हे जीवन सुंदर आहे! (भाग ३९)
आय. सी.यु. मध्ये राघव मानसीजवळ उभा होता. मानसीच्या नाका-तोंडात श्वासनाठी नळ्या टाकलेल्या होत्या. त्याला व्हेंटिलेटर जोडलेलं होतं… मानसीच्या शरीरावर कितीतरी वायर मॉनिटरला जोडले होते. आय. सी.यु. मधली शांतता आणि मॉनिटरचा टून टून आवाज… राघवची बेचैनी अजून वाढवत होता… मानसी अगदी निपचित पडून होती…
"काय चुकलं गं मानसी? ही अशी कोणती शिक्षा देतेय तू मला? लवकर बरी हो ना गं… तुझ्याशिवाय या घराला, या संसाराला काहीच अर्थ नाहीये… तू आहेस तर मी आहे… तुझ्याशिवाय मी हे सगळं सांभाळू शकणार नाही… मानसी… तुला लवकर बरं व्हायचंय… माझ्यासाठी… माझ्या प्रेमासाठी… स्वार्थी म्हण मला… चालेल… आहे मी स्वार्थी… पण मला तुझी साथ हवीये मानसी… मानसी…आपली स्वरा… माझ्यासाठी नाही तर स्वरासाठी तरी परत ये… भांबावलंय गं लेकरू… तिची समजूत कशी काढू तेच कळत नाहीये…" राघव मानसीकडे बघत मनातच बोलत होता. त्याने मानसीला एक आवाज देऊन बघितला. कदाचित मानसी खूप गाढ झोपली असेल आणि आपल्या आवाजाने तिला जाग येईल ही भाबडी आशा होती त्याला; पण मानसीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही…
राघव आय. सी. यु.च्या बाहेर आला… स्वराने खूप आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिलं… तो स्वराच्या नजरेला नजर देऊ शकला नाही…
एव्हाना मानसीच्या आजारपणाची बातमी आश्रमातही समजली होती. आश्रमातल्या महिला, तिथले कर्मचारी सगळेजण मानसी बरी होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत होते.
डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तास सांगितले होते… प्रत्येकानेच तो प्रत्येक क्षण अगदी जीव मुठीत धरून काढला… या दोन दिवसात मानसीच बी.पी. तेवढं नॉर्मल झालं होतं. डॉक्टरांच्या मते ती एक जमेची बाजू होती.
चार-पाच दिवस असेच सरले. मानसी कोमातच होती. व्हेंटिलेटर सपोर्ट जराही कमी झाला नव्हता. आता मात्र मानसीला भेटायचं म्हणून स्वरा हट्टाला पेटली होती. राघव डॉक्टरांच्या परवानगीने स्वराला आय.सी.यु.त घेऊन गेला. आत गेल्या गेल्या तिथल्या वातावरणाला स्वरा थोडी घाबरली. तिने राघवचा हात अगदी गच्च दाबुन धरला होता. राघव तिला मानसीच्या बेडजवळ घेऊन गेला. आपल्या आईला असं बघून स्वराला खूप रडू आलं. एक स्टूल घेऊन ती मानसीच्या बेडजवळ बसली.
"आई, सॉरी ना गं… मला माहितीये… माझ्यामुळेच तुझी तब्येत खराब झाली… आई उठ ना गं… मी तुला परत असा त्रास देणार नाही… आई… तुला माहिती आता माझ्यामागे कोणीच लागत नाही… जेवून घे… अभ्यास कर… एकटी इकडं-तिकडं जाऊ नको… असं कोणीच म्हणत नाही….
आई… मी ना माझे केस परत वाढवणार आहे… तू माझ्या वेण्या घालून देशील ना…? आई मला तू माझ्या सोबत हवी आहेस… प्रत्येक ठिकाणी… आई…" स्वरा मानसीचा हात हातात घेऊन रडत होती. स्वराच्या डोळ्यातले अश्रू मानसीच्या हातावर पडले… जणू त्या अश्रूंमध्ये काही जादू होती… मानसीने तिच्या हाताच्या बोटांची हालचाल केली… ही गोष्ट राघवच्या लक्षात आली… त्याने ताबडतोब डॉक्टरांना हे कळवलं…
डॉक्टरही ताबडतोब मानसीला तपासायला आले. त्यांनी मानसीला तपासलं. मानसीमध्ये काहीच बदल झाले नव्हते.
"मि. राघव… असं होतं कधी कधी… पेशंटने काही हालचाल केली असं आपल्याला वाटू शकतं." डॉ.दीपक
"मी स्वतः पाहिले डॉक्टर… मानसीने हाताची बोटं हलवली होती… तुम्ही माझ्या मुलीला… स्वराला विचारा हवं तर… तीसुद्धा माझ्या सोबत होती." राघव
"तुम्ही मानसीसोबत खूप भावनिकरित्या अटॅच आहात म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल… एनिवेज… तुम्ही म्हणत आहात आणि असं काही झालं तर स्वराला रोज मानसीसोबत बोलू द्या. कदाचित माय-लेकीचं बॉंडिंग स्ट्रॉंग असेल… लेट अस वेट फॉर सम मिरॅकल…!" डॉक्टर बोलून निघून गेले.
राघवने घडलेला सगळा प्रसंग घरातल्या लोकांना सांगितला. सगळ्यांच्या मनात आशा पल्लवित झाल्या. स्वराने दिवसातून एकदा मानसीला जाऊन भेटायचं असं ठरलं.
"दादू, सगळं बरोबर आहे; पण मला काय वाटतं, स्वराने शाळेत जाणं सुरू करावं… सतत घरी राहून ती काहीच दुसरं करत नाही. तिच्या डोक्यात झालेला प्रसंग असतो, ती त्याबद्दलच बोलत असते आणि सारखी मानसीच्या आठवणीत रडत असते … शाळेत जाईल तर तिला तेवढाच बदल मिळेल आणि शाळेतून आल्यावर डॉक्टर म्हणाले तसं ती तासभर मानसीला भेटून येईल." रजनी
"बरोबर आहे रजनीचं, स्वराची शाळा, अभ्यास परत व्हायला हवा…तसंही उद्याची गणेश चतुर्थी आहे… उद्या गणेश स्थापना करावी लागेल. परवापासून स्वराची शाळा परत सुरू करू… राघव आपल्याला आश्रमाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे." माई
"माई, या वर्षी गणपती बसवायला नको… मानसी किती आवडीने करायची दरवर्षी… ती अशी ऍडमिट असल्यावर सणवार साजरे करणं नको वाटतंय." राघव
"राघव, अरे विघ्नहर्ता आहे तो… आपण गणपती बसवू… गणपतीच्या आगमनाने घरात एक सकारत्मक वातावरण तयार होईल… दरवर्षीप्रमाणे मोठा घाट न घालता साधीच तयारी करू… " माई म्हणाल्या. सर्वांना माईंचं म्हणणं पटलं. दुसऱ्यादिवशी घरात आणि आश्रमात विधीवत गणपतीची स्थापना करण्यात आली.
"हे विघ्नहर्ता, आता स्वराच्या प्रयत्नांना यश दे. माय-लेकीचं हे नातं अबाधित ठेव." सर्वांनी गणपती समोर हात जोडून प्रार्थना केली.
"आत्या, नको ना गं शाळा… मला आईजवळ जायचंय… मी तिथेच थांबणार… शाळेत नाही जायचं मला…" दुसऱ्या दिवशी स्वरा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करून बसली होती.
"स्वरा, बेटा आईला आवडेल का तू शाळा बुडवलेलं? नाही ना… ती बरी झाल्यावर आम्हालाच रागवेल की माझ्या लेकीला तुम्हीच शाळेत जाऊ दिलं नाही… तुला आवडेल का आम्हाला रागवलेलं? आणि शाळेतून आल्यावर रोज आईला भेटायला जायचंच आहे … ते तर डॉक्टर काकांनीच सांगितलंय ना की स्वराला रोज भेटू द्या…" रजनी स्वराला समजावत होती. स्वराला तिचं म्हणणं पटलं आणि तिने शाळेची तयारी केली.
शाळेतून परत आल्यावर स्वरा हेमंतबरोबर हॉस्पिटलमध्ये गेली. मानसीला भेटायला आय.सी.यु.मध्ये गेली. मानसीचा हात हातात घेऊन ती दिवसभरातल्या शाळेतल्या गमती-जमती, मित्र-मैत्रिणींचे किस्से मानसीला सांगत होती. त्या गोष्टी स्वरा करत होती ज्या ती मानसीसोबत काही दिवसांपूर्वी करत होती. स्वराची अखंड बडबड सुरू होती. सगळं दृश्य बघून राघवच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. डोळ्यातलं पाणी अलगद पुसत तो तिथेच उभा होता. स्वराच्या बोलण्याला मानसीने पुन्हा प्रतिसाद दिला होता. आज मानसीने पुन्हा हाताची हालचाल केली. राघवने तिथल्या नर्सला ही गोष्ट दाखवली. नर्सने डॉक्टरांना कळवलं. डॉक्टरांनी असेच प्रयत्न सुरू ठेवायला लावले.
घरात गणपतीचं आगमन झालं, तशी वातावरणात एक प्रसन्नता जाणवू लागली. माई रोज गणपती समोरचा अंगारा मानसीच्या कपाळावर लावून येत होत्या. दोन-चार दिवस झाले, स्वराही रोज शाळेत जाऊ लागली. शाळेतून आल्यावर मानसीसोबत तिच्या अगदी सुरुवातीसारख्या गप्पा होऊ लागल्या. मानसीही आता जास्त प्रतिसाद देत होती.
डॉक्टर दीपक सगळ्यांकडून मानसी स्वराला प्रतिसाद देते हे ऐकत होते; पण जे विज्ञान ते शिकले होते त्यानुसार असे पेशंट प्रतिसाद देत नाहीत. म्हणून आज स्वरा मानसीला भेटायला आल्यावर डॉक्टर स्वतः तिथे हजर होते. रोज रोज आय.सी.यु मध्ये येऊन स्वराची तिथल्या वातावरणाची भीती गेली होती. तिथे काम करणाऱ्या नर्सेससोबत देखील स्वराची चांगली ओळख झाली होती. स्वरा मानसीजवळ आली आणि तिथल्या स्टुलवर बसली.
"आई, मी आले गं शाळेतून." स्वरा मानसीचा हात हातात घेऊन बोलू लागली. त्यावर मानसीने स्वराचा हात हळूच दाबला.
"उठ ना." स्वरा बोलली त्यावर मानसीने काहीच हालचाल केली नाही.
"अजून झोपायचं आहे का?" स्वरा बोलली, मानसीने परत तिचा हात दाबला.
"किती झोपशील गं…? झोप मग… मी जाते परत…" स्वराच्या बोलण्यावर मानसीने तिचा हात अजून घट्ट पकडला.
"जाऊ नको म्हणतेस, मग बोल माझ्यासोबत." स्वरा बोलली मानसीने परत तिचा हात दाबला.
डॉ. दीपक बघत होते, स्वरा बोलत होती आणि ज्या गोष्टी मानसीला आवडतात, पटतात त्या गोष्टींना मानसी रिस्पॉन्स करत होती. डॉक्टरांनी राघवला बाजूला नेलं.
"मिरॅकल म्हणतात ते हेच… हे खूप पॉझिटीव्ह साइन आहे… स्वराला जास्त वेळ मानसीसोबत राहू द्या… मला वाटतं की मानसीच्या मनात काहीतरी गोष्टी आहेत, अजून काही प्रॉब्लेम्स होते का त्यांना की ज्याचं टेंशन त्यांनी घेतलं होतं… कदाचित ते सॉलव्ह झालेत असं त्यांना कळलं तर कदाचित अजून त्यांचा रिस्पॉन्स वाढेल." डॉ. दीपक
"असं विशेष असं काहीच नव्हतं… घरगुती मॅटर होतं… ते ही असं कॅज्युअल होतं… " राघव बोलला.
"ओके. आपण प्रयत्न सुरू ठेऊ." डॉ. दीपक राघवसोबत बोलून निघून गेले. थोड्यावेळाने स्वरा आणि राघव देखील आय. सी. यु. च्या बाहेर आले. बाहेर आल्या आल्या राघवच लक्ष योगेश वकिलांकडे गेलं.
"योगेश! इकडे कसं काय?" राघवने आश्चर्याने विचारलं.
क्रमशः
क्रमशः
©डॉ.किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा