Feb 23, 2024
नारीवादी

हे जीवन सुंदर आहे (भाग २८)

Read Later
हे जीवन सुंदर आहे (भाग २८)

 

हे जीवन सुंदर आहे! (भाग २८)

 

माईंच्या समजवण्याचा राघववर चांगला परिणाम झाला होता. मानसीची मैत्री अगदी निरपेक्ष भावनेने त्याने स्वीकारली होती, आपल्या प्रेमाला त्याने मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवलं होतं. राघव पहिलेसारखाच मानसीसोबत बोलायचा. राघव, मानसी, वीरेन, शरद, कबीर, दिनेश, अर्चना आणि प्रिया असा आठ जणांचा ग्रुप तयार झाला होता. त्यातही वीरेन बरेचदा आपल्या श्रीमंतीचा थाट सगळ्यांना दाखवायचा, थोडा गुर्मीतच राहायचा. ग्रुपमधल्या कोणालाच त्याचं हे वागणं पटायचं नाही; पण केवळ मानसीसाठी सर्वजण त्याला सहन करायचे.

 

वीरेनच्या एकंदरीत हाय-फाय राहाणीमानामुळे कॉलेजमधल्या जवळपास सर्वच मुली वीरेनवर लट्टू होत्या. वीरेनही थोडा फ्लर्ट करणाराच होता; त्यामुळे कोणतीही मुलगी त्याच्यासोबत बोलायला आली की तो तिच्यासोबत जरा जास्तच लगट करायचा. मानसीबाबत तो मात्र थोडा पझेसिव्ह होता; पण वीरेनचं वागणं राघवला खूप खटकायचं. बरेचदा त्याने मानसीला हे सांगायचा प्रयत्न केला देखील पण मानसीच्या डोळ्यांवर वीरेन बाबत जो पडदा होता तो सरकवून तिला काही बघायचं नव्हतंच. 

 

बघता बघता पहिल्या वर्षाच्या परीक्षा झाल्या आणि सर्वांना अपेक्षित असा रिझल्टही लागला. राघव कॉलेजमधून पहिला आला होता आणि वीरेन राघवच्या अपेक्षेप्रमाणेच सगळ्या विषयांत नापास झाला होता. वीरेन नापास झाल्यावर तरी त्याच्या बाबतीत मानसीचं मत बदलेल असं राघवला वाटत होतं; पण झालं उलटंच. मानसी आता स्वतःहून वीरेनचा अभ्यास घ्यायला लागली होती आणि त्यासाठी ती जास्तीत जास्त वेळ वीरेनसोबत राहू लागली.
 

"मानसी, अगं काल मी एक टॉपिक वाचत होतो, मला थोड्या त्यात अडचणी आहेत… म्हणजे कळतच नाहीये काही. वेळ असेल तर थोडं सांगशील का?" वीरेन मानसीसोबत बोलत होता. कॉलेज सुटल्यावर मानसी आणि ग्रुप कॉलेजमधून परत जात होता, तेव्हा वीरेन मानसीला भेटायला आला होता. सगळ्या विषयात नापास झाल्यामुळे त्याला ए.टी.के.टी. देखील मिळाली नव्हती. त्यामुळे वीरेन मागच्या वर्गात आणि मानसी समोरच्या वर्गात असं झालं होतं.
 

"वेळ असेल तर म्हणजे? तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. प्रिया, अर्चना तुम्हाला वेळ होत असेल तर तुम्ही निघा पुढे. मी मागून येते जरा." मानसी बोलली. राघवच लक्ष होतंच तिच्या बोलण्याकडे. तो हळूच परत मागे गेला. बाकी ग्रुपच्या ते लक्षातही आलं नाही.
 

मानसी आणि वीरेन कॉलेजच्या बाहेर असलेल्या एका कॅन्टीनमध्ये गेले. वीरेनने दोन कप कॉफी सांगितली आणि तो मानसीच्या खुर्चीजवळ त्याची खुर्ची सरकवून बसला. मानसी पुस्तक उघडून त्याला समजवून सांगत होती. वीरेनचं सगळं लक्ष मात्र मानसीकडे होतं. तो हळूच मानसीच्या हाताला हात लावू लागला. मानसीने त्याचा हात झटकला. राघव दुरूनच हे सगळं बघत होता. खरंतर त्याला वीरेनच्या कानाखाली एक वाजवावी वाटली, त्याने रागाने आपल्या हाताच्या मुठी आवळल्या आणि तो कॅन्टीनमध्ये गेला. मुद्दामच त्या कॅन्टीनवाल्या सोबत मोठ्याने बोलू लागला. मानसीला राघवचा आवाज ऐकू आला.

"राघव इथे कसा?" वीरेनचा अभ्यास घेता घेता तिने दचकून वर पाहिलं. राघवचं तिच्याकडे लक्ष होतंच. मानसीने त्याला हात हलवून हाय केलं. राघव मानसीजवळ गेला.
 

"काय, आईस्क्रिम सोडून आता चहाचा धंदा सुरू केला वाटतं?" वीरेननी राघवला मुद्दाम खोचक प्रश्न विचारला.
 

"हो, काय हरकत आहे… काही काही लोकं जे धंदे करतात त्यापेक्षा चहाचा धंदा बरा नाही का?" राघवनेसुद्धा वीरेनला बरोबर सुनावली. 
 

"काय बोलताय तुम्ही! तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?" मानसीने दोघांना उद्देशून प्रश्न विचारला.
 

"मानसी, येतो मी. नंतर करू अभ्यास. तसाही माझा अभ्यासाचा मूडच गेलाय आता. बाय." वीरेन तिथून रागात निघाला.
 

"काही कळत नाही या मुलाचं! विचित्रच वागतो!" मानसी पुटपुटली.
 

"तेच तर तुला सांगत असतो नेहमी." राघवही पुटपुटला.
 

"काय म्हणालास?" मानसी
 

"काही नाही. मीपण निघतो म्हटलं. चल, हॉस्टेलपर्यंत सोडतो तुला." राघव आणि मानसी बोलत बोलत मानसीच्या हॉस्टेलवर पोहोचले. राघव मानसीचा निरोप घेऊन निघाला. आज त्याला उशीर झाला होता. त्यामुळे तो सरळ आईस्क्रिम पार्लवर गेला. तिथे त्याच्या मालकाने त्याला उशीर झाला म्हणून खडे बोल सुनावले.
 

"कधी कधी महत्त्वाचं काम असू शकतं ना? त्यामुळे मला उशीर झाला की तुम्ही माझे तासाने पैसे कापत जा म्हणजे तुमचंही नुकसान नको." राघवने दुकानदारासमोर पर्याय ठेवला.
 

"तुझी मेहनत दिसत नाही का मला? म्हणून तुझ्यासाठी एक चांगली ऑफर घेऊन आलोय. माझा एक मित्र आहे, त्याने नवीनच हॉटेल सुरू केलंय, त्याला संध्याकाळी एकजण त्याच्या हाताखाली हवंय… अकाउंट, बिलिंग वगैरे बघणारं… इथे मिळतो त्यापेक्षा जास्तच पैसा मिळेल तिथे आणि डिनर संध्याकाळी सात वाजता सुरू होतं त्यामुळं तू ही थोडं सावकाश जाऊ शकशील तिथं. कॉलेज वगैरे सगळंच नीट ऍडजस्ट होईल." दुकानदाराने दिलेली ऑफर राघवला आवडली. त्याने नवीन कामासाठी त्याचा होकार कळवला.
 

"जास्त पैसे मिळतील ते बरंच आहे म्हणा… रजनीचे वर्ग आता वाढत आहेत, तिच्या शिक्षणाला पैसे लागणारच. ते लोक बऱ्यापैकी पैसे देत असतील तर माईला स्वयंपाकाचं एखादं घर कमी करायला लावेल. किती दगदग करते ती… आणि कॉलेजमध्येही आज झाला तसा उशीर झाला तरी जॉबच तेवढं टेन्शन राहणार नाही… या सगळ्यातून वेळ मिळाला तर थोडा अभ्यासदेखील नीट होईल. डिग्री नंतर चांगला जॉब मिळायलाच हवा…" राघव स्वतःच्या विचारातच घरी चालला होता. तेवढ्यात एक  पावसाची सर आली. राघवने दोन्ही हात पसरुन पावसाची सर अंगावर घेतली आणि डोळे मिटले. त्याला मानसीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरचे, केसांवरचे पावसाचे थेंब आणि त्यात तिचे निळे डोळे….
 

"माई, तू कितीही समजावून सांगितलं तरी माझं पहिलं प्रेम कसं विसरू ग मी…? माझ्या प्रेमाला मैत्रीचं नाव देऊन कसं जगू मी…? खरंच मानसीचं प्रेम मिळवण्या इतकी लायकी नाहीये का माझी? तूच सांग माई, तिचे निळेशार डोळे दिसले की कसं स्वतःला रोखायचं, त्या सागरात हरवण्यापासून? तिचे लांब लांब काळेभोर केस… कसं नाही गुंतायचं त्यात…? तिचा गोड मंजुळ आवाज… कसा ऐकून न ऐकल्यासारखं करायचं…? पावसात भिजू नये म्हणून आपण छत्री घेतो, तरी भिजतोच की थोडंतरी…! माई… तूच सांग या प्रेमाच्या पावसात मी न भिजता कसा राहू…?" स्वतःच्या विचारांच्या द्वंद्वात राघव घरापर्यंत येऊन पोहोचला. पावसात अगदी चिंब भिजला होता.
 

सगळीकडे अंधार होता, वीज गेलेली होती. राघव तसाच घरात आला. माईने औषधाच्या बाटलीत कापडाची वात आणि रॉकेल टाकून चिमणी लावली होती.
 

"अरे दादू, किती भिजलास?" रजनी त्याला पाहून बोलली.
 

"अरे पाऊस चालू होता तर थांबायचं ना कुठेतरी… पटकन कपडे बदलून घे." माई बोलत होत्या पण राघवच लक्षच नव्हतं.
 

"दादू, कुठे हरवला?" रजनीने त्याला खांद्याला हलवून विचारलं.
 

"आज कॉलेजमध्येच उशीर झाला म्हणून मग तिकडूनच कामावर गेलो. माई मला असा कधी उशीर झाला तर वाट बघत जाऊ नको. मी सगळं आटोपून घरी येत जाईल." राघव केस पुसत बोलला.
 

"बरं, असं सांगितलं की काळजी वाटत नाही." माई
 

"ही लाईट कधी येईल काय माहिती, दादू तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बरं." रजनी
 

"त्यासाठी लाईट कशाला हवी? दाखव की… चिमणीच्या प्रकाशात दिसेल ना." राघव
 

"घरात असतं तर लगेच दाखवलं असतं ना… बाहेर आहे… आणि हवा बघ किती सुरू आहे… चिमणी बाहेर नेली तर विझून जाईल ना…!" रजनीची भुणभुण सुरू होतील. तेवढ्यात लाईट आली.
 

"येsssss… दादू लवकर चल बाहेर…" रजनीने राघवला अक्षरशः ओढतच नेलं. माईसुद्धा त्याच्यासोबत बाहेर आल्या.
 

"दादू, हे बघ…आवडलं का सरप्राईज?" रजनी उत्सुकतेने विचारत होती. राघवच्या डोळ्यांत मात्र अश्रूंची गर्दी झाली होती

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//