

विद्याचे बोलणे ऐकून हर्षा व नेहा तर अवाकच झाल्या. काय बोलावे ? काय प्रतिक्रिया द्यावी? हे ही समजत नव्हते. पण जे काही घडते आहे , ते चुकीचे आहे. एवढे मात्र त्यांना समजत होते. आपण विद्याच्या वडिलांना काही सांगू शकतो एवढे आपण मोठेही नाही आणि तेवढे आपल्यात धाडसही नाही.विद्याची आई व विद्याचा लग्नाला विरोध असूनही विद्या वडिलांसाठी लग्नाला तयार झाली. आपण यात काय करू शकतो. विद्याचे यापुढील आयुष्य सुखाचे राहो. एवढीच प्रार्थना आपण देवाकडे करू शकतो. असे हर्षा व नेहाला वाटले.
विद्याच्या आईने हर्षा व नेहाला नाश्ता दिला,पण दोघींनाही विद्याची परिस्थिती पाहून काहीही खाण्याची इच्छा उरली नाही. त्यामुळे फक्त पाणी पिऊन त्या घरी जाण्यास निघाल्या. विद्यानेही अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला व आपल्या पुढच्या तयारीला लागली.
हर्षाने व नेहाने विद्याच्या लग्नाची गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनाही वाईट वाटले. पण तेही काही करू शकत नव्हते. हर्षाला व नेहाला विद्यासाठी खूप रडू येत होते,वाईट वाटत होते.
ठरल्याप्रमाणे विद्याचे लग्न झाले. सुंदर, हुशार व गुणी सून मिळाल्याने मुलाकडचे सर्व आनंदी होते. सरकारी नोकरी करणारा जावई मिळाला म्हणून विद्याचे वडीलही आनंदी होते. विद्या व तिची आई या दोघी आनंदी असण्याचं दाखवत होत्या पण मनाने खूपचं दुःखी होत्या.
आपले पुढील आयुष्य कसे असेल ? हे सर्व विद्याने देवावर सोपवले होते. जे पुढे होत राहणार त्याला फक्त सामोरे जात राहयचे एवढेचं तिने ठरवले होते.
लग्न करून सासरी गेलेली विद्या आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी माहेरी आली. आताचे नववीचे वर्ष व पुढचे दहावीचे वर्ष तिला माहेरी राहता येणार होते. त्यामुळे तिने अभ्यास व माहेर या दोघांचा मनसोक्त आनंद घेण्याचे ठरवले. सुट्टीत किंवा सासरी काही काम निघाले तर सासरी जावे लागणार व तिचा नवरा तिला भेटण्यासाठी इकडे येत राहणार असेही ठरले होते.
विद्या माहेरी असली तरी आता ती सासरची जबाबदारी म्हणूनचं राहणार होती. पूर्वीसारखं तिला स्वातंत्र्य मिळणार नव्हतं.
विद्याला शिक्षण करून आपले डॉक्टर होण्याचं स्वप्नं पूर्ण करायचं होत म्हणून ती इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त अभ्यासात मन लावत होती.
शाळेत जाणे,अभ्यास करणे हे सर्व पूर्वीप्रमाणे करत होती. शाळेत कोणाला गळ्यातील मंगळसूत्र व पायातील जोडवी दिसणार नाहीत याची ती काळजी घेऊ लागली. या गोष्टींमुळे कोणी आपल्याला हसतील तर कोणी टिंगल ही उडवतील असे तिला वाटायचे.तिला आपल्या लग्नाविषयी कोणालाच सांगायचे नव्हते. पण त्या दिवशी हर्षा व नेहा अचानक घरी आल्याने त्यांना कळले होते. त्यांनी इतरांना सांगू नये ,असे त्यांना सांगण्यात आले होते.
वयातील अंतर जास्त होतेच पण विद्या व तिच्या नवऱ्याचे विचार, स्वभाव ही काही जुळत नव्हते. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी आला किंवा विद्या कधी सासरी गेली तर ,त्यांच्या नात्यात मनमोकळेपणा वाटत नव्हता.
दोघांच्या घरातील व्यक्तिंना वाटत होते की, एकदा का विद्या दहावी पूर्ण होऊन सासरी आली की, एकमेकांच्या सहवासाने सर्व सुरळीत होईल.
नववी चांगल्या गुणांनी पास होऊन विद्या दहावीत गेली. ती डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत अजून जोमाने अभ्यास करू लागली. तिच्या मेहनतीचे तिला चांगले फळही मिळाले. ती चांगल्या गुणांनी दहावी पास झाली. तिला खूप आनंद झाला. पण आता आपल्याला सासरी जावे लागणार या विचाराने तिला दुःख ही होत होते.
क्रमशः
नलिनी बहाळकर