हे जीवन सुंदर आहे (भाग ९)

Manasi's story

हे जीवन सुंदर आहे! (भाग ९)

"खरंय, राघव म्हणला तसंच काही तरी करते. यावेळी स्वराचा बर्थडे एकदम मस्त साजरा करूया. काय बरं करता येईल?" मानसी विचार करत होती आणि तिला एक कल्पना सुचली… एक परफेक्ट प्लॅन तयार झाला होता.

"स्वरा, किती रागवशील माझ्यावर? तू ना अगदी माझ्यासारखीच आहेस गं. तुझ्या मनातलं लवकर जात नाही. पण… मी पण आई आहे तुझी… तुला असं माझ्यापासून दूर होऊच देणार नाही. आता मी पण ठरवलंय, तुला जसं वागायचं तसं वाग, मी मात्र माझ्या पिल्लासोबत असा अबोला धरून बसणार नाही. माझं गोडुलं गं ते! किती लवकर मोठं झालं…! असं वाटतं आताच तर जन्म झाला होता!" रात्री झोपताना मानसी स्वराचाच विचार करत होती, तिचं लहानपण पुन्हा विचारांमध्ये जगताना तिला कधी झोप लागून गेली ते कळलंच नाही.
 

सकाळ झाली. नेहमीप्रमाणे घरात मानसीच्या गोड आवाजाची किलबिल सुरू झाली. या काही दिवसात मानसी खूप शांत राहात होती; पण सकाळची तिची आधीसारखी हसत खेळत चालणारी घाई-गडबड बघून माईंना खूप बरं वाटलं. माईसुध्दा खूप आनंदीत होत्या. बऱ्याच दिवसांनंतर मानसीचा असा प्रसन्न चेहरा बघून राघवची सकाळही अगदी प्रसन्न झाली होती.

मानसीने स्वराच्या शाळेची तयारी करून दिली. राघवही तयार झाला. दोघं बाप-लेक शाळेत जायला निघाले होते. टीचर्स-पॅरेन्ट्स मिटींगला बाबा सोबत येणार म्हणून स्वराची गाडी खुश होती. स्वरा कारमध्ये जाऊन बसली. राघव आणि मानसी बोलत बोलत बाहेर येत होते. तितक्यात राघवने अंगणातल्या गुलाबाच्या झाडांचं एक टपोरं फुल तोडलं आणि मानसीला दिलं.

"थॅंक्यु! पण कशासाठी हे?" मानसी

"खूप दिवसांनी तू अशी आनंदीत दिसतेय, तुझा चेहरा असा एकदम प्रसन्न वाटतोय, त्यासाठी." राघव
 

"मी ना, आता ठरवलंय राघव… कितीही संकटं आली तरी न घाबरता, अगदी हसतमुखाने त्याचा सामना करायचा… आणि हा विरेन चौधरी… अजून किती त्रास देणार देऊन देऊन… याआधी पण त्याला धूळ खाऊ घातली आहेच की. पुन्हा नव्याने खाऊ घालेन." मानसी

"याला म्हणतात स्पिरीट…! अशीच राहा मनू." राघव मानसीसोबत बोलत कारपर्यंत आला. मानसीला बाय करून तो स्वराच्या शाळेत गेला. मानसीही आश्रमात गेली.
 

मानसी आश्रमात पोहोचली. बरोबर अकरा वाजता शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुजा आश्रमात पोहोचल्या होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची टीमही होती. डॉ. अनुजांनी आश्रमातल्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरची प्राथमिक लक्षणे सांगितली. त्याचप्रमाणे इतर स्त्रीरोगांविषयी माहिती दिली. आश्रमातल्या महिलांना तपासलं, ज्यांना गरज असेल त्यांच्या काही तपासण्या केल्या. त्यानंतर आश्रमातल्या महिलांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, शंका निरसन केलं. डॉ. अनुजांचा गोड, हसरा चेहरा बघून सगळ्या महिलाही अगदी बिनधास्तपणे बोलल्या. एकंदरीत शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मानसीला या गोष्टीचा अतिशय आनंद झाला होता.

स्वराच्या शाळेतली टीचर्स-पॅरेन्ट्स मिटिंग दोन तासात संपली होती. त्यानंतर दोघा बाप-लेकानी मस्त दिवसभर बाहेर फिरून शॉपिंग, आईस्क्रीम पार्टी केली आणि मानसी घरी येण्याआधी काही वेळापूर्वी दोघे घरी पोहोचले होते. घरी आल्यावर स्वरा माईंना तिने घेतलेले ड्रेस, शूज आणि इतर शॉपिंग दाखवत होती. तेवढ्यात स्वराचं लक्ष बाहेर गेलं, तिला मानसी घरात येताना दिसली. तिने पटकन आपल्या शॉपिंगच्या बॅग उचलल्या आणि धावत तिच्या रूममध्ये गेली. माईंना आणि राघवला आश्चर्य वाटलं. 

"अगं, आईला दाखव तर काय काय आणलं ते." मानसीला घरात आलेलं बघून माई स्वराला बोलत होत्या.

"नंतर दाखवेन." स्वरा तिच्या रूममधून ओरडली. 'नेमकं काय सुरू आहे?' मानसीला काही कळत नव्हतं.

"कसा झाला तुझा कॅम्प?" राघव

"खूप मस्त. तुला सांगू राघव, एवढी मोठी डॉक्टर आहे पण जरा म्हणून गर्व नाही तिला. साधी राहणी आणि उच्च विचार म्हणतात ना… तशीच एकदम… आश्रमातल्या महिलांना पण खूप आवडली ती… सोप्या सोप्या शब्दात एवढी छान माहिती दिली रे! आश्रमातल्या कोणालाही काही झालं तरी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून देणार आहेत त्या. खरंच… खूपच फायदा झाला या शिबिराचा… " मानसी भरभरून बोलत होती. तितक्यात स्वरा तिथे आली.

"तसं पण तुला आश्रमच आवडत ना नेहमी. मला किती मार्क्स मिळाले हे नाही विचारलं तू." स्वरा गाल फुगवून, चिडून बोलली.

"बिहेव युअरसेल्फ स्वरा! आणि मी तिला आल्या आल्या प्रश्न विचारला, सो ती माझ्यासोबत बोलतेय… मी तिला विचारलंच नसतं तर तिने आधी तुझे मार्क्स विचारले असते… से सॉरी टू हर!" राघवचा पारा चढला होता. स्वरा सॉरी न म्हणता, रडतच तिथून गेली. माई तिच्या मागे मागे गेल्या.

"बरोबर आहे तिचं… आश्रम आश्रमाच्या ठिकाणी… घरी आलं की घर… म्हणजे माझंच चुकतंय…" मानसी हतबल होऊन म्हणाली.

"व्हॉट इ धिस? असं थोडी असतं! तू तिच्या अशा बोलण्याकडे बिलकुल लक्ष देऊ नको. उद्या ती तुला म्हणेल तर आश्रम बंद करशील का?" राघव

"तसं नाही रे… पण… बरोबर आहे तिचं… जो वेळ लेकरांना द्यायला हवा तो दिलाच पाहिजे. माझे पहिले प्राधान्य माझे कुटुंब आहे . कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मला काहीच मिळवायचं नाहिये." मानसी

"आता हे काय नवीनच? ती काय छोटं बाळ आहे का? की तू तिला आता खाऊ-पिऊ घालत बसशील… मोठी झालीये ती… आणि तू दोन्ही गोष्टींचा अगदी योग्य समतोल साधून करतेय सगळं… माईंना विचार हवं तर… सगळं नीट सुरू असलेलं असे विचित्र विचार करून बिघडवू नको. तू समाजासाठी काय आहेस हे बघायचं असेल तर आश्रमातल्या प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात बघ… तुला तुझं उत्तर नक्की मिळेल." राघव मानसीला समजावत होता.

"ते सगळं असेल तसंच… पण माझं लेकरू माझ्यापासून दूर चाललंय त्यासाठी मी काय करू ते तरी सांग." मानसी हताशपणे म्हणाली.

"तिला समजावून सांगण्याचा काही फायदा नाही. आपल्याला तिला समजून घ्यावं लागेल. जेव्हा जेव्हा मी तिच्यासोबत असतो, तेव्हा तेव्हा मी तिला तिच्या अशा वागण्याबद्दल समजावतोच… तेवढ्यापुरते ती हो म्हणते… आपण मोठे आहोत… आपण तिला थोडं समजून घेऊ." राघव बोलत होता, मानसीला त्याचं म्हणणं पटलं.
 

आठवडा असाच निघून गेला. ऊन-पावसाच्या श्रावण सरींच्या खेळाला सुरुवात झाली होती. कधी लख्ख ऊन तर कधी रिमझिम पाऊस पडत होता. मानसीने ठरवलं होतं त्याप्रमाणे ती स्वरासोबत वागत होती. स्वराचं मात्र हेकड वागणं, उद्धट बोलणं सुरूच होतं. मानसीच्या जणू संयमाची परीक्षा सुरू होती. राघवच्या ऑफिसमधली कामं पण वाढली होती. त्याला ऑफिसमधून घरी यायला आजकाल वेळ होत होता. मानसी नियमित स्वराचा अभ्यास घेत होती. स्वरा अभ्यास करताना काय तेवढं मानसीसोबत नीट बोलत होती.
 

योगेश वकिलांनी आश्रमाच्या नव्या जागेसंदर्भात कोर्टात केस दाखल केली होती. त्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी मानसी कोर्टात गेली होती. न्यायाधीशांसमोर दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजू मांडल्या होत्या. वीरेन चौधरीच्या वकिलाने न्यायाधीशांना अजून वेळ मागून घेतला होता. न्यायाधीशांनी त्यांना पुढची तारीख दिली होती. पाच वाजले होते. मानसी योगेश वकिलांसोबत  बोलून कोर्टाच्या बाहेर येत होती. तितक्यात वीरेन चौधरी तिच्यासमोर आला. त्याला बघून मानसी थबकलीच.

"भूतकाळ आठवतोय का? का विसरल्या मानसी मॅडम? आता तर म्हणे एक मुलगी पण आहे तुम्हाला…." वीरेन चौधरी मोठ्याने विक्षिप्त हसत बोलला आणि तिथून निघून गेला. वीरेन चौधरीच्या त्या वाक्याने मानसीच्या हाता-पायांना कंप सुटला… तिला वाटलं, धावत जाऊन त्या वीरेनच्या कानाखाली वाजवावी… पण पुन्हा स्वराचा विचार तिच्या डोक्यात आला…वीरेनचे शब्द डोक्यात फिरत होते… ती कशी बशी धावत कारपर्यंत पोहोचली… तिने कार सुरू केली… डोळ्यात अश्रू जमा झाले होते… त्यामुळे समोरचं नीटसं दिसतही नव्हतं… घशाला कोरड पडली होती… शक्य तितक्या फास्ट कार चालवत ती घरी पोहोचली. कार अंगणात उभी केली आणि धावतच ती घरात गेली.
 

"स्वरा ssssssssss!" मानसी दारातूनच अक्षरशः किंचाळलीच…

क्रमशः

©डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all