Feb 23, 2024
नारीवादी

हे जीवन सुंदर आहे (भाग ३३)

Read Later
हे जीवन सुंदर आहे (भाग ३३)
हे जीवन सुंदर आहे! (भाग ३३)वीरेनचं नाव ऐकताच सुधीरराव आणि मंदाताई एकदम स्तब्ध झाले. कितीतरी वेळ वेटिंग रुममधल्या बेंचवर ते दोघे बसून होते.


"सत्येंद्रचा मुलगा… वीरेन असा वागू शकतो यावर विश्वासच बसत नाहीये… गावात चर्चा होती तो आता वाया गेलाय याची… पण तो मानसीच्या कॉलेजमध्ये कसा आला….? मानसीही कधी त्याच्याविषयी काही बोलली नाही… एक सत्येंद्र होता… यारी-दोस्तीसाठी अगदी जीव द्यायची त्याची तयारी असायची… आणि एक वीरेन आहे…! सत्येंद्रच्या पोटी का जन्म झाला असेल याचा… याने तर घराण्याची पुण्याई अगदी धुळीला मिळवली." सुधीररावांच्या डोक्यात विचार सुरू होते.


"उमे, बरं झालं गेलीस ते! काय तोंड दाखवलं असतं आपण एकमेकांना… तू असती तर कदाचित हा दिवस दिसला नसता. तुझ्या मुलाला तू नक्कीच चांगले संस्कार दिले असते… मानसीच्या बारशाच्या दिवशी आलेले ते साधू महाराज बोलले होते… दोन योग… म्हणजे हा पहिला योग तर नाही ना…. नाही असं काही नसावं… देवा, माझ्या मनूला दीर्घायुष्य दे… माझ्या वाट्याचं सगळं सुख तिच्या पदरात टाक." इकडे मंदाताईंच्या मनातही विचारांची कालवाकालव सुरू होती.


थोड्यावेळाने डॉक्टर नकुल राऊंडवर आले.


"डॉक्टरसाहेब, मी मानसीचा… मानसी माझी मुलगी आहे…" सुधीरराव


"मानसी ठीक तर आहे ना? ती कधी शुद्धीवर येईल?" मंदाताई


"शुद्धीवर कधी येईल ते सांगणे जरा अवघड आहे…" डॉ. नकुल बोलत होते. त्यांनी मंदाताई आणि सुधीररावांना पुढची सगळी ट्रीटमेंट, ऑपरेशन्स आणि त्याचा खर्च याबद्दल माहिती दिली.


"डॉक्टरसाहेब, कितीही पैसा लागू द्या; पण माझ्या मानसीला पूर्वीसारखं करून द्या."  मंदाताई


"मी समजू शकतो तुमच्या भावना. विज्ञानाने जेवढी प्रगती केली आहे, तेवढ्याच गोष्टी शक्य आहेत. मानसीला पूर्वी सारखं करायला खूप सारी ऑपरेशन्स लागतील आणि तिला ती झेपायलाही हवी. सध्या ती शुद्धीवर येणं खूप महत्त्वाचं आहे. आपण शक्य तितकं बेस्ट करू तिच्यासाठी." डॉ. नकुल समजावून गेले. माई आणि रजनी दोघी घरी निघून गेल्या. कॉलेजमध्ये जाताना रजनीने हॉस्पिटलमध्ये डब्बा पोहोचवला.


मानसी जबाब नोंदवण्यासाठी दुपारी पोलीस आले होते.


"इन्स्पेक्टर साहेब सापडला का तो?" राघव


"असे लोक लगेच सापडतात का…? परागंदा आहे तो… पळून पळून कुठे पळणार…? आम्ही सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची माहिती पुरवली आहे. लवकरच सापडेल. पेशंटची जबानी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या शुद्धीवर आल्या की कळवा, आम्ही तोपर्यंत त्या हरामखोराला पकडतो." पोलीस बोलून निघून गेले.


राघव हॉस्पिटलमध्ये थांबला होता. रात्री माई आणि रजनी मंदाताईंना घेऊन घरी गेल्या. दरम्यान मानसीवर एक ऑपरेशन करण्यात आलं. चार दिवस सगळ्यांनाच खूप जड गेले. चार दिवसांनी मानसी शुद्धीवर आली. त्यानंतर तिला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. सुधीरराव आणि मंदाताईंनासमोर बघून तिला खूप रडू कोसळलं. डोळ्यातलं पाणी पुसायला तिचा हात चेहऱ्याकडे गेला. सम्पूर्ण चेहऱ्यावर लावलेल्या बँडेजची जाणीव तिला झाली. "आई, नेमकं काय झालं गं मला? त्यादिवशी त्याने चेहऱ्यावर काहीतरी फेकलं आणि खूप आग झाली… एवढंच आठवतं गं…मला इथे कोणी आणलं?" मानसीची प्रश्नांची मालिका सुरू होती.


"त्या गोष्टींचा आता विचार करू नको." मंदाताई


"आई, प्लिज सांग." मानसी हट्टाला पेटली होती. 


"काही नाही गं… लागलंय थोडं… होईल नीट…" मंदाताईंनी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं कारण सत्य घटना सांगायची त्यांना हिम्मतच होत नव्हती. 


"डोक्यालाही लागलंय का गं…? पूर्ण तोंडचं बँडेजमध्ये गुंडाळलय का गं? केस पण गुंडाळून ठेवले की काय?" मानसी 


"अगं, किती प्रश्न विचारशील? डॉक्टर आले की तूच बोलून घे." मंदाताई


त्यादिवशीचा प्रसंग आठवून मानसी पुरती खचून गेली.आपल्या चेहऱ्यासोबत खूप काही वाईट झालंय याची जाणीव तिला नव्हती. वीरेनबद्दल आणि एकंदरीत प्रेम या भावनेबद्दल तिच्या मनात चीड निर्माण झाली होती. तेवढ्यात राघव तिथे आला. त्याने जेवणाचा डब्बा आणला होता.


"आई, याला इथून जायला सांग. मला कोणाचीच आणि कोणत्याच प्रकारची सहानुभूती नकोय. मुळात आता मला प्रेम, सहानुभूती या शब्दांचीच चीड येते. कोणी कोणावर प्रेम करत नसतं, सगळे स्वार्थी असतात… बस्स!" मानसी राघवकडे रागाने बघत बोलत होती.


"मनू, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही." मंदाताई


"राहू द्या काकु, तिला मी इथे आलेलं आवडत नसेल तर मी येणार नाही." राघव पटकन रूममधून बाहेर निघाला. त्याच्या डोळ्यातलं पाणी मानसीला दिसलं होतं.


"काय हे मानसी? असं बोलतात का?" मंदाताई


"याला कळलं असेल ना वीरेनचं आणि माझं ब्रेकअप झालं ते… म्हणून मग आता मुद्दाम माझी काळजी घेईल… पण आता माझा मुलांवर विश्वासच राहिला नाही… सगळे मुलं सारखेच असतात… धोकेबाज!" मानसी मनातल्या मनात बोलत होती.


"मानसी, काय विचार करतेय?" मंदाताई


"आई, प्रिया आली होती का गं मला भेटायला? प्रिया… माझी मैत्रीण…" मानसी


"नाही… तुझ्या वर्गातला राघवच तेवढा आला बघ." मंदाताई


"कमाल आहे प्रियाची! जिच्यासाठी मी एवढं सगळं केलं, तिने एकदाही येऊन भेटू नये… वीरेनला अद्दल घडवायची असेल तर मला तिची मदत लागेलच ना… त्या वीरेनला तर मी सोडणार नाही आता… त्याची पोलिसात तक्रार करायचीय मला… पण मी अशी हॉस्पिटलमध्ये…काय करावं?" मानसी पुन्हा विचारांच्या गुंत्यात गुंतत होती.इकडे राघव वेटिंग एरियात उभा होता. सुधीरराव तिथे आले.


"राघव…" त्यांनी राघवला आवाज दिला.


"काय काका? काही आणून देऊ का?" राघव


"बस रे थोडा." सुधीरराव


दोघेजण तिथल्या बेंचवर बसले.


"राघव, तुला तर माहितीच आहे, मानसीला बरं व्हायला भरपूर वेळ लागणार आहे. त्या वीरेनचाही अजून काही पत्ता लागला नाही… कॉलेजचं हे शेवटचं वर्ष आहे बाळा! तू तुझं नुकसान करून घेऊ नको. मानसीला रोज भेटायला येत जा; पण कॉलेज आणि अभ्यास पुन्हा सुरू कर… तुझे, तुझ्या आईचे खूप उपकार आहेत आमच्यावर… आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू." सुधीरराव हात जोडत बोलले.


"काका, प्लिज…! अहो, मानसी माझी मैत्रीण आहे… तिच्यासाठी जे केलं ते फक्त मैत्री या नात्याने…" राघव बोलला.  सुधीररावांनी त्याच्या खांद्यावर हात थोपटला. दुसऱ्यादिवशी पासून राघवने कॉलेजमध्ये जाणं सुरू केलं. कॉलेजमध्ये जाताना तो हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसाठी डब्बा पोहोचवून जात होता.कॉलेज संपल्यावर तो संध्याकाळी मानसीला भेटायला येत होता. मानसीला दुरूनच बघून निघून जात होता.


दोन तीन दिवस गेले. एक दिवस सकाळच्या वेळी नर्स ड्रेसिंग ट्रॉली घेऊन मानसीच्या रूममध्ये गेली.


"काय करायचंय सिस्टर?" मानसी


"डॉक्टर येतीलच आता.चेहऱ्यावरचं ड्रेसिंग बदलून देतील." नर्स


"पुन्हा बांधणार का असंच?" मानसी


"सर ठरवतील." नर्स बोलली. थोड्यावेळात डॉक्टर आले. त्यांनी मानसीच्या चेहऱ्यावरचं ड्रेसिंग काढलं.


"डॉक्टर, मला माझा चेहरा आरशात बघू द्या ना… आई म्हणे की लागलंय… एवढं असं काय लागलं असेल बरं.." मानसी


"मिस मानसी, खरंतर तुम्हाला लागलं नाहीये… तुम्हाला आठवतं ना त्यादिवशी काय झालं होतं ते." डॉक्टर जखम स्वच्छ करत बोलले.


"हो, त्या वीरेनसोबत माझं भांडण झालं होतं… त्याने काही तरी गरम फेकलं हो चेहऱ्यावर… डॉक्टर, गरम फेकलं तर भाजायला हवं ना? मग आई कसं म्हणे की लागलंय." मानसी


"बरोबर… गरम फेकलं की भाजतंच… आणि भाजलंच आहे… आय एम सॉरी टू से… तुमच्यावर ऍसिड अटॅक झालाय.


"काय?" मानसी किंचाळलीच! तिने भिंतीकडं पाहिलं… तिथे लावलेल्या आरशात तिला भयाण सत्य दिसलं…. मानसीला राग अनावर झाला होता… चिडून ड्रेसिंग ट्रॉलीवरची औषधी बाटली उचलून तिने आरशावर भिरकावली. मानसीच्या मानासारखेच आरशाचे तुकडे तुकडे… तिच्या सौन्दर्यासारखे ते इतस्ततः विखरले… कदाचित पुन्हा पूर्ववत न होण्यासाठी…

क्रमशः


(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. समाजात घडणाऱ्या काही अनिष्ट गोष्टींवर या कथेद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा वाईट संदेश पोहोचविणे हा या कथेचा उद्देश नाहीये.)


© डॉ. किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//