मला सोडून गेलेला तो

An Unfortunate And Unforgettable Event Of My Life


कसं आणि काय लिहू तेच कळत नाही. जास्त सुख सोयी नव्हत्या पण बालपण खरंच खूप सुखद होतं आमचं. वयात येताच असं काय घडलं कि त्याने स्वतःची आहुती दिली समजत नाही. खूप शोधाशोध केली कारणांची. पण काहीच हाती लागलं नाही. चौदा वर्ष पूर्ण होतील या डिसेंबर मधे. पण वाटतं जसं मी अजूनही तिथेच आहे. कारणमीमांसा करत.

मी नुकतीच पदवीधर झाली होती त्यामुळे घरच्यांना माझ्या लग्नाचे वेध लागले होते. बघण्याचे कार्यक्रम वरचेवर सुरु असल्यामुळे आमची सारखी गावाला वारी सुरु होती. कारण मुलांना आणि मध्यस्थी नातेवाईकांना नागपूरला येणं दूर पडायचं किंवा सोईस्कर वाटत नव्हतं. दादा पुण्यात नोकरी करायचा व तो, माझा लहान भाऊ शिवहरी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला (म्हणजे सहावं सेमिस्टर) रामटेकच्या अभियंत्रिकी विद्यालयात होता.

तो अभ्यासात हुशार तसेच दिसायलाही रुबाबदार. उंच पूर्ण, गोरापान. मी त्याला गमतीने चिडवायचीही कि समोरून जरी तु ह्रितिक रोशन दिसतोस मागून मात्र मल्लिका शेरावत भासतोस. तो खूप हसायचा. त्याला चिडलेला, रागावलेला कधी बघितलंच नाही मी. म्हणून त्याला कशाचं दुःख असेल, काही अडचण असेल, तो त्रासात असेल असं वाटलंच नाही.

मला तर वाटायचं, याला काय कमी आहे? रूप, रंग, चांगलं शिक्षण आणि जीव ओवाळून टाकणारे आई बाबा सगळंच आहे याच्याजवळ. किती चुकीचा गैरसमज होता मला त्याच्या बद्दल.

मी आई बाबा सोबत असंच एकदा मुलगा बघायला येणार म्हणून गावाला गेलेली असतांना त्याने घरी स्कॉलरशिपचे पैसे आणून ठेवले. मी व बाबा पुढे आलो. आई गावातील कामं आटोपून येणार होती. बघितलं तर पोराने रविवारी घरी आल्यावर त्याच्यासाठी बनवून ठेवलेल्या पोळ्याही खाल्या नव्हत्या. त्यांना बुरशी लागलेली. त्याला फोन केला तर फक्त पैसे आणलेत म्हणून सांगितलं. बाकी जास्त काही बोलला नाही. मीही विचारलं नाही कारण मी माझ्याच अडचणीत व्यस्त. आई ओरडेल म्हणून मी सर्व घर आवरायला घेतलं.

दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी ऑफिस मधून लवकरच आले. त्यांचा चेहरा खूप गंभीर दिसत होता. मी विचारलं काय झालं? तर फक्त शिवा हॉस्पिटलमधे आहे आणि संध्याकाळी त्याला घरी आणू म्हणाले.

जीव थाऱ्यावर नव्हता. खाड्कन चार दिवस आधीच त्याला बोललेलं आठवलं.

"तु इतकं टेंशन का घेते? आई बाबा फक्त नातेवाईक म्हणत आहेत म्हणून सगळं करत आहेत. समजून घे." तो मला गावाला जायच्या आधी फोनवर बोलला होता.
"तुला कशाचीच कमी नाही. तेव्हा तुला माझी अडचण नाही समजणार. जाऊदे अभ्यासात लक्ष दे." मी त्याला बोलली होती.

मी अंगकाठीने अतीच बारीक. मुलाकडील मंडळी टीबी आहे का असं विचारायची. खूप वाईट वाटायचं. म्हणून लग्नाची इतकी काय घाई? माझं आईशी जरा बिनसलं होतं आणि त्याचा आईत खूप जीव तरीही तो तिला सोडून गेला. का?

खूप वाईट वाटलं. आपण का बोललो त्याला असं म्हणून पश्चाताप झाला. मी त्याच्या सोबत शिकणाऱ्या मित्राला फोन लावला. त्याने सांगितलं कि शिवाचा या सेमिस्टरचे पेपर ठीक नाही गेले म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तो सुखरूप आहे दवाखान्यात. माझी बोबडीच वळली. तरीही मी स्वतःला सावरलं म्हटलं,

"घरी आल्यावर चांगले फटके देते त्याला. खूप रागावते. असं कोणी करतं का? नाही जमत काही तर सरळ घरी निघून यायचं. दूर कुठेतरी फिरायला जायचं पण हे आत्महत्या वगैरे."

पण मला ही संधीच नाही मिळाली. हळूहळू आजूबाजूची मंडळी, आयाबाया घरी जमू लागल्या आणि संध्याकाळी त्याचं कलेवरच घरी आलं. तनमनाचा आक्रोश आवरत नव्हता. त्याने असं काही केलं यावर विश्वासच बसत नव्हता (अजूनही बसत नाही. वाटतं परत पोलीस केस उघडून सर्व तपास करावा.) त्याच्या सोनेरी केसांमधून हात फिरवताच तो उठेल असं वाटलं पण त्याने आधल्या दिवशीच मुंडन केलं होतं. इतकी घाई का रे?

प्रत्येक गोष्टीला मुळुमुळु रडत बसणारी मी. तेव्हा नाही रडली. मला रडण्याची मुभा नव्हती. मीच रडत बसली तर आईला कोण सांभाळणार? त्या दिवशी मी अजिबात रडली नाही. शांत होती.

पण त्यानंतर एकही रात्र अशी गेली नाही कि मी त्याच्या आठवणीत रडली नाही. आजपर्यंत मी कुठेच त्याच्या विषयी लिहिलं नाही कि त्याच्या वाढदिवसाच्या, आठवणीच्या पोस्ट कुठे टकल्या नाहीत. सतत प्रश्न पडतो, ज्याने आपल्याला त्याची अडचण सांगण्याच्या लायकीचं समजलं नाही त्याच्या आठवणींचा बाजार का मांडावा?

14 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस होता. आम्ही लोवर मिडल क्लास कॅटेगरीत बसणारे. केक म्हणजे पैसे उडवणं असंच वाटायचं. पण त्याला प्रत्येक वाढदिवसाला केक हवाच असायचा आणि आम्ही त्याची ही जिद्द पूर्ण करायचो. तरीही आम्ही त्याला हवं ते सुरक्षित वातावरण नाही देऊ शकलो याचं दुःख शेवटच्या श्वासापर्यंत हृदयात दडून राहणार.

हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा. लहान भावाने आत्महत्या केली या दुःखात मोठया भावाने स्वतःला दारुच्या हवाली केलं. आई बाबाला मानसिक आधार उरला तो मीच. कमीत कमी आपलं एक लेकरू चांगलं म्हणावं असं आयुष्य जगतेय यातच समाधानी ते म्हणून एका नवीन अर्चनाला जन्म देणारी ही अविस्मरणीय वाईट घटना. ती सोज्वळ, साधी, शालीन, सौम्य, शांत स्वभावाची मुलगी तिथेच थांबली जणू आणि एक काट्याने काटा काढणारी चतुर ललना, "काहीही झालं तरीही तुला एक चांगलं आयुष्य जगायचंच आहे. " असं स्वतःला सांगत पुढे सरसावली. चांगला नवरा, एक मुलगा, नौकरी आणि मनासारखं आयुष्य जगतेय.

एका अतिशय संथगती असलेल्या मुलीच्या आयुष्याला गती लाभली. पण त्यासाठी तिला जीवापाड जपू बघणाऱ्या भावाला मुकावं लागणं गरजेचं होतं का? तो स्वप्नात भेटूनही सत्यात कधीच समोर आला नाही. येणारही नाही. पुनर्जन्म संकल्पना वैज्ञानिक अनुषंगाने खोटी. सगळं माहित आहे तरीही वाटतं तो कधीतरी भेटेल मला.

असो,

भावा तुझ्याच आशेत जगत आहे.
तु येशील म्हणून स्वतःला सांभाळत आहे.
जास्त काही नको,
फक्त यावेळेस असं रागवून जाऊ नकोस.

एक संधी दिल्याशिवाय
माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.

तळटिप : परीक्षेचा निकाल आल्यावर कळलं तो पास झाला होता. मुलांनो कृपा करून विचार पूर्वक निर्णय घेत जा. काही नाही पटलं, दडपण आलं तर परिवाराकडे, मित्रांकडे धाव घ्या. घरात, मित्रपरिवारातही कोणी समजून घेणारं नसलं तर एखाद्या समुपदेशकाला जाऊन भेटा. वाट्टेल तिथे भटकंती करा मन शांत होत नाही तोवर पण असं स्वतःची आहुती देऊ नका. खूपवेळा आप्तेष्ट कडू गोष्ट बोलून जातात. तेही परिस्थितीने पोळलेले असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला सांभाळा ही विनंती.