हे जीवन सुंदर आहे (भाग ३४)

कथा मानसीची... तिच्या संघर्षाची



हे जीवन सुंदर आहे! (भाग ३४)


राघव, मंदाताई आणि सुधीरराव तिघे मानसीच्या रूमच्या बाहेर थांबले होते. डॉ.नकुल मानसीच्या चेहऱ्यावरचं ड्रेसिंग बदलत होते. डॉक्टरांकडून सत्य परिस्थिती कळल्यावर मानसीने रागाच्या भरात तिच्या रूममधला आरसा फोडला होता. त्याचा आवाज ऐकून तिघेही काळजीत पडले.


"का? माझ्यासोबतच का हे सगळं? प्रेम केलं…हेच चुकलं ना… ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच असं करावं? मला वाटलं वीरेनसुद्धा माझ्यावर प्रेम करत असेल… मग त्याने केलं ते काय होतं… नाही नाही… तो हा वीरेनच नाहीये, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं… वीरेन का बदलला तू एवढा? का…?" मानसीचं मन आक्रोश करत होतं. डॉक्टर मानसीचं ड्रेसिंग आटोपून तिच्या रूमच्या बाहेर आले.


"डॉक्टर, कशी आहे मानसी? तिचा चेहरा पूर्वीसारखा होईल ना?" मंदाताई 


"चेहरा पूर्ववत होणे अवघड आहे. आता आपण जो त्वचेचा ग्राफ्ट लावला तोच तिच्या शरीराने पूर्णपणे ऍक्सेप्ट केला नाहीये. आपण अजून  प्रयत्न करून बघू." डॉ. नकुल बोलून निघून गेले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मंदाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची मानसीच्या रूममध्ये जायची हिम्मतच होत नव्हती.


"काका, येतो मी… कॉलेजची वेळ होतेय." राघव


"राघव, थांब ना थोडं… मानसीला भेटून तर जा… खरं सांगू आता तिच्यासमोर जायची हिम्मतच नाहीये माझ्यात." मंदाताई


"काकु, थांबलो असतो; पण मानसीला मी समोर आलेलंही आवडत नाही… अजून चिडले ती… तुम्ही तिच्याजवळ थांबा… आपल्यालाच तिला सावरावं लागेल… आणि तुम्हाला तर मी कधीही आणि कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहे, तुम्ही अगदी निःसंकोचपणे सांगा." राघवच्या बोलालण्याने मंदाताई आणि सुधीररावांना थोडा धीर आला. ते दोघे मानसीच्या रूममध्ये गेले. मानसी शून्यात नजर लावून बसली होती. मंदाताईंनी तिला आवाज दिला. मंदाताईंच्या कुशीत शिरून मानसी खूप वेळ रडली.


"आई… बाबा… त्या वीरेनला त्याच्या कर्माची फळं मिळालीच पाहिजे… मला आताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जायचंय. त्याने मलाच नाही, प्रियाला देखील फसवलं आहे." मानसी चिडून बोलली.


"पोलिसात जायची गरज नाहीये बेटा… पोलिसात तक्रार नोंदवली आहे आणि ते लोक वीरेनचा शोध घेत आहेत. तुझा जबाब नोंदवायचा आहे; पण तुझ्या तब्येतीमुळे थांबून होतो इतके दिवस. डॉक्टरांनी तुझं फिटनेस सर्टिफिकेट दिलं की पोलीस तुझा जबाब नोंदवायला इथेच येतील." सुधीरराव


"कोणी नोंदवली पोलिसांत तक्रार आणि कधी?" मानसी


"राघवने…" मंदाताई


"काय…!" मानसीला आश्चर्याचा धक्का बसला.


"हो, त्यानेच पोलीस कंम्पलेंट केली… त्यानेच तुला दवाखान्यात आणलं होतं. आम्ही लोक इथं पोहोचेपर्यंत तुझ्यावर योग्य ते उपचार केवळ राघवमुळे सुरू झाले." मंदाताई


"पण त्याला कसं कळलं ?" मानसी


"त्यादिवशी तू बोलावलं म्हणून तो हॉटेलमध्ये आला होता. तुझं आणि वीरेनचं भांडण होऊन तू हॉटेलच्या बाहेर निघाली तेव्हा राघव बाहेरच रस्त्यावर होता. त्याच्या डोळ्यादेखत वीरेनने तुझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं." सुधीरराव बोलता बोलता थांबले. त्यांचा कंठ दाटून आला होता. मानसीही स्तब्ध झाली.


पोलिसांनी मानसीचा जबाब नोंदवला. वीरेनचा शोध सगळीकडे सुरू होता. वीरेनचा शोध घेता घेता पोलिसांना त्याच्या काळ्या धंद्यांची माहिती कळत गेली. अवैध दारू भट्टी पासून ड्रग डीलरपर्यंत वीरेनच्या नावाचे धागे दोरे सापडले होते. एवढे दिवस मामांच्या फार्म हाऊसवर दबा धरून बसलेला वीरेन पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कोर्टात केस दाखल झाली. मानसीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची बातमी सगळीकडे पसरली. कोर्टाची पहिली तारीख होती, मानसी दवाखान्यात भरती असल्यामुळे सुधीरराव एकटेच कोर्टात गेले होते. मामांनी वीरेनची केस एक नामवंत वकिलांकडे दिली होती. वीरेनच्या वकिलांनी कोर्टाकडून काही अवधी मागून घेतला होता, त्यामुळे कोर्टाने पुढची तारीख दिली होती, तोपर्यंत वीरेनला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.


काही दिवसांनी मानसीवर दुसरं ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर मानसीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज द्यायचा प्लॅन डॉक्टरांनी केला होता. सुधीरराव आणि मंदाताईंनी मानसीच्या ट्रीटमेंटच्या दृष्टीने आणि कोर्टकेसच्या दृष्टीने त्याच शहरात एक घर भाड्याने राहाण्याकरिता घेतलं, ते घर राघवच्या घराजवळच होतं. त्यांना घर शोधताना राघवची खूप मदत झाली होती.


मानसीचा डिस्चार्ज होता त्यादिवशी संध्याकाळी राघवसुद्धा हॉस्पिटलमध्ये आला. मानसीच्या चेहऱ्यावर यावेळी ड्रेसिंग लावलेलं नव्हतं. राघवला मानसीकडे बघून एकदम रडायला आलं. 


"मानसी, आवरलं का? चल पटकन… घरी जायचंय… तुला एक सांगू सुधीर काकांनी माझ्या घराजवळच घर घेतलंय बरं… माई म्हणत होती, आता मानसीला कधीही शिरा खावासा वाटला की ती पटकन आपल्या घरी येऊ शकेल. ए तू पण काकांना एक सायकल घेऊन माग, मग आपण दोघे सोबत सायकलवर कॉलेजमध्ये जात जाऊ… किती मस्त ना…" आपल्या डोळ्यातलं पाणी अडवत, रडणं कसंतरी थोपवत राघव काहीतरी बोलत होता.


"राघव…" मानसीने त्याला आवाज दिला. राघवने मानसीकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यांतून अविरत श्रावण धारा बरसत होत्या.


"का करतोय हे सगळं? नको माझ्या मागे येऊ… माझी वाट खूप वेगळी झालीये आता… अगदी छिन्नविच्छिन्न… मला माहितीये माझ्याबद्दल तुझ्या मनात काय होतं ते… ते सगळं आता विसरून जा राघव… तू तुझं आयुष्य चांगलं जग… तुझं… माईंचं स्वप्न पूर्ण कर…  आता प्रेम वगैरे या गोष्टींवर माझा विश्वासच बसत नाहीये." मानसीचा आवाज कापरा झाला होता.



"कोण म्हणतंय की मला तुझं प्रेम हवंय… त्यादिवशी तूच मैत्रीचा हात पुढे केला होतास ना… बस तोच हात मी सावरतोय…" राघव


"राघव, आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलंय आणि पुढे काय काय होणार आहे, काहीच माहिती नाही… तू तुझा वेळ वाया घालवू नकोस…" मानसी


"माझ्याजागी तू असतीस तर तुसुद्धा असंच केलं असतं का? मला एकटं सोडून निघून गेली असती का? आधी माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे… मग तू म्हणशील ते करेल मी." राघवच्या या प्रश्नावर मानसी काहीच बोलली नाही. 


"चला, निघुया का?" तेवढ्यात सुधीरराव आणि मंदाताई डॉक्टरांसोबत बोलून आणि मानसीचे औषधे घेऊन आले. घरी जाण्यासाठी सगळे हॉस्पिटलच्या बाहेर पडले तसं मानसीने तिचा चेहरा ओढणीने झाकून घेतला.


"चेहऱ्यावरच्या जखमेची काळजी म्हणून चेहरा झाकला असशील तर ठीक आहे; पण लोकांना तुझा चेहरा दिसू नये, तू आता खराब दिसतेय या भावनेने चेहरा झाकत असशील तर प्लिज तसं करू नको. कारण सौन्दर्याची व्याख्या फक्त शरीर सुंदर दिसण्यावरून ठरत नसते. तुमचं मन किती स्वच्छ आहे आणि तुमची बुद्धी किती तल्लख आहे यावरून ठरत असते. तू सुंदर होतीस, आहेस आणि कायम सुंदरच राहशील… एक दिवस लोकांना तुझ्याकडे बघून कळेल की जीवन सुंदर कशाप्रकारे असतं." राघव म्हणाला आणि मानसीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकायला लागला. तिने तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला केली. किती तरी दिवसांनी थंड हवेची झुळूक तिच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली होती.


सगळेजण मानसीच्या घरी पोहोचले. माई आणि रजनी तिथे आधीच आल्या होत्या. माईंनी मीठ मिरच्या ओवाळून मानसीची नजर काढली. मानसीकडे येतानाच माईंनी तिच्या आवडीचा स्वयंपाक करून आणला होता. माईंचं प्रेम बघून मानसी हरखून गेली.


राघव रोज कॉलेजमध्ये जाताना आणि परत घरी येताना मानसीची भेट घेऊन जात होता.


"ए, मानसी तू काही नाही येत कॉलेजमध्ये? घरीच तर आहेस ना आता…" एक दिवस संध्याकाळी राघव मानसीला भेटायला आला तेव्हा त्याने विचारले.


"नको रे, इच्छाच होत नाही माझी पुन्हा तिथे येण्याची." मानसी


"अग हे शेवटचं वर्ष ना… हे पास आऊट झालं की डिग्री मिळेल, आधीचे तीन वर्ष वाया गेली असं होणार नाही ना." राघव


"बरोबर बोलतोय राघव. तसंही घरी बसून तू झालेल्या गोष्टी आठवत राहतेस." सुधीरराव


"बाबा, खरंच माझी हिम्मतच नाहीये आता. प्लिज माझ्या मागे लागू नका ना." मानसी


"बरं… ठीक आहे. कॉलेजला येऊ नको, पण कमीत कमी अभ्यास तर सुरू कर. तसही तुझं मेडिकल सर्टिफिकेट दिलं की तुला परीक्षेला तरी बसू देतील. मी रोजच येत असतो… तुझ्या  अभ्यासातल्या अडचणी दूर करत जाईल. आपल्या ग्रुपमधून नाहीतर तूच मागे राहशील बघ." राघवची कल्पना सगळ्यांना पटली.

"राघव, आपल्या ग्रुपमधलं कोणीच भेटायला आलं नाही रे… का बरं? प्रिया, अर्चना…  कोणीतरी यायला हवं होतं ना." मानसी


"जाऊ दे… नसेल यायचं त्यांना…त्यांचा विचार नको करू तू… मानसी तुला माहिती का…" राघव विषय बदलत होता, मानसीच्या ते लक्षात आलं.


"राघव, विषय नको बदलू… सांग मला…" मानसी.


"मानसी… प्रियाने… प्रियाने आत्महत्या केली…." राघवचा आवाज कापरा झाला होता.


"काय!" मानसी जवळपास ओरडलीच. मानसीसाठी हा खूप मोठा धक्का होता.

क्रमशः

(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहे. या कथेद्वारे समाजात घडणाऱ्या काही अनिष्ट गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश पोहोचवणे हा या कथेचा उद्देश नाहीये.)

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all