Login

हे जीवन सुंदर आहे (भाग ३६)

कथा मानसीची... तिच्या संघर्षाची


हे जीवन सुंदर आहे! (भाग ३६)


वीरेन विरुद्धची केस जिंकल्याच्या आनंदात मंदाताईंनी राघव, माई आणि रजनीला घरी जेवायला बोलावलं होतं. सगळेजण खूप आनंदात होते. मानसी मात्र गप्प गप्प होती.

"काय झालं मानसी? काय विचार करतेय?" सुधीरराव

"एवढे दिवस सारखं कोर्ट केस, तारखा, वीरेनला शिक्षा होईल की नाही याचा विचार… आणि आता सगळा रस्ता मोकळा झाला… खरंतर छान अगदी मोकळं मोकळं वाटतंय; पण माझ्यासारख्याच अजून मुली असतील, प्रियासारख्या असतील त्यांचं कसं होत असेल हा विचार आता स्वस्थ बसू देत नाहीये… त्यांच्यासाठी मी काही करू शकते का? काय करू शकेल? हेच सुरू होतं डोक्यात…" मानसी


"खूप काही करू शकशील… पण जे करशील ते अभ्यासपूर्ण कर." राघवचं म्हणणं मानसीला पटलं.


माई मंदाताईंना स्वयंपाकघरात मदत करत होत्या.


"मंदाताई, एक विचारायचं होतं." माई


"काय झालं माई, अहो निःसंकोचपणे बोला." मंदाताई


"मानसीचा हात राघवच्या हातात द्याल? मला मानसी माझी सून म्हणून पसंत आहे. राघवच्या मनात मानसी आहे; पण तो काही तिला विचारायचा नाही म्हणून मग मीच पुढाकार घेतला." माई म्हणाल्या आणि मंदाताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.


"माई, खरं तर मानसीवर जो प्रसंग ओढवला त्यानंतर आम्ही मानसीचं लग्न हा विषय आमच्या डोक्यातून काढूनच टाकला होता. आज तुम्ही खूप मोठा सुखद धक्का दिलात." मंदाताई


"जे झालं त्यात मानसीचा काय दोष होता बरं…? " माई


"तरीपण…. राघवला कोणतीही सुस्वरूप मुलगी मिळेल तरी तुम्ही मानसीला मागणी घालताय! तुमच्यासारखं मोठं मन कुणाचं नसेल." मंदाताई


"तुम्ही मानसीच्या बाबांजवळ विषय काढता का? कसं आहे ना, राघवचे बाबा असते तर ते बोलले असते, मला त्यांच्यासोबत बोलयला थोडं अवघडल्यासारखं वाटतं." माई म्हणाल्या. मंदाताईंनी अश्वासकपणे त्यांचा हात पकडला.


सगळ्यांची जेवणं आटोपली आणि सगळेजण बोलत बसले होते. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. बोलता बोलता मंदाताईंनी राघव आणि मानसीच्या लग्नाचा विषय काढला. माईंनी मानसीला मागणी घातली हे ऐकून सुधीररावांना तर अतिशय आनंद झाला. मानसी मात्र खूश दिसत नव्हती.


"राघव, आई, बाबा, माई… मला तुमच्या सगळ्यांसोबत थोडं बोलायचं होतं. खरं सांगू आता प्रेम या गोष्टीवरच माझा विश्वास राहिला नाहीये. तुमच्या आग्रहास्तव किंवा तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून लग्न करून घर-संसाराच्या रहाटगाड्यात मला अडकायचं नाहीये. आज मला न्याय मिळाला; पण समाजात माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया असतील ज्यांना न्याय मिळाला नसेल, ज्यांना कोणाचीच साथ नसेल अशा स्त्रियांसाठी मला काहीतरी करायचंय. संसार वगैरे या गोष्टी माझ्यासाठी नाहीत आणि राघवला माझ्यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली मुलगी मिळेल." मानसी


"हो मिळेल ना चांगली मुलगी, पण तिचे डोळे सागरासारखे निळे नसतील, तिचं मन आकाशासारखं मोठं नसेल… कोणतीही मुलगी मिळेल मला पण ती स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करणारी नसेल. मानसी, लग्नानंतर तुला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य राहील… मी तुला कधीच, कोणत्याच गोष्टींसाठी अडवणार नाही… तू जे कार्य करायचा विचार करतेस त्यात आम्ही आमचा खारीचा वाटा उचलू; पण त्यातही तुझी संमती असेल तर. लग्नसुद्धा तुझी इच्छा असेल तरच होईल. तू विचार करून निर्णय घे. काही घाई नाहीये आणि जबरदस्ती तर मुळीच नाहीये. तसही उद्या मी बेंगलोरला जातोय, रात्रीची ट्रेन आहे." राघव


"बेंगलोरला? अचानक! कशाला जातोय? आणि परत कधी येशील?" मानसी


"तीन महिन्यांनी… कंपनी पाठवतेय, ट्रेनिंगसाठी." राघव बोलला आणि मानसीचा निरोप घेऊन निघून गेला.


राघव गेल्यावर मंदाताई आणि सुधीरराव राघवविषयीच बोलत होते. त्यांनी गौरीला फोन करून दोन्ही आनंदाच्या बातम्या सांगितल्या. गौरीसुद्धा खूप आनंदात होती. मानसीचं मन मात्र चलबिचल होत होतं. वीरेनचं प्रेमाचं नाटक, विश्वासघात आठवला की तिला सगळं नको वाटायचं; पण राघव… राघवची काळजी घेणं, त्याचा सहवास, त्याची प्रत्येक वेळी मनापासून दिलेली साथ… हे सगळं आठवलं की तिला राघवची साथ अजून हवी वाटायची… पुन्हा तिच्या डोक्यात समाजातल्या स्त्रिया, त्यांच्यासाठी काहीतरी करायचय हा विचार यायचा. काय निर्णय घ्यावा मानसीला काहीच कळत नव्हतं. सगळ्या गोष्टींचा विचार करत ती झोपून गेली.


दुसऱ्यादिवशी मानसीच्या घरात राघवचाच विषय सुरू होता. मंदाताई आणि सुधीरराव राघवबद्दल भरभरून बोलत होते. मानसीही दिवसभर विचारांच्या गुंत्यात होती.


राघवने दिवसभर मानसीची, तिच्या फोनची वाट पाहिली; पण मानसीचा कुठेच पत्ता नव्हता. राघवनेही जाणीवपूर्वक मानसीच्या घरी जाणं टाळलं. राघवच्या ट्रेनची वेळ झाली आणि तो स्टेशनवर पोहोचला. ट्रेन यायला अजून पंधरा मिनिटांचा अवधी होता. राघव तिथल्या एका बाकड्यावर बसला. डोक्यात मानसीचाच विचार सुरू होता.

"राघव…" त्याला मानसीचा मंजुळ आवाज ऐकू आला, त्याने चमकून इकडे तिकडे पाहिलं. त्याला मानसी त्याच्या बाजूला उभी दिसली.


"अजूनही भास होतात तिचे!" राघव पुटपुटला.


"राघव…" पुन्हा मानसीचाच आवाज! पुन्हा भास! राघवने डोळे घट्ट मिटले, त्याला पुन्हा मानसीचा आवाज ऐकू आला.


"राघवssss अरे मी आहे ना…" मानसीने राघवच्या खांद्याला धरून गदागदा हलवलं. 


"मला वाटलं की मला भास झाला." राघव


"अजून किती दिवस असं भास, स्वप्न यातच जगणार आहेस… बाहेर ये त्यातून… राघव तुझ्या प्रेमाला एकदा नाही म्हटलं मी… पण आता… आता मी नाही म्हणणार नाही… राघव मला तुझी साथ हवीये… अगदी कायम… देशील का?" मानसी बोलू लागली, तिच्या डोळ्यात राघव बद्दलचं प्रेम दिसत होतं. राघवला तर काय करावं आणि काय नाही ते सुचतच नव्हतं, त्याने आनंदाने मानसीला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून प्रेमाच्या श्रावणधारा बरसत होत्या. तेवढ्यात ट्रेनची शिट्टी वाजली. 


"राघव…" 


"मानसी…"


दोघांनाही काय बोलावं सुचतच नव्हतं.


"राघव, लवकर परत ये… मी वाट बघतेय…" मानसी


"हो, ट्रेनिंग संपलं की लगेच… तोपर्यंत तू तुझ्या कामाला सुरुवात कर… सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती काढ… मी नेहमीच तुझ्यासोबत आहे." राघव मानसीचा हात हातात घेऊन बोलत होता. ट्रेनची शिट्टी परत वाजली. राघव ट्रेनच्या बोगीत चढला. प्लॅटफॉर्मवरून ट्रेन संथ गतीने निघाली. अचानक पावसांच्या सरींना सुरुवात झाली. मानसीने दोन्ही हात पसरवून त्या सरी झेलल्या. राघवनेही बोगीच्या दारातून पावसाच्या सरी आपल्या हातात पकडण्याचा प्रयत्न केला. डोळ्यातल्या सरींना सोबत घेऊन दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.


मानसी घरी गेली. तिने मंदाताई आणि सुधीररावांना तिचा निर्णय सांगितला. दोघेहीजण खूप खुश झाले होते. मंदाताईंनी माईंना फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली, त्यांच्याही आनंदाला पारावार नव्हता.


दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी झोपेतून उठली. रोजच्यापेक्षा एक प्रसन्न सकाळ तिला वाटत होती. फटाफट आपली सगळी तयारी करून, एका एन. जी. ओ. मध्ये जाण्यासाठी ती बाहेर पडली. कितीतरी दिवसांनी मानसी एकटी बाहेर पडली होती. खरंतर लोकांच्या नजरांचा तिला त्रास होत होता; पण तिने या सगळ्यांविरुद्ध लढून पुढे जायचं ठरवलं होतं.


मानसी एका एन. जी.ओ. मध्ये पोहोचली. तिथे गेल्यावर तिने तिथल्या संस्थापकांसोबत बोलून त्यांच्यासोबत काम करायची परवानगी मिळवली. तिथेच तिला आशाताई भेटल्या. मानसी आशाताईंसोबत तिथली माहिती घेत होती. आशाताईंची आणि तिची पटकनच मैत्री झाली. तिथे फिरताना, तिथल्या स्त्रियांसोबत बोलून त्यांचं दुःख समजून घेताना मानसीला स्वतःचं दुःख अगदीच थिटं वाटायला लागलं होतं.


"मानसी, चल भेटू उद्या… येशील ना?  इथे खूप उत्साही लोकं येतात काम करायला आणि दोन-चार दिवसांत निघून जातात… तसं तर करणार नाहीस ना?" आशाताई मानसीचा निरोप घेताना बोलत होत्या.


"येईल मी.." मानसी


"नक्की? प्रॉमिस कर." आशाताईंनी मानसी पुढे हात केला.


"हो आशाताई…" मानसीने अगदी आनंदाने त्यांचा हात हातात घेतला. हा हातात घेतलेला हात खूप दूरच्या प्रवासात सोबत राहणार आहे याची कल्पना दोघींनाही नव्हती.


क्रमशः
©डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all