हे जीवन सुंदर आहे (भाग ३८)

कथा मानसीची... तिच्या संघर्षाची


हे जीवन सुंदर आहे! (भाग ३८)


स्वराच्या घरात येण्याने सगळ्या घराचं गोकुळ झालं होतं. स्वरासोबत सगळेजण आपलं बालपण परत जगत होते. आश्रमाचा वाढता व्याप, स्वराचं बालपण त्यात तिचं दुखणं-खुपणं यात मानसीची तारेवरची कसरत होत होती. मानसी मात्र आनंदाने हे सर्व करत होती.


पण मानसीच्या मनात आजकाल एक वेगळीच शंका येत होती. त्यामुळे मानसी बरेचदा अस्वस्थ वाटायची. सतत विचारात हरवल्यासारखी वाटायची. राघवच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्याने मानसीला विचारलंच.


"मानसी, काय झालंय? आजकाल तू बेचैन वाटतेस? काही टेन्शन आहे का? आश्रमात काही प्रॉब्लेम?" राघव


"काही नाही रे." मानसी


"मानसी, सांग बघू. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय." राघव


"राघव, आपली स्वरा मोठी होईल… शाळेत जायला लागेल… मग तिलाही वाटेल ना की आपली आई बाकीच्या मुलींच्या आईसारखी नाहीये… माझ्या चेहऱ्यावरून तिच्या मनात माझ्याबद्दल काही कॉम्प्लेक्स तर तयार होणार नाही ना… आणि असं झालं तर मी काय करणार रे त्यावेळी… राघव विचार करूनच मला थरकाप सुटतोय." मानसी आगतिकपणे बोलत होती.


"का होईल असं? मानसी, स्वरा आपली मुलगी आहे… आणि आपण तिच्यावर असे संस्कार करणार नाहीत. तू आता उगी असं होईल का, तसं होईल का  असा विचार करू नको. मला माहितीये या जगातली सर्वात बेस्ट आई राहशील तू." राघवने मानसीला समजावलं आणि मानसी राघवच्या खांद्यावर डोकं ठेऊन थोडी निवांत झाली. दोघं मिळून स्वरा मोठी झाल्यावर अजून काय काय करेल याचे स्वप्न रंगवत होते…



**************************************************


मानसीबद्दल बोलताना, स्वराला सांगताना माई आणि मंदाताईंच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली होती. सुधीररावांची परिस्थिती काही वेगळी नव्हती.


माईंनी अजून एक ट्रंक उघडली. त्यात स्वराची जुनी खेळणी, बाहुल्या, तिचे छोटे छोटे फ्रॉक, टोप्या, स्वराने पहिल्यांदा रेघोट्या मारलेला कागद… स्वराचं पहिलं दप्तर, पहिली वॉटर बॅग, स्वराने वाकडेतिकडे रंगवलेले चित्रं असं कितीतरी समान होतं.


"आपल्या लेकीचं सगळं पहिलं वहिलं कौतुक किती जपून ठेवलंय मानसीने.." माई त्या वस्तूंवर प्रेमाने हात फिरवत होत्या. 


"माई, खरंच, माझी आई किती ग्रेट आहे गं! मला हे का नाही कळलं गं? मीच किती दुष्ट आहे ना… माझ्यामुळे आईची तब्येत खराब झाली ना… माई, मला माझी आई पाहिजे… आत्ताच्या आत्ता… मला आईजवळ जायचंय… प्लिज, मला आईजवळ घेऊन जा ना… मी तिथेच थांबेन… " स्वरा माईंच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडत होती. स्वराची समजूत कशी काढावी हे काही माईंना सुचत नव्हतं.


"स्वरा, मी नेईन हां तुला हॉस्पिटलमध्ये… रडू नको बाळा… तू रडलेलं तुझ्या आईला आवडत नाही ना… मग ती बरी झाल्यावर आम्हालाच रागवेल माझ्या मुलीला का रडवलं म्हणून…" सुधीरराव स्वराची समजूत काढत होते.


"माई, जेवणाची पानं घेतली आहेत… दोन घास खाऊन घ्या." तेवढ्यात गीता तिथे आली. खरंतर कोणाचीच जेवायची इच्छा नव्हती; पण स्वरा जेवली पाहिजे म्हणून सगळे जेवायला बसले. सगळ्यांनीच कसेबसे दोन घास घशाखाली ढकलले… 


स्वरा माईंच्या मांडीवर डोकं ठेऊन पडून होती. मानसीच्या आठवणीत तिचं मुसमुसणं सुरूच होतं… थोड्या वेळाने तिचा डोळा लागला. माईंचा देखील बसल्या बसल्या डोळा लागला. मंदाताई देवघरात देवासमोर बसून नामस्मरण करत होत्या. सुधीरराव घरात अस्थिरतेने चकरा मारत होते. तेवढ्यात हेमंतचा फोन वाजला.


"हेमंत, मी शशांक बोलतोय, मानसीची तब्येत पुन्हा बिघडली आहे… तू सगळ्यांना घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ये… ड्रायव्हर आहेच तिथे… " पलीकडून शशांक घाईघाईने बोलत होता. हेमंतने सुधीररावांना शशांकच्या फोनबद्दल सांगितलं. सगळ्यांचेच हातपाय गळून गेले होते. स्वराची अवस्था तर कोणीच बघू शकत नव्हतं. पटापट सर्वजण बाहेर आले. कारमध्ये बसू लागले. तेवढ्यात अचानक आभाळ भरून आलं, काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली, भर दुपारी एकदम अंधारून आलं होतं. 


"दोन योग…पाऊस… आजही पाऊस येतोय… म्हणजे…नाही नाही…. मी माझ्या लेकीला काहीच होऊ देणार नाही… " मंदाताई तशाच धावत देवघरात गेल्या. काय झालं हे बघायला माईही मंदाताईंच्या मागे गेल्या… मंदाताईंनी देव पाण्यात ठेवले होते.


"माई, तुम्ही सगळे जा हॉस्पिटलमध्ये… आज मी देवाचीच परीक्षा घेणार आहे… बघू आता आईची ममता जिंकते की देव जिंकतो… लेकीची माया जिंकते की देव जिंकतो… मानसी बरी होईपर्यंत देवही असेच पाण्यात राहतील…" मंदाताई बोलल्या आणि माई बाकीच्या लोकांसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्या.


राघवची अवस्था तर कोणी बघू शकणार नव्हतं. माई, रजनी आणि हेमंत आय. सी.यु.च्या काचेतून मानसीला बघत होते. तीन-चार डॉक्टरांची चमू, नर्स सगळे मानसीभोवती वेढा घालून होते. सगळ्यांचीच काहीतरी घाईगडबड सुरू होती, नर्स मानसीला वेगवेगळे इंजेक्शन देत होत्या.


"शशांक, काय झालं रे?" हेमंत


"बी.पी.एकदम वाढलं आणि हार्ट बीट ही वाढले, व्हेंटिलेटर सपोर्ट वाढवला आहे… हार्टच्या डॉक्टरांना बोलवलं आहे…. डॉक्टर म्हणत होते की बी.पी. असाच वाढत राहील तर पुन्हा ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे." शशांक 


वेटिंग रूमच्या खुर्चीवर राघव मान खाली घालून, डोकं धरून बसला होता. स्वरा राघवजवळ गेली. तिने तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. स्वराला बघून राघवला अजूनच भरून आलं. दोघं बाप-लेक एकमेकांच्या कुशीत शिरून ढसाढसा रडत होते.


"राघव, पुरे आता… आता असावं गळायची नाहीत… मानसी किती धीराची आहे हे माहितीये ना… आणि तूच आठव थोडं… अरे तेव्हा एकटा होतास ना… तुझ्यामुळंच तर मानसीला जीवनदान मिळालं होतं… आताही मानसी बरी होईल… तुला मात्र खंबीर राहावं लागेल… तुला सगळ्यांनाच सभाळायचंय… स्वराकडे बघ जरा… तू असा खचून गेला तर आम्ही म्हाताऱ्यांनी कोणाकडे बघायचं…" सुधीरराव उसनं अवसान आणून राघवला धीर देत होते. त्यांचं ऐकून राघवनेही आपले डोळे पुसले.


बराच वेळ शांततेत गेला.


डॉ. दीपक आय.सी.यु.च्या बाहेर आले. त्यांच्यासोबत अजून एक डॉक्टर होते. राघव आणि सगळेजण डॉक्टरांभोवती गोळा झाले.


"मायनर हार्ट अटॅक होता." डॉ. दीपक


"काय!" राघवच्या तोंडून पुढे शब्दच फुटले नाहीत.


"हो… आता स्टेबल आहेत. सगळ्याप्रकारची औषधं सुरू आहेत… पण पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहेत… त्यानंतरच आपण पेशंटच्या तब्येतीबाबत काही बोलू शकतो… हे डॉ. सचदेव… हार्ट स्पेशालिस्ट… हे पण सकाळ संध्याकाळ विझिट देऊन जातील… " डॉ. दीपक बोलत होते. राघवने त्यांच्यासमोर हात जोडले. त्याच्याचाने पुढे बोलवलं जात नव्हतं, त्याचा कंठ अगदी दाटून आला होता.


"खूप लोकांचे आशीर्वाद आहेत मानसी मॅडमसोबत… लेट्स होप फॉर बेटर!" डॉ. दीपक राघवच्या खांद्यावर हात थोपटवत बोलून गेले.


सगळेजण आय.सी.यु. च्या काचेतून मानसीकडे बघत होते. प्रत्येकाच्या डोळ्यातून मानसी सोबत घालवलेले क्षण अगदी बेधुंद बरसत होते…. मानसी बरी व्हावी म्हणून प्रत्येकजण देवासमोर हात जोडत होता…

क्रमशः
डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all