Feb 25, 2024
पुरुषवादी

हॅलो , हॅलो इन्स्पेक्टर

Read Later
हॅलो , हॅलो इन्स्पेक्टर
ट्रिंग ट्रिंग करत त्याच्या फोनची बेल वाजली . त्याने डोळे किलकिले केले , पहाटेचे चार वाजले होते . तिची मिठी सैल करत त्याने फोन उचलला . " हॅलो , इन्स्पेक्टर सबनीस , कोण बोलतंय ? "

" सर , हवालदार पाटील . या , अजुन एक बॉडी . तिथेच , महाबळेश्वर कडे यायच्या वाटेवरच्या घाटात , मागची सापडली होती त्याच्याच जवळ . येताय ? " पलीकडून अदबीने विचारलं गेलं .

" आलोच , सॅम्पल घ्यावे लागतील , कुठल्याही एविडन्सला हात लावू नका .... फिंगर प्रिंट एक्सपर्टला बोलावलंय ना ?....." ह्या आणि अशा जुजबी सूचना देऊन पोलीस उपनिरिक्षक (PSI) अश्विन सबनीस निघाले .

अश्विन सबनीस , अतिशय हुशार , कर्तव्यदक्ष , निर्भिड आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगणारे, एक स्टाफ मध्येही लोकप्रिय असणारे पोलीस अधिकारी. आता गाठीशी अनुभव देखील बारा तेरा वर्षांचा झालाच होता . प्रथमच त्यांची पत्नी अनघा ही देखील त्यांच्या मागे लागून त्यांच्याबरोबर महाबळेश्वर च्या बदलीवर आली होती . अन्यथा सासू सासऱ्यांमुळे ती गावीच रहायची . कदाचित ह्या दुराव्यामुळे की काय माहित नाही पण लग्नाला आठ वर्षे होऊनही अजुन मुलबाळ होण्याचं दान पदरात पडलं नव्हतं . असो .

अंगावर उबदार जॅकेट चढवत अनघाची झोप मोडणार नाही अशा पद्धतीने हळूच अश्विनने घराचं दार ओढलं . मी जाऊन येतो , लक्ष ठेव हे खुणेनेच सुरक्षारक्षकाला सांगत तो त्याच्या जीपमध्ये बसला . काय भानगड असेल ? आठ दिवसांपूर्वीच एक डेड बॉडी सापडली होती , म्हणजे ती एक महिलेची आहे हे जेमतेम कळत होतं . अंदाजे महिना झाला असेल म्र्युत्यूला . तिचे पोस्ट मॉर्टेम , फिंगर प्रिंट्स रिपोर्ट्स ट्रेस करायला हवेत . त्याचा आणि आजच्या डेड बॉडीचा काही संबंध असेल ? अश्विनच्या डोक्यात विचारचक्र फिरत होते .

" अं , पाटील....अरे बापरे , काय हे ? " श्वास गुदमरून टाकणाऱ्या अशक्य वासाने सगळे हैराण होते . अश्विनने नाकाला रुमाल बांधला , हातात ग्लोवज घातले आणि तो घटना स्थळाकडे पुढे पुढे सरकू लागला .

" हं , बोला..." त्याने म्हणताच , " सर , ते पलीकडे दोन-तीनशे मीटर वर हॉटेल \"ब्ल्यू मुन\" आहे . त्यांना खूप दुर्गंधी येत होती म्हणून कुणी जनावर मरून पडलंय का ते पाहण्यासाठी त्यांनी नोकराला पाठवलं...." पाटील म्हणाले . " पहाटे तीन वाजता ? " अश्विनने बरोबर धागा पकडला . जीभ चावत पाटील पुढे म्हणाले " नाही म्हणजे ते मी विचारलं नाही पण इथे त्यांना ही बॉडी सापडली . त्यांनी आम्हाला कळवलं आणि सदरची घटना आपल्या मोठ्या साहेबाना कळविल्यानंतर लगेच त्यांनी सदरची केस तुमच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि आम्ही लगेच तुम्हाला कळवलं . तीसेक वर्षाची तरुणी दिसते . मोबाईल ,दागिने वगैरे काहीच नाही बॉडीजवळ . म्हणजे मंगळसूत्र पण नाही , काय माहित लग्न झालंय की नाही ? " पाटील एका दमात म्हणाले .

" चला , बघूया...." अश्विन झपाझप पाऊले टाकत डेड बॉडीजवळ पोहोचला .

मिळेल का अश्विनला काही पुरावा ? पटेल ओळख ? केस सुटेल ?

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Shilpa Kshirsagar

Doctor

I am a gynaecologist and love to write and read.

//