हे जीवन सुंदर आहे (भाग २९)

Manasi's story

हे जीवन सुंदर आहे! (भाग २९)
 

लाईट आल्यावर रजनीने राघवला अक्षरशः ओढून बाहेर नेलं. माईसुद्धा त्या दोघांच्या पाठोपाठ आल्या.
 

"ट्रिंग… ट्रिंग…." रजनीने सायकलची बेल वाजवली. राघवने त्या सायकलवरून हळूच हात फिरवला.
 

"काय दादू, आवडली ना सायकल?" रजनी
 

"माई, हे सगळं कशाला गं? कशाला उगी पैसे खर्च केलेस? मी पायी जात होतो ना कॉलेजला…" राघव
 

"राघव, किती कष्ट घेशील? अरे तुझ्यासारखे मुलं या वयात गाड्या घेऊन फिरतात… तुला देखील वाटलं असेल ना कधी…पण, माझ्यामुळे तुम्ही लेकरं मन मारुन जगता. सकाळी पेपर टाकायला जायचा तेव्हा त्या मालकाने तुला सायकल दिली होती, ते काम सुटलं तर ती सायकलही गेली… माझंच मेलीचं नशीब फुटकं म्हणून तुमच्याही मागे अशी दरिद्री आली." माईंनी बोलता बोलता डोळ्याला पदर लावला.
 

"असं का बोलतेस माई, तू आम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट दिली आहेस… तुझ्या संस्कारांची शिदोरी… आता बघ तूच… सगळं चांगलं होईल… तुझ्यासाठी मोठं घर बांधेन… त्या घरासमोर मोठं अंगण… आणि अंगणात तीन चार लांबलचक गाड्या बरं का…! तुला, रजनीला आणि मा…" राघव बोलताना मध्येच अडखळला.
 

"आणि मा… काय रे दादू? पुढे बोल की…" रजनी
 

"अगं, मला नवीन नोकरी मिळाली आता… " राघवने विषय बदलत सम्पूर्ण घटना माईंना सांगितली.
 

"होsssssss! पण ते मा… अर्धचं राहिलं की…" रजनी त्याला चिडवू लागली.
 

"ए, रजने…गप हां…" राघव तिला दटाऊ लागला.
 

"हो, पण एका अटीवर… आता तू मला तुझ्या सायकलवरून चक्कर मार." रजनीने हट्ट लावला.
 

"आता नाही बरं रजनी…अंधार पडलाय, त्यात पाऊस पडून गेलाय… हवं तर उद्या मार चक्कर." माई
 

"काय गं माई, मी एकटी कुठे जातेय? दादा सायकल चालवेल आणि मी मागे बसते…" रजनीने खूप तगादा लावला म्हणून मग राघव तिला सायकलवर मागे बसवून घेऊन गेला.
 

"दादू, तुला ती मानसी आवडते ना रे…? प्लिज, खरं खरं सांग…" रजनी
 

"हो आवडते… पण तिचं आणि माझं कसं जमणार बघ ना… ती श्रीमंतीत वाढलेली आहे… आणि आपल्याकडे तर तू बघतेसच ना सगळं… आणि त्याही पेक्षा तिचा एक मित्र आहे… फार श्रीमंत… त्याच्याबरोबरच असते ती सतत." राघव
 

"म्हणजे ते दोघं कपल आहेत का?" रजनी
 

"नक्की माहिती नाही." राघव
 

"दादू, मग तू तिला तुझ्या मनातलं सांगत का नाही? जास्तीत जास्त काय होईल… ती नाही म्हणेल… तुला तुझा मार्ग तरी मोकळा होईल…" रजनी
 

"एकदम एखाद्या म्हाताऱ्या बाईसारखी बोलतेय तू… माझं बघेन मी काय करायचं ते… आता अकरावी आणि बारावी चांगला अभ्यास करायचा… या असल्या गोष्टींसाठी आयुष्य पडलंय… कळलं का?" राघव आणि रजनी दोघे घरी आले. रजनीच्या बोलण्याचा राघव विचार करत होता. आपल्या मनातली गोष्ट एकदातरी मानसीला सांगावी असं त्याला राहून राहून वाटत होतं… त्या विचारतच तो झोपून गेला.
 

दुसऱ्या दिवशी राघव सायकल घेऊन कॉलेजला गेला. तिथे पार्किंगमध्ये सायकल स्टँडवर तो सायकल लावत होता. तेवढ्यात वीरेन तिथे आला.
 

"काय सरपोतदार? बरीच प्रगती केली!" वीरेन त्याच्या सायकलकडे तुच्छतेने बघून बोलला.
 

"तुला जेलसि वाटतेय म्हणजे भरपूरच प्रगती म्हणावी लागेल." राघवने त्याला सडेतोड उत्तर दिले.
 

"ए… जास्त शहाणपणा भरला का अंगात? काल मुद्दाम माझ्या आणि मानसीच्या मागे आला होता ना? आला मोठा डिटेक्टिव्ह!" वीरेनने राघवची कॉलर पकडली.
 

"तुला हवं ते समज." राघवने देखील वीरेनची कॉलर पकडली. तितक्यात वीरेनला मानसी येताना दिसली. त्याने राघवची कॉलर सोडली आणि त्याच्या शर्टवरून हात फिरवला.
 

"बॉईज, काय सुरू आहे?" मानसी राघवच्या मागून येत बोलली.
 

"काही नाही गं, या राघवने सायकल घेतली तर त्याला म्हटलं की पार्टी दे." वीरेन
 

"ओह, अभिनंदन राघव!" मानसीने राघवला शेकहँड केला.
 

"वीरेन, अरे काल तू जो प्रॉब्लेम सांगितला होता ना, त्यासाठी अजून एक खूप चांगलं पुस्तक आहे. चल, तसंही मी लायब्ररीत जातेय तर तुला ते पुस्तक देते…" मानसी वीरेनला ओढत लायब्ररीत नेत होती. वीरेनने जाता जाता राघवला ठेंगा दाखवला. राघवही वर्गात निघून गेला.

दिवसेंदिवस मानसीवर वीरेनची जणू जादू पसरत होती. त्यातल्या त्यात वीरेननी दुसऱ्याच प्रयत्नात सगळे बॅक राहिलेले विषय काढले होते; मानसी अगदी हुरळून गेली होती कारण वीरेन त्याच्या पास होण्याचं श्रेय मानसीला देत होता.
 

दिवस पुढे सरकत होते. एका सायकलमुळे राघवला बरीच मदत झाली होती. आता त्याचा कॉलेजला पायी जाण्या-येण्याचा वेळ वाचत होता, त्यामुळे अभ्यासालाही वेळ मिळत होता. संध्याकाळी कामासाठी हॉटेलवरही तो वेळेत पोहोचत होता. तिथे त्याला बऱ्यापैकी पैसेही मिळत होते. कॉलेजचं दुसरं वर्षही अगदी पंख लावून उडून गेलं.
 

"जरा बरे दिवस आलेत असंच म्हणावं लागेल. आता रजनीला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि शिकून पुढे एकदा का ती तिच्या पायावर उभी राहिली की मिळवलं सगळं. आताच हे तिसरं वर्षं आणि मग पुढचं शेवटचं… पुढच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू… त्यात माझं सिलेक्शन व्हायलाच हवं… मला नोकरी लागली की मी माईला कोणत्याच प्रकारचं काम करू देणार नाही… आमच्यासाठी खूप खस्ता घेतल्यात तिने…" हॉटेवरचं काम संपवून राघव आपल्या विचारात सायकलवर घरी जात होता. तितक्यात त्याला बाईकवर वीरेन दिसला. त्याच्यामागे कोणीतरी मुलगी बसली होती. बाईक रस्त्याच्या कडेला उभी करून ते दोघे काही तरी बोलत होते. राघव त्यांच्यापर्यंत पोहोचणार, तेवढ्यात वीरेननी बाईक स्टार्ट केली आणि ते दोघे तिथून निघाले. त्या मुलीचे केस खांद्याइतके होते, त्यामुळे ती मानसी नक्कीच नाही हे राघवच्या लक्षात आले. रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा नीट दिसला नव्हता; पण एकंदरीत चेहरेपट्टी ओळखीची वाटत होती.
 

"कोण असेल बरं ती मुलगी? आणि वीरेन त्या मुलीला गाडीवर घेऊन एवढ्या रात्री कुठे फिरत असेल? आणि का फिरत असेल?" राघवने विचारातच आपली सायकल अजून जोरात चालवत नेली; पण बाईकचा वेग अतिशय होता. राघव घरी पोहोचला. घडलेला प्रसंग मानसीला सांगायचा असं त्याने मनाशी पक्कं ठरवलं.
 

दुसऱ्यादिवशी तो रोजच्यासारखा लवकर कॉलेजमध्ये गेला. रोज कॉलेजमध्ये लवकर येऊन तो लायब्ररीत पुस्तकं वाचत बसायचा. राघव पार्किंगमध्ये सायकल स्टँडवर सायकल लावून लायब्रीच्या दिशेने निघाला होता. इतक्यात त्याला मानसी दिसली.
 

"हाय मानसी, आज लवकर?" राघव
 

"हो, अरे वीरेनसाठी भरपूर नोट्स काढत असते आणि त्याला थोडं सोप्या भाषेत लिहिलं की बरं पडतं समजायला. खूप वेळ जातो त्यात, मग माझा मला अभ्यास करायला वेळ कमी पडतो म्हणून मग ठरवलं की रोज लवकर लायब्ररीत येऊन अभ्यास करायचा." मानसी
 

"बरं केलंस… ऍक्टच्युअली मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं." राघव
 

"बोल ना… तसही अपल्या आजकाल जास्त वेळच मिळत नाही बोलायला. तुला आठवतं, आधी किती बोलत बसायचो आपण…" मानसी
 

"हो… वीरेन आला तसं सगळं बंद झालं." राघव पुटपुटला.
 

"काय म्हणालास राघव?" मानसी
 

"काल मी हॉटेलवरून परत घरी जात होतो, तेव्हा बाईकवर मला वीरेन दिसला होता आणि त्याच्यासोबत कोणीतरी एक मुलगी होती. रस्त्यावर तेवढा प्रकाश नव्हता म्हणून तिचा चेहरा नीट दिसला नाही." राघवने एका दमात सांगुन टाकलं.
 

"व्हाट? वीरेन आणि रात्री बाईकवर आणि ते ही एखाद्या मुलीबरोबर! मुलांनापण हॉस्टेलवर वेळेचं बंधन आहे म्हटलं आणि त्याहीपेक्षा तो एखाद्या मुलीला घेऊन का फिरेल." मानसी रागाने बोलत होती.
 

"मुलांच्या हॉस्टेलवर तेवढे बंधन नाहीयेत मानसी…  आणि असले तरी मुलं सगळं मॅनेज करतात बरोबर." राघव
 

"हे बघ राघव, हे जरा अतीच होतंय… रस्त्यावरच्या अंधुक प्रकाशात तुला त्या मुलीचा चेहरा नीट दिसला नाही आणि वीरेनचा चेहरा बरोबर ओळखू आला! तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना!" मानसी खूप चिडली होती.
 

"विश्वास ठेव माझ्यावर… तो वीरेनच होता…" राघव
 

"विल यु स्टॉप धिस नॉनसेन्स? राघव तुला वीरेन कधीच आवडला नव्हता… तो आला तेव्हापासून बघतेय मी… ऍक्टच्युअली तू जळतोस त्याच्यावर! म्हणून असले बिनबुडाचे आरोप करतोस त्याच्यावर आणि तू मला सांगायची गरज नाहीस तो कसा आहे ते… तो कसा आहे हे मला माहितीये… लहानपणापासून ओळखते मी त्याला… आणि मी माणसं ओळखण्यात चुकत नाही कधी… पण तुझ्याकडे बघून वाटतंय की यावेळी मी चुकलेय… तुला ओळखण्यात चुकले मी…" मानसी चिडून तोंडाला येईल ते बोलून निघून गेली. राघव हतबल होऊन तिच्याकडे बघत होता. त्याला आता अजूनच मानसीची काळजी वाटायला लागली.

क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all