तो, ती आणि स्तब्धता.
©पूजा आडेप.
तो- मला तुझ्या भूतकाळाशी काही एक देणे नाही. तू पाहिजे ते सांगू शकतेस. मी ऐकेन तुझा शब्द न् शब्द.
ती ( अगदी हलकेच हसून, त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली) - खरंच? माझ्याकडे काही नाही सांगण्यासारखे.
तो- मी वाट बघेन तुझ्या मनातील कोपरा रितं होण्याची.
ती फक्त हसली आणि निघून गेली. त्याच्या मनात कोडे निर्माण करून...
__________________________________________
ती- मी काय बोलली?
तो- आठव तूच काय बोललीस 3 मिनिटांपूर्वी.
ती- बाबा रे, जे आहे ते बोलून मोकळी होते आणि लक्षात ठेवण्याइतक खोटे काही बोलत नाही मी.
तो- तरीही तू आठवच कारण माझी अर्धी झोप उडाली.
ती- मग तूच आठव ना झोप उडाली आहे तर. मला नको सांगू आठव करून.
इथे ही किंचित रागावून स्तब्ध आणि पलीकडेही शांतता
__________________________________________
ती- तू हो किंवा नाही सांग. बाकीचे मला नाही ऐकायचे.
तो- मला नाही माहित.
ती- मी फक्त हो किंवा नाही एवढेच विचारलेय.
तो पुन्हा एकदा स्तब्ध आणि उत्तर काय द्यावे तिला फोनवर ह्या विचारात .
__________________________________________
तो- सगळे पुरुष तुला वाटते तसे वाईट नसतात.
ती (अगदी शांतपणे पलीकडून फोनवर)- ते मला माहितीये. मी असे कधी म्हंटले नाही आणि म्हणणार सुद्धा नाही.
तो पुन्हा एकदा स्तब्ध आणि काय बोलू ह्या विचारात.
__________________________________________
तो- तुला समजणारच नाही मला काय म्हणायचेय.
ती- तू समजेल अश्या शब्दात सांगितले तर नक्कीच समजेल.
तो- किती प्रकारे आणि कसे सांगू? तुला नाही समजणार.
ती ( फोनवर रागावून)- तू न सांगताही तुझ्या मनातले मी ओळखावे ही अपेक्षा नको करूस. मी कोणी जादूगार नाही आणि आपला तेवढा सहवास सुद्धा नाही.
तो पुन्हा स्तब्ध आणि फोन शांत.
__________________________________________
तो- तुला तुझ्या मनाच्या कोपर्यातला तो भेटला तर जाशील?
ती- हो. कदाचित.
तो काही क्षणात तिच्यापासून विलग झाला.
ती शांत आणि निर्विकार. पुन्हा एकदा.
__________________________________________
ती- मी ज्या त्या व्यक्तीला त्या प्रमाणेच बघते. कोणाशी तुलना करणे जमत नाही. जी जिथे आहे ती तिथेच.
तो- आजपर्यंत कोणीही माझ्याशी अश्या शब्दात बोलले नाही.
ती (काम करता करता फोनवर शांतपणे उत्तरली)- हो? असे असेल तर लक्षात घे की कोणी असे बोलणार नाही कारण, मी एकमेव आहे. जे आहे ते परखडपणे बोलता येते मला.
तो पलीकडे पुन्हा स्तब्ध आणि विचारमग्न...
__________________________________________
तो- तूझ्यासोबत माझ्या आयुष्यातल्या पाहिल्या क्षणांना जोडला गेलोय मी.
ती स्तब्ध आणि निर्विकार...
__________________________________________
तो- तुझे व्यक्तिमत्त्व एखाद्या मुलासारखे आहे.
ती (गोंधळून)- म्हणजे?
तो- बघ ना! एखाद्या मुलाच्या आयुष्यात अनेक मुली आल्या तरी तो भावनिक रित्या कोणामध्ये गुंतून जात नाही.
ती- मग? ह्याच्या संबंध काय माझ्याशी?
तो- तुझेही अगदी तसेच आहे. तुझे कोणामध्ये गुंतणे कोणाच्या समजण्याच्या पलीकडे आहे.
ती विचारमग्न आणि चेहर्यावर आलेले पुसटसे हसू.
__________________________________________
ती- आता आई वडील लग्नासाठी मुलगा बघायला चालू करतील.
तो- पकड एखादा बकरा आणि करून टाक लग्न.
ती- त्या बकऱ्याने माझे डोके सटकवले तर सोडायला मागे पुढे बघणार नाही आणि पुन्हा स्वतः च्या पायावर उभी राहीन.
तिच्या आवाजाला संताप त्याला पलीकडे फोनवर जाणवला तसा तो स्तब्ध.
__________________________________________
©पूजा आडेप.
फोटो साभार गूगल