तिचं बहरणं

Her bloom
तिचं बहरणं

विषय - स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो..?

तिचं बहरणं अनुभवायचं असेल तर तिच्यात रुजलेल्या भावनांना मायेचा ओलावा द्यायला शिकणं खूप गरजेचं आहे. एकदा का आपण तिच्यातल्या तिच्या रुतलेल्या शब्दांना वाट करून दिली की वात्सल्याची , प्रेमाची, मायेची पुष्पवृष्टी तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तिच्या अंतरंगाचे पदर बघण्याची, समजण्याची, किंवा उमजून घेण्याची कोणालाच फार आवश्यकता वाटत नाही. भावनेचे ते असंख्य पदर अंतरंगात दडवून ठेवत जगत असते ती या जगात.

अनेक नावांनी, अनेक शब्दांनी, अनेक मुखवट्यांनी सजलेली असते ती. अंतरंगात विखुरलेल्या असंख्य भावनांचे पाश बाजूला करत, हसत असते, हसवत असते, राबत असते कायम. तिची प्रत्येक भूमिका साकारत असते. ना तिला कधी तिच्या विखुरलेल्या भावनांना कुणाजवळ मांडण्यासाठी उसंत असते, ना दुसऱ्या कुणाला तिच्या भावना समजून त्यांना वाट मोकळी करू देण्यासाठी वेळ असतो.

स्त्रीला हातातलं खेळणं समजणं जसं चूक तसं तिला देव समजणं ही चूक. ती माणूस आहे, तिच्या स्वतःच्या काही भावना आहेत, ती ही थकते, तिला ही कंटाळा येतो, तिला ही वाटते आपल्याला एक चहाचा कप कोणीतरी आणून द्यावा. ती ही चुकू शकते. परंतू आपण कधी या नजरेने तिला पाहतच नाही. तिला दैवीशक्तीचं नाव देऊन तिचं खेळणं करू पाहतो.

स्त्री कोणत्याही भूमिकेतील असो ती कायम सन्माननीय असते. तिचं आपल्यापैकी असलेलं समर्पण तिची ताकद आहे त्याला तिची कमजोरी समजू नका. तिचं असणं स्वस्त वाटत असेलही परंतू तिचं नसणं फार महाग असतं. घरातल्या स्त्रीयांचे हसरे आवाज, आनंदी चेहरे दिसले की घरातला वास्तूपुरुष मोठ्या मनाने आशीर्वाद देत असतो. स्त्रीत्व आपल्याला सांभाळता आलं, समजून घेता आलं, तर समाधान ही तुमच्या चेहऱ्यावर उमटतं.

तिच्या अंतरंगात तिचे स्वच्छंदीपणाचे झरे अडलेले असतात, त्यांना वाट मोकळी करून दिली की बघा, तिच्या चेहऱ्यावर तेज पसरेल, मनाच्या खोलीतुन उत्साहाचा, उमेदीचा, आपल्याला नवीन पंख फुटल्यागत आनंद झालेल्या अप्सरेचा जन्म होईल.
अंतरंगातील प्रत्येक रंगाच्या छटा तिच्या चेहऱ्यावर उमटत असतात. फक्त तिला तसं बघणारी नजर हवी. एवढं सोप्प असतं तिला समजणं. तिनं आपल्या प्रत्येक कामाच्यावेळी आपल्यासाठी उपस्थित असावं.तिचं कोणतंही काम दुय्यम आपलं कसलंही काम असो ते प्रथमतः या विचारसरणीत आपण कायम वावरत असतो. तिला तिच्या स्वतंत्र असलेल्या विचारासाठी ते प्रकट करण्यासाठी आपली साथ हवी असते. एकदा का ती साथ मिळाली तर तिच्या मनातलं फुल उमलतं. अन नाही मिळाली साथ तर ठेवते जपून आपल्या विचारांना काळजाच्या एका कोपऱ्यात अखेरच्या श्वासापर्यंत.

तिच्या मनाचा ठाव घेणारा जीव तिला सापडला की ती मनाचा दरवाजा उघडते, अडगळीत पडलेल्या किंवा पाडलेल्या तिच्या विचारांना समोर बसवते अन मनाचा दरवाजा मोकळा करते. पापण्यांच्या कडा ओलावतात, पापण्यांची सीमारेषा ओलांडून अश्रूंना वाट मोकळी करून देते. तिला समजणं खूप सोप्प असतं. फक्त आपल्याला ते उमजायला हवं. बीज छोटसंच असतं परंतू वेळेतच त्यावर मायेची फुंकर मारली तर ते अंकुरीत होतं ना..? स्त्रीच्या मनाचंही याहून दुसरं काय असतं.? हेच तर असतं..! दुधाच्या सायीला हळूच फुंकर मारतोच ना आपण..? ती जाड साय दूर होऊन आतील अंतरंग दिसू लागते ना आपल्याला..? अगदी तसंच असतं स्त्रीचं अंतरंग ओळखणं. नापीक जमिनीची नांगरणी, मशागत केली की देते ना आपली काळी आई आपल्याला भरभरून .? तसंच तिच्यातल्या रुतलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आपण तिला मदत केली, की तुम्हाला ती इतकं देईल की ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. "समर्पणाची सर्वोच्च शक्ती स्त्रीमध्ये दडलेली असते.!"

सतत कुठल्या न कुठल्या भूमिकेत ती राबत असलेली आपल्याला दिसते, जाणवते.
आज ही कुठेतरी ती अशीच राबत असेल. नाही का..?

◆ ट्रेनच्या धक्क्याबुक्क्यात स्वतःला सावरत लाजेने भीतीने आपल्या चारित्र्याला आपल्या मुठीत पकडत अन टपून बसलेल्या गिधाडांच्या नजरेला कानाडोळा करत जगत असेल कुठेतरी ती..!

◆ पाठीवर लेकराला गुंढाळून उसाच्या चिपाटातून चालत उसाच्या कापणीला जुंपली असेल कुठेतरी ती..!

◆पोलिसांच्या रुपात तैनात असेल , वकिलीच्या वेषात न्याय देण्यासाठी धडपडतही असेल, शिक्षकीपेशेत मुलांना ज्ञानाचं अमृत ही पाजत असेल कुठेतरी ती..!

◆ आपल्या मुलांची कित्येक वर्षांपासून येण्याची वाट पाहत वृद्धश्रमात एकटी पडली असेल कुठेतरी ती..!

◆ आपल्या भाऊच्या स्वप्नांच्या, आकाक्षांच्या, पूर्णत्वाचे संकल्प करत असेल कुठेतरी ती.

◆ आपल्या लेकराला मोठं होता पाहताना स्वप्नात रंगून गेली असेल कुठेतरी ती..!

◆ चौकटीचा उंबरा ओलांडून स्वच्छंदी मनाने पावसात भिजत असेल कुठेतरी ती..!

◆जगाला विसरून जुन्या विचारांचा मागे टाकत पुढे निघत असेल कुठेतरी ती..!

◆अजूनही आपल्या रूढी-परंपरा यांना मनात हृदयात संदुक रुपी साठवत असेल कुठेतरी ती..!

◆ अस्तित्वाच्या चिंधडया होत असताना आपल्या इच्छेविरुध्द किती तरी वेळा वेश्येच्या रुपात स्वतःच्या चारित्र्यचा डाग पुसता पुसता तिथेच अडकून पडली असेल कुठेतरी ती..!

◆ आई बाबांच्या कष्टाला खरं उतरत, जाणिवेचा दिवा घेऊन दिवस रात्र मेहनत करत असेल कुठेतरी ती..!

◆ रंग चढलेल्या पार्टीत धुंद होऊन हवेत सिगारेटच्या धुरांचे वलय निर्माण करत असेल कुठेतरी ती..!

◆ स्वयंपाकघरात सर्वांसाठी काहीतरी खास बनवण्याच्या विचारात गढून गेली असेल कुठेतरी ती..!

◆सीमेवर लढत असलेल्या आपल्या पतीच्या विरहात बेचैन होऊन त्याच्या येण्यासाठी डोळा लावून बसलेली असेल कुठेतरी ती..!

◆ आपल्या पोटच्या गोळ्याला जन्म देत असताना वेदनेच्या सुरात वात्सल्याचा पान्हा फोडत असेल कुठेतरी ती..!

◆ सारे रस्ते,नाले पहाटेच साफ करून कोणाच्याही शाबासकीची वाट न पाहता पुन्हा आपल्या पुढच्या कामात स्वतःला गुंतवून घेत असेल कुठेतरी ती..!

◆ आपल्या पोटाची खळगी पाण्याने तुडुंब भरत , खोटा ढेकर देत, टोपल्यात उरलेली अर्धी भाकर ही लेकराच्या ताटात कुस्करत असेल ना. ? कुठेतरी ती..!

"आपल्यासाठी अर्पिलेल्या तिच्या अस्तित्वात तिचं अवखळ बालपण शोधण्याचा प्रयत्न करूया..!!"
तिच्या अंतरंगात डोकावून मायेने तिच्या भावनांचे, असंख्य रुतलेल्या प्रश्नांचे, कोमेजलेल्या विचारांचे, विखुरलेल्या आठवांचे, गाडलेल्या त्यागांचे, निस्वार्थी मनाचे, आपल्यापरी असलेल्या असंख्य आशांचे, जाणिवेतून उमललेल्या कळ्यांचे. यासारखे अनेक पदर तिच्या अस्तित्वाची जोडलेले असतात. त्यांना समजून तिच्या मनाचा आरसा साफ केला की तिचं बहरणं हे कधी श्रावणात हिरवी शाल पांघरलेल्या डोंगराप्रमाणेही भासेल, झुळूझुळ करत संथ वाहणाऱ्या नदीप्रमाणेही, तर कधी ती भासेल तप्त उन्हात बहरत असलेला \"गुलमोहर\"..!!

सुशांत भालेराव
विभाग - ठाणे