Login

हे जीवन सुंदर आहे (भाग ३१)

कथा मानसीची...तिच्या संघर्षाची
हे जीवन सुंदर आहे! (भाग ३१)

वीरेनने मानसीच्या बर्थडेसाठी हॉटेल सिटी प्राईडच्या छोट्याश्या फंक्शन हॉलमध्ये पार्टीची तयारी केली होती. हॉलमध्ये सगळीकडे वेगवेगळ्या रंगांचे मंद दिवे लावले होते, सुगंधित कँडल लावलेल्या होता, ठिकठिकाणी सुंदरसे फ्लॉवर पॉट ठेऊन त्यात महागडी फुलं सजवली होती. मध्यभागी एक टेबल ठेवून त्यावर एक सुंदरसा केक ठेवला होता. एक मोठा बुके घेऊन वीरेन मानसीची वाट बघत होता. इकडे राघवही केवळ मानसीने बोलावलं म्हणून, मानसीच्या मैत्रीसाठी, काळजावर मोठा दगड ठेऊन सिटी प्राईडच्या दिशेने निघाला होता. त्याचं मन इतकं नाराज होतं की त्याची सायकल अगदी संथ गतीने जात होती.



संध्याकाळ झाली होती. मानसी सिटी प्राईडमध्ये पोहोचली होती, तिच्यासोबत प्रिया आणि अर्चना होत्या.


"हॅपी बर्थडे गोर्जीअस…!" वीरेन बुके समोर करत बोलला. मानसीने तो बुके घेतला आणि ताडकन जमिनीवर फेकून दिला.


"मानसी, हा काय प्रकार आहे?" वीरेन जोरात खेकसला.


मानसीने त्याच्या कानशिलात जोरात एक झापड मारली.


"मला विचारतोस, हा काय प्रकार आहे?" मानसी रागाने लालबुंद झाली होती.


"ए… " वीरेन पुढचं बोलणार त्यावर मानसीने त्याला अजून एक झापड मारली.


"लाज नाही वाटत का रे तुला? पोरीच्या भावनांशी खेळतोस… तुझ्या पैशाचा माज दखवतो… तुला काय वाटलं, पैसे फेकले की सगळं मिळतं…!" मानसी चिडून बोलत होती.


"नीट बोलयचं हां… आहे माझ्याजवळ पैसा… आणि दाखवेन मी माज… तुला काय करायचंय…?" वीरेनही चिडून मानसीच तोंड दाबत तिला भिंतीजवळ लोटत बोलला.


"मला काय करायचंय! या प्रियाच्या पोटात जे काही वाढतंय ना… त्याला तू जबाबदार आहेस… कळलं?" मानसी अजून चिडली होती. प्रियाचं नाव ऐकताच वीरेनची मानसीवरची पकड सैल झाली.


"निर्लज्ज… ! खूप मोठे मोठे स्वप्न दाखवलेस तिला… तिचा हवा तसा वापर करून घेतलास आणि आता तिच्या लेकरचा बाप होणार आहेस तर तिला अबोर्शन करायला लावलं तू…!" मानसीच्या डोळ्यांत आग होती.


"हे बघ मानसी ही प्रिया काहीपण बोलतेय… माझ्यापेक्षा जास्त तुझा हिच्यावर विश्वास आहे का? अगं मला किती लहानपणापासून ओळखतेस तू! खरं तर तू हीच तोंड बंद करायला पाहिजे." वीरेन तिरस्काराने प्रियाकडे बघत बोलत होता.


"वीरेन, एक स्त्री आपली इज्जत अशी चव्हाट्यावर तर मुद्दाम तर आणणार नाही ना… आणि मी ज्या वीरेनला लहानपणापासून ओळखते तो हा वीरेन नाहीच…! तो वीरेन वेगळाच होता…! माझी काळजी करणारा…!  स्वतःला काही मिळालं तर माझ्यासाठी जपून ठेवणारा…! ज्याचं विश्व मीच होते…! तुला असलं घाणेरडं काम करताना एकदाही माझी आठवण आली नाही… आता जे करून ठेवलंस ना ते सगळं नीट सांभाळ, नाही तर…" मानसी


"नाही तर…? काय गं…? काय करशील?" वीरेनने मानसीचा हात तिच्या पाठीमागे गच्च आवळून धरला.


"मी पोलिसात जाईल… पोलिसात तुझी कम्प्लेन्ट देऊन येईल." मानसी चिडून बोलली.


"पोलिसांत जाशील का? खुशाल जा… तुझ्या मैत्रिणीचे प्रेमपत्र, फोटोज आहेत म्हटलं माझ्याजवळ…!" वीरेनने तिचा हात अजून जोराने पिळला.


"वीरेन का केलंस असं तू?" मानसी


"ए महानतेची देवी….! समजते काय गं तू स्वतःला? एवढं तुझ्या मागे मागे करायचो… तर तुझे सो कॉल्ड उपदेशाचे धडे असायचे…. आता हे नाही करायचं… नंतर ते नाही करायचं… काय तर म्हणे आधी करिअर… मग लग्न आणि मग….  अग चिक्कार पैसा आहे माझ्याजवळ! तू मला कधी तुझ्याजवळ येऊच दिलं नाहीस… कधी तुझा हातही पकडला तर तू तो लगेच झटकायची… आपल्या बॉयफ्रेंडला कसं खुश ठेवायचं हे विचार तुझ्या त्या मैत्रिणीला… ती पण आता आलीये तणतणत… पैसा फेकत होतो, महागडे गिफ्ट देत होतो तेव्हा तिची इज्जत गेली नाही का? आली मोठी….! या असल्या मुलींची हीच लायकी असते… या असल्या पन्नास मुली फिरवू शकतो मी, कळलं का?" वीरेनने बोलता बोलता तिथे ठेवलेली एक दारूची बॉटल उघडली आणि एका दमात सगळी दारू पिऊन टाकली.


"वीरेन, तू दारू ही पितोस!" मानसीच्या डोळ्यांत चीड होती, आवाज कापरा झाला होता.


"हो, पितो… रोजच पितो! सिगारेटही फुकतो… आणि तुला माहिती मी कसा पास झालो… तू शिकवल्यामुळे नाही बरं! माझ्या मामाने विद्यापीठात पैसा फेकला… आणि मी कॉलेजमध्ये आलोच तुझ्यासाठी…! तुला मिळवायसाठी! तू काही हाती लागत नव्हती… मग हीच चिमणी अडकली माझ्या जाळ्यात… अजूनही काही अडलं नाहीये… या प्रियाचा निकाल लावू आपण… तू माझी हो…. तुला मी फुलात ठेवेल…." वीरेन मानसीच्या गालावरून घाणेरड्या प्रकारे हात फिरवत बोलला. 


"शी….! मी आणि तुझी… वाट बघ! मी तुझी तर कधीच होणार नाही… प्रियाला मात्र नक्की न्याय मिळवून देईल…." मानसीने त्याचा हात झटकला. 


"मानसीssssss!" वीरेन किंचाळला.


मानसी तावातावाने तिथून निघाली.


"राघवने कितीदा मला वीरेनबद्दल सांगायचा प्रयत्न केला… पण मी… मी त्याचं कधी काही ऐकूनच घेतलं नाही… वीरेन नावाचा पडदा होता माझ्या डोळ्यावर…! आणि तो किती घाणेरड्या प्रकारे माझ्या डोळ्यावरून निघाला! मी पहिल्यांदा माणूस ओळखायला चुकले…! खरंतर मी चुकीच्याच माणसावर प्रेम केलं! प्रेम…. या शब्दाचीही आता किळस येते मला…." मानसी स्वतःशीच बडबडत निघाली होती.


"मानसी…." वीरेन मागून ओरडत आला.


"तुझा आणि माझा कोणताच संबंध नाहीये…" मानसी


"हे बघ… जास्त शहाणपणा करू नको… चुपचाप तू केलेला राडा आवर… " वीरेन


"मी केला का राडा? की तू केलास सगळा घाणेरडा प्रकार? आता तुझा आवाजही ऐकायची इच्छा नाहीये माझी." मानसी तिथून तावातावाने निघाली. वीरेनने मागून तिचा हात ओढला.


"मानसी… हे बघ… ठीक आहे चुकलं माझं…. मी… मला…" वीरेन झोकांड्या खात बोलत होता. मानसीने त्याचा हात झटकला आणि ती तिथून निघाली.


राघव हॉटेल सिटी प्राईडच्याजवळ आला होता. त्याला मानसी तिथून रडत जाताना दिसली. राघवने तिला आवाज दिला; पण मानसीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. राघव मानसीकडे बघत तिथेच उभा होता. इतक्यात वीरेन मानसीच्या मागे गेला. राघवला वीरेन रागात वाटला.


"नक्कीच काहीतरी मॅटर झालंय… पण या दोघांमध्ये मी जाऊ की नको…? मानसीला माझी गरज लागली तर? काय करावं? मी त्यांच्यामध्ये बोललेलं मानसीला नाही आवडलं तर? जास्तीत जास्त चिडले ती… पण माझं मन का म्हणतंय की मी आत्ता, या क्षणाला मानसीसोबत असावं." राघव विचारातच मानसीच्या मागे निघाला.


"मानसी… तुला थांब म्हणतोय ना… हे बघ तू फक्त माझी आहेस आणि मी तुला दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही… समजलं?" वीरेन मानसीच्या मागे जात ओरडत बोलत होता.


"कर तुला काय करायचं ते? मानसीला तू गमावलंस आता… अगदी कायमचं…" मानसी त्याच्याकडे बघून चिडून बोलली आणि पुन्हा झपाझप पावलं टाकत निघाली. पावसाच्या सरींना सुरुवात झाली होती. राघवही मागून येत होता.


"मानसीssssss" वीरेन अक्षरशः किंचाळला. मानसीने मागे वळून पाहिलं आणि एक जोरदार किंकाळी आसमंतात पसरली. राघवने पाहिलं… एवढ्या वेळ हातात सायकल धरून तो चालत होता. त्याच्या हातातली सायकल पडली. तो मानसीच्या दिशेने धावू लागला. धावता धावता एक दोनदा अडखळला. पावसानेही चांगला जोर पकडला होता. मानसी जमिनीवर कोसळली होती. वीरेनने तेथून पोबारा केला होता. राघव मानसीजवळ पोहोचला. त्याने मानसीला सरळ केलं. वीरेनने मानसीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं होतं. त्यात तिच्या चेहऱ्याची डावी बाजू, मान आणि डाव्या बाजूचे सगळे केस जळून चिपकले होते. मानसी वेदनेने विव्हळत होती.


"मनूssssss." मानसीला जवळ घेऊन राघव ढसाढसा रडत होता. पाऊस अजून जोरात कोसळत होता. दोन क्षणांसाठी काय करावं हे राघवला कळलंच नाही… पण तो लगेच भानावर आला. आजूबाजूला काही मदत मिळते का ते बघू लागला. मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्ताही अगदी सुनसान होता.


क्रमशः


(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. समाजात घडणाऱ्या काही अनिष्ट गोष्टींवर या कथेद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा वाईट संदेश पोहोचविणे हा या कथेचा उद्देश नाहीये.)
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all