हे जीवन सुंदर आहे (भाग ५)

Manasi's story about her life

हे जीवन सुंदर आहे (भाग ५)

आशाताई आश्रमातून गेल्या आणि मानसी आत येत होती. 

"खरंच, सगळा प्रपंच एवढा वाढेल असं वाटलं नव्हतं. आपण आपलंच दुःख कुरवाळत बसतो, पण जेव्हा आपल्यापेक्षा समोरचा दुःखी दिसतो, तेव्हा आपलं तेच दुःख छोटं वाटतं." मानसी आतमध्ये येत आश्रमातल्या महिलांकडे बघत विचार करत होती. 

तिला माईंचे शब्द आठवले, "एवढूस रोपटं किती मोठं झालं."

"हो ना, एवढं मोठं झालं की आता ही जागा कमी पडतेय. अजून कितीतरी गोष्टी करायच्या आहेत." मानसी स्वतःशीच पुटपुटली. एकदम तिला नवीन घेतलेल्या जागेची आठवण झाली, तिने लगेच योगेश वकिलांना फोन लावला.

"योगेश सर, मी मानसी. वेळ आहे का? नाही म्हणजे, मी डिस्टर्ब तर केलं नाही ना." मानसी

"हां, बोला मॅडम, तुम्हाला फोन करणार होतो आपल्या त्या जागे संदर्भात." योगेश वकील

"हो, मी त्याचसाठी फोन केलाय. मी विचार करत होते की तिथे जाऊन त्या लोकांसोबत बोलावं का एकदा? म्हणजे बोलून काही फायदा होईल का? ते अतिक्रमण काढून मला लवकरात लवकर तिथे बांधकाम सुरू करायचे आहे." मानसी

"मॅडम, ते लोकं बोलून ऐकणाऱ्यातले नाहीयेत. तुम्हाला कालच तर सांगितलं ना मी. मी स्वतः जाऊन आलो तिथे. ते लोकं गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत, बोलून काही होणार नाही. त्यापेक्षा मी म्हणत होतो की, मी तुमचा वकील या नात्याने त्यांना नोटीस पाठवतो. आपण त्यांना जागा रिकामी करण्यासाठी काही दिवसांची मुदत देऊ. त्यांनी जर जागा रिकामी नाही केली तर मग कायदेशीर जी कार्यवाही असेल ती करू." योगेश

"तुम्ही कायद्याचे तज्ञ आहात. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. तसंही तुम्ही एवढी मदत केलीये 'संजीवनी'साठी, म्हणजे नेहमीच करता अगदी वेळात वेळ काढून! आवाज दिला की नेहमी मदतीसाठी हजर असता." मानसी

"मॅडम, खरंतर तुमच्यामुळे आम्हाला थोडंफार सत्कार्य करायला मिळतं." योगेश वकील

"हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे." मानसी

"तसं काही नाही. बरं, ती नोटीस पाठवायची आहे त्याकरिता तुमची सही आणि त्या जागेची कागदपत्रे लागतील. तुम्ही आश्रमात आहात का? मी थोड्यावेळाने येतो तिकडे." योगेश वकील

"तुम्ही कशाला त्रास घेताय. मीच येते तिकडे. किती वाजता येऊ ते सांगा." मानसी

"त्रास कसला त्यात? तुम्हाला जमणार असेल, वेळ असेल तर इकडे या मग. असं करा तीन वाजेपर्यंत या. तोपर्यंत मी सगळी कागदपत्रं तयार करून ठेवतो." योगेश वकिलांनी मानसीला दुपारची वेळ दिली. मानसी आश्रमातल्या कामात व्यस्त झाली होती.

दुपारी मानसी कोर्टात जायला निघाली होती. कार चालवत असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने तिला स्वरा दिसल्यासारखी वाटली, चार-पाच मुला-मुलींचा घोळका हसत खिदळत रस्त्याने जात होता.

"स्वरा, शाळा सोडून कुठे फिरतेय? पण कशावरून ती स्वराच असेल? दुसरी कोणी मुलगी असेल; पण युनिफॉर्म तर तिच्या शाळेचाच आहे…  ठीक आहे, स्वरा माझ्यासोबत नीट बोलत नाही आजकाल; पण अशी शाळा वगैरे बुडवून ती नक्कीच फिरणार नाही… मानसी, तू पण ना लेकीचा  अतिविचार करणं सोड…" स्वतःशीच बोलत मानसी कार चालवत होती.

बरोबर दुपारी तीन वाजता ती जागेची कागदपत्रे घेऊन कोर्टाच्या बाहेर पोहोचली. बाहेर पे अँड पार्कमध्ये गाडी पार्क करून ती आता जात होती. कोर्टात भरपूर वर्दळ होती. काळे कोट घातलेले वकील, त्यासोबत त्यांचे अशील, त्यांचे नातेवाईक… सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्ट दिसत होती. प्रत्येकजण आपापल्या बाजूने न्याय मागण्यासाठी न्यायालयात आला होता.

"शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. मग शहाण्याने न्यायच मागायचा नाही का? की तो एवढा शहाणा असला पाहिजे की त्याच्यावर न्याय मिळवायची वेळच नाही आली पाहिजे! पण, न्याय तर मिळवावा लागतो ना? कधी कधी आपली चूक नसताना आपण जेव्हा विनाकारण भरडल्या जातो, जेव्हा विनाकारण अन्याय केला जातो, न्याय मागावाच लागतो, लढावंच लागतं. पण ते तरी कुठे सोपं आहे, वकील बघा, केस उभी करा, साक्ष, पुरावे, प्रतिस्पर्धी वकिलांचे ते विचित्र प्रश्न, केसच्या पडणाऱ्या तारखा आणि आपल्याला न्याय हवा म्हणून आपल्याच चारित्र्यावर लोकांनी शिंतोडे उडवावे… हा विचारदेखील आता नको वाटतो…" मानसीला भूतकाळातील काही आठवणी उष्ण वाऱ्यासारख्या स्पर्शून गेल्या. नुसत्या आठवणीने तिच्या अंगार काटे उभे राहिले. ती विचारांच्या तंद्रीतच योगेश सरांच्या चेंबरमध्ये गेली. चेंबरच्या बाहेर वकिलांचा असिस्टंट उभा होता. त्याने सर मीटिंगमध्ये असल्याचं सांगितलं. मानसी तिथेच बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसली होती. थोड्यावेळातच वकिलांची मिटिंग संपली. मानसी सरांच्या चेंबरमध्ये गेली. योगेश सरांनी म्हटल्याप्रमाणे सगळी कागदपत्रं तयार केली होती. मानसीने सुध्दा सगळं एकदा नीट वाचून त्यावर सह्या केल्या. या सगळ्या गोष्टी करण्यात पाच वाजून गेले होते. मानसी तिथलं आटोपून घरी जाण्यासाठी निघाली.
 

मानसी घरी पोहोचली. स्वरा हॉलमध्ये सोफ्याच्या हँडरेस्टवर बसून कोणासोबत तरी लँड लाईनवर गप्पा मारत होती. माई तिथेच बाजूला संत साहित्यावरचं पुस्तक वाचत बसल्या होत्या.

"गीते, अगं फक्कड आल्याचा चहा टाक. मानसी आलीये." माई मानसीकडे बघत हसत बोलल्या. मानसी स्वतःच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आली. स्वराचं फोनवर बोलणं सुरूच होतं.

"मैत्रीण असावी कोणीतरी." मानसीने एकंदरीत बोलण्यावरून कयास बांधला. गीताने चहा आणून दिला. माई आणि मानसी दोघी चहा घेत गप्पा करत होत्या. स्वराचं फोनवरच बोलणं आटोपलं होतं. हातात वही घेऊन ती तिथेच रेंगाळली होती.

"काय स्वरा मॅडम, कसा सुरू आहे अभ्यास?" मानसी स्वराची खुश गाडी बघून बोलली.

"मस्त… चांगला सुरू आहे." स्वराने कोणतेच आढेवेढे न घेता, सरळ उत्तर दिलं.

"तुला माहिती स्वरा, दुपारी मी बाहेर जात होते तर रस्त्यात मला सेम तुझ्यासारखी एक मुलगी दिसली. चार-पाच मुलामुलींचा ग्रुप होता. तुझ्याच शाळेचा युनिफॉर्म होता बघ; पण मी विचार केला, तू कशाला असशील तिथे?" मानसीने आपली शंका खरी आहे की खोटी हे पडताळून बघण्यासाठी स्वराला विचारलं.

"मी… मी… कशाला? आई तुला काहीही वाटतं… मी नव्हते…" मानसीच्या या, अशा अचानक बोलण्याने स्वरा एकदम चाचरली. मानसीने तिचे बदललेले भाव अलगद टिपले.

"हो, मलाही तेच वाटलं…" मानसी

"आई, मी नैनाकडे जाऊ का गं अभ्यासाला? आम्ही मॅथ्सचा अभ्यास सोबत करणार आहोत. आता तिचाच फोन होता." स्वरा

"हो… जा की... असं करते, चल मीच तुला सोडायला येते." मानसी

"राहू दे ना… जाते मी… सायकलवर… जवळच आहे की तिचं घर…" स्वरा थोडं चिडून बोलली.

"अग, आई येतेय सोडायला तर येऊ दे की. आता थोड्यावेळात अंधार पडेल. पावसा-पाण्याचे दिवस आहेत." माई

"मग सायकल कधी वापरू मी?" स्वरा तणतण करत होती.

"ठीक आहे. जा सायकलवर." मानसी

"आई, मी घरी जेवणार नाहीये. नैनाची आई पाव भाजी करणार आहे तर तिकडेच खाऊन येईल मी." स्वरा

"तू पावभाजी खायला जाणार आहेस की अभ्यास करायला?" माई

"काय गं आजी…? मी अभ्यासालाच जातेय…तिच मला म्हणे की तिची आई पावभाजी बनवणार आहे तर तू आमच्याकडे जेव…" स्वरा पाय आपटत स्वतःची बॅग भरत होती. तिने तिची बॅग भरली आणि सायकल काढून निघून गेली.

"सोडायच की तिला… तू पण ना… जे नाही ते लाड पुरवतेस… पावसाळ्याचे दिवस आहेत, विंचू-काट्याचे भय वाटते, बाकी काही नाही." माई

"हो माई, तुमची काळजी पण अगदी योग्यच आहे. घ्यायला जाईल मी तिला." मानसी

माई पुन्हा पुस्तक वाचण्यात गुंग झाल्या.

"काही कळत नाही या पोरीचं… आश्रमातल्या शंभर बायका सांभाळण सोपं आहे हिच्यापेक्षा. मघाशी मी विचारलं तर थोडी चाचरली बोलताना. स्वरा माझ्यासोबत खोटं तर बोलली नसेल ना? आणि ती स्वराच असेल तर तिने का खोटं बोलावं माझ्यासोबत? शाळा सोडून मित्र मैत्रिणींसोबत फिरायची काय गरज होती?" मानसी विचारांच्या गुंत्यात हरवली होती.

क्रमशः

डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all