वाटते.....ह्या दोगी पोरी माज्या लावण्यापेक्षा कमी न्हाय माज्यासाठी "

रुतू आणि अनुश्रीकडे पाहत कमला बाई म्हणाल्या.....