Feb 28, 2024
जलद लेखन

तिचं स्वप्नं ( भाग 1 ) ( तिचं आभाळ )

Read Later
तिचं स्वप्नं ( भाग 1 ) ( तिचं आभाळ )


तिचं स्वप्नं ( भाग 1 ) 

"अगं हर्षा, विद्या तीन-चार दिवसापासून शाळेत येत नाही आहे गं, तुला काही सांगितले का तिने ? इतके दिवस ती कधी शाळा सोडून घरी राहत नाही. त्यामुळे काळजी वाटते आहे गं तिची ."
नेहा आपली मैत्रीण हर्षाला म्हणाली.

"मलाही ती काही बोलली नाही गं. मी पण तिचाच विचार करत होते. काय कारण असावे,तिचे शाळेत न येण्याचे . मला वाटते आपण जास्त चिंता करण्यापेक्षा उद्या तिच्या घरीच जाऊ. विद्याच्या घरी जाणार आहोत असे आपल्या घरी सांगूनच तिच्या घरी शाळा सुटल्यानंतर जाऊ, म्हणजे आपल्या घरचेही आपली काळजी करणार नाही शाळेतून यायला उशीर का झाला वगैरे यासाठी." हर्षा नेहाला म्हणाली.
"हो, चालेल जाऊ या उद्या." नेहानेही हर्षाला प्रतिक्रिया दिली.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर नेहा व हर्षा विद्याच्या घरी गेल्या. तिच्या घरी गेल्यानंतर त्या दोघींना धक्काचं बसला आणि या दोघींना घरी आलेले पाहून विद्याला व तिच्या घरातील लोकांनाही आश्चर्य वाटले.विद्या शाळेत का येत नव्हती ,याबद्दलचे अनेक विचार हर्षा व नेहाच्या मनात येत होते पण त्यांनी जे पाहिले, तो विचार त्यांच्या मनात आलाही नाही आणि तो विचार कधी आलाही नसता.
विद्याच्या घरी पाहुणेमंडळी आलेली होती, घरात वेगवेगळ्या पदार्थांचा घमघमाट येत होता. विद्याच्या हातांवर व पायांवर मेंदी काढलेली होती,हातात काचेच्या हिरव्या बांगड्या होत्या. हा सर्व प्रकार पाहून हर्षा व नेहाच्या लक्षात आलेच होते पण तरीही त्यांनी विद्याला विचारले,
"विद्या,हे काय ? आम्ही जीवलग मैत्रीणी असूनही तू याबद्दल काही बोलली नाही आणि या वयात तुझे लग्न ? "

विद्याला स्वतः लाच समजत नव्हते, आपल्या आयुष्यात हे काय होते आहे ,त्यामुळे हर्षा व नेहाच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हे ही तिला सूचत नव्हते. तरीही काहीतरी सांगावे लागणार होते,म्हणून ती बोलू लागली.
" हो,माझे परवा लग्न आहे. लग्न मुलाच्या गावी आहे. उद्या आम्ही तिकडे जाणार आहोत.माझी तर इच्छाही नाही लग्न करण्याची. मला तर शिक्षणाची खूप आवड आहे,हे तुम्हांला माहितचं आहे. शिक्षण करून नोकरी करण्याचे माझे स्वप्नं आहे. पण माझे वडील माझे ऐकत नाही. त्यांचे आमच्यावर प्रेम आहे पण त्यांचे विचार थोडे वेगळे आहेत. वडिल सरकारी नोकरी करतात, सरकारी नोकरीत भरपूर पैसा कमवता येतो ,असे त्यांना वाटते. त्यांच्या ओळखीतील व्यक्तीने त्यांना सरकारी नोकरी करणाऱ्या मुलासाठी एखाद्या मुलीचे स्थळ दाखवा असे सांगितले तर माझ्या वडिलांनी मुलाची सरकारी नोकरी पाहून माझेच त्या मुलाशी लग्न ठरवले. माझ्या व त्या मुलाच्या वयात बरेच अंतर आहे आणि मी अजून शिकते आहे. तरीही माझे वडील पुढच्या भविष्याचा विचार करून माझ्या आताच्या इच्छांना मारून लग्न करण्यास सांगत आहे.
आईलाही हे मान्य नाही. पण वडिलांचा रागीट स्वभाव आणि आपल्या चार मुली ,एक मुलगा यांचा विचार करून ती नाखुशीनेच माझ्या लग्नाला तयार झाली.
लग्न झाल्यावर मी माहेरी राहणार. दहावी पास झाल्यावर मी सासरी जाणार व पुढचे शिक्षण तिकडेच घेणार ,असे ठरले आहे."


क्रमशः

नलिनी बहाळकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//