तिचा वाढदिवस
आज ती सकाळी लवकर उठली. तशीही तिला सकाळी लवकर उठायची सवय होतीच. वाढदिवस आहे म्हणून लवकर उठली असं मात्र मुळीच नव्हतं. मुलांच्या शाळा , नवऱ्याचं ऑफिस , घरचं सगळं तीच बघायची, त्यामुळे लवकर उठणं तिला क्रमप्राप्त होतं. पण आज मात्र उठल्याबरोबर तिने गॅलरीतल्या झाडांकडे धाव घेतली. मोगरा चहुबाजूनी बहरुन आला होता. जास्वंद ही आठ- दहा फुलांसमवेत सकाळच्या मंद हवेच्या तालावर हळूहळू डुलत होता. पारिजातकाच्या फुलांनी खाली जमिनीवर पांढर्या पाकळ्या आणि केशरी दांड्यांची मोत्या-पोवळ्यांची मुक्त उधळण केली होती. उन्हाळी लिली लाल , अबोली रंगांनी पानोपानी उमलून , रंगांची मुक्त उधळण करत होती. तगरीच्या झाडावर पांढऱ्या चांदण्या उमलल्या होत्या. जणू आज तिचा वाढदिवस आहे म्हणून ती सारी फुलझाडं तिला वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन करीत होती.
निसर्गाचा ह्या अभिनंदनाचा स्वीकार करून , तिची स्वारी मग हॉलमध्ये वळवली. तिने मुलाची खेळणी , मुलीच्या वह्या पुस्तकांची आवराआवरी करायला घेतली आणि त्यातच अर्धा तास निघून गेला. आता सवयीप्रमाणे तिने हातात मोबाईल घेतला. तसा तर मोबाईल तिला रात्रीच बघायचा होता,पण नवऱ्याला आवडत नाही म्हणून तिने तो मोह रात्री आवरता घेतला होता. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजेसने मोबाइल ओसंडत होता. सासर - माहेरचे , मैत्रिणींचे , मुलांच्या शाळेतल्या मम्मी यांचे ग्रुप , सगळीकडे तिच्यावर आज वाढदिवसाच्या अभिनंदनाचा वर्षाव होत होता आणि म्हणूनच मोबाईलची गॅलरी त्या संदेशांनी काठोकाठ भरून मेमरी रिकामी करा म्हणून तिला विनवत होती. या सगळ्या गोड अभिनंदनाने तिच्या हळव्या मनावर हलकेच मोरपिस फिरलं , नाही असं नाही! पण सालाबादप्रमाणे यंदाही नवऱ्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा तोंडीच काय पण मोबाईल मार्फतही अजून तरी दिल्या नव्हत्या . तिने सवयीप्रमाणे तिकडे कानाडोळा केला आणि कामाला लागली .
एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की , ही गोष्ट आहे तिची. या कथेची नायिका आहे सर्वसामान्य कुटुंबातली एक सर्वसामान्य गृहिणी. तिची मोठी लेक दहावीला आहे तर धाकटा आठ वर्षाचा.
घर आवरता आवरता , स्वयंपाक घरात सकाळच्या चहा - पाण्याची , आणि नाश्त्याची तयारी करताना नकळतच बालपणीचा ,तिला तिचा वाढदिवस आठवला. तिच्या माहेरी तीन भावंडामधलं ती शेंडेफळ . वडील सरकारी नोकरीत तर आई त्या काळानुरूप गृहिणी. पण तरीही त्यांच्या घरी तिच्यासकट सगळ्याच भावंडांचा वाढदिवस अगदी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जायचा. सकाळी छान आंघोळ झाली की , आईने आणलेला किंवा क्वचित प्रसंगी पैशाच्या अडचणीमुळे ताईने घरीच स्वतः शिवलेला नवा फ्राॅक घालून , देवासमोर आई रांगोळी काढून त्यावर काळा शिसवी लाकडी पाट ठेवून तिला औक्षण करी. मग ती आधी देवाच्या आणि तर साऱ्यांच्या पाया पडे.
त्या दिवशीचा जेवणाचा बेत तिच्या आवडीचा असायचा. कधी गुलाबजाम , तर कधी बासुंदी तर , कधी गाजराचा हलवा , सोबतच सुक्या बटाट्याची भाजी आणि पोळी असा साधासा पण रुचकर आईने मायेनं बनवलेला स्वयंपाक ती आनंदानं मिटक्या मारत खाऊन घेई.
संध्याकाळी दिवेलागणीला आजूबाजूच्या आणि वर्गातल्या काही निवडक मैत्रिणीनां बोलून दहीवडे किंवा पाणीपुरी अशी छोटीशी पार्टी पण व्हायची. पण मेणबत्ती विझवून केक कापणे तिच्या घरी कुणालाच पसंत नव्हतं.
लेखिका राखी भावसार भांडेकर.
*********************************************************
.
जय हिंद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा