हे जीवन सुंदर आहे! (भाग ३५)
"काय! प्रियाने आत्महत्या केली!" मानसीच्या डोळ्यासमोर अकरावी पासूनचा प्रियासोबत घालवलेला क्षण न् क्षण उभा होता.
"हो, मानसी… त्यादिवशी हॉटेलमध्ये ती तुझ्यासोबत आली होती ना… तू रागातून बाहेर निघाली आणि तुझ्या पाठीमागे वीरेन… वीरेन पाठोपाठ प्रिया आणि अर्चनादेखील होत्या. काही तरी मॅटर झालंय असं मला वाटत होतं म्हणून मग मीसुद्धा तुमच्या सर्वांच्या मागे आलो. वीरेनने तुझ्यावर हल्ला केला तेव्हा त्या दोघीही तिथेच होत्या. प्रिया खूप घाबरली होती… तुला मदत करायची सोडून ती रस्त्याने धावत सुटली आणि तिच्या मागे अर्चनासुध्दा… मी तर तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो; पण प्रियाने त्याचदिवशी रेल्वे क्रॉसिंगच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली… मलाही हे दोन दिवसांनी कळलं. या सगळ्या प्रकरणाला अर्चना एवढी घाबरली की ती कॉलेज सोडून गेली… राहता राहिले आपल्या ग्रुपमधले मुलं… त्यांना हिम्मत होत नाहीये तुझ्यासमोर यायची… या सगळ्या गोष्टींमुळे आता कॉलेजनेही अजून कडक नियम केलेत… कॉलेज कॅम्पसमध्ये मुलं-मुली भेटण्यावर बंदी आहे आणि हॉस्टेलचे नियमही खूप स्ट्रिक्ट झालेत…" राघवने एक उसासा टाकला.
झालेला सगळा प्रकार ऐकून मानसी मटकन खाली बसली. वीरेनबद्दलची तिची चीड अजूनच वाढली होती. कोर्टात केस सुरू होती. त्याच्या तारखेवर तारखा पडत होत्या. कोर्टाच्या केसचं टेन्शन, वीरेनच्या वकिलाने चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि त्यात मानसीच्या चेहऱ्यावरही सततच्या होणाऱ्या ऑपरेशन्समुळे मानसीच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होत होता. डॉक्टरांनी त्यामुळे ऑपरेशन न करण्याचा सल्ला दिला; त्यामुळे सगळ्यांसमोर आहे ते सत्य स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
मानसीवर झालेल्या ऍसिड हल्ल्यामुळे सगळ्या घरावर त्याचे परिणाम दिसत होते. गौरीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. शशांक… तिचा जीवनसाथी तिनेच निवडला होता. शशांकच्या घरचे आधी गौरी आणि शशांकच्या लग्नाला तयार होते; पण मानसीवर ओढवलेल्या प्रसंगानंतर मात्र शशांकच्या घरच्या लोकांनी या लग्नाला विरोध केला. शशांकने मात्र सगळ्यांचा विरोध पत्करून गौरीसोबत लग्न केलं. गौरी आणि शशांक दोघेही एका आय. टी. कंपनीत जॉबवर होते.
दिवस सरत होते. इकडे फायनल इअरच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. मानसीचा अभ्यास एकदम संथगतीने सुरू होता. कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी निरनिराळ्या कम्पन्या येत होत्या. राघवने मन लावून अभ्यास करून आणि आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिले. एका नामांकित कंपनीत त्याचं सिलेक्शन झालं. फायनल इअरचा रिझल्ट लागल्यावर त्याला कंपनीत जॉईन व्हायचं होतं. माईंचं आणि राघवचं स्वप्न पूर्ण होणार होतं.
बघता बघता फायनल इअरचा रिझल्ट लागला. राघव नेहमीप्रमाणेच टॉपवर होता. यावर्षी त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मानसी मात्र जेमतेम मार्क घेऊन पास झाली होती. राघव पेढ्यांचा बॉक्स घेऊन मानसीच्या घरी गेला.
"अभिनंदन मानसी!" त्याने एक पेढा मानसीच्या तोंडात कोंबला.
"नुसतं पास तर झालेय… त्याचं कशाला हवं अभिनंदन?" मानसी मन खट्टू करत बोलली.
"वेडा बाई, अगं ज्या परिस्थितीत तू परीक्षा दिली ना, या जगाच्या पाठीवर कोणीच नसतं करू शकलं. खरंतर त्यादिवशी तू ताठ मानेने परीक्षा द्यायला गेली ना त्याच दिवशी तुझा पहिला नंबर आला होता. अर्धी लढाई तू तर तेव्हाच जिंकलीस." राघव
"अगदी बरोबर… आहेच माझी मुलगी अगदी शूरवीर!" सुधीरराव
"हो, पण अजून लढाई संपली कुठे? वीरेनला अजून शिक्षा कुठे झालीये? कधी कधी कोर्टातही उगीच वेळ काढणं सुरू आहे… त्या वीरेनचे वकील उगीचच दिवस लांबवतात असं वाटतं…" मानसी
"लवकरच त्याला शिक्षा होईल… माझं मन मला सांगतंय." मंदाताई म्हणाल्या.
"थोडे पेशन्स ठेवावे लागतील आपल्याला." राघव मानसीसोबत बोलून तिथून निघाला आणि घरी गेला. माई अजून स्वयंपाकाच्या कामावरून घरी यायच्या होत्या. थोड्यावेळाने माई घरी आल्या. राघवने माईंना पेढा दिला आणि नमस्कार केला.
"माई, आता ही सगळी दगदग बंद बरं का… पुढच्या महिन्यात माझा जॉब सुरू होईल… आता मस्त घरी राहायचं आणि आराम करायचा." राघव
"एकटीच घरी राहून काय करू? रजनीचं कॉलेज सुरू असतं. तिचं शिक्षण पूर्ण झालं की तिचंही लग्न करून देऊ मग ती पण तिच्या घरी चालली जाईल. तू तुझ्या ऑफिसात… मग मी काय एकटीच." माई
"ठीक आहे, आपण रजनीसाठी घर जावई शोधू म्हणजे रजनी कायम तुझ्या सोबत राहील." राघवच्या या वाक्यावर माईंनी डोक्यावर हात मारला.
"घर जावई शोधला तरी चालेल बरं! सुनेचं काय तेवढं तू बघ." माई
"आता सून कुठून आणायची?" राघव
"ठोंब्या… अरे तू लग्न कर ना… आता नोकरी पण लागलीये चांगली…" माई
"माई, तुला माहितेय ना सगळं." राघव
"हो, मग कधी विचारतोस मानसीला?" माई
"माई!" राघवने आश्चर्याने माईकडे पाहिलं.
"एवढं सगळं होऊनही तू तयार आहेस! मला वाटलं तू विरोध करशील!" राघव
"विरोध का करेन मी? तिचा चेहरा खराब झाला म्हणून? तिचं मन, तिचा स्वभाव, तिचं ते लाघवी बोलणं ते सगळं आहे तसंच आहे ना… आणि समजा लग्नानंतर जर अपघाताने असं काही झालं असत तर आपण तिला काय टाकून दिलं असतं का? नाही ना… तू मानसीला विचार… नाही तर मी विचारू का?" माई
"सध्याच्या परिस्थितीत मानसी काही हो म्हणायची नाही, मी योग्य वेळ पाहून विचारेन…" राघव
राघवने नंतर ऑफिस जॉईन केलं. मानसीच्या केसची सुनावणी होती. मानसी कोर्टात गेली होती, तिच्यासोबत सुधीरराव आणि मंदाताई दोघेही होते. कोर्टात राघवची पुन्हा साक्ष घेण्यात आली. दोन्हीकडच्या वकिलांची चांगलीच जुंपली होती.
"न्यायाधीश महोदय, वीरेन चौधरी यांनी स्वतः मानसीसाठी पार्टीचे आयोजन केले होते, मग ते पार्टीत ऍसिड घेऊन का गेले असतील? असं ही होऊ शकतं की मानसी आणि वीरेनचं भांडण झालं आणि त्याचा फायदा घेऊन दुसऱ्याच कोणी मानसीवर हल्ला केला. याबाबत अजून तपास व्हावा." वीरेनच्या वकिलांनी न्यायाधीशांपुढे आपली बाजू मांडली. वीरेन मानसीकडे बघत छद्मी हसत होता. तेवढ्यात मानसीच्या वकिलांनी न्यायाधीशांना वीरेनला प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली आणि त्यांना परवानगी मिळाली.
मानसीच्या वकिल प्रश्न विचारत होते आणि त्याची उत्तरं देता देता वीरेनची भांबेरी उडाली होती.
"मैत्रिणीच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून तुम्ही ऍसिडची बाटली नेली होती ना? म्हणजे तुम्ही आधीच ठरवलं होतं की मानसीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकायचं! आणि जर असं नसेल तर मग ती बॉटल तुमच्याजवळ आली कुठून?" मानसीचे वकील वीरेनला प्रश्नावर प्रश्न विचारत होते.
"प्रियासाठी आणली होती मी." वीरेन चिडून बोलून गेला.
"आता एवढं सांगितलं आहे तर सगळंच नीट सांगा." मानसीचे वकील
"प्रियाला माझ्याबद्दल सगळं कळलं होतं. माझ्यामुळे ती प्रेग्नंट झाली होती. मी ड्रग्सचा सप्लाय करतो हेही तिला माहिती होतं. एकदा दोनदा तिने मला या कामात मदतदेखील केली होती. पण प्रेग्नंट झाल्यावर तिचं वागणं बदललं. तिने माझ्यामागे लग्न कर म्हणून तगादा लावला, हे सगळं काम सोड म्हणून माझ्या मागे लागली होती. मानसीचा वाढदिवस झाल्यावर मी प्रियाला भेटणार होतो. त्यादिवशी माझ्या मित्राने मला ही ऍसिडची बाटली आणून दिली होती. प्रियाला तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकायची धमकी दे असं माझ्या मित्राने मला सांगितलं होतं. धमकीला घाबरून ती माझं ऐकेल असं तो म्हणाला होता. मानसी माझ्यासोबत भांडून, पोलिसात जायची धमकी देऊन हॉटेलच्या बाहेर निघाली होती. माझं डोकं चालेनासं झालं, डोकं चालवायला दारूची गरज होती. माझ्या गाडीच्या डिक्कीत दारूची बॉटल होती. मी ती काढायला गेलो तर मला ही ऍसिडची बॉटल दिसली… आधीच डोकं फिरलं होतं खूप, प्रियाला शांत बसवणं सोपं होतं… पण ही लैच फडफड करत होती मग काय फेकलं सालीच्या तोंडावर… !" वीरेन
वीरेनचं बोलणं ऐकून सगळेच स्तब्ध झाले. न्यायाधीशांनी कायद्याप्रमाणे वीरेनला शिक्षा सुनावली. या केसमधून समोर आलेल्या ड्रग सप्लायरची चेन, अवैध ऍसिड पुरवणारे लोकं या सर्व गोष्टींचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.
मानसी केस जिंकली!
पोलीस वीरेनला तुरुंगात नेत होते. कोर्टाच्या बाहेर वीरेन आणि मानसी एकमेकांच्या समोरासमोर आले.
"पुन्हा त्रास द्यायला नक्की येईल… वाट बघशील माझी…" वीरेन मानसीकडे बघत विकृत हसत गेला. वीरेनच्या बोलण्याने मानसी स्तब्ध झाली होती. तितक्यात पत्रकारांचा गराडा मनासीभोवती जमा झाला होता. पत्रकार मानसीवर प्रश्नांचा भडिमार करत होते.
"मानसी मॅडम, समाजतल्या मुलींना तुम्ही काय सांगाल? तुमच्यासोबत तुमचं कुटुंब होतं, पैसा होता म्हणून कदाचित तुम्ही इथपर्यंत येऊ शकल्या; पण अशा खूप मुली आहेत ज्यांना समाज काय त्यांच्या घरचेच स्वीकारत नाहीत, अशा मुलींना तुम्ही काय सांगाल? स्त्रियांना अजूनही खूप प्रकारचे त्रास आहेत, प्रत्येकच स्त्री कोर्टाची पायरी चढू शकत नाही. या अशा स्त्रिया त्यांच्या घरी राहू शकत नाहीत. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? स्त्रियांसाठी पुढे काही कराल का?" पत्रकार प्रश्नांवर प्रश्न विचारत होते. मानसी मात्र शांत उभी होती.
क्रमशः
डॉ. किमया मुळावकर
डॉ. किमया मुळावकर
(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. या कथेद्वारे समाजात घडणाऱ्या काही अनिष्ट घटनांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा वाईट संदेश पसरवणे हा या कथेचा हेतू नाहीये.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा