Login

हे जीवन सुंदर आहे! (भाग ३७)

कथा मानसीची...तिच्या संघर्षाची




हे जीवन सुंदर आहे! (भाग ३७)


मानसी स्वतःला झोकून देऊन, अगदी मनापासून एन.जी.ओ.मध्ये काम करत होती. इकडे राघवचही ट्रेनिंग जोमात सुरू होतं. आपापले व्याप सांभाळून दोघं कधीकधी फोनवर बोलत होते. बघता बघता तीन महिने संपले आणि राघव परत आला. राघव परत आल्यावर मात्र मंदाताई आणि माई दोघीजणींनी राघव आणि मानसीच्या मागे लग्नाचा तगादा लावला. मंदाताईंनी लग्नाची बोलणी करण्यासाठी राघव आणि माईंना घरी आमंत्रण दिलं. राघव, माई मानसीच्या घरी आले होते. सोबत रजनीही होतीच. 


"मी लग्न करेल पण माझी एक अट आहे." मानसी


"आता अजून तुझ्या अटी आहेतच का?" मंदाताई तिला चिडवत बोलल्या.


"तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत." राघव


"आधी ऐकून तर घे." मानसी बोलू लागली.


"लग्न धुमधडाक्यात करण्यापेक्षा आपण रजिस्टर पद्धतीने करू… अगदी साधा कार्यक्रम… आणि लग्नासाठी जो पैसा तुम्हाला खर्च करायचाय तो तुम्ही एखाद्या आश्रमाला दान द्या. तसंही मी अशी…उगीच लोकांना बोलवा…त्यांचे तर विचित्र बोलणं ऐकून, त्यांच्या त्या बोचऱ्या नजरा झेलून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा हेच बरं…नाही का?" मानसी


"मानसी आता बोललीस ते ठीक आहे, हे शेवटचं बरं का? पुन्हा तुझ्या तोंडून मी अशी, मी तशी, मी खराब असे शब्द निघालेले मला आवडणार नाही. तुला मी या आधी पण म्हटलंय… सुंदरता ही शरीराची नसते… ती मनाची, तुमच्या विचारांची असते… शरीराचं सौन्दर्य कधी ना कधी संपुष्टात येणार… पण मनाचं, आत्म्याचं सौन्दर्य चिरतरुण असतं… तू सुंदर होतीस, सुंदर आहेस आणि कायमच सुंदर राहशील." राघव बोलत होता. सुधीरराव आणि मंदाताई त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. राघवचे विचार ऐकून माईंचा उर भरून आला.


"मानसी खूप नशीबवान आहेस बेटा, राघवसारखा जीवनसाथी तुला मिळाला. तू म्हणशील तसं आणि तुला हवं तसं आपण करू; पण सर्व धार्मिक विधी करण्याची आमची इच्छा आहे… त्या विधी आपण घरातल्या घरातच किंवा एखाद्या मंदिरात करू." सुधीररावांचा विचार सगळ्यांना पटला. मानसीची इच्छा होती म्हणून अगदी साध्या पद्धतीने मानसी आणि राघवचा विवाह सोहळा सम्पन्न झाला. राघवच्या घरात लक्ष्मीच्या पावलाने मानसीचा गृहप्रवेश झाला.


"मानसी, छोटंसं घर आहे गं आमचं… सध्या भाड्याचंच आहे… काही दिवसांनी आपण मोठं घर घेऊ… तोपर्यंत हे सगळं सांभाळून घेशील ना?" माई मानसीसोबत बोलत होत्या.


"माई, अहो मला सगळंच माहिती आहे की… परकी असल्यासारख का सांगताय… आणि घर लहान असलं म्हणून काय झालं… या घरातल्या माणसांचं मन किती मोठं आहे हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला थोडी माहिती असणार. सगळं संभाळेन मी, बस तुम्ही सोबत रहा" मानसी बोलली आणि माईंनी तिला मिठी मारली.


राघव-मानसीचा नवा संसार सुरू झाला. मानसीचं एन.जी.ओ., राघवचं ऑफिस सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं. रजनीचं शिक्षणसुद्धा पूर्ण झालं. राघवने योग्य मुलगा बघून रजनीचं लग्न लावून दिलं. 


मानसीच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता. एकदिवस रात्री जेवताना तिने तो माई आणि राघवसमोर मांडला.


"माई, राघव, मला काय वाटतं माहिती का?" मानसी


"बोल ना, काय झालं?" राघव


"माई, म्हणजे… जिथे मी काम करतेय ते सगळं चांगलंच आहे; पण मला स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचंय… महिलांसाठी आश्रम… जिथे कोणतीही पीडित स्त्री येऊन राहू शकेल… पुढे तिला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहण्यात आपण मदत करू शकू… अशिक्षित महिलांना शिक्षण देऊ शकू… त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन काही उद्योग सुरू करून देऊ शकू…" मानसी


"खूप चांगला विचार आहे मानसी." माई


"विचार चांगला आहे… ज्या रस्त्याने तू जायचा विचार करतेय तो मात्र अवघड आहे, भरपूर खाचखळगे आहेत त्यात…" राघव


"हो, त्याची कल्पना आलीये… तुम्ही दोघं साथ द्याल ना" मानसी राघवकडे, माईकडे बघत बोलली.


"नक्कीच… आम्ही कायम तुझ्या सोबतच असू." दोघे सोबतच बोलले. मानसीने त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.


"संजीवनी महिला आश्रम" नावाचं छोटंसं रोपटं नावारूपाला येत होतं. संकटांचा सामना करत, नवनवीन गोष्टी शिकत बहरत होतं…


इकडे राघवची देखील चांगली प्रगती सुरू होती. यशाची एक एक शिडी तो वर चढत होता. काही दिवसांनी त्याने एक सुंदर, टुमदार घर घेतलं. \"संजीवनी\"ची सुरुवात झाल्यापासून माईसुद्धा मानसीला तिच्या कामात जमेल तशी मदत करत होत्या.


बघता बघता राघव- मानसीच्या लग्नाला तीन वर्ष झाली. एक दिवस मानसीला या संसार वेलीवर नवीन कळी फुलण्याची चाहूल लागली. मानसीने ही गोड बातमी घरात सांगताच घरातले सगळे जण अतिशय खुश झाले. माई तर आता प्रत्येक क्षणाला मानसीच्या सोबत राहत होत्या. मानसीला खूप कठीण डोहाळे लागले होते, अगदी पहिल्या महिन्यापासून तिला खाल्लेलं काही पचत नव्हतं. मानसीची तब्येत बरीच नाजूक झाली होती, तरी तिचे काम सुरूच राहायचे. माई मग तिला जबरदस्ती घरी ठेवून आश्रमाचं काम स्वतः बघायच्या.


पावसाळ्याचे दिवस होते. मानसीला सातवा महिना लागला होता.


"मानसी, आज तू घरीच थांब… मी जाऊन येते आश्रमात… आराम कर…." माई काळजीने म्हणाल्या.


"माई, घरात बसून खूप कंटाळा येतो… मी येते ना सोबत…" मानसीही हट्टाला पेटली. माई नाईलाजाने तिला सोबत घेऊन गेल्या. पण आज मानसीने आश्रमात येऊ नये असं त्यांना मनापासून वाटत होतं. मानसीचं आश्रमातलं काम सुरू होतं, त्याच घाई गडबडीत चालता चालता तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. पोटावर पडल्याने मानसीला प्रचंड त्रास होऊ लागला.


माईंनी आश्रमातल्या लोकांच्या मदतीने मानसीला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे गेल्यावर त्यांनी राघवला आणि मानसीच्या आई-बाबांना फोन करून मानसीबद्दल सांगितलं. सगळ्यांनी धावत हॉस्पिटल गाठलं.मानसीला तोपर्यंत ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं.


"माई, काय म्हणाले गं डॉक्टर? काय झालं मानसीला?" राघवचा आवाज कापरा झाला होता.


"पोटावर पडली रे ती… आणि तिला खूप वेदना सुरू झाल्या… डॉक्टर म्हणाल्या की ताबडतोब सीझर करावं लागेल…बाळ-बाळंतीण दोघांच्या जीवाला धोका आहे… म्हणून मी कोणाचीच वाट न बघता ऑपरेशनच्या फॉर्मवर सही केली." माई म्हणाल्या. सगळेजण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते.


"मी हे कसं विसरले… बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच… म्हणजे ते बारशाच्या दिवशी… ते साधू महाराज बोलले… पण आज तर पाऊस पडत नाहीये… ते म्हणाले होते की पाऊस…" मंदाताईंच्या डोक्यात परत विचारांचा भुंगा आला होता. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आल्या. सगळेजण डॉक्टरांच्या भोवती जमा झाले.


"डॉक्टर, मानसी…" मंदाताईंना पुढं बोलवल्या गेलं नाही.


"मानसी ठीक आहे; मुलगी झालीये… पण सातव्या महिन्यातच डिलिव्हरी झाल्यामुळे बाळाचं वजन फारच कमी आहे आणि त्यात बाळाच्या फुफ्फुसांची वाढही नीट झाली नाहीये. बाळाला काही दिवस ऑक्सिजनवर आणि गरज पडली तर व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. तुम्ही ताबडतोब बाळाला घेऊन बालरोगतज्ञांकडे जा, मी त्यांच्यासोबत बोलले आहे. त्यांचा पत्ता देते, आपल्या हॉस्पिटलची अँबुलन्स आहेच. बाळाबद्दल तेच व्यवस्थित बोलू शकतील." डॉक्टर बोलल्या आणि पटकन पुढच्या तयारीला लागल्या. राघव आणि मंदाताई बाळाला घेऊन दुसऱ्या दवाखान्यात गेले. जगण्यासाठी धडपड करणाऱ्या त्या एवढूश्या जीवकडे बघून राघवला रडू कोसळलं. मंदाताईंनी राघवला समजावलं.

बालरोगतज्ञांकडे गेल्यावर त्यांनी बाळाला ताबडतोब बाळांच्या आय.सी.यु.मध्ये दाखल केलं. एकीकडे काचेच्या पेटीत स्वतःचाच अंश होता आणि एकीकडे मानसी होती. कोणाजवळ थांबावं… दोन्ही प्राणप्रियच होते… राघवची द्विधा मनस्थिती होत होती. त्यामुळं तो दिवसातून दहा वेळा या दवाखान्यातून त्या दवाखान्यात चकरा मारत होता. काही दिवसांनी मानसीला डिस्चार्ज झाला. राघव आणि मानसी दोघेही बाळाजवळ राहू लागले. या काळात माईंनी आश्रम सांभाळलं. तब्बल एक महिन्याने बाळाला डिस्चार्ज झाला. राघव आणि मानसी बाळाला घेऊन घरी आले. माई, मंदाताई, सुधीरराव सगळ्यांनी मिळून बाळाचं जंगी स्वागत केलं. बाळाच्या बारशाचा अगदी साधासा कार्यक्रम करण्यात आला. राघव आणि मानसीने आपल्या लाडक्या लेकीचं नाव ठेवलं, "स्वरा".