हे जीवन सुंदर आहे (भाग ३२)

कथा मानसीची.... तिच्या संघर्षाची




हे जीवन सुंदर आहे! (भाग ३२)


मुसळधार पाऊस सुरूच होता. राघव मानसीला जवळ घेऊन खूप रडत होता. मानसी बेशुद्ध झाली होती. पावसामुळे रस्त्यावर फारशी वर्दळही नव्हती. राघव भानावर आला, आजूबाजूला कुठे मदत मिळते का ते बघू लागला. तेवढ्यात तिथून एक ऑटोरिक्षा जात होती, राघवने त्या रिक्षावाल्याला थांबवलं. त्यात दोन माणसं बसलेली होती. त्यांना परिस्थितीच गांभीर्य कळलं. त्यांनी राघवला मानसीला रिक्षात बसवण्यात मदत केली.


"कोणत्या दवाखान्यात घेऊ?" रिक्षावाला


"भाऊ, शहरात जो सगळ्यात चांगला दवाखाना असेल तिथे न्या." राघव म्हणाला आणि रिक्षावाल्याने शक्य तितक्या फास्ट रिक्षा नेली.

एका मोठ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलजवळ रिक्षा थांबली. रिक्षातला एक माणूस लगेच उतरून धावत आत गेला. त्याच्यासोबत दोन वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन आले. सगळ्यांनी मिळून मानसीला रिक्षातून बाहेर काढलं आणि स्ट्रेचरवर झोपवलं. दोन्ही वॉर्डबॉय जलद गतीने स्ट्रेचर इमर्जन्सी रूमकडे नेत होते.


"थांबा एक मिनिट! तुम्हा दोघांना कळत नाहीये का की बर्न केस आहे ही… ऍसिड हल्ला झालेला दिसतोय… आधी पोलीस केस होईल मग बाकीच्या गोष्टी… आणि पेशंट ऍडमिट करायच्या आधी काही रक्कम ऍडव्हान्स जमा करावी लागेल त्याचं काय?" रिसेप्शनिस्ट तिच्यासमोरून स्ट्रेचर नेताना त्या दोन वॉर्डबॉयवर अक्षरशः खेकसली. डॉ. नकुल तिथून जात होते, रिसेप्शनिस्टचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं.


"काय नाव तुमचं? मिस. संगीता… काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुमच्या मते मग अशा पेशंटच्या नातेवाईकाने पेशंट घेऊन आधी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे… मग पोलीस केस करून तोपर्यंत पेशंट वाचला तर पोलिसच त्याला दवाखान्यात घेऊन येतील, हो ना? व्हॉट अ नॉनसेन्स! आणि अजून काय… पैसे जमा करण्यासाठी बोललात ना… तुमचं कोणी असतं तर तुम्ही आधी पैसेच घेतले असते, नाही? पेशंटला ताबडतोब इमर्जन्सी रूममध्ये शिफ्ट करा, कळलं? आणि हॉस्पिटलच्या प्रोटोकॉल नुसार पोलिसांना तुम्ही इंफॉर्म करा… या अशा तुमच्यासारख्या मनोवृत्तीच्या लोकांमुळे डॉक्टर लोकांच नाव खराब होतं." डॉ. नकुल रिसेप्शनिस्टवर खूप चिडले. 


वॉर्डबॉयनी तोपर्यंत मानसीला इमर्जन्सी रूममध्ये शिफ्ट केलं होतं. 


"मी डॉ. नकुल, प्लास्टिक सर्जन आहे. हे माझंच हॉस्पिटल आहे. कितीवेळ झाला ऍसिड अटॅकला?" डॉ. नकुल


"अर्धा तास झाला असेल सर…" राघव


"ओ. के. तुम्ही पेशंटचे कोण?" डॉ. नकुल


"सर, मी मित्र आहे तिचा." राघव


"ठीक आहे. पेशंटच्या घरचे किंवा तुमच्या घरचे बोलावून घ्या. पोलिसांना योग्य ती मदत करा. मी तोपर्यंत पेशंट बघतो आणि नंतर तुमच्यासोबत बोलतो." डॉ. नकुल राघवच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवून बोलून गेले. 


राघवला थोडा धीर आला. त्याने त्याच्या घरमालकाला फोन करून माईला फोन देण्यास सांगितले.


"माई, अग मी बोलतोय, राघव… हे बघ घाबरू नकोस… मानसीची तब्येत खराब आहे त्यामुळं तिला दवाखान्यात ऍडमिट केलं आहे. मी हॉस्पिटलचा पत्ता देतो त्यावर तू आणि रजनी ये. येताना घरात असतील तेवढे पैसे सोबत आण आणि जमलं तर आपल्या घरमालक काकांनी काही मदत केली ते तर पण पैसे आण." राघव एकादमात बोलला.


"कारे? काय झालं अचानक?" माई खूप काळजीने विचारत होत्या.


"माई, तू जास्त टेंशन घेऊ नको. तू इकडे आली की मी तुला सांगतो." राघवने फोन ठेऊन दिला. दुसरा फोन हॉस्टेलच्या वॉर्डनला लावला आणि त्यांना मानसीच्या घरी कळवायला लावलं. माई आणि रजनी राघवने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचल्या. राघवने घडलेली सगळी हकीकत माईंना सांगितली. हॉस्पिटलचे पैसे जमा केले. तोपर्यंत डॉ. नकुल बाहेर आले.


"डॉक्टर, मानसी कशी आहे?" राघव


"मानसिक धक्का बसलाय खूप मोठा, त्यामुळे बेशुद्ध आहेत, अजून नक्की काही सांगता येणार नाही. आम्ही योग्य ते उपचार सुरू केले आहेत. ऍसिड अटॅक झालेला आहे, पण नशीब हे म्हणावं लागेल की डावा डोळा शाबूत राहिला. चेहरा, मान, डाव्या बाजूचे केस जळलेत. आपण त्यावर  प्लास्टिक सर्जरी करू शकतो. दोन-चार किंवा जास्त ऑपरेशन लागतील. ती सगळी एका वेळेला होणार नाहीत, काही दिवसांच्या गॅपने करावी लागतील." डॉ. नकुल


"सर, पावसात भिजल्याने जखम जास्त खराब झाली का? सर, रस्त्यात मला चटकन मदतच मिळाली नाही." राघव हतबल होऊन बोलत होता.


"पावसाची मदतच झाली म्हणावं लागेल. आपल्याला भाजल्यावर आपण नळाखाली हात धरतोच ना… तसंच समजा हवं तर. बरं मानसीच्या घरुन कोणी आलंय का?" डॉ. नकुल


"सर मी कळवलं आहे, मानसीचे आईवडील इथे नसतात. त्यामुळे त्यांना यायला वेळ लागेल." राघव


"इट्स ओ.के. आपण योग्य ती ट्रीटमेंट सुरू केली आहे. मानसीला सध्या आम्ही आय. सी. यु. मध्ये हलवतोय. तिच्यासाठी जे चांगलं असेल ते सगळंच करू आपण." डॉक्टर बोलले आणि निघून गेले.



रात्रीचे साडे अकरा वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. काही केल्या मात्र मंदाताईंना झोप लागत नव्हती. त्यांनी सुधीररावांना आवाज दिला.


"काय ग मंदा? काय झालं? काही त्रास होतोय का? बरं वाटत नाहीये का?" सुधीरराव मंदाताईंच्या कपाळाला हात लावत बोलले.


"खूप घाबरल्यासारखं होतंय…एक वेगळीच बेचैनी जाणवत आहे. आपल्या मुली ठीक असतील ना हो? गौरी तर आताच येऊन गेली… मनू…  मनू ठीक असेल ना…? मनूला भेटायची खूप इच्छा होतेय… आपण एक दिवस जाऊन येऊया का?" मंदाताई


"तू तर असं करतेय जसं की मुली दोन दिवसांपूर्वी घराच्या बाहेर पडल्यात शिक्षणासाठी…  एव्हाना सवय व्हायला हवी ना तुला… बरं, तू म्हणतेस तर पुढच्या रविवारी वगैरे जाऊन येऊ." सुधीररावांनी मंदाताईंची समजून काढली. मंदाताई खूप घाबरलेल्या होत्या. त्या उठून देवघरात गेल्या आणि तिथे बसून नामस्मरण करत होत्या. तेवढ्यात घरातला लँडलाईन खणकला. त्या आवाजाने मंदाताईंच्या काळजात एकदम धस्स झालं. सुधीररावांनी फोन उचलला. मंदाताई त्यांच्या मागे जाऊन उभ्या राहिल्या. सुधीरराव कोणासोबत तरी बोलले आणि त्यांच्या हातातला रिसिव्हर गळून पडला.


"काय झालं? कोणाचा फोन होता?" मंदाताई काळजीने बोलत होत्या.


"मानसीच्या हॉस्टेलच्या वॉर्डनचा फोन होता. मनूची तब्येत चांगली नाहीये. दवाखान्यात भरती आहे ती. आपल्याला ताबडतोब तिकडे बोलवलं आहे." सुधीररावांच्या आवाजाला कम्प सुटला होता. हे ऐकून मंदाताई मटकन खाली बसल्या. सुधीररावांनी गावातल्या एकदोन ओळखीच्या लोकांना फोन लावले आणि ड्रायव्हरला घेऊन दोघे मानसीकडे जायला निघाले. पावसाचा जोर कायमच होता. रस्त्यावरच नीटसं दिसतही नव्हतं. कारमध्ये एक भयाण शांतता होती.


मंदाताई  आणि सुधीरराव पहाटे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सुधीरराव रिसेप्शन काउंटरवर मानसीची विचारपूस करत होते. राघव तिथेच वेटिंग एरियात होता. सुधीररावांनी मानसीचं नाव घेताच तो त्यांच्या जवळ गेला.


"काका, मी राघव. मानसीचा क्लासमेट… मीच मानसीला हॉस्पिटलमध्ये आणलं. या इकडे…" राघव


सुधीरराव आणि मंदाताई राघवसोबत गेले. ते आय.सी.यु. च्या बाहेरच्या काचेतून मानसीला बघत होते. बेडवर मानसी निपचित पडलेली होती. मानसीच्या चेहऱ्यावर पांढऱ्या पट्ट्या लावलेल्या होत्या.


"काय झालं मानसीला?" मंदाताई


"काकु… तिच्यावर ऍसिड हल्ला झालाय…" राघवने खाली मान घातली.


"काय…!" मंदाताईंना भोवळ आली. माईंनी त्यांना तिथल्या खुर्चीवर बसवलं, प्यायला पाणी दिलं.


"तूच तर केला नाहीस ना?" सुधीररावांनी राघवची कॉलर पकडली. रागाने त्यांचे डोळे लाल झाले होते.


"मी केला असता तर माझ्या आईला आणि बहिणीला इथे सोबत घेऊन रात्रभर नक्कीच बसलो नसतो." राघव शांतपणे म्हणाला. सुधीरराव थोडे शांत झाले. त्यांनी बाजूला पाहिलं, माई आणि रजनी तिथे होत्या.


"मग कोण आहे तो नराधम? तू नाव सांग त्याचं… आताच्या मी पोलिसाच्या हवाली करतो त्याची…" सुधीरराव चिडून बोलले.


"वीरेन… वीरेन चौधरी नाव आहे त्याचं…! मी कालच त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली… एव्हाना तो पकडला गेला असेल…" राघवने वीरेनचं नाव घेताच मंदाताई आणि सुधीरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. 


क्रमशः


(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. समाजात घडणाऱ्या काही अनिष्ट गोष्टींवर या कथेद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा वाईट संदेश पोहोचविणे हा या कथेचा उद्देश नाहीये.)


© डॉ. किमया मुळावकर


🎭 Series Post

View all