Login

तिचं अस्तित्व भाग -19

नाचणारीच्या मुलीची संघर्ष कथा

. *तिचं अस्तित्व *


मागील भागात आपण पाहिलं की अनुश्रीच्या चिरा उतरवण्याच्या आधीची तयारी चालू होती. सगळेच कोण उतरवेल चिरा म्हणून टेन्शन मध्ये होते. तर इकडे राजन घरी आल्यानंतर तो आधी निलमच्या रूममध्ये जातात, आता पाहूया पुढे.....

"निलम, आज तुम्ही हव्या होतात, कदाचित हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला नसता."

ते उदास अंतकरणाने तिच्या फोटोकडे पाहत उद्गारले.

इकडे रुतू गुपचूप रडत बसल्या होत्या. एकेकाळी तिला तिच्या नशिबावर खूप खूप गर्व होता पण आज त्याचाच तिला पश्च्याताप होत होता. त्यात एक नवीन मुलगी या घरात प्रवेश करत आहे वंश वाढवण्यासाठी म्हणजे नाही म्हंटल तरी ती अमोल सावकारांच्याच आयुष्यात प्रवेश करेल ह्याची कल्पना तिला आली होती. तिला वाटत होत जणू हजारो साप येऊन आपल्याला दंश करत आहेत, आपण कशा निरुपयोगी आहोत, आता आपली गरज कुणालाच उरली नाही आहे..... ह्याची तिला खंत, लाज आणि दुःख वाटत होत. पण ती काहीही करू शकत नव्हती. तिचं काय स्वतः राजनसुद्धा मोठ्या पाटलांच्या पुढे जाऊ शकत नव्हते.


रुतूला सवत येण्याचे दुःख होतेच ! पण त्याहीपेक्षा जास्त आपला नवरा आता आपल्या पासून दुरावला जाणार, त्याचे प्रेम वाटले जाणार, तो आपला राहावा म्हणून तिने एवढी मोठी रिस्क स्वीकारली होती. राजनला ह्यासाठी तयार करण्याशिवाय अजून काही पर्याय तिच्या पुढे नव्हता.


राजन राव आलेले समजताच रुतूने त्यांच्या रूमकडे धाव घेतली. त्यांना आलेले पाहून राजन रावांनी विचारलं...

"वाहिनी साहेब कश्या आहेत तुम्ही...?"

राजनने त्यांच्या कडे पाहत स्मित हास्य देत विचारलं.

"म्या कशी ठीक असणार भाऊजी, आता तुमचे दादासाहेब आमच्या पासून दूर जातील."

कसबस अडखळत ती राजन रावांना म्हणाली.

रुतूचं दुःख राजनला कळत होत.....,

ते तिला धीर देत म्हणाले

"असे काहीही घडणार नाही वाहिनी , तुम्हाला मनात ठेऊन ते तिला जवळ करू शकत नाही. त्यांच्या मनात तुम्हीच आहेत. तेव्हा काळजी नका करू..."

"भाऊजी, आजकाल ह्यांचं वागणे पाहता मला काहीही भरोसा वाटत नाही. त्यापेक्षा तुमीच का नाही तयार होत. सई ला आय भेटेल. "

खूप आशेने त्यांच्याकडे पाहत रुतू म्हणाली पण आता राजनला तिला काय न कस समजवावं हे समजत नव्हतं.

मध्ये मध्ये रडत असल्यामुळे रडून रडून तिला धाप लागली होती. तिला कस तरी समजावत होते राजनराव... पण इथे ते स्वतःच कात्रीत सापडले होते.

"वाहिनी साहेब नका स्वतःला त्रास करून घेऊ तुम्ही...."

तस तर तिला खूप रडायला येत असल्यामुळे तिने फक्त हात जोडले आणि ती स्वतः त्यांच्या दालनातून बाहेर गेली.!


राजन पाटलाची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. रुतूची ही अवस्था त्यांना पाहवत नव्हती आणि स्वतःच आयुष्य जगता येत नव्हतं, की घरच्यांचा विचार करता येत नव्हता. मन मारून जगणे मुश्किल झाले होते; पण सईवरील प्रेम त्यांना थांबवत होत.

त्यांच्या डोळ्यासमोर काही दिवसांपूर्वीचा प्रसंग उभा राहिला.....,

"पण दादा... मी हे नाही करू शकत.... निलमची जागा दुसऱ्या कुणाला द्यायचा विचार पण नाही माझ्या मनात आला कधी......"

अमोल रावांचा तो चिरा उतरवण्याचा प्रस्ताव अमान्य करत राजन राव म्हणाले.....

"राजन राव तुमास्नी फकस्त तुमचा न्हाय... समद्यानचा इचार करायचा हाय... समजतंय ना..... वंश तर वाढलंच पाहिजे...... माज्या जवळ जवळ रुतू बाई तरी हायेत... तुमचं काय..... वारसासाठी, घरासाठी आणि तुमच्या सवतासाठी तुमास्नी हे करायलाच लागल..... आपल्या वडिलांची पण तशीच इच्छा व्हती.. त्यांचं ऐकलं न्हाय तर हे काय बी राहणार न्हाय अन मला ते होऊन द्यायचं न्हाय."

त्यांना समजावत अमोल पाटील बोलले

"पण दादा...."

राजन मोठ्या पाटलांना काही बोलणारच की,

"ऐकून घ्या आधी आमचं राजनराव...."

अमोल राव जरा जरबी स्वरात बोलले....

"ती पोरगी हुशार हाय... सुंदर हाय..... तुमास्नी शोभलं अशी हाय..... तरी बी वाटल्यास तुमी गुंतू नका... एक वारस दिला कि तुमास्नी नको असलं तर नका जवळ करू.... आमी त्यांना आयुष्यभर पोसू... पण एक वारस दिल्यावरच..... आणि खरं सांगायचं झालं च तर तुमास्नी पण एका जोडीदाराची गरज हाय.... हे काय समजत न्हाय का आम्हास्नी.... गरज हाय तुमच्या... शरीराला आणि मनाला सुद्धा..... किती दिवस एकटे राहणार तुमी????."

राजनराव फक्त ऐकत होते. काय खोटं बोलत होते मोठे पाटील. प्रसंग उद्यावर येऊन ठेपला होता. पाटील घराणे बिना वंशाचे कसे ठेवायचे, कुलदीप तर हवाच घराण्यात! अमोल दादाचं तर किती प्रेम आहे रुतू वहिणीवर म्हणून तो नाही तयार नाही पण मग आमचं सुद्धा निलमवर प्रेम आहेच ना, मग मीच का? पण खरंच मलाही गरज आहेच ना..... शरीराला आणि मनालाही.... किती वर्ष झालं.... ह्या गोष्टीला......!

त्यांना मोठ्या दादाचं म्हणणे पटत होत... पण मन निलममध्ये व सईमध्ये अजूनही अडकलं होत.

"आता तुमी ह्या रविवारला घरला या, म्या तुमचं काय बी ऐकणार न्हाय. हा फोटो हाय त्या पोरीचा पाहून घ्या..... आणि तुमी न्हाय आलात तर घरासाठी म्या उतरवेन चिरा..... तेव्हा आईसाहेबास्नी आवडेल का ह्याचा इचार करा अन तुमच्या लाडक्या वाहिनी साहेबास्नी सवत आलेली चाललं का तुमास्नी हे तुमचं तुमी ठरवा....! येतो.... आमी.!"

एवढं बोलून त्यांच्या हातात एक लिफापा ठेऊन ते निघून गेले.

द्विधा मनस्थिती मध्ये अडकून राजन राव खाली बसले.....

लिफाप्यात त्या मुलीचा फोटो होता... त्यांनी तो उघडला आणि फोटो पाहिला.... अनुश्रीचा आताचा तो फोटो होता..... गोरीपान अनुश्री, आणि मुखावर असलेले हास्य.... त्यांच्या मनाचा ठाव घेत होते...... खूप सुंदर दिसत होती अनुश्री....... तो एकच फोटो राजनच्या मनाला पुन्हा एकदा टवटवीत करायला पुरेसा होता......! एकतर तरुण रक्त....... त्यात एवढ्या वर्ष ह्या सुखाला पारखे झालेले...... आपसूकच त्यांचं मन आणि तन तिच्याकडे ओढल गेलं........ पण डोकं मात्र कुठेतरी निलम आणि सईमध्ये अडकून पडलं होत.... जे ह्या सगळ्याला नकार देत होत....... पण हेही तेवढंच खरं होत कि, ते वडिलांच्या समान असलेल्या त्यांच्या भावाच्या शब्दाच्या पुढे जाऊच शकत नव्हते.

काय असेल नक्की त्या दोघांच्या नशिबात हे आता येणारा काळच ठरवणार होता.....!

**-------*-----*----*----**

रघूच्या आवाजाने राजन पाटील भानावर आले, त्यांच्या आईसाहेबांनी त्यांच्यासाठी जेवण करायला येण्याचा निरोप दिला होता.

अमोल राव मुद्दाम आज राजनसोबत जेवायला थांबले होते. हात धुवून राजन त्यांच्या भावासोबत जेवायला बसले. त्यांना जेवण वाढण्यासाठी आज खास कमळाबाई आणि राणूकक होत्या. आज त्यांचं सगळं कुटुंब खूप दिवसांनी एकत्र होत... जेवता जेवता एकीकडे थोडा वेळ कामाच्या गप्पा झाल्या, त्या नंतर बाकी घरगुती विषय झाले. खूप दिवसातून राजन आले कि अशीच पंगत भरायची.

जेवता जेवता परत एकदा अमोल पाटलांनी तोच विषय छेडला.....,

"बगा आपल्या राणूक्का सुद्धा आल्या हायेत.... इथ काही दिवस राहायला.... समद्यासाठी नवीन कापडं घेतली... मानपान झालाय.... त्या पोरीला चुडा, मेहंदी, हळद समद्या विधी झाल्यात.... काय बी बाकी न्हाय......"

राजन राव एक एक घास खात फक्त ऐकत होते....त्यांच्या डोक्यात नको ते विचार चालू होते आणि बाकीचे अमोल राव काय बोलतील हे कान देऊन ऐकत होते. सगळेच निर्णय होत नाही तोपर्यंत टेन्शन मध्ये होते.



काय असेल राजनचा निर्णय....???

तर राजन आणि अनुश्री एकमेकांच्या आयुष्यात जोडले जाणार आहेत....... कसा असेल त्यांचा प्रवास......????