

कॉलेज,अभ्यास, नोकरी हे सर्व सांभाळत असताना विद्याला खूप त्रास होत होता. पण जीवनात काहीतरी चांगले मिळवायचे असेल तर त्रास सहन करावाच लागतो म्हणून ती आनंदाने सर्व करत होती.
नवी नोकरी शोधण्यासाठी तिच्या वडिलांनाही खूप त्रास झाला. खूप प्रयत्नांनी एका खाजगी कंपनीत त्यांना नोकरी मिळाली.विद्याची आईही कंपनीत कामाला जाऊ लागली. सर्वांच्या प्रयत्नांनी घराची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली.
कठीण प्रसंगातचं कुटुंबातील व्यक्तिंचे प्रेम व एकजूट कुटुंबाला सांभाळून घेत असते.
याचा त्या सर्वांना अनुभव येत होता.
विद्याने जॉब व कॉलेज सांभाळत आपले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. परिस्थितीमुळे आपण डॉक्टर नाही होऊ शकलो पण आपल्या बहीण भावाने तरी त्यांची स्वप्ने पूर्ण करावीत असे तिला वाटू लागले,त्यासाठी ती त्यांना प्रोत्साहन देवू लागली व मदत करू लागली.
तिच्या आईची इच्छा होती की, विद्यिने शिक्षिका व्हावे.त्यामुळे आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने बी. एड . केले. व नोकरीसाठी प्रयत्न करू लागली.तिच्या प्रयत्नांना यश मिळाले. तिला एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिला खूप आनंद झाला. डॉक्टर होऊन पेशंटला चांगले करण्याचे तिचे स्वप्न होते. पण तिच्या नशिबात डॉक्टर होणे नव्हतेचं. आता शिक्षिका होऊन देशाची भावी पिढी घडविण्यात तिचा हातभार लागणार होता. यामुळे तिला खूप चांगले वाटत होते. ती मन लावून मुलांना शिकवत होती . मुलांनाही तिचे शिकवणे आवडत होते.
विद्याचे बहीण व भाऊ ही अभ्यासात तिच्यासारखेच हुशार होते. त्यांना ही आपल्या ताईसारखे आयुष्यात काहीतरी चांगले करायचे होते.त्यामुळे कोणी डॉक्टर,कोणी इंजिनिअर तर कोणी प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले व त्या दिशेने त्यांनी वाटचालही केली.आपल्या भावंडांचे यश पाहून विद्याला खूप समाधान वाटू लागले. आईवडिलांनीही आपली मुले हुशार तर आहेतच पण त्यांनी निवडलेला मार्ग, त्यांचे यश हे सर्व पाहून समाधान व्यक्त केले.
पण विद्याच्या बाबतीत आपण जो निर्णय घेतला होता त्याचा त्यांना पश्चाताप होत होता. तिला त्यांनी दुसरे लग्न करण्याविषयी सांगितले. पण तिला आता लग्न करावेसेच वाटत नव्हते.पहिल्या लग्नाचा इतका वाईट अनुभव तिने अनुभवलेला होता.
सर्वजण सारखे नसतात. एकदा वाईट अनुभव आला म्हणून पुन्हा तसेच होईल असे नाही.
असे तिचे आईवडील तिला सांगत होते.
सुदैवाने विद्या ज्या शाळेत नोकरीला होती,तिथे नोकरीला असलेल्या एका शिक्षकांना विद्या आवडली होती. त्यांनी आपल्या मुलासाठी विद्याच्या आईवडिलांकडे तशी बोलणी केली.
विद्याच्या आईवडिलांनी त्यांना विद्याच्या पहिल्या लग्नाविषयी सर्व सांगितले. त्यांनी हे सर्व ऐकून त्यावर काही हरकत घेतली नाही उलट विद्याविषयी त्यांना वाईटच वाटले.
दोघांकडील मंडळींना मुलगा ,मुलगी आवडले व लवकरच विद्याचे लग्नही झाले आणि ती आनंदाने आपल्या संसाराचा आनंद घेऊ लागली.
डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी विद्या परिस्थितीने डॉक्टर झाली नाही. पण जीवनात दुःखी न होता काही तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून लढत राहिली. आपल्या बुद्धीमत्तेचा,गुणांचा फक्त संसारापुरता उपयोग न होता समाजासाठीही त्याचा काहीतरी उपयोग व्हावा असे तिला वाटत राहयचे आणि शिक्षिका होऊन तिने ते खरे करून दाखविले. आपल्या ज्ञानाला,आपल्या गुणांना वाव मिळण्यासाठी ,त्यांचा चांगला उपयोग होण्यासाठी तिला शिक्षिका होऊन तिचं आभाळ मिळालं होतं.आणि ती त्याचा आनंद घेत होती.
विद्यासारख्या अशा अनेक मुली असतात, ज्या कमी वयात लग्न, मनाविरुद्ध लग्न, घरातील अत्याचार ,अनेक बंधने अशा प्रकारच्या अडचणींमुळे आपल्या मनातील इच्छा, आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. जर विद्याप्रमाणे त्यांनीही जीवनातील संघर्षाशी लढण्याचे ठरवले तर त्याही आपल्या इच्छा, आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात. यशाची उंच भरारी मारून आभाळालाही कवेत घेऊ शकतात.
समाप्त
नलिनी बहाळकर