हे राष्ट्र......

It's story of milk strike, happened in maharastra.

हे राष्ट्र......


        छमी. चिमनीसारखी. छोटीशी. 
धावत ,धापा टाक़त आईजवळ आलेली.
छमी - आई व, तुले माहीत आय्ये का, का झालात?
आई - न्हाई व . का झाला? का म्हून एवड्यांन धापा टाकून रायलीस? बस पाणी पी.
छमी - गावाईतले लोक येडे झाले. त्याईन सगळा दूध फेकला रस्त्यावर.
आई - का बोलून रायलीस तू?
छमी - होणं व. मी माया डोळ्यांनी पाह्यल.
       ( पप्पा आगमनलेले.)
आई - का व? का म्हणून रायली छमी?  दूध टाकलं म्हणे रस्त्यावर. तुमि दूध डेरीत गेलते न, मंग का झालं?
राजाभाऊ - हो बरोबर सांगून रायली ते. पाणी दे पेवाले.
छमी - आर देवा. तुमीबी फेकलं का दूध?
राजा - मी न्हाय फेकलं. आंदोलनामंदी आलेल्या लोकायन फेकला. आपलंबी दूध त्यायनच .......
आई - असं काऊन केला त्याईंन?
राजा - सरकार दुधाले बराबर भाव न्हाई देऊन रायला म्हणून आंदोलन केला.
आई - पण मंग दूध फेकल्यावर भाव वाढले का? दोन पैसे जादाचे घरात येतील म्हणून आपुन आपल्या पोरायले कपभर दूध देवाले मागपुढ पायतो. आन ह्या लोकायन जराबी इचार न्हाई केला. तुमी तरी कराचा होता.
राजा - ( चिडून) तुले सांगलन मी न्हाई फेकलं म्हून. कोठचे पुढारीफिडारी आलते न त्याईंन फेकलं. च्यायला घरीबी तेच न बाहेरबी तेच. मले माहीत रायला असता त मी नेलोच नसतो दूध डेरीवर.
 आई -  काऊन बावरून रायले? मलेबी वाट्त 10 लिटर दुध वाया गेल्यापरिस पोरायले थोडस दूध, दही तरी चाखाले मिळालं असत. गरीबाच्या घरी दररोजच आंदोलन असतो.

                 चहाची टपरी. 
             इथले मोठेमोठे ( महान) विचारवंत नि टीव्हीवरील न्यूजचॅनलवरचे मोठेमोठे विचारवंत एकाच नाळेचे.

सदा - का राजाभौ, का हाल चाललागा?
राजा - काय नाय सदाभौ. बसला आयोगा.
सदा - वातावरण गरम दिसून रायला. म्हणूंन म्हणलं आपणबी गरम व्हावा. च्या घेणार का भौ?
राजा - बोलावं.
सदा - कावून गा? कायले एवडुसा तोंड करून आहेस?
राजा - काही नाही गा. सकाळी 10 लिटर दुध फेकला आंदोलनवाल्याने. खूबच बेक्कार वाटून रायला मले. पोरायले कपभर दूध न्हाई देत आपण. चहाबी काळा पितो. अन ह्यायन एकावेळी सगळं दूध फेकून दिला.
सदा - पण हे सगळं आपल्यासाठी चाललं ना बे.
 भाव वाढासाठी...
गन्या - कायचं आपल्यासाठी चालल्लाबे? का-का चालल्लाबे आपल्यासाठी? हा देश? हा राज्य? हे सरकार? अन जर चाललाच असता तर आपण कायले असे भिकार्यासारखे जगलो असतो? आपल्याच दुधासाठी, मालासाठी आपल्यालेच डोकं फोडा लागते. आपण फक्त माल पिकवाचा अन यायन आपल्या मालाचा भाव ठरवावा मंग तो आपल्याला परवडो न्हाईत नको परवडो. 
सदा - गण्या, शांत हो गा. आमदारसाहेब बोलले न्हायका भाषणात चांगला भाव मिळून देतो म्हणून. करतील ते काहीतरी.
गण्या - मान्य. देतील भाव मिळऊन. पण मले सांग आजचा दूध बिनभावाचा होता का रस्त्यावर फेकाले?
सदा - आबे कायले बावरून रायला बे? दररोज थोडीच फेकणारे आहेत.
राजा - हो भाऊ. बराबर. पण आपली पोरपण दररोज दुधदही न्हाई पाहत गा.
सदा - हो गा, मले बी पटते. पण सगळीकडे तसच दूध फेकलं म्हणे. आणि जिकडेतिकडे असच आंदोलन होऊन दूध फेकणार आहेत म्हणे.
गण्या - दूध फेकाले त्यांच्या घरचं आहे का ? किती आमदार खासदार आपल्या घरी गायिम्हशी पाळून  त्यांचं दूध फेकणार आहेत सांग? हे लोक सुपर मार्केट मंदी जाऊन हाच दूध डबल भावाने घेतात पण शेतकऱ्याजवळचा दूध यांना महाग वाटतो. अन यायले आंदोलनचं कराच होत त मग धरणा आंदोलन, आमरण उपोषण हे आंदोलनाचे प्रकार आहेत की. नेहमी नेहमी शेतकऱ्यांनीच आपला माल का फेकावा? नाशिवंत आहे म्हणूंन? अन जर नाशिवन्त आहे तर त्या मालाला टिकाऊ करावचा उपाय सांगावा. दुधापासून पनीर, मिठाई बनते हे विसरले का? त्यातून पण आपल्याला पैसे मिळतेत. पण असे उपाय त्यांना पेपरात, टीव्हीवर झळकू देणारे नाहीत. आता तर व्यापारिबी आंदोलन करून रायले. किती व्यापारी त्यायचा माल रस्त्यावर फेकून रायले? 
गुरुजी - अरे बाबांनो शांत व्हा. गण्या तू जो बोलून रायला मला पटलं बावा. पण आता फडफडण्यापेक्षा मगाशीच बोलले असते तर काही झालं असत. आता काही उपयोग आहे का?
राजा - बोलाले वेळ त दिला पाहिजे होता. आले, नारे दिले, भाषण ठोकले, दूध फेकले, फोटो काढले, घरी गेले. संपलं आंदोलन.
गुरुजी - पण आता चिडून उपयोग आहे का? आपणच वेडे आहोत. भाव नाही त फेक टमाटर, फेक कांदे, फेक दूध. अरे अस फेकफेक करून आपणच रस्त्यावर फेकले जातोय हे लक्षात येतंय का तुमच्या. बरोबर आहे गाण्याचं भाव नाहीतर कोण्या व्यापाऱ्याने फेकलाय त्याचा माल? अस असलं तर सोनाराने अगोदर सोन फेकलं पाहिजे. तो तर त्यांच्या घरात सोन पिकवत नाही मग आपण तर आपल्या घरी कष्ट करून घाम गाळून पीक पिकवतो. त्याची किंमत सोन्यापेक्षा कमी आहे का? व्यापारी कोणतेही असो ते माल फेकत नाही न आत्महत्याबी करत नाही. आपण गरीब शेतकरी भाव नाही भेटला त रडत बसतो. पण दारूचे भाव वाढले तरी दारू पितोच. त्यावेळी आपली अक्कल कुठे जाते? नाशिवन्त माल टिकाऊ व्हावा हे मार्ग आपण स्वीकारायला पाहिजे गण्या म्हणतो तस. आता म्हणाल पैसे कुठून आणायचे? आपल्याकडे दारू प्यायला, जहर खायला पैसे असतात पण चांगल्या कामासाठीच पैसे नसतो.
         हे असंच चालायच.  इथे शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही. जो कोणी असेल तो स्वतःचे  रक्षण घराभोवती वॊल कंपाउंड बांधून  अगोदर करणार. म्हणून आपणच आपला विचार करायला पाहिजे. 
          हे राष्ट्र आता आपलं राहिलेलं नाही भावानो. छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा हे राष्ट्र महान राष्ट्र होते. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा हे राष्ट्र महाराष्ट्र होते. आता फक्त हे राष्ट्र कुरूराष्ट्र आहे. कौरवांचे आणि पांडवांचे. आणि ते फक्त स्वतःच्या हितासाठी लढत आहेत. तुमच्या आमच्यासाठी नाही.
              
               हे राष्ट्र कौरवांचे, हे राष्ट्र पांडवांचे,
               आचन्द्रसूर्य नांदो न नांदो,
                 हे राष्ट्र फक्त पैसेवाल्यांचे.

         ही नाण्याची दुसरी बाजू मी माझ्या परीने 'थोडक्यात'  मांडण्याचा प्रयत्न केला. चुकभुल द्यावी घ्यावी.