तिचं स्वप्नं ( भाग ३ )

About Dream Of Life


तिचं स्वप्नं ( भाग 3 )

विद्या सासरी येऊन राहू लागली.शिक्षणाचा खर्च तिच्या वडिलांनी करावा या अटीवर तिच्या नवऱ्याने तिला अकरावीला ऍडमिशन घेऊन दिले. सासरी आल्यावर विद्याला घरातील कामे,कॉलेज,अभ्यास हे सर्व सांभाळावे लागत होते. तिला हे सर्व सांभाळताना त्रास व्हायचा पण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने हे सर्व सहन करण्याचे ठरवले.
कॉलेज,अभ्यास, करियर अशी स्वप्ने विद्या पाहत होती. आणि संसार, पती-पत्नी, मुले अशी स्वप्ने तिचा नवरा पाहत होता. विचारांनी व स्वभावाने विद्यापेक्षा वेगळा असलेला नवरा तिच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकला
नाही उलट दिवसेंदिवस आपल्या वर्तनाने अजूनच न आवडेनासा होऊ लागला.
घरातील कामावरून तर कधी ती अभ्यासात जास्त वेळ देत असल्याचे कारणावरून रागवू लागला, कधीकधी हातही उगारू लागला. बिचाऱ्या विद्याचे हे सर्व सहन करण्याचे वयही नव्हते व मनही नव्हते. जेव्हा विद्याला हा त्रास असह्य होऊ लागला तेव्हा ती माहेरी निघून आली.

"बाबा,तुम्ही मला मारून टाका पण मला पुन्हा सासरी पाठवू नका. "
विद्या काकुळतीने आपल्या वडिलांना म्हणाली.

आपली मुलगी लग्नानंतर सुखात रहावी या उद्देशाने काही आईवडील आपल्या मुलीसाठी श्रीमंत नवरा शोधतात. मग तो मुलगा रंग,रूप,गुण व स्वभावाने आपल्या मुलीपेक्षा वेगळा असला तरी.
पण जेव्हा लग्न झाल्यावर संसार सुरू होतो, आणि मुलगी सुखाऐवजी दुःख भोगते ,तिला त्रास होतो. तेव्हा मुलीचे खरे सुख हे पैशात नसते तर ते मुलीला तिच्या योग्यतेचा जोडीदार मिळण्यात असते. हे आईवडिलांना समजते.

विद्याच्या बाबतीत ही असेच झाले. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाची खूप घाई केली व सासरची लोकही चांगली मिळाली नाही. या गोष्टीचा विद्याच्या वडिलांना पश्चाताप होऊ लागला.

माहेरी आल्यावर विद्याने कॉलेजला ऍडमिशन घेतले. आपल्या आयुष्यात जे झाले ते एक स्वप्न होते. असे समजून ती आपल्या स्वप्नाच्या दिशेने पुढे जात होती. आता मी व माझे स्वप्न यात कोणतीही अडचण नाही ,असे तिला वाटू लागले.

पण आयुष्य वाटते तितके सोपे नसते. आपण जे ठरवतो ते नेहमी पूर्ण होतेच असे नाही.

विद्याच्या वडिलांना त्यांच्याच ऑफिसातील एका व्यक्तीने एका कामात फसविले,विश्वासघात केला.सर्व पुरावे त्यांच्याविरोधात होते त्यामुळे त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले.
नोकरी गेल्यामुळे कुटुंबाचा खर्च भागविणे जड जाऊ लागले. विद्याला आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न धुसर वाटू लागले. इथे प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पैसे पुरत नाही तर आपल्या शिक्षणासाठी कुठून पैसे येतील ? असा विद्या विचार करू लागली.
आपले स्वप्न, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न करत असलो तरी, काही वेळेस आयुष्यात अशी परिस्थिती येते की, नाईलाजाने आपल्याला आपले स्वप्न, आपल्या इच्छा यांना विसरावे लागते.
विद्या बारावी चांगल्या गुणांनी पास होऊनही पैशाअभावी तिला मेडीकलला जाता आले नाही.आपल्या बहिण भावांचेही शिक्षण पूर्ण करायचे आहे. या विचाराने तिने कॉलेज करता करता पार्ट टाइम जॉब करण्याचे ठरवले.

जीवनात अनेक अडचणी येत असतील, आपली स्वप्ने पूर्ण होत नसतील तरी हताश न होता आपण त्यातून काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. आणि पुढे चालत राहिले पाहिजे.
असे विद्याचे मत होते. त्यामुळे आपण जरी डॉक्टर नाही होऊ शकत असे तिला समजत होते, तरी तिने आयुष्यात हार न मानता आपण काहीतरी नक्कीच करू या उद्देशाने ती प्रयत्न करू लागली होती.

क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all