हे जीवन सुंदर आहे (भाग २)

कथा मानसीच्या संघर्षाची



हे जीवन सुंदर आहे! (भाग २)


मानसी गॅलरीत उभी होती. पावसाची सर तिच्या चेहऱ्यावर आली, तशी ती शहारली. तिनी डोळे घट्ट मिटले. दोन सेकंदासाठी तिला ते थेंब नको वाटले पण पुढच्याच क्षणाला ते हवेहवेसे देखील वाटले.


"मानसीताई, माई बोलवत आहेत." गीताच्या आवाजाने मानसी भानावर आली. लगोलग माईंच्या रुममध्ये गेली.


"काय झालं माई?" मानसी.


"हा टी. व्ही…मेला सुरू होत नाहीये. तेवढा सुरू कर आणि रामायणाची सी. डी. लावून दे बरं जरा." माई.


"अच्छा, सी. डी. लावायची आहे. ते तर काय गीता पण करू शकत होती." मानसी सी. डी. लावत बोलली.


"तिला काय येतंय? उगी इकडंच वायर तिकडं करत बसते." माई काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होत्या.


"खरंच…? " मानसी.


" नाही… म्हटलं तुला थोडा सासुरवास करून बघावं…!" माई.


"माई, तुम्ही आणि सासुवरवास! जमणार आहे का?" मानसी बोलली तशा माई हसल्या.


"जायचं नाही का आज?" माई.


"जायचंय ना. उशीरा जाईन थोडं… म्हणजे आपण दोघीजणी जाऊ." मानसी.


"कुठे गं?" माई.


"आश्रमात. ती अनिता आठवते ना? तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आहे आज. आश्रमातल्या सगळ्याजणी मागे लागल्या होत्या, मग म्हटलं करू. तसं पण अनिताचं हे पहिलंच बाळंतपण, तिच्या घरी असती तर डोहाळेजेवण झालंच असतं ना." मानसी.


"हो गं, गुणाची पोर आहे ती. सासरच्या लोकांना किंमत नाही वाटली तिची. किती त्रास दिला तिच्या नवऱ्याने तिला! संशयी होता म्हणे! \"हे मूल पण माझं नाही\" असं म्हणून मारझोड करायचा म्हणे! बरं  झालं त्याला सोडलं तिने… सुखाचे दोन घास तरी पोटात पडतायत आता तिच्या." माई. 


 मानसीचं माई काय बोलतात त्याकडे लक्षच नव्हतं.


"मानसी, अगं कोणत्या विचारात हरवलीस?" माई.


"काही नाही माई." मानसी दचकून म्हणाली.


"काय काही नाही? सांग बघू, काय झालं? या दोन-चार दिवसात तू जरा शांत शांत वाटत आहेस. स्वरा आणि राघव घरी असेपर्यंत त्यांच्या मागे मागे करतेस; पण तुझ्या मनात काहीतरी दुसरंच सुरू आहे." माई.


"काही नाही ओ माई... काम म्हटलं की थोडंफार टेंशन सुरूच राहणार." मानसी.


"काय टेंशन आहे? बोलून मोकळं हो ना. मनावरचा ताण कमी होईल." माईपण मोठ्या जिद्दीच्या.


"तुम्हाला आठवतं, आश्रमाची आहे ती जागा आता कमी पडतेय म्हणून आश्रमासाठी आपण दोन महिन्यांपूर्वी एक जागा घेतली होती, त्यावर आता काही लोकांनी अतिक्रमण केलं आहे. तेच मग आता… वकिलांसोबत बोला…  कायदेशीर नोटीस पाठवायची की अजून काही करायचं… ते लोक कोण आहेत? त्यांना बोलून काम होतं का नाही..? हेच काम सुरू आहे. ते अतिक्रमण नीट निघालं पाहिजे म्हणजे झालं." मानसी बोलताना थोडी चिंताक्रांत झाली होती.


"होईल गं सगळं नीट. एवढ्या लोकांचे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत. सगळं चांगलंच होईल बघ. राघवसोबत बोल हवं तर. त्याच्या ओळखीचे, मोठ्या हुद्द्यावरचे कोणी लोकं असतील तर तुला तेवढीच मदत होईल." माई.


"नको माई, राघवला आधीच ऑफिसचं टेन्शन काय कमी आहे, अजून हे एक देऊ. सध्या मी माझ्या पद्धतीने हँडल करते सगळं…. आणि तुम्हाला माहितीये ना, मला माझी कामं स्वतःच करायला आवडतात." मानसी.


"बरं बाई कर तुझ्या मनाने. माझी काय मदत लागली तर सांग." माई. 


"असाच मायेचा हात फिरवत जा पाठीवर. कोणतंच संकट मोठं वाटत नाही मग." मानसी माईंच्या मांडीवर डोकं ठेवत बोलली. डोळ्यांतून पाण्याचे थेंब ओघळत होते. माईंनी तिचा चेहरा आपल्या थरथरत्या हाताने वर केला आणि तिचे अश्रू पुसले.


"जरा म्हटलं सासुरवास करते तर होतच नाही बाई." माई चेष्टेने बोलत होत्या.


"अठरा वर्षात जमलं नाही, आता जमेल होय?" मानसी आपले अश्रू पुसत हसत बोलली. तेवढ्यात दुपारच्या जेवणाला काय बनवायचं हे विचारायला गीता तिथे आली. मानसी तिला सांगत होती.


"राहू दे गं आज… घरी काहीच नको बनवू… आश्रमात जातोय ना आपण… तिथे डोहाळेजेवण आहे तर जेवायला असेलच ना? नसलं तरी जे काही खायला असेल तेच खाऊन घेईल मी पोटभर. पुन्हा स्वर्गात गेल्यावर वाटायला नको, \"हे खायचं राहिलं, ते खायचं राहिलं." माई.


"पुरे झालं हां आता… सारखं काय हो म्हणत राहता स्वर्गात जायचं म्हणून… त्यापेक्षा बोलूच नका माझ्यासोबत." मानसी लटके रागावून बोलत होती.


"नाही म्हणणार, ठीक आहे; पण मला थोडं चव बदल खाऊ देत जा गं." माई.


"अहो माई, तिथे आहे जेवणाचा कार्यक्रम, पण तुम्हाला पचेल का बाहेरचं खाल्लेलं? उगी काही त्रास होईल, त्यापेक्षा तुम्ही घरचंच खा." मानसी.


"चांगलं बनवतात तिथे. मी तिथेच जेवण करेन, तेवढाच बदल मला." माई.


"ठीक आहे माई, जशी तुमची इच्छा. तुम्ही रामायण बघत बसा तोपर्यंत मी महत्त्वाचे दोन-चार फोन करून घेते. साडे-बारा पाऊण ला निघू आपण." मानसी माईंसोबत बोलून निघाली. साडे बारा वाजता दोघी सासा-सुना आश्रमात जायला निघाल्या. अर्ध्या तासात दोघी आश्रमात पोहोचल्या.

मानसीने कम्पाउंड वॉलजवळ कार पार्क केली. माई तिचा हात धरून चालु लागल्या. आश्रमाच्या गेट जवळ माई थोड्या थांबल्या.


"माई, काय झालं?" मानसी.


"संजीवनी महिला आश्रम" माईंनी पाटीवरच नाव वाचलं, "मानसी, अगं एवढूसं लावलेलं रोपटं किती मोठं झालंय… खूप कष्ट घेतलेस पोरी… अजूनही घेतच आहेस… खरंच सोपं नव्हतं सगळं… मोठं काम करतेयस… ते पण कोणता गाजावाजा न करता…" माई.


"माई, मी एकटी थोडी आहे, तुम्ही आहात सोबत, या आश्रमतले सगळे काम करणारे सोबत आहेत. सगळ्यांमुळे एवढं शक्य झालं." मानसी.


"मी कुठे गं सोबत तुझ्या… मी तर घरातच असते." माई.


"आता दोन-चार वर्षं झाली घरात आहात म्हणून काय झालं. थोडे आधीचे दिवस आठवा की." मानसी.


"हो गं बाई… तुझ्यासारखी सून मिळाली म्हणून थोडा चौकटीच्या बाहेरचा मी विचार करायला लागले… मजा यायची तेव्हा… दोघी मिळून काम करायचो… आता काही काही प्रसंग आठवले की हसू येतं…तेव्हा किती छोट्या छोट्या गोष्टींचा वैताग यायचा आपल्याला, नवीन सगळं… काही कळायचं नाही… त्रस्त होऊन जायचो दोघीपण…" माई हसत बोलल्या.


"चला, आत जाऊ. सगळे वाट बघत असतील आपली." मानसी म्हणाली आणि दोघी आश्रमात गेल्या. अनिताच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम सुरू होता. अनिता छान फुलांचे दागिने घालून तयार झाली होती, हिरव्या साडीत अजूनच सुंदर दिसत होती. तिला एका फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसवून बाकीच्या बायका मस्त गाणी गात होत्या, काही त्या गाण्यांवर फेर धरून नाचत होत्या.


"कोण कुठल्या बायका…? सगळ्या एकमेकींना धरून राहायला शिकल्या… इथं येताना प्रत्येकीला आपलंच दुःख मोठं वाटत होतं; पण इथं आल्यावर दुसरीच दुःख ऐकून प्रत्येकीने आपलं दुःख बाजूला सारलं… सगळ्यांना कसं एका धाग्यात गुंफून ठेवलंय मानसीने… परमेश्वरा! आता तर कुठे सगळ्या गोष्टी नीट सुरू झाल्या आहेत. आता पुन्हा मानसीची परीक्षा घेऊ नकोस… सकाळी अतिक्रमणाचं काहीतरी म्हणत होती… सगळं निर्विघ्न पार पाडू दे रे बाबा!" माई मनाशीच पुटपुटल्या.


बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. आश्रमातल्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात मानसीचा फोन वाजला. योगेश वकीलांचा फोन होता. योगेश वकील, आश्रमाचे कायदेशीर सल्लागार होते.


"हां, बोला योगेश सर." मानसी.


"मॅडम, आपल्या आश्रमाच्या त्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलंय तिथले लोक म्हणत आहेत, त्यांचा कोणी म्होरक्या आहे म्हणे, विरेनभाई त्याच्यासोबत बोला. तो जे म्हणेल, तसंच हे लोकं करतील म्हणे. विरेनभाई चौधरी नाव आहे म्हणे त्याचं. आत्ताच काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटून आलाय म्हणे, त्याच्या जेलच्या वाऱ्या सुरूच असतात , एकदम गुंड माणूस!" योगेश वकील बोलत होते.


"ठीक आहे. योगेश सर तुम्ही कायदेशीररीत्या जे योग्य असेल ते करा." मानसी बोलली आणि योगेश वकीलांनी फोन ठेऊन दिला.


"विरेन चौधरी. हा तोच तर नसेल?" मानसीच्या डोक्यात शंकांचं काहूर माजलं होतं. एक जोरदार वीज चमकली आणि मानसीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मानसीने दचकून मागे वळून पाहिलं.


"अनिता…" मानसी चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलली.


" काय झालं ताई? माफ करा मला… दोन तीन आवाज दिले तुम्हाला पण तुमचं लक्ष नव्हतं म्हणून खांद्यावर हात ठेवला मी." अनिता चाचरत बोलली.


"अगं केवढी वीज चमकली ना आता… मला भीतीच वाटली. तू कशाला सॉरी वगैरे म्हणतेस. काय म्हणत होतीस बोल? कार्यक्रम आवडला की नाही? काही खावं वाटलं तर सांगत जा आणि काही त्रास झाला तरी लगेच सांगत जा." मानसी.


"हो ताई नक्कीच. मला खरं तर तुम्हाला थँक यु म्हणायचं होतं. माझ्या घरीसुद्धा कोणी एवढं कौतुकाने केलं नसतं जेवढं तुम्ही केलंत आज." अनिता बोलत होती, बोलताना तिचे डोळे भरून आले होते.


"अगं रडतेय का अशी? बाळ रडकं होईल बरं! हास बघू!" मानसी अनिताला समजावत होती, तितक्यात तिचा फोन पुन्हा वाजला. तिने फोन उचलला आणि फोनवर बोलून ती माईजवळ गेली.


"माई,चला निघुया का?" मानसी.


"थांब की थोडं, जाऊयात थोड्यावेळाने, काय घाई आहे?" माई.


"स्वराच्या शाळेतून फोन आला होता, तिची स्कूल बस खराब झालीये आणि पाऊसही सुरू आहे, तिला शाळेतून आणावं लागेल. तुम्ही इथेच थांबा, मी कार आत आणते मग निघू आपण." मानसी बोलली आणि कार आत आणून तिने माईंना कारमध्ये बसवलं. स्वराला आणायला दोघीजणी शाळेच्या दिशेने निघाल्या. पाऊस सुरूच होता. मानसीने शाळेच्या समोर रस्त्यावर कार उभी केली, छत्री घेऊन ती शाळेच्या गेटपाशी जाऊन उभी राहिली. पाचच मिनिटात शाळेची बेल वाजली. मुलं-मुली घोळक्या घोळक्याने बाहेर येत होते. मानसीला स्वरा तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत येताना दिसली, पाऊस सुरू होता तरी हातातली छत्री न उघडताच स्वरा गप्पा मारत चालली होती. मानसीने स्वराला आवाज दिला. स्वराने तिला पाहिलं आणि मित्र-मैत्रिणींना बाय करून ती मानसीजवळ आली.


"आई, तू कशाला आलीस? मी टिचरला सांगितलं होतं की बाबांना सांगा मग ते ड्रायव्हरला पाठवतील." स्वरा चिडचिड करत बोलत होती. मानसीने आपली छत्री तिच्या डोक्यावर धरली.


"अगं, काय झालं मी आले तर? आणि हा काय मूर्खपणा…! पावसात बंद छत्री हातात घेऊन फिरायचं." मानसी बोलत होती तेवढ्यात स्वरा रागारागाने तिथून गाडीच्या दिशेने निघाली. गाडीचा मागचा दरवाजा उघडून तिने पाठीवरची बॅग आणि छत्री मागे सीटवर फेकली आणि तोंड फुगवून गाडीत बसली. तिच्या मागेमागे मानसीसुद्धा गाडीत येऊन बसली. मानसी कार चालवत होती.


"काय झालं गं स्वरा? पावसात कशाला भिजलीस? पुन्हा सर्दी-पडसं झालं तर? दहावीचं वर्ष आहे ना तुझं, उगी आजारी पडून वेळ वाया घालवू नको." माई स्वरासोबत बोलत होत्या. स्वरा मात्र रागाने फुगली होती, माई काय बोलत होत्या ते चुपचाप ऐकून घेत होती. मानसी गाडी चालवताना मागे बघायच्या आरश्यात बघत होती. स्वराचा चेहरा तिला दिसत होता. राग अगदी स्पष्ट जाणवत होता.


"काय करावं या पोरीचं काय माहिती? छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो आजकाल. काही बोलायची सोयच नाही राहिली. जेव्हा बघावं तेव्हा राग आपला नाकावरच…" मानसी स्वराचा विचार करत गाडी चालवत होती. विचारांच्या तंद्रीत घर कधी आलं ते तिला कळलच नाही. तिने गाडी अंगणात पार्क केली. स्वरा तावातावाने गाडीतून उतरली. गाडीचा दरवाजा धाडकन् आपटून ती घरात केली. पावसात भिजलेली ओली बॅग तशीच सोफ्यावर फेकून ती आपल्या रूममध्ये निघून गेली.


"स्वरा…!" मानसी स्वरावर चिडली होती.


क्रमशः

(काय होती संजीवनी महिला आश्रमाच्या स्थापनेची कहाणी… जाणून घेण्यासाठी वाचत रहा हे जीवन सुंदर आहे!

या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. या कथेद्वारे समाजात घडणाऱ्या काही अनिष्ट गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणत्याच प्रकारचा वाईट उद्देश पसरवणे हा या कथेचा हेतू नाहीये.)

(कथा आवडतेय का नाही? आजचा भाग कसा वाटला? नक्की सांगा… आवडली तर लाईक नक्की करा…)


© ® डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all