हे जीवन सुंदर आहे (भाग ३०)

कथा मानसीची

हे जीवन सुंदर आहे! ( भाग ३०)

मानसीने राघवसोबत अबोला धरून एक आठवडा झाला होता. राघवने एकदा-दोनदा तिच्यासोबत बोलयचा प्रयत्न केला होता; पण मानसीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. 


"राघव, जे झालं ते झालं. तू खूप चांगला मित्र आहेस माझा… आपण आपली मैत्री पुन्हा पहिलेसारखीच ठेवूया का? फ्रेंड्स!" एक दिवस मानसीच राघवजवळ आली आणि स्वतःहून बोलली.


"फ्रेंड्स." राघवने मानसीचा हात पकडला होता.


"पण, तू वीरेनबद्दल काही बोलत जाऊ नकोस… मला नाही आवडत त्याला वाईट बोललेलं आणि त्याच्याबद्दल मला काय वाटतं हे मी तुला सांगू शकत नाही." मानसी थोडी लाजत बोलली. त्यावर राघवने एक स्माईल दिली. मानसीचा मैत्रीचा हात आज पुन्हा हातात आला म्हणून राघव खूप खुश होता. बघता बघता कॉलेजचं तिसरं वर्षही संपून गेलं.


कॉलेजचं चौथं आणि शेवटचं वर्ष सुरू झालं होतं. यावर्षी पाऊसही अगदी बेफाम पडत होता. \"कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे तर आपणही रोजच कॉलेजमध्ये यावं\" अस जणू पावसाने ठरवलं होतं. मानसी मात्र पावसाचा मनमुराद आनंद घेत होती.


"तसंही हे शेवटचं वर्ष… यानंतर सगळ्यांच्याच वाटा वेगळ्या होणार…! मानसीही जाईल… आणि तिच्याबद्दल मला काय वाटतं ते माझ्या मनातच राहिल… त्यापेक्षा तिला सांगूनच टाकतो… जे होईल ते होईल… पुन्हा आयुष्यभराची खंत बाळगण्यापेक्षा आपल्या भावना व्यक्त केलेल्या बऱ्या… नाही का?" राघवने मनाशी निश्चय केला.


यावर्षी त्याचा आणि मानसीचा वाढदिवस नेमका रविवारी आला होता. मानसी वाढदिवसाच्या दिवशी कोणत्या मंदिरात जाते हे राघवला माहिती होतं. ते मंदिर छोट्याश्या टेकडीवर होतं. मंदिराच्या आजूबाजूला बरीच मोकळी जागा होती. राघव सकाळीच त्या मंदिरात पोहोचला. आभाळ अगदी गच्च भरून आलं होतं. सकाळच्या वेळीही अगदी काळोख दाटला होता. राघवने मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि तो मंदिराच्या बाहेर मानसीची वाट बघत बसला.


"पाऊस… वाढदिवस… सगळं अगदी मस्त जुळून आलंय… पण मानसी येईल ना मंदिरात?" राघव विचारात होता तेव्हा त्याला मानसी मंदिरात येताना दिसली. पिस्ता कलरच्या चुडीदार ड्रेसमध्ये ती अजूनच सुंदर दिसत होती. राघव अगदी डोळे फाडून तिच्याकडे बघत होता. हातातली छत्री मंदिराच्या दाराजवळ ठेऊन ती आत गेली. देव्हाऱ्यातली घंटा वाजवून तिने डोळे मिटले. राघवही तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. मानसीची प्रार्थना संपली आणि तिने डोळे उघडले. तिचं लक्ष राघवकडे गेलं. तिने त्याला एक स्माईल दिलं आणि दोघेजण मंदिराच्या बाहेर आले.


"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राघव!" मानसी


"सेम टू यु." राघव एक गुलाबाचं फुल देत म्हणाला आणि दोघे बोलत निघाले. मंदिराची छोटीशी टेकडी उतरून दोघे खाली आले.


"मानसी, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे." राघव


"बोल ना…" मानसी


"खरं सांगू, ज्याक्षणी तुला पहिल्यांदा पाहिलं ना अगदी त्याचक्षणी तुझ्या प्रेमात पडलो गं… तुझे हे गर्द निळे डोळे…! मानसी… या निळ्या डोळ्यांत हरवून जावं वाटतं गं… ! तुला आयुष्यभर साथ देईल अगदी प्रत्येक क्षणात तुझ्यासोबत असेल मी… माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत! आय लव्ह यु मानसी… आय लव्ह यु!" राघव बोलला आणि पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली.


"सॉरी राघव! तुझ्यात मी नेहमीच एक चांगला मित्र बघत आलेय. खरंतर मैत्री म्हणजे काय? एकमेकांना जीव लावणं म्हणजे काय? एकमेकांची वाट बघणं… रुसणं-फुगणं… मनवणं… एकमेकांची काळजी घेणं… एकमेकांच्या आवडी जपणं या सगळ्या गोष्टी मला लहानपणापासून वीरेनमुळे कळत गेल्या… त्याच्यासाठी माझ्या मनात प्रेम ही भावना अगदी मला कळायला लागलं कदाचित तेव्हापासूनच रुजली आहे… राघव, मी वीरेनशिवाय दुसऱ्या कोणाचाच कधी विचारच केला नाही… तुला सांगू, वीरेनने मला आतापर्यंत प्रपोज केलं नाही; म्हणून मीच आज त्याला प्रपोज करणार आहे… त्याने माझ्या वाढदिवसानिमित्त संध्याकाळी हॉटेल सिटी प्राईडमध्ये एक पार्टी ठेवली आहे. त्याने तुला बोलवलं नसेलच… पण माझ्यासाठी तू नक्की ये त्या पार्टीला… माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाच्या क्षणी माझा बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत असावा ही माझी इच्छा आहे… राघव येशील ना?" मानसी 


मानसी बोलली पण राघवच्या तोंडून नंतर एक शब्द देखील निघाला नाही. पावसाचा जोर वाढत होता, मानसीने तिची छत्री उघडली. राघव मात्र पावसात भिजत होता. मानसी काही तरी बोलत होती; पण राघवला जणू काहीच ऐकू येत नव्हतं. इतक्यात अर्चना तिथे आली.


"मानसी, चल लवकर… प्रियाची तब्येत खराब झाली आहे…" अर्चना


"प्रिया… तिला काय झालं? आणि तू तिला दवाखान्यात न्यायचं तर इथे काय करतेय?" मानसी


"ती ऐकेल तर ना… आधी मानसीला बोलावं म्हणतेय… मगच दवाखान्यात जाईल." अर्चना


"ही प्रिया पण ना… बिलकुल ऐकत नाही कुणाचं… तरी तिला काल म्हटलं होतं की इतकी पाणीपुरी खाऊ नको; पण ऐकेल तर शप्पथ! चला, नेऊया तिला दवाखान्यात… तसंही आज रविवार… कोणता दवाखाना उघडा असेल काय माहिती…" मानसी आणि अर्चना बोलत तिथून निघाल्या. मानसीने जाताना राघवला हात हलवून बाय केलं. राघव मात्र एका वेगळ्याच विश्वात होता.


"मानसी, आज पाऊस आवडायला अजून एक कारण मिळालं… डोळ्यातल्या सरी पावसाच्या सरींसोबत किती एकरूप होऊन जातात ना." राघव मनाशीच बोलत होता.


मानसी आणि अर्चना दोघी हॉस्टेलवर पोहोचल्या.


"प्रिया, अगं काय झालं? चल आधी दवाखान्यात जाऊन येऊ." मानसीने काळजीने विचारलं.


"मानसी… गरगरायला होतंय खूप…" प्रियाचा चेहरा मलूल झाला होता.


"उठ, आपण डॉक्टरला एकदा दाखवून येऊ." अर्चना


"नको, वाटेल बरं… मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी मानसी." प्रिया


"बोलणं वगैरे नंतर. आधी डॉक्टरांना दाखवून घेऊ मग बघू." मानसीने प्रियाला दटावलं. अर्चना आणि मानसी प्रियाला घेऊन एका दवाखान्यात गेल्या. रविवार असल्याने ओ. पी.डी. बंद होती; पण मानसीने रिक्वेस्ट केली आणि डॉक्टर प्रियाला तपासायला आल्या. त्यांनी प्रियाला तपासलं आणि काही टेस्ट लिहून दिल्या.


"टेस्ट आताच कराव्या लागतील का मॅडम? बाहेर खूप पाऊस सुरू आहे." प्रिया


"तुम्ही इथेच थांबा, मी लॅबवाल्याला फोन करते. तो येऊन सॅम्पल घेऊन जाईल. रिपोर्ट पण आणून देईल. त्याने रिपोर्ट दिले की इथल्या सिस्टरांना सांगा, त्या मला कळवतील. माझं घर हॉस्पिटच्या वरच्या मजल्यावरच आहे." डॉक्टर बोलून गेल्या. लॅब असिस्टंट येऊन प्रियाचं सॅम्पल घेऊन गेला. तासाभरात त्याने रिपोर्ट आणून दिले. प्रिया आणि मानसी डॉक्टरांच्या चेंबरमध्ये होत्या. अर्चना बाहेर थांबली होती.


काचेच्या दरवाज्यातून आतलं थोडं धूसर दिसत होतं. डॉक्टर काही तरी बोलत होत्या आणि मानसी ताडकन उठून उभी राहिली होती. प्रियाकडे हातवारे करून ती काहीतरी बोलत होती. अर्चना बाहेरून बघत होती. तिला आतलं बोलणं काही ऐकू येत नव्हतं.



इकडे राघव मानसी मंदिरातून गेली तरी बराच वेळ तिथेच उभा होता. मुसळधार पडणाऱ्या पावसात अगदी चिंब भिजून गेला होता. बऱ्याच वेळाने तो घराकडे जायला निघाला. पावसाच्या प्रत्येक थेंबात त्याला मानसीचा चेहरा दिसत होता. मानसीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते.


"मानसी, एकवेळ जीव मागितला असतास तर तोही अगदी आनंदात दिला असता… हे काय मागितलं गं तू?" राघव विचार करत होता. 


"प्रेमात मिळवणच सगळं काही नसतं… त्याहून मोठा असतो तो त्याग… आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आनंदीत ठेवण्यासाठी आपण काहीही करू शकतो आणि त्या व्यक्तीचा आनंद आपल्यापासून दूर जाण्यात असेल तर त्या व्यक्तीला तो आनंद का नाही द्यायचा?" त्याला माईचे शब्द आठवले.


मानसीच्या आनंदासाठी त्याने पार्टीला जायची तयारी केली.


संध्याकाळ झाली होती. दिवसभर कोसळणारा पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. राघव आपली सायकल काढून हॉटेल सिटी प्राईडच्या दिशेने निघाला होता.
क्रमशः
डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all