Nov 24, 2020
नारीवादी

घराण्याचा वारस 

Read Later
घराण्याचा वारस 

घराण्याचा वारस 

आज ती डॉक्टरकडे गेली होती,डॉक्टरांनी सांगितले ,पिशवीला सूज आहे ,हार्मोनल कॉपर्टी बसवल्यावर तुमचा त्रास कमी होईल.

तिला डॉक्टरांनी ऑपरेशन किती झाले ते विचारलं,तसं तिने सांगितल,दोन अबॉरशन आणि दोन सीझर .

डॉक्टर म्हणाले ,अबॉरशन केल्यामुळे त्रास होऊ शकतो .

ती म्हणाली ,ठिक आहे डॉक्टर,मी उद्या मिस्टरांना घेऊन येते.

असं म्हणत ती दवाखान्याच्या दारातून बाहेर पडली ,रिक्षा वाल्याला हात करुन ,त्यात बसली आणि पत्ता सांगितला .

तिला तो दिवस आठवला,ज्या दिवशी तिला अविनाश झाला होता.

डॉक्टरांनी तिला सांगितले,मुलगा झाला ,तसा तिने एक सुटकेचा श्वास सोडला आणि ग्लानीत गेली. बाहेर तिचा नवरा आणि मुलगी होती ,त्यांना सांगितल्यावर तर त्यांनी उड्या मारत आपला आनंद साजरा केला ,त्यांची फैमिली पूर्ण झाली होती,एक मुलगा ,एक मुलगी आणि ते दोघे.

आई आणि बाळाला रूममध्ये शिफ्ट केलं ,मुलीने आणि वडिलांनी बाळाला हातात घेतलं,ती तशी अजून थोडी ग्लानीतच होती.थोड्या वेळाने ती शुध्दीवर आली ,तसा तिला त्याचा हसरा चेहरा समोर दिसला आणि ती हसली ,तर तो म्हणाला ,अभिनंदन मुलगा झाला ,माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.ती काही न बोलता फक्त हसली ,तो तिला म्हणाला,बरं वाटतं आहे का तुला. ती हसत ,हो म्हणाली ,पण मनात मात्र विचारांच काहूर माजले होते.

ती मनाने भुतकाळात गेली ,या तीन वर्षात तिने जे सहन केलं होतं,ते तिच्या डोळ्यासमोरुन सरकत होतं , लग्न ठरलं,मुलगा मुंबईला एका नावाजलेल्या कंपनीत कामाला ,लग्न झालं ,पण काही दिवस नंदे बरोबर राहत होते ,नंतर स्वतः रूम भाड्याने घेतला,त्यात राहायला गेले ,शेजारची माणसं चांगली होती,त्यातच तिला दिवस गेले ,गौरी विसर्जनाच्या दिवशी तिला मुलगी झाली,सासू आणि नवरा एवढे काही खूष नव्हते ,पण जेव्हा सगळे बोलायला लागले ,तुमच्या घरात गौरीच्या रुपाने लक्ष्मी आली ,तसं ते जरा प्रफुल्लित झाले , मुलगी दोन वर्षाची झाली ,तशी ती पुन्हा गरोदर राहिली ,मग त्याने हट्ट धरला की,चेक करुया ,ती आधी नाही म्हणत होती,पण त्याच्या पुढे तिचं काही चाललं नाही. पुण्याला जाऊन चेक केलं ,तर मुलगी आहे असं कळालं,हे कळाल्यानंतर त्याने तिच्याशी बोलणं बंद केलं,ती रात्रभर रडत होती ,तो शेजारी झोपला होता पण एकदाही वळून त्याने चौकशी केली नाही ,की तू का रडते,त्याचं हे बदललेलं रूप पाहून,ती मनातून पूर्णपणे हादरली. दुस-या दिवशी सकाळी तो म्हणाला,आवर आपल्याला दवाखान्यात जायचे आहे. तिने विचारले ,कशाला.

त्यावर तो चिडून तिला म्हणाला ,जे सांगितल ते कर,जास्त डोकं चालवू नको.

दोघे दवाखान्यात जाऊन ,पिशवी रिकामी करून आले. ती सारखी गर्भातल्या मुलीची माफी मागत होती ,पण तिच्यात एवढे साहस नव्हते की,ती तिच्या नव-याला विरोध करू शकेल.

परत एक वर्षानी ती गरोदर राहिली ,परत तेच सगळं करण्यात आलं,आता तर तिच्या मनात एक अनामिक भिती बसली होती.

आता तर तिला गरोदर राहण्याची इच्छा पण होत नव्हती ,पण नव-याला मात्र मुलाला पाहण्याची इच्छा काही शांत बसू देत नव्हती आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं,सहा महिन्यातच ती परत गरोदर राहिली ,आता परत तिला त्याच दिव्यातून जावं लागणार होत ,पण यावेळी तिला नशीबाने साथ दिली,रिपोर्ट मध्ये मुलगा आहे ,हे कळाल्यावर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.तो त्यानंतर तिची खूप काळजी घ्यायला लागला ,तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू लागला ,त्याचं हे बदललेल्ं रूप पाहून तिला हायसं वाटतं होतं.पण जो पर्यंत बाळ हातात येणार नाही ,तो पर्यंत तिला चैन पडणार नव्हती. तारीख जवळ येत चालली तसं,सासूबाई बाळंतपण करायला आल्या ,पण दोघी सासू सुनांच काही जमेना, तिची तारीख उलटून गेली ,तरी पोटात काही दुखेना ,असचं बोलता बोलता दोघींची भांडणे झाली ,नव-याने सायकल मारायला उचलली आणि हे तिला सहन झाले नाही,त्याचवेळी तिचे पोटही दुखायला सुरुवात झाली,हे सारं पाहून सासूने मात्र तेथून पळ काढला. तिला दवाखान्यात नेण्यात आलं आणि मुलगा झाला हेही कळालं,शेवटी एकदाचा घराण्याचा वारस ,तिच्या घरात आला आणि तिची वाताहात संपली .

मुलगा आणि मुलगी कसे होतात ,हे आजकाल सगळ्यांनाच माहित आहे की,XX गूणसूत्र जुळले की मुलगी आणि XY जुळले की मुलगा ,बाईमध्ये तर XX असतात ,मग जे काही होणार ,हे पूर्ण पणे पुरुषां मधील गूणसुत्रांवर अवलंबून असते ,तरीही नेहमी दोष हा स्त्रीलाच सहन करावा लागतो.

आता तरी बदला ,बदलण्याची वेळ आली आहे ,मुलांबरोबरच मुलींचही स्वागत तितक्याच उत्साहाने करा.

तुम्हाला  जर हा लेख आवाडला असेल ,तर नावासहित शेअर करा.

हसत रहा,वाचत रहा,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

 

रुपाली थोरात 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat