हे जीवन सुंदर आहे! (भाग ४०- अंतिम)
"योगेश, तू इकडे कसा?" राघवने आश्चर्याने योगेश वकिलांना विचारलं.
"तुमच्याकडेच आलो होतो. मानसी मॅडमबद्दल कळलं. म्हटलं तुम्हाला भेटून घ्यावं." योगेश
"हो, ते जरा.. पण आता थोडी बरी आहे मानसी… ये ना इथे बेंचवर बसू." राघव आणि योगेश दोघे बेंचवर बसले.
"आपण आश्रमासाठी एक जागा घेतली होती, त्यावर अतिक्रमण झालं होतं, त्यासंदर्भात कोर्टात केस सुरू होती. मानसी मॅडमने सांगितलं असेलच ना तुम्हाला." योगेश
"हो… बोलली होती ती… तिच्या या आजारपणात मीच विसरून गेलो… तुझी फीस द्यायची असेल ना… पुढची तारीख कधी आहे कोर्टाची? मानसी तर येऊ शकणार नाही… आश्रमातलं प्रशासकीय मंडळातलं कोणी आलेलं चालेल का? नाही तर मी येईल कोर्टात… तसंही मी ट्रस्टी आहे आश्रमाचा… तर माझी काही गरज पडेल का?" राघव
"त्याची काहीच गरज नाहीये… केसचा निकाल लागला आणि आपण जिंकलो." योगेशने आनंदाने सांगितलं.
"काय!" राघवच्या चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य होतं.
"हो… त्या वीरेन चौधरीने आपल्या जागेसोबत अजून तीन जागांवर अतिक्रमण केलं होतं आणि त्या ठिकाणी त्याने अवैध धंदे सुरू केले होते. खरंतर केस पहिल्याच दिवशी क्लीअर होती; पण त्या वीरेनच्या वकिलांनी वेळ काढला… ते बरंच झालं… त्याचे बाकीचे धंदे समोर आले… त्याला त्याची शिक्षा मिळाली.. आता आपल्याला आपली जागा परत मिळालीच सोबत नुकसानभरपाईसुद्धा मिळाली…" योगेश
"थॅंक्यु सो मच योगेश! मानसीला हे कळल्यावर किती आनंद होईल." राघव योगेशसोबत थोडावेळ बोलत बसला. योगेश वकील गेल्यानंतर राघव परत आय.सी.यु. मध्ये जायला निघाला. भेटायची वेळ संपली म्हणून तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्याला अडवलं. राघव त्याला दोन मिनीटं जाऊ द्या म्हणून विनवणी करत होता. आय.सी.यु. मधल्या नर्सचं लक्ष दाराकडे गेलं, तिने राघवला आत येऊ दिलं. राघव धावतच आत गेला. मानसीच्या बेडजवळ जाऊन उभा राहिला.
"मानसी… तू जिंकलीस…!" राघवच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.
"मनू, आपल्या आश्रमाच्या जागेच्या केसचा निकाल लागला… आपण जिंकलो… त्या वीरेनला तू परत एकदा हरवलंस… मानसी आता त्या जागेवर आपण तुला हवी ती तशी इमारत बांधू… तुला मुलांसाठी आश्रम आणि शाळा सुरू करायची होती ना… आपण सगळं करू… मानसी…" राघव बोलत होता, मानसीच्या डोळ्यांची हालचाल होत होती… राघवने सिस्टरला आवाज दिला. राघव अजून मानसीसोबत बोलत होता… आश्रमाबद्दल… तिच्या स्वप्नांबद्दल आणि राघव बोलत असताना मानसीने डोळे उघडले.
"मानसी… तू जिंकलीस..." राघवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते. मानसीने पापण्यांची खाली-वर हलचाल करून राघवला प्रतिसाद दिला.
"मानसी, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत… थोडा धीर धर… डॉक्टर हे सगळं काढतील… त्यांना थोडं सहकार्य कर…" राघव मानसीला समजावून सांगत होता. मानसी मान हलवून त्याला रिस्पॉन्स देत होती. नर्सने डॉक्टरांना कळवलं. डॉ. दीपक लगेच तिथे आले.
"राघव, आता व्हेंटिलेटर सपोर्ट कमी करू आणि सगळं नीट राहिलं, मानसीला काही त्रास झाला नाही तर उद्या व्हेंटिलेटर काढून टाकू…" डॉ. दीपक बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.
राघवनेही घरी फोन करून ही आनंदाची बातमी कळवली. माई आणि मंदाताई लगेच देवघरात गेल्या, त्यांनी देवासमोर हात जोडले. माई, स्वरा, मंदाताई, सुधीरराव, गौरी, शशांक, ओम, रजनी, हेमंत आणि हर्षा सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
"राघव, बघ मी तुल म्हटलं होतं ना… विघ्नहर्ताने आपली किमया दाखवली…" माई अतिशय आनंदाने बोलत होत्या. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.
"बाबा, मला आईला भेटायचं आहे." स्वरा
"आता भेटू देणार नाहीत बेटा… आपण काचेच्या दरवाज्यातून आईला बघू." राघव बोलला आणि सगळेजण दरवाज्यापाशी गेले. मानसीसुद्धा तिकडून डोळे उघडून बघत होती. तिच्याही डोळ्यांत अश्रूंची गर्दी होती.
दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे व्हेंटिलेटर काढण्यात आलं. त्यानंतर मानसीला बेडवर बसवलं होतं. डॉक्टरांनी राघवला आय.सी.यु. मध्ये बोलावलं. राघव आणि मानसी एकमेकांना बघून खूप खुश झाले होते.
"मानसी, तुम्ही आता बोलू शकता." डॉ. दीपक
"स्वरा…." मानसीचा आवाज थोडा कापरा आला होता. डॉक्टरांनी स्वराला आत बोलवलं. आपल्या आईला असं छानपैकी बसलेलं बघून स्वरा आनंदाने आईला बिलगली. मानसीनेसुद्धा तिला गच्च मिठीत घेतलं. दोघी माय-लेकी प्रेमाच्या श्रावणधारेत चिंब भिजल्या होत्या.
"मानसी, तुमचा डावा हात उचला." डॉ. दीपकने बरोबर एक गोष्ट हेरली जी आनंदाच्या भरात कोणालाच कळली नाही, मानसीने एका हातानेच स्वराला मिठी मारली होती.
मानसीने हात डावा उचलायचा प्रयत्न केला; पण तो उचलल्या गेला नाही.
"मानसी, आता डावा पायही हलवा." डॉक्टरांच्या सूचनेवरून मानसीने डावा पाय हलवायचा प्रयत्न केला पण तिला ते जमलं नाही.
"ठीक आहे." डॉ. दीपक बाहेर आले, त्यांच्यामागे राघवही बाहेर आला.
"राघव, हे अपेक्षितच होतं. ब्रेन हॅमरेजमुळे डाव्या बाजूला पॅरॅलीसिस झाला आहे. त्यासाठी आता काही प्रकारचे व्यायाम करावे लागतील. चालायला, स्वतःची कामं स्वतः करायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही मानसीसाठी व्हील चेअर वापरा." डॉक्टर काऊंसेलिंग करून गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक काळजीची लकेर उमटून गेली.
दोन दिवसांनी मानसीला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यावेळी शशांक तिथे एकटाच होता.
"शशांक भावोजी, बाकी घरातली मंडळी कुठे आहेत?" मानसीने रूममध्ये आल्या आल्या प्रश्न विचारला.
"अनंत चतुर्दशी नाही का आज… गणपती विसर्जन करून येतीलच सगळे." शशांकच वाक्य पूर्ण व्हायलाच उशीर, तोपर्यंत सगळे तिथे पोहोचले सुद्धा.
आल्या आल्या माईंनी मानसीला प्रसादाच्या शिऱ्याचा घास भरवला.
"माई, तुमच्या हातचा शिरा! लाजवाब! पण आज मोदक नाही का केले?" मानसी
"केले गं… पण तुला आवडतो म्हणून प्रसादाला थोडा शिराही बनवला." माई
"पण हे मात्र बरं केलं तुम्ही… गणपती बसवला… आणि तुम्ही सगळेजण इथे थांबलात इतके दिवस… सगळ्यांना बघून खूप चांगलं वाटतंय… " मानसीची बडबड सुरू झाली होती.
"हिची अखंड बडबड सुरू झालीये म्हणजे ही शंभर टक्के बरी झालीये… डॉक्टरांना सांगतोच आता." राघव बोलला आणि सगळेजण कित्तीतरी दिवसांनी खळखळून हसले.
काही दिवसांनी मानसीला डिस्चार्ज झाला. डिस्चार्जच्यावेळी राघवने मानसीला ऑटोमॅटिक व्हील चेअर गिफ्ट केली. त्यामुळे मानसी स्वतःहून घरात कुठेही फिरू शकत होती. मानसीसाठी घरातल्या काही गोष्टींमध्ये देखील राघवने बदल करून घेतले होते. राघवचं हे प्रेम बघून मानसी सुखावली होती. मानसी घरी आल्यापासून स्वराही खूप खुश राहत होती.
"आई, चल ना तू माझ्यासोबत… मला बस स्टॉपपर्यंत सोडून ये." एक दिवस सकाळी शाळेत जाताना स्वरा मानसीच्या मागे हट्ट करू लागली.
"अग स्वरा जा ना तू… इथेच तर आहे बस स्टॉप." मानसी
"हो, माहितीये मला, म्हणूनच तू सोबत आलीस तर काय बिघडणार आहे का?" स्वराचा हट्टीपणा सुरू होता.
"स्वरा, आईला त्रास देऊ नको." माईने स्वराला दटावलं.
"आई, मला ते काही माहिती नाही. तू सोडायला आली नाही तर मी शाळेत जाणार नाही." स्वरा
"अगं, पण मी कशी येऊ?" मानसी
"कशी येऊ म्हणजे? अशीच… या खुर्चीला बटण आहे ते दाबलं की घरात फिरतेस तशीच… बाबा पण येतील तुझ्यासोबत… तसं पण मी शाळेत गेल्यावरच ते ऑफीसला जातात ना." स्वरा
"ठीक आहे बाई! चल." मानसी आणि राघव स्वराला सोडायला स्टॉपपर्यंत गेले.
"राघव, माझी स्वरा मला परत मिळाली… मी खूप खुश आहे…" मानसीची बडबड सुरू होती, राघव मात्र थोडा विचारात हरवला होता.
दिवस सरत होते. एक दिवस मानसी सकाळी सकाळी उठली. गीताने तिचं सगळं आवरून दिलं. मानसीने स्वराला उठवलं आणि ती गीताला पुढच्या कामाच्या सूचना देत होती.
"गीता, आमचे टिफिन भरशील तर तुझ्या ताईचा पण टिफिन भर." राघव
"म्हणजे? टिफिन घेऊन मी कुठे जाणार?" मानसी
"आश्रमात! अजून कुठे जाणार!" राघव
"आश्रमात कशी जाणार मी? या चेअरवरून पलंगावर बसताना मला आधार लागतो, तर कारमध्ये कशी बसणार मी? आणि एवढ्या दूर या चेअरला चालवत नेणं पण सोपं नाही… राघव प्लिज, आधीच मला खूप परावलंबी झाल्याचं गिल्ट आहे… त्यात पुन्हा तू अजून कारमध्ये बसणं-उतरणं याची भर नको टाकू." मानसी
"झालं बोलून? चल बाहेर.." राघव बोलत होता, मानसी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती.
"अगं चल ना, आता अंगणात तर तू या चेअरवर जाऊच शकतेस. माई, स्वरा तुम्ही पण थोडं बाहेर या." राघव बोलला आणि सगळे बाहेर आले.
बाहेर अंगणात एक नवीन व्हॅन उभी होती. राघवने ड्रायव्हरला आवाज दिला. ड्रायव्हरने आतून एक बटन दाबलं. व्हॅनचा दरवाजा आपोआप वर गेला आणि खालच्या बाजूने एक मेटलची स्लाइडिंग पाटी बाहेर आली, ज्यावरून मानसीची व्हील चेअर कोण्याच्याही मदतीशिवाय आत जाऊ शकेल. राघवने मानसीला तिची चेअर आत न्यायला लावली. आत गेल्यावर तिथे एक सीट बेल्ट होता, जो मानसी एका हाताने सहज लावू शकणार होती, त्यामुळे मानसीची चेअर चालत्या व्हॅनमध्ये स्थिर राहणार होती. मानसीने राघवकडे पाहिलं.
"एवढं प्रेम फक्त तूच करू शकतोस." मानसीच्या डोळ्यांत अश्रूंची गर्दी झाली होती.
"ओये रडुबाई… चला आता आवरा… आपलं आश्रम आणि आपल्या बायका सांभाळा… आणि हो आश्रमातही जिथे जिथे पायऱ्या आहेत तिथे असच स्लाइडिंग करून घेतलंय, त्यामुळे तिथंही बिनधास्त फिर… आणि अजून एक… " राघव
"अजून बाकी आहेच का?" मानसी
"आय लव्ह यु!" राघव म्हणाला आणि मानसीने एक गोड स्माईल दिलं.
मानसीचं पुन्हा आश्रम, घर, स्वरा असं रुटीन लाईफ सुरू झालं होतं.
*********************
बारा वर्षानंतर
सकाळी सकाळी स्वराची वेगळीच गडबड सुरू होती.
"बाबा, सगळं नीट होईल ना?" स्वरा
"हो होईल की… त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे?" राघव
"तरी पण मला भीती वाटतेय… असं करते मी पुढे जाते तुम्ही या मागून." स्वरा
"आता सकाळचे सात वाजले आहेत." राघव
"हो मला माहितीये… तरी मी पुढे जाते." स्वरा बोलली आणि घाईघाईने घराच्या बाहेर पडली.
"मानसी, उठ आता." राघव मानसीला उठवायला बेडरूममध्ये गेला.
"काय रे राघव! झोपू दे ना दोन मिनिटं." मानसी
"हे बरं लावलं तू आणि माईने… आजकाल तर दोघीजणी झोपून राहता मस्त." राघव
"मग आम्ही काय ठेका घेतला आहे का लवकर उठायचा? स्वराही मोठी झालीये आता… घरातही विशेष काही काम नसतं तर झोपू दे ना आम्हाला… किती वर्षं झालीत आम्ही सगळ्यात लवकर उठतच आलो… तू ना आता म्हातारा झाला आहेस… म्हाताऱ्या लोकांनाच अशी झोप येत नसते…" मानसी राघवला चिडवत होती.
"हो मी म्हातारा… माई तरुण झालीये आणि तू तर कुक्कुल बाळ! हो ना." राघवही आता मानसीला चिडवत होता.
मानसी उठली, राघवने तिला चेअरवर बसायला मदत केली.
"राघव, हात झाला रे पूर्ववत; पण हा पाय कधी होईल रे नीट." मानसी
"पाय नीट झाला तर तू अशी रोज माझ्याजवळ येशील का?" राघव मिश्किल हसला.
"पुरे आता… स्वरा कुठे आहे? बारावी पासून मॅडम एवढ्या बिझी झाल्यात की विचारायची सोय नाही." मानसी
"ती बाहेर गेलीये, आपल्याला पण जायचंय… चल आवर लवकर… कुठे? कशाला? का? हे प्रश्न विचारू नको." राघव
मानसी, माई दोघी तयार झाल्या. राघव त्यांना घेऊन निघाला. एका मोठ्या बिल्डिंगच्या बाहेर त्याने कार थांबवली. मानसी बिल्डिंग न्याहळत होती. "संजीवनी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल" बिल्डिंगवर मोठ्या अक्षरात नाव लिहिलं होतं आणि त्याखाली "डॉ.स्वरा सरपोतदार, एम.बी.बी.एस. (एम.एस.)(प्लास्टिक सर्जरी)"
मानसीचा उर आनंदाने भरून आला.
"राघव, हे हॉस्पिटलचं कधी ठरलं? तू तर मला काहीच बोलला नाही, स्वरा पण बोलली नाही." मानसी आश्चर्याने
"ती एम. एस. च्या शेवटच्या वर्षाला होती तेव्हाच तिने हा प्लॅन आखला होता. तुला तेवढं सांगितलं नाही… सरप्राईज द्यायचं होतं ना." राघव
तेवढ्यात स्वरा तिथे आली.
"आई, कसं वाटलं सरप्राईज? आई, मी ठरवलंय ऍसिड अटॅक झालेल्या स्त्रिया आणि कौटुंबिक हिंसाचारात झालेल्या बर्न केसेसवर मी मोफत उपचार करणार आहे… सोबतच आता आश्रमाचं कामही पाहणार आहे… आपण प्रत्येकच स्त्रीला एवढा आत्मविश्वास देऊ की तिनेही म्हटलं पाहिजे…"हे जीवन सुंदर आहे!"
चल पटकन रिबीन काप… तुझ्याच हस्ते उद्घाटन करायचं आहे…" स्वरा बोलत होती. मानसीची छाती अभिमानाने फुलून आली होती. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रूची गर्दी झाली होती. स्वरा तिची व्हील चेअर पुढे घेऊन गेली. स्वराने तिच्या हातात कैची दिली. मानसी फित कापणार तेवढ्यात फोटोग्राफर म्हणाला, " एक मिनिट मॅडम, कैची तशीच पकडा…रिबीन साध्याच कापू नका… सगळेजण इकडे बघा.. थ्री…टू…वन… स्माईल प्लिज!"
पूर्णविराम!
(जीवनाच्या या वाटेवर प्रत्येक दृष्टीने खडतर प्रवास करणाऱ्या आणि जिच्यामुळे "हे जीवन सुंदर असतं" त्या प्रत्येक स्त्रीला समर्पित.)
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा