हे जीवन सुंदर आहे (भाग ३)

story of Manasi ... Story about her life

हे जीवन सुंदर आहे (भाग ३)

पावसाने भिजलेली ओली बॅग तशीच सोफ्यावर फेकून स्वरा तिच्या रूममध्ये गेली. 

"स्वरा, काय आहे हे? असं वागतात का?" मानसी स्वरावर चिडली होती. विरेन चौधरीचं नाव ऐकून आधीच तिचं डोकं भणभणायला लागलं होतं आणि त्यात भरीस भर स्वरा विचित्र वागत होती.

"तू थांब गं, मी बोलते तिच्यासोबत." माई म्हणाल्या. त्यांनी गीताला हळदीचं दूध बनवायला लावलं. दुधाचा ग्लास घेऊन त्या स्वराच्या रूममध्ये गेल्या.
 

"अगं, वेण्या तर सोडायच्या ना, केस ओले झालेत ना पावसात भिजल्यामुळे." माई दुधाचा ग्लास टेबलवर ठेवत बोलल्या. माईंना बघून स्वरा थोडी शांत झाली होती. तिने तिच्या वेण्या सोडल्या. माई टॉवेल घेऊन तिचे केस पुसून देत होत्या.

"मज्जा येते ना पावसात भिजायला! मला तर बाई खूप आवडायचं. आताही भिजावं वाटतं; पण आता काय! वय झालं!" माई बोलत होत्या, तरी स्वरा शांत होती.

"तुला माहिती स्वरा, मी पावसात भिजले ना की माझी आई म्हणजे तुझी पणजी गं, एक मोठा धपाटा घालायची पाठीत. तरी मी भिजयचेच बरं. तू अगदी माझ्यावर गेली आहेस याबाबतीत; पण तुला सांगू, आपली आई जे म्हणते ना ते ऐकावं… आता काही वाटत नाही बघ तिच्या सांगण्याचं; पण मग आपण मोठे झालो ना  की असं जीव तोडून सांगणारं भेटत नाही बघ कोणी. आई ती आईच… तिची सर नाही येत हो कोणाला… ती काय मुद्दाम रागवायसाठी बोलते का? तुझी काळजी असते म्हणून बोलते ना… " माई.

"म्हणून मग भियाजयचंच नाही का पावसात?" स्वरा नाक फुगवत बोलली.

"भिजायचं ना… कोण म्हणे भिजायचं नाही?… तूच बघ, आता भिजलीस… केस पण वाळवले नाहीस… सर्दी-पडसं झालं तर शाळा, अभ्यास बुडेल ना…  म्हणून आईला तुझी काळजी वाटते ग… बाकी काही नाही. हे दूध घेऊन घे, आणि तुझी बॅग उचलून आण हॉलमध्ये फेकलेली. पुस्तकं बघ ओली झाली का? बॅग वाळत घाल आणि हो...  आईला सॉरी म्हण बरं." माईंच्या समजवण्याचा थोडा फार फरक पडला. स्वराने दूध पिलं, आपली बॅग आणून पुस्तकं काढली, बॅग वाळायला ठेवली; पण मानसीसमोर जाऊन तिला काही बोलायची हिंमत होत नव्हती. एक दोन वेळा तिने हॉलमध्ये चकरा पण मारल्या, मानसी चहा घेत काहीतरी काम करत बसलेली दिसली. मानसीने तिला पाहिलं पण न पहिल्यासारखे करुन तीसुद्धा काहीच बोलली नाही. स्वराला मानसीचा अजून राग आला. स्वरासुद्धा शांत बसून होती.

संध्याकाळ झाली, माईंनी देवासमोर दिवा लावला. मानसी तिथेच होती, स्वराने रोजच्या सारखं 'शुभं करोती' म्हटलं आणि एक शब्दही न बोलता ती तिच्या रूममध्ये गेली, पुस्तकं काढली आणि अभ्यास सुरू केला. मानसी हळूच तिच्या रूममध्ये डोकावली, तिला स्वरा अभ्यास करताना दिसली.

राघव घरी आल्यावर मात्र स्वरा एकदम आनंदित होती. राघवसोबत तिची बडबड सुरू होती. रात्रीच्या जेवणाला सगळा स्वयंपाक स्वराच्या आवडीचा होता. डायनींग टेबलवर आवडीचे पदार्थ बघून खरंतर तिला मानसीला आनंदाने एक मिठी मारावी वाटली, तिने मानसीकडे पाहिलं; पण मनातला विचार झटकून ती राघवसोबत बोलत जेवली. जेवणानंतर राघवने रोजच्या सारखी तिच्या अभ्यासाची उजळणी घेतली. बराच वेळ स्वराचा अभ्यास घेऊन राघव त्याच्या बेडरूममध्ये आला. मानसी बेडवर काहीतरी हिशोब करत बसली होती.

"काय मॅडम, कसली बेरीज वजाबाकी सुरू आहे?" राघव.

"तू मला किती वेळ देतोस त्याची." मानसी उसासा टाकत बोलली.

"असं होय, मग तर सगळी बेरीज करावी लागत असेल." राघव थोडं चिडवत मानसीच्या जवळ जाऊन बसला, त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"हो… कितीही बेरीज केली तरी उत्तर शून्यच येत आहे." मानसी राघवच्या खांद्यावर डोकं ठेवत बोलली. राघवच्या खांद्यावर डोकं ठेवल्यावर मात्र मानसीला एकदम भरून आलं. 

"योगेश सरांचा फोन… त्यांनी विरेन चौधरीच नाव घेणं… स्वराचं विचित्र वागणं… मानसीच्या डोक्यात विचारांचा भुंगा होता. राघवला यातलं काही सांगावं की नाही, नक्की तोच विरेन चौधरी आहे का दुसरं कोणी आहे? काही कळायला मार्ग नव्हता." मानसीच्या मनात विचारांची सरमिसळ होत होती. 

राघव तिच्या सोबत बोलत होता; पण तिचं त्याच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं.

"कुठे हरवली मानसी?" राघव तिच्या डोळ्यासमोर चुटकी मारत बोलला.

"नाही रे.. कुठेच नाही." मानसी चाचरत बोलली.

"मनू… सांग बघू, काय झालं?" राघव.

"काही विशेष नाही रे. स्वराचं वागणं विचित्र होत चाललंय आजकाल. मी शाळेत तिला आणायला गेले होते; पण तिला ते बिलकुलच आवडलं नाही. मी सकाळी सुद्धा तुला म्हटलं होतं ना… काही दिवसांपासून स्वरा अशीच वागतेय माझ्यासोबत… तुझ्यासोबत आता कशी बोलली स्वरा?" मानसी बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

"चांगली बोलली, म्हणजे एकदम नॉर्मल… नेहमीसारखंच." राघव.

"मग माझ्यासोबतच का अशी वागतेय? तुझ्यासोबत चांगली बोलतेय… माईंसोबतही व्यवस्थित बोलते… काही कळत नाही या पोरीचं." मानसी उसासा टाकत बोलली.

"तू कधी रागावली होती का तिला इतक्यात?" राघव.

"नाही रे… मला तर असं काही आठवत नाहीये… नॉर्मली तर थोडंफार सुरूच राहतं ना. हे नको करू… असं नको करू… तसं नको करू… आता एवढही बोलायचं नाही म्हणजे खूपच झालं." मानसी.

"मानसी, छोटं बाळ नाहीये गं आता ती. सोळा वर्षांची होईल ना. मला वाटतं आपण तिच्यासोबत संवाद साधण्यात चुकतोय… तुझ्या मुलीसोबत बोलण्यापेक्षा तुझ्या मैत्रिणीसोबत बोलतेय अस समजून बोल तिच्यासोबत… कदाचित तुझ्यात एक चांगली मैत्रीण भेटेल तिला." राघव.

"हो… पण आताही काही दिवसांपूर्वी सगळं तर व्यवस्थित होतं… छान मोकळंच बोलायची ती माझ्यासोबत… आता कुठे माशी शिंकली देव जाणे." मानसी.

"होईल गं सगळं नीट… तू जास्त विचार करू नको. तिला तिचा वेळ दे. बघ दोन-चार दिवसात आई-आई करत तुझ्या मागे मागे येईल." राघव.

"हो… " मानसी

"स्वराचं काही नाही रे… आपलीच पोर… आला असेल कशाचा राग… जाईल दोन दिवसात… पण जे नवीन संकट तोंड उघडून बसलंय… त्याचं काय करावं? तेच कळत नाहीये…"  मानसी स्वतःच्याच विचारात होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

"मनू… अगं, किती विचार करशील?" राघव.

"कुठे… काय? काहीच नाही." मानसी स्वतःला सावरत बोलली.

"ठीक आहे… चल, मला यु.एस.च्या क्लएन्टला एक-दोन मेल करायचे आहेत, तेवढे पटकन करून घेतो." राघव बोलला आणि लॅपटॉप काढून काम करत बसला. मानसीचं मन चलबिचल होत होतं. तिने पुस्तकांच्या रॅक मधून एक कादंबरी काढली आणि ती वाचत पडली. मन अस्थिर असल्यावर वाचन करायची सवय होती तिला. वाचताना अगदी देहभान हरवून ती वाचनात गुंग होऊन जायची. मानसी कादंबरी वाचत होती, पण कधी नाही ते तिचा वाचता वाचता डोळा लागला. राघवच काम आटोपलं आणि तोसुद्धा झोपायला आला. मानसी पुस्तक तसंच हातात धरून झोपली होती. राघवने तिच्या हातातून हळूच ते पुस्तक काढून ठेवलं आणि तिच्या अंगावर पांघरूण घालून तोही झोपला.
 

सकाळीच अलार्म वाजला आणि मानसी उठली. बाहेर चांगलंच आभाळ आलेलं होतं. सकाळीच वातावरणात एक विचित्र मरगळ जाणवत होती. तिचं रोजच्या सवयीप्रमाणे सगळं आवरून झालं. स्वराला उठवायला ती तिच्या रूममध्ये गेली. स्वराला फक्त एक आवाज दिला आणि बाहेर निघून आली. स्वरा उठली. तिने तिचं आवरलं. नाश्ता करायला सगळेजण डायनींग टेबलवर बसले होते. स्वराच्या प्लेटमध्ये ब्रेड, बटर, जॅम होतं ते पाहून स्वराला आश्चर्याचा धक्का बसला.

"अगं, काय ते कोरडे ब्रेड आणि ती लाल चटणी खात बसली, घे… जरा वडा सांबर खाऊन बघ. अशा पावसाळी वातावरणात तर गरम गरम वडे किती मस्त लागतात." माई.

"नकोय मला ते… आणि आजी याला चटणी नाही जॅम म्हणतात." स्वरा.

"हो… मोठं कौतुकाचं ते जॅम का फॅम… तूच खा…" माईंचं आणि स्वराचं रोजच्यासारखं लुटुपुटूचं शाब्दिक युद्ध सुरू होतं. मानसी मात्र शांत शांत होती. मानसी तिच्यासोबत बोलत नाहीये, या गोष्टीचा स्वराला काहीच फरक पडला नाही. स्वराची शाळेची सगळी तयारी झाली होती. गीताने तिचा डब्बा तिला दिला. स्वरा शाळेत जायला निघणार इतक्यात मुसळधार पाऊस सूरु झाला. स्वराने मानसीकडं पाहिलं, पण मानसीने तिला काहीच म्हटलं नाही.

"बाबा, बसपर्यंत सोडता का? बाहेर बघा ना किती पाऊस येतोय, बस येईपर्यंत मी भिजून जाईल." स्वरा मानसीकडे बघत राघवला बोलली.

"हो, चल ना. विचारायचं काय त्यात?" राघवने गाडीची चावी घेतली आणि स्वराला सोडायला गेला. बस येईपर्यंत त्याने स्वराजवळून मानसीसोबतच्या अबोल्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण स्वराने त्याला नीट काही उत्तर दिलं नाही. स्वराला स्कुल बसमध्ये बसवून तो घरी आला. मानसी माईंना औषध देत होती. इतक्यात तिचा फोन वाजला.

"हां आशाताई, बोला… काय…?" मानसी फोनवर बोलत होती. बोलता बोलता तिने आपल्या बॅगेत लॅपटॉप, फाईल्स वगैरे टाकल्या आणि ती पटकन तयार झाली.

"माई… राघव… येते मी… एक फोन आला होता… अर्जंट काम आलंय…" मानसी

"अगं, तुझा चहा नाश्ता?" माई.

"माई, राहू द्या… तसंही आता घशाखाली काही उतरणार नाही. मला लवकर निघायला हवं." मानसी

"गीते, अगं तो राघवचा भरलेला टिफिन मानसीला दे आणि राघवसाठी दुसरा भर." माई.

"अहो माई, राहू द्या तो टिफिन वगैरे." मानसी.

"राहू दे सोबत. टिफिन सोबत असला की तू नक्की खाणार, मला माहितीये. मी काय तुला आज ओळखते!" माईंनी मानसीला डब्बा दिला आणि ती राघवचा निरोप घेऊन कार काढून निघाली.

(कोण होत्या आशाताई? मानसीला कुठून फोन आला होता? पाहूया पुढच्या भागात)

क्रमशः
 

(कसा वाटला आजचा भाग? नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा.)
 

©® डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all