Login

तिचं अस्तित्व भाग -21

नाचणारीच्या मुलीची संघर्ष गाथा


.     * तिचं अस्तित्व * भाग - एकविसावा

मागील भागात आपण पाहिलं कि, सगळेच स्वतःच्या परीने राजनला लग्नासाठी तयार करत आहेत. आता ही कमळाबाई त्याच्याशी बोलण्यासाठी येतात. तर अनुश्री दागिने, कपडे पाहून हरखून जाते. आता पाहूया पुढे...,



   "आणि तसंबी तुमी तयार नाही झालात तर तुमचे मोठे बंधू तयार आहेतच..... गुढघ्याला बाशिंग बांधून......शेवटी पुरुष हा पुरुषच काहीही झालं तरी वासना काय  जाता जात न्हाय.....!"


आई साहेबांच्या मनातली भीती त्यांच्या प्रत्येक शब्दात सामावली होती. जे त्यांच्यासोबत झालं ते कदाचित रुतू सोबत होऊ नये म्हणून त्यांची धडपड चालू असावी अस राजनला वाटल.


"तवा आता तुम्हीच उभ राहून आपल्या वाहिनीची म्हणण्यापेक्षा बहिणीची सवत येण्या पासून वाचवू शकता.... बगा.   ....रुतूबाईंच्या सवतीपेक्षा आमची सून  म्हणुन आम्ही आनंदाने स्वीकार करू तिचा ! त्याच्या सारखा आनंद दुसरा नाही.... तुमचा पण संसार मार्गाला लागेल....  तेव्हा तयार राहा ...म्या हात जोडते ........"


असं म्हणून कमळाबाई त्यांच्यापुढे हात जोडून उभ्या राहिल्या... तस पुढे होत त्यांचे हात पकडून राजन म्हणाले.....,


"नका आईसाहेब असं नका करू..... तस ही बाबांनी अन दादांनी माझ्यापुढे काहीच पर्याय ठेवला नाही आहे .... त्यांचे शब्द मला अजून ही आठवतात,...."

"काय.....?"

कमला बाईंनी अस्वस्थपणे राजनला विचारलं.....


"हे ठरलेले चिरा उतरवण्याचं कार्य ठरल्यावेळी ठरल्या दिवशीच व्हईल......तवा तुमी आलात तर तुमच्या सोबत... नाहीतर तुमच्याशिवाय.....  तुमी तयार नाही झालात ; तर कार्यास उभा रहायला आजही तुमचा थोरला भाऊ समर्थ हाय. पण तुमी आलात तर ते नीती अणि रिती प्रमाणे संपन्न होईल आणि महत्वाचं म्हणजे आनंदाने व्हईल......"


एवढं बोलून ते शांत झाले ; कमला बाई त्यांच्या कडे मोठ्या काळजीने आणि आतुरतेने पाहत होते.....त्यावर त्या म्हणाल्या...,


"बगा मी म्हणलं व्हतं ना.... तुमच्या वडलांच एवढे वरीस समदं बाहेरच थोपवून धरलं व्हतं..... पण आता ते जमल असं न्हाय वाटत.....शिवाय रुतू फक्त ह्या घरची सून न्हाय.. माझी लेक बी हाय... तिच्यासोबत काय बी वाकड व्हायला नगो.....समजतंय ना तुमास्नी.. माज्या भावासोबतच नातं मला न्हाय तोडायचं...."


"ह्म्म्म....."

फक्त मान हलवत राजन म्हणाले.

"मग तुमचा होकार सांगू ना..... "

कमळाबाईंनी विचारलं....


तस त्यांनी येताना  नव्या नवरीसाठी एक सोन्याचा हार, पैंजण अणि हिरव्या रंगाचा भरगच्च शालू आणला होता शहरातून तो त्यांनी काहीही न बोलता कमला बाईंच्या हातात दिला. फक्त पैंजण आणि हार स्वतःकडे ठेवून घेतला.......!

तो शालू पाहून कमळाबाई त्यांचा होकार समजून गेल्या ; त्यांच्या कडून तो शालू घेऊन राजनच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून प्रसन्न वदनाने निघून गेल्या.

-------****----****--------******-----***------

सकाळी परत एकदा हे सगळं राजन ला आठवतं होत आणि त्या बरोबरच निलम सोबत घालवलेले क्षणही त्यांना आठवत होते. ती लग्नाची घाई, नंतर सगळ्या विधी आणि त्यांची पहिली रात्र......! सगळं काही त्यांना जसंच्या तस आठवत होत. पण ते विचार तूर्तास आवरत त्यांनी बाकीचे आवरला सुरुवात केली.


लावण्या सुद्धा आदल्या रात्री आली होती. तिच्या सोबत राणूक्काची धाकटी मुलगी वेदिका होती. त्या दोघींनी मिळून राजनला उटणे लावले आणि मग अंघोळ घातली. नंतर त्यांची वस्त्रे देऊन त्या तिथून निघून गेल्या.


राजनच्या ही दोन्ही हातात तीन चार अंगठ्या, गळ्यात मोत्याचा हार, जाडसर सोन्याची चैन, सोनेरी रंगाचा फेटा आणि गोऱ्या रंगावर उठून दिसणारा सोनेरी काळपट रंगाचा सदरा, कपाळी लाल टिक्का खूप लोभस दिसत होत त्यांचं हे रूप.



कमला बाईनी पुढे येऊन त्यांच्या गालावरून हात फिरवला आणि बोटे मोडली. स्वतःच्या डोळ्यातलं काजळ एका हाताने काढून त्यांच्या कानामागे काळा टीका लावला आणि आपल्या लेकाचे राजबिंड रूप डोळे भरून पाहत राहिल्या......



साधारण सहा फुट उंच, गोरापान,  पिळदार शरीरयष्टीच्या ओठांवर मिशी आणि वाढलेली थोडी दाढी पण ती सुद्धा चांगली शेविंग केलेली, तांबड्या रंगाच्या डोळ्यांमध्ये थोडी निळसर झाक असणारे घारेपणाकडे  झुकणारे करारी आणि प्रामाणिक डोळे , तरतरीत नाका,  गुलाबी ओठ, त्यावर सतत असलेले मृदू हास्य. भरदार छाती.. बळकट बाहुबल आणि प्रसन्न मुद्रा. एक प्रकारे सर्वार्थाने एक संपूर्ण पुरुष! कुणालाही बघताच क्षणी आवडणारा. त्याच्या नावाला शोभेसा.... लोभस, राजस..... राजन ..




त्यांच्या कडे पाहून कमला बाईंना खूप अभिमान वाटला;  आपली अशी कूस निपजल्या बद्दल त्यांनी देवाचे आभार मानले.........


चला राजनराव तर तयार झाले आता पाहूया अनुश्री कशी दिसते.........


राजन ची तयारी झाल्यानंतर राणूक्काने त्यांना  केशर घातलेले दूध व केळे दिले.अन रिती -रिवाजा प्रमाणे त्यातील अर्धे दूध आणि अर्धे केळे त्यांनी खाल्ले. उरलेले लावण्यासोबत अनुश्री साठी पाठवून दिल.....

.(रीतच होती वो तशी..... हाउ रोमँटिक ना.....


त्यानंतर पुढच्या तयारी साठी सगळे पुरुष मंडळी देवळात निघून गेले. तिथे देवीचा कौल लावला जाई. म्हणजे त्यावरून ठरवलं जाई ही मुलगी योग्य आहे कि नाही आणि घरासाठी वंश देईल कि नाही. कौल दिल्यावरच अनुश्रीला मंदिरात नेणार होते. त्या एका देवीच्या कौला वर तिचं भविष्य अवलंबून होत. त्यातून समजणार होत, अनुश्री चा चिरा वंश वाढी साठी उतरवणार कि तिला रखेल म्हणून ठेवणार.


म्हणजे अनुश्री चे भविष्य अजूनही अधांतरीच होते..!

एकासाठी नाही उत्तर आले तर दुसऱ्याच्या नावाने कौल लावुन प्रश्न परत मांडला जाणार म्हणजे परत एकदा कोण चिरा उतरवणार हा प्रश्न होताच......! आता येणारा काळच त्यांचं भविष्य ठरवणार होता हे मात्र नक्की.


***-------*******-------*******----------****


            पहाटे आसपास पाचच्या सुमारास  शेवंताने अनुश्रीला उठवले. तोपर्यंत तिने पाच सुवासिनी बोलावून आणल्या होत्या ; त्या पाच सुवासिनीनी मिळून  चंदनाचे लेप आणि उटणे अनुच्या अंगाला लावले. तर शिकेकाई वाळा रिठा मिश्रित केलेला लेप लावुन तिचे केस धुवून गुलाब पाण्याने तिला अंघोळ घातली. नंतर तिचे केस सुकवून परत त्या केसांना गुलाबजल लावले. धुपाची धुरी सुद्धा सुगंध पदार्थ टाकून दिली.


नंतर हाता पायाच्या रंगलेल्या मेंदीवर अधिक गडद रंग चढावा म्हणुन लवंग धुरी दिली गेली...रात्री शेवंता ने साखरपाणी सुद्धा लावल होत. त्यामुळे मेहंदी खूप गडद रंगली होती.





यानंतर तिला राजनने कमळाबाईंकडे दिलेला शालू तिला नेसवला. आरशा समोर बसवून तिच्या केसांची मस्त वेणी घालून त्यांचा हलका आंबाडा घातला. त्यावर मोगऱ्याचे, कागऱ्याचे गजरे घातले आणि मध्ये एक सोन्याच फुल घातलं.

डोळ्यात काजळ, ओठांवर गुलाबी रंगाची फुलाचा रंग दिला...(तेव्हा लिपस्टिक नव्हती ना..... )
सोन्याची मोठी नथ घालून कपाळी लाल टिकली लावली.
मुळातच गोरीपान,  देखणी असलेली अनुश्री ह्या सगळ्यामुळे अधिकच सुंदर भासत होती त्या हिरव्या शालूत. हे सगळं झाल्यावर तिच्या हातात अंगठ्या आणि गळ्यात हार व मोत्यांची सर घातली. कानात झूमके घालून, तिच्या हातात त्या सोन्याच्या बांगड्या घातल्या. पायात पैंजण घालून सोबत फेडवे घातले.




तिचं ते लोभस, सुंदर रूप पाहून एक क्षण राणूक्का, कमलाबाई, रुतुबाई व वेदिका पाहतच राहिल्या. पटकन पुढे होऊन राणूक्काने तिची दृष्ट काढली आणि तिच्या कानामागे एक काळा टिक्का लावला. खरंच आपल्या राजनला शोभेल अशीच आहे त्याची राणी असा विचार कमलाबाईंच्या मनात आला आणि त्या आपल्या सुनेकडे प्रेमाने बघत हसल्या.


तेवढ्यात.

"जायली .... जायली .....देवी आईची कुरपा झायली ... ... कौल लागला... चलावे.....आपण समदे ..."

असा निरोप घेऊन ओरडत...,.. रघू... धावत आला....

"चला.... चला समद्यानी  देवळात चला.....  सांगावा घीऊन आलोय म्या....."

"पण कौल मनासारखा आहे ना....? "

असे राणूक्काने त्याला विचारले. पण निघायची खूप घाई झाली त्यामुळे त्यांना काही त्याच उत्तर मिळालं नाही ..... !


       
कौल लावणे म्हणजे शुभाशुभ शकुन पाहणे किंवा भविष्य विचारणे.
राजन कि अमोल???
त्यासाठी वाचत राहा...
क्रमश

🎭 Series Post

View all